Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा: चिंता करणं सहजपणे सोडायला शिकवणारी गोष्ट…

bodhkatha featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होती. वडिलोपार्जित संपत्ती, अफाट शेतजमीन आणि आलिशान वाडा या गोष्टी त्याच्यासाठी अत्यंत सामान्य गोष्टी होत्या. या सगळ्या संपत्तीच्या जोरावर थोड्या फार प्रमाणात सावकारी करणं, हा त्याचा व्यवसाय घरबसल्या सुरु होता.

सावकारी करत असूनही, गोरगरिबांना मदत करण्याच्या बाबतीत सुद्धा हे महाशय मागे नसत. अडल्यानडल्या लोकांना सढळहस्ते मदत करणं हा त्याचा स्वभाव झालेला होता.

हे सगळं करत असतानाही त्याने अमाप संपत्तीचा केवळ हिशोब लावावा अशा रीतीने घरात लक्ष्मीचा वास होता. पुढील सात पिढ्यादेखील सहज बसून खातील अशी अगणित संपत्ती असून सुद्धा तो समाधानी मात्र नव्हता. त्याला रात्री झोप लागत नसे.

 

 

बराच काळ तो यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र काही केल्या उपाय सापडेना. गावोगावचे हकीम, वैद्य, विविध उपचार पद्धती असे सगळे प्रयत्न करून झाले. त्याला रात्रीची झोप येणं मात्र दुरापास्तच ठरत होतं. कुठल्याशा काळजीने त्याला हैराण केलं होतं. नेमकी कुठली काळजी त्याला आतल्या आता पोखरत होती, हेदेखील त्याला कळत नव्हतं.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : जीवनाच्या शर्यतीत कुठे थांबायचं ते प्रत्येकालाच काळायला हवं!

===

अखेर परिस्थिती इतकी बिकट झाली, की जी कुणी व्यक्ती भेटेल तिला उपाय विचारण्याचा त्यानं सपाटा लावला. त्याच त्याच प्रश्नांना कंटाळून गावकरी सुद्धा त्याच्यापासून लांब राहू लागले, त्याला टाळू लागले. गावातील सर्वाधिक प्रतिष्ठित व्यक्ती असून सुद्धा त्याच्यावर अशी वेळ आली होती.

दिवसेंदिवस त्रास वाढला, मात्र उपाय सापडत नव्हता. त्याच दरम्यान त्या गावात एका ऋषींचं आगमन झालं. प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे, अशी चर्चा कानावर येऊ लागली.

 

 

गावातील अनेक जणांच्या समस्यांवर ऋषिजींनी रामबाण उपाय सांगितल्याचं त्याला कळलं आणि त्याने लगेचंच ऋषिंची भेट घेण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या समस्येचं निराकरण नक्की करतील याचा त्याला विश्वास होता.

साधू बाबांनी जिथे वास्तव्य केलं तिथवर तो पोचला आणि त्यांचा प्रसन्न, हसरा चेहरा त्याच्या नजरेस पडला. समस्येवर उपाय मिळणार यावर त्याची शंभर टक्के खात्री पटली.

“ये बाळा… तू कुठली समस्या घेऊन आलायस हे मला ठाऊक आहे.” असं त्याचं स्वागत झालं. बाबांना आपली समस्या सुद्धा ठाऊक आहे, हे ऐकून त्याला आणखीच बरं वाटलं.

“रात्री झोप न लागण्याच्या तुझ्या समस्येचं आपण नक्की निराकरण करू, फक्त माझं एक साधं काम त्याआधी करशील का?” साधू बाबांनी प्रश्न विचारताच, “होय” असं उत्तर आलं.

“ठीक, मग हा शिधा घे, आणि त्या समोरच्या डोंगरावरच्या झोपडीत एक म्हातारा माणूस राहतो त्याला देऊन ये. साधारणपणे आठवडाभर पुरेल इतका शिधा आहे, असं सांग.”

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : कथा वाचल्यानंतर तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल…

===

साधू महाराजांचं बोलणं, ऐकताच पडत्या फळाची आज्ञा मानून, शिध्याचं गाठोडं घेऊन तो तडक झोपडीकडे निघाला. साधारण दीड-दोन तासांची पायपीट केल्यावर त्या झोपडीपाशी तो पोचला. म्हातारा शांतपणे सावलीत बसून साधना करत होता.

त्या झोपडीच्या आजूबाजूला काहीही नव्हतं. डोंगरमाथ्यावर उभी असणारी ती एकच झोपडी आणि धड चालण्याची सुद्धा ताकद नसावी असा तो म्हातारा, या दोन गोष्टी सोडल्या तर आजूबाजूला केवळ झाडाझुडपांचा पसारा होता.

 

 

शिधा देऊ करता क्षणीच म्हातारा चिडला. तुला कुणी हे करायला सांगितलं, असं म्हणत त्या श्रीमंताला घालवून देऊ लागला.

“अहो बाबा हा शिधा ठेवा, तुमच्या कामी येईल. आठवडाभर पुरेल इतकं जिन्नस आहे.” हे वाक्य ऐकून तर तो अणिकच चिडला. ‘दोन दिवस पुरेल इतका शिधा आहे, तिसऱ्या दिवशी काय करायचं ते माझं मी बघेन’, असं म्हणत त्याने श्रीमंत व्यक्तीला तिथून घालवून लावलं.

त्याक्षणी तो शिधा तसाच्या तसा घेऊन तो साधू महाराजांकडे गेला. शिध्याचं गाठोडं ठेवलं, आणि महाराजांना म्हणाला माझी चिंता दूर झाली.

सात पिढ्यांना पुरेल इतकी अमाप संपत्ती असूनही, मी आठव्या पिढीचं काय होईल याची काळजी करत होतो. तो म्हातारा बाबा परिस्थिती बिकट असूनही, दोन दिवसांनंतर काय होईल याची सुद्धा चिंता मनी बाळगत नाही.

“साधू महाराज मला माझी चूक उमगली, यापुढे मी निष्कारण विवंचनेत राहणार नाही.” असं म्हणत तो आनंदाने घराकडे निघाला, सुखाची झोप घेण्यासाठी…

 

 

बोध

आयुष्यात निष्कारण कुठलीही काळजी करत बसण्यापेक्षा आहे तो दिवस आनंदाने घालवावा आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी ठरेल यासाठी प्रयत्नशील असावं.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : जाणून घ्या, संकटांकडे बघण्याचा साधा, पण वेगळा दृष्टिकोन

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version