आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – डॉ. हर्षल हेमंत भडकमकर
(लेखक टिआयएफआरमधून खगोलशास्त्रात पीएचडी धारक आहेत. त्याच विषयात संशोधन सुद्धा केले आहे.
सध्या एका आंतरराष्ट्रीय खाजगी वित्तसंस्थेत कार्यरत आहेत.)
===
साधारण दोन दशकांपूर्वी महाराष्ट्र सरकारने शिवजयंती पारंपरिक तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया न धरता पाश्चात्य कॅलेंडरच्या तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी जाहीर करावी असा निर्णय घेतला.
अनेकांना हा निर्णय त्यावेळी सोयीचा वाटला असेल. ज्यांचा शिवजयंतीशी संबंध केवळ सुटीपुरताच आहे त्यांना तसे वाटणारच.
हा निर्णय अमलात येऊन आता दोन दशके उलटून गेली असल्याने नवीन पिढीस पूर्वी शिवजयंती तिथीनुसार साजरी होत असे. हे माहितही नसेल. ज्यांचा शिवरायांशी भावनिक संबंध जोडलेला आहे आणि शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाचे भारतीय राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्तित्वासाठीचे ऐतिहासिक महत्त्व जे जाणतात त्यांच्यासाठी मात्र हा मुद्दा सुटीच्या सोयीपुरता मर्यादित नाही.
===
हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख
===
ह्या विषयाचे गांभीर्य समजण्यासाठी सांस्कृतिक वसाहतवाद म्हणजे काय ते पाहिले पाहिजे. वसाहतवाद हा आजच्या स्वरूपात प्रथम मांडला इंग्रजांनी. इंग्रजी राजवट जेव्हा अर्ध्या जगावर राज्य करत होती तेव्हा त्यांनी जेते व जित समाज यांच्या संबंधांचे वसाहतरूपी प्रारूप (मॉडेल) मांडले.
ह्या प्रारूपानुसार जित समाज हे मागासलेले असल्याने त्यांच्या उन्नतीची जबाबदारी ही ब्रिटिश राजवटीच्या शिरावर आहे असे मानले गेले. आणि ही उन्नती घडवायची म्हणजे ह्या सर्व देशी समाजांना त्यांच्या चालीरीती, वागणे-बोलणे ह्या सर्वांत अधिकाधिक ब्रिटिश बनवायचे.
जित समाजांना त्यांची म्हणून काही सांस्कृतिक ओळख आहे हे विसरून जायचे. युद्धात पराभूत झाले किंवा इतर काही मार्गांनी ब्रिटिशांचे राज्य स्थापन झाले म्हणून समाजरचनेच्या इतर सर्व अंगांच्या विषयीसुद्धा ब्रिटिश अथवा युरोपीय रचना आदर्श मानावी ह्याचा बलपूर्वक आग्रह धरायचा.
थोडक्यात म्हणजे ब्रिटिशांनी सामरिक आणि राजकीय विजयानंतर जगभरात सांस्कृतिक वसाहतवाद लादण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिशांच्या पूर्वी जेव्हा मध्यपूर्वेतील इस्लामी राजवटींनी भारतात सत्ता स्थापन केली, तेव्हा वसाहतवाद संकल्पनेस असे सैद्धांतिक स्वरूप नव्हते. मात्र याचा अर्थ ह्या राजवटींनी भारताचा सांस्कृतिक चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केलाच नाही असे नाही.
===
हे ही वाचा – …म्हणून ‘मोहम्मद कुली खान’ याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात घेतलं!
===
अगदी साधे उदाहरण द्यायचे तर मुघलांच्या दरबारात राज्यकारभाराची भाषा कोणतीही भारतीय भाषा नसून फारसी आणि अरबी ह्या मुख्य भाषा होत्या.
शिवाजी महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन ह्या अनुषंगाने करताना केवळ लढाया, राजकीय डावपेच आणि इतर पराक्रम न पाहता त्यांनी राज्यकारभाराची जी घडी बसवली होती त्याकडे लक्ष देऊन पाहिले पाहिजे.
हिंदवी स्वराज्य हे केवळ एक स्वतंत्र राज्य नसून भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्याकडे टाकलेले ते पहिले पाऊल होते हे लक्षात घेतले पाहिजे. शिवरायांची दृष्टी ही संकुचित नसून संपूर्ण भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न त्यांच्या मनात होते. त्यांच्या जीवनातील विविध उदाहरणांतून त्यांची ही दृष्टी दिसून येते.
अगदी पहिल्याप्रथम जाणवणारे उदाहरण म्हणजे भाषाशुद्धीचे… राज्य व्यवहारात यावनी भाषा नकोत म्हणून महाराजांनी राज्यव्यवहार कोष बनवून घेतला.
भाषा हा समाजाच्या सांस्कृतिक व्यवहारांचा आरसा असतो आणि कित्येक संकल्पना जशा स्वभाषेत सांगता येतात तशा परकीय भाषेत अनुवादित करता येत नाहीत हे तत्त्व आता जगन्मान्य आहे. परकीयांचा सांस्कृतिक प्रभाव नष्ट करायचा असेल तर भाषेचा प्रभाव नष्ट करणे हे पहिले आणि प्रभावी अस्त्र आहे हे शिवरायांनी ओळखले होते.
दुसरे उदाहरण म्हणजे धर्मपरिवर्तन. छळाने, बळाने वा लोभाने धर्मपरिवर्तन झालेल्या हिंदूंना सन्मानपूर्वक स्वधर्मात परत आणण्याची अपूर्व पद्धत सुरू करून महाराजांनी समाजास सामाजिक दास्यातून मुक्ततेची दिशा दाखवली.
वृक्षवल्ली, गुरेढोरे यांच्या पालनपोषणाचे नियम, शेतसाऱ्याचे नियम, गुलामांच्या व्यापारावर बंदी यांतून आर्थिक विषयांत भारतीय दृष्टी कोणती हे दाखवून दिले.
वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेणे, ह्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व जाणून त्यानिमित्त वेगळा शिवशक सुरू करणे ह्या सर्व कृत्यांतून समाजाच्या सर्व अंगांमध्ये भारतीय जीवनदृष्टीचा अंगिकार करण्याचा मानस शिवरायांनी पदोपदी जाणवून दिला. आजच्या परिभाषेत बोलायचे तर निर्वसाहतीकरण म्हणजे काय आणि ते व्यवहारात कसे करावे ह्याचा वस्तुपाठच महाराजांनी घालून दिलेला आहे.
हा वारसा आपल्याला चालवायचा आहे का हा आपल्यापुढचा आजचा प्रश्न आहे. स्वतःच्या नावाचा शक सुरू करणाऱ्या शिवरायांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करणे ही सोय असेल, पण त्यातून शिवरायांचा आदर्श जपला जातो आहे का?
मुळात शिवजयंती हा शिवप्रेमींसाठी सोयीचा विषय नसून अभिमानाचा, उत्सवाचा विषय आहे. ह्याच त्यांच्या स्वातंत्र्यविषयक समग्र दृष्टिकोणामुळे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाचा प्रेरणास्रोत बनले.
ह्यासाठीच महात्मा फुल्यांनी शिवजयंती साजरी करायला शंभर वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि तीही फाल्गुन कृष्ण तृतीयेलाच. तेव्हा हा वारसा जर खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा असेल, ‘शिवरायांचे आठवावे स्वरूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ हा उद्देश असेल, तर शिवजयंती ही भारतीय कालगणनेनुसारच साजरी व्हायला हवी.
===
हे ही वाचा – बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.