Site icon InMarathi

फिल्मफेयर पुरस्कार चक्क विकत घेतल्याचं ऋषि कपूर यांनी मान्य केलं आणि…

rishi kapoor filmfare inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या फिल्मी कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कारापासून फिल्म फेयर पर्यंत अनेक पुरस्कार मिळविणार्‍या दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी चक्क पदार्पणातला पुरस्कार विकत घेतला होता. आता हे ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र त्यांनीच काही वर्षांपूर्वी याबाबतीत खुलासा केला होता. हा पुरस्कार कोणता होता आणि तो का विकत घेतला गेला?

आर के बॅनर हे इंडस्ट्रीतलं एक प्रतिष्ठित बॅनर आहे. ऋषी कपूर तर साक्षात रोमान्सचा बादशहा राज कपूर यांचा मुलगा. एका न्यु कमरला पदार्पणासाठी आणखी काय हवं?

 

 

त्याकाळात नेपोटीझम हा शब्दही कोणाला माहित नव्हता. उलट सुपरस्टार्सची मुलं सिनेमात कधी पदार्पण करतात याकडे लोक उत्सुकतेनं पहात असत. त्यांच्या पदार्पणाच्या चर्चाही होत आणि त्यांचे पहिलेवहिले सिनेमे उत्तम चालतही असत.

राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव हा चॉकलेट हिरो म्हणून तरूणींची ‘दिल की धडकन’ बनला तर मनोज कुमार यांचा मुलगा चक्क श्रीदेवीसारख्या आघाडीच्या नायिकेसोबत झळकला. विश्र्वजीतचा मुलगा ऐश्वर्या राय सोबत झळकला आणि हिंदीत करियर डगमगतंय हे बघून बंगाली सिनेमातला सुपरस्टार बनला.

===

हे ही वाचा – ऋषी कपूरजींना ‘अमरत्व’ देणारे हे त्यांचे १० डायलॉग्स लोकांच्या सदैव लक्षात राहतील!

===

कपूर खानदानाच्या तर धमन्यांतून रक्तासोबत अभिनयही वाहतो. पृथ्वीराज कपूर यांचा निळ्या डोळ्यांचा, स्वप्निल नजरेचा राज एक कालखंड गाजवून गेला आणि राज कपूर यांच्या तिनही मुलांनी चित्रपटात आपलं नशीब अजमावून पाहिलं. त्यापैकी सर्वात जास्त यश ऋषी कपूरनं मिळवलं.

 

 

बॉबीची तयारी चालली होती. मेरा नाम जोकरमधून ऋषीचं पदार्पण आधीच झालेलं होतं. आता बॉबीमधून तो हिरो म्हणून चमकायला तयार होता. चित्रपटादरम्यान त्याच्या आणि डिम्पलमधल्या प्रेम प्रकरणाची चर्चाही खूप गाजली. या चित्रपटाची प्रदर्शनानंतरही हवा गरम होती. चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. ऋषीला पदार्पणातच छप्परफाड यश मिळालं.

ते वर्ष होतं, १९७३ चं. हे तेच वर्ष, ज्या वर्षी सिनेमाचा इतिहास नव्यानं लिहिला गेला. याच वर्षी हिंदी चित्रपटसृष्टिला ॲन्ग्री यंगमॅनचा सुप्रसिध्द फॉर्म्युला सापडला आणि हिंदी सिनेमाचा ॲन्ग्री यंग मॅन, ‘अमिताभ’ सुद्धा सापडला. त्याचवर्षी जंजीर प्रदर्शित झाला होता. एका बाजूला तरूणाईला तुफान आवडलेला बॉबी आणि दुसरीकडे त्याच तरूणाईच्या मनातला धगधगता असंतोष पडद्यावर साकारणारा जंजीर.

जरी बॉबीनं तुफान यश मिळवलं असलं, तरीही हे वर्षं खर्‍या अर्थानं होतं अमिताभचंच. कारण यावर्षी त्याचे एकाहून एक हिट चित्रपट झळकले.

जंजीर, अभिमान, सौदागर आणि नमकहराम या चारही चित्रपटात त्याची चार रुपं पहायला मिळाली. अभिनेता म्हणून अमिताभच्या चौफेर फटकेबाजीचं हे वर्ष… याचवर्षी यश चोप्रा आणि राजेश खन्ना यांचा बहुचर्चित आणि सुपरहिट दागही प्रदर्शित झाला. या यादीवरूनच लक्षात यावं, की यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नवख्या ऋषीची कोणाकोणाशी स्पर्धा होती.

 

 

भल्या भल्यांच्या सुपरहिट कामात एक काम ऋषीचं होतं. त्याकाळात पुरस्कारांची चर्चा आदरानं व्हायची. उत्तम कामालाच पुरस्कार मिळतो यावर चाहत्यांचा विश्र्वास होता.

===

हे ही वाचा – “शेवटचा रोमँटिक हिरो” : चिंटू उर्फ ऋषी कपूर…!

===

परस्परांच्या फॅन्समधे तुंबळ युध्दही होत असे हा भाग निराळा. मात्र जंजीर आणि अभिमान हे बच्चनचे चित्रपट पुरस्कारांच्या कमवारीत अग्रणी असताना ऋषीच्या बॉबीनं फिल्मफेयरमधे बाजी मारली. नमकहरामसाठी बच्चनला सहाय्यक भूमिकेचं, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा, अभिनेत्रींमधे जया भादुरी आणि डिंपल कपाडीया विभागून, तर सहाय्यक अभिनेत्री म्हणून राखीला दागसाठी पुरस्कार मिळाले.

नव्वदीचा काळ म्हणजे अमिर खानचा जमाना! आमिर सरळ सरळ या सर्व फिल्मी पुरस्कारांवर बहिष्कार टाकला आणि उघडपणे सांगितलं की माझा या पुरस्कारांवर विश्र्वास नाही कारण इथे पुरस्कार सर्रास विकत घेतले जातात.

 

 

अनेकांसाठी हा धक्का होता. कारण ही  माहिती पहिल्यांदाचा कळत होती आणि ज्यांना हे माहित होतं त्यांनाही धक्का बसला कारण कोणीतरी इतकं उघडपणे बोलेल हे अकल्पित होतं.

एकूणात नव्वदीच्या दशकानं फिल्मी पुरस्कारातली हवा हळूहळू काढून घ्यायला सुरवात केली होती. पूर्वी फिल्म फेयर आणि स्टार डस्टसारखे मोजके पुरस्कार आणि त्यांचे चकाचक सोहळे असत. आता खंडीभर पुरस्कार सोहळे बनल्यानं त्यातलं नाविन्य सरलं. असं असलं तरीही आजही फिल्म फेयरचा दबदबा कायम आहे.

काही वर्षांपूर्वी अचानक खळबळ उडाली ती ऋषी कपूरच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रानं आणि त्यातल्या काही खुलाशांमुळे.

ऋषी पहिल्यपासूनच तिखट आणि बिनधास्त बोलण्याबद्दल प्रसिध्द आहे. या आत्मचरित्रातही असे तिखट आणि बिनधास्त खुलासे नसते तरच नवल.

यातच एक खुलासा होता बॉबीसाठी त्याला मिळालेल्या पुरस्काराचा. बॉबीचा पुरस्कार त्यानं चक्क विकत घेतल्याचा हा खुलासा अनेकांसाठी जोरदार धक्काच होता.

मुळात तो पुरस्कार त्याला मिळाला याबाबत कोणाचीही काही तक्रार नव्हतीच. कारण पुरस्कार मिळण्यासारखं काम त्याने केलं होतंच. मात्र त्याच्या स्पर्धेतली तगडी नावं मागे टाकत त्यानं पटकावलेल्या पुरस्काराबद्दल अनेकांना कौतुकाबरोबरच आश्चर्यही वाटत होतंच.

या पुरस्कार खरेदीबाबत त्याने सांगितलं आहे, की त्यांचं तेव्हा फार अक्कल असण्याचं वय नव्हतं. अवघ्या विसाव्या वर्षी मी अचानकच प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यांचा सिनेमा वाटला होता त्याहून जास्त हिट ठरला आणि मग त्यांना वाटू लागलं, की त्यांना पुरस्कार मिळायला हवा.

 

 

याचवेळेस एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं होतं, की हवं तर तू हा पुरस्कार विकतही घेतला जाऊ शकतो. त्यांच्यासाठी हे नवीनच होतं. या पुरस्काराची किंमत होती त्या काळातली तीस हजार रूपये. कल्पना करा सत्तरीच्या दशकातले तीस हजार. पण ऋषीनं हे पैसे दिले आणि योगायोगानं त्यालाच पुरस्कारही मिळाला.

कदाचित पैसे दिले नसते तरीही तो मिळालाच असता. पण, असमंजस वयात हे काही कळण्याइतकी सारासारबुध्दी नसते. अनेक वर्षांनंतर हा खुलासा करताना त्यानं या वर्तनाबद्दल कायम पश्चात्तापही वाटत असल्याची कबुली दिली आहे.

अमिताभ आणि ऋषी ही पडद्यावरची आवडती जोडी होती. वास्तवातही कपूर्स आणि बच्चन्स एकमेकांचे चांगले स्नेही आहेत. या खुलाशानंतरही या स्नेहात फरक पडला नाही.

अमिताभनं ही जुनी गोष्ट मनावर न घेता जो हो गया उसपे क्या बात करना? असाच पवित्रा घेत त्याला साजेसं आदबशीर मौन पाळलं.

===

हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांचं वेगळेपण नेमकं रेखाटणारा अप्रतिम लेख!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version