Site icon InMarathi

खोटारड्यांचं पितळ उघडं पाडणारं मशीन अन् असेच २९ ‘खास’ पेटंट असणारा भारतीय

ramendra feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गरज ही शोधाची जननी असते. आपण आज सहजपणे वापरत असलेली प्रत्येक गोष्ट ही कधी काळी कोणाला तरी भासलेली गरज होती. त्या दिशेने काही शास्त्रज्ञ मंडळींनी काम केलं आणि मग आपल्याला आपलं काम सहज कसं करता येऊ शकतं हे विज्ञानाने शिकवले.

क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या बातम्यांनी व्यापून गेलेल्या आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने भारतातील किंवा जगातील कोणत्याही ‘शास्त्रज्ञाचा शोध’ ही कधी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलीच नाही.

हेच कारण असावं की, काही अपवाद वगळता भारतीय मुलांमध्ये विज्ञान, नवीन शोध याची आवड जगातील युरोपियन देशातील मुलांपेक्षा कमी आहे.

 

 

शास्त्रज्ञ म्हंटलं की आपल्याला एडिसन, ग्रॅहम बेल आणि आपल्या बॉलीवूडचा रँचो असे काही मोजकेच नावं चटकन आठवतात. थोडं अजून आठवलं तर डॉक्टर सी व्ही रमण, होमी भाभा, विक्रम साराभाई इथपर्यंत आपली मजल जाते.

यात आपला दोष नाहीये. आपल्याकडे जे खपतं तेच परत परत दाखवलं जातं. आपल्या भारतात एक अजून शास्त्रज्ञ आहेत ज्यांच्या नावावर मूलभूत वस्तुंचे एकूण ३० आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांच्या नावावर आहेत.

फार कमी जणांना याचं उत्तर माहीत असेल. ह्या शास्त्रज्ञाची कारकीर्द सुद्धा २१ व्या शतकातच घडली आहे, त्यामुळे फार जुने आहेत असं ही नाहीये. कोण आहेत हे शास्त्रज्ञ? जाणून घेऊयात.

या लेखातून आम्ही डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांच्याबद्दल माहिती देत आहोत.

आजपर्यंत आपण ‘सिरीयल इन्व्हेस्टर’ ही उपाधी ऐकली असेल, डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांना ‘सिरीयल इन्व्हेन्टर’ म्हणजे ‘सतत शोध लावणारी व्यक्ती’ ही उपाधी बहाल करण्यात आली आहे. भारताचा हा खूप मोठा गौरव आहे.

कोणते आहेत प्रमुख शोध?

१. १९९८ मध्ये लावलेला शोध ‘सूक्ष्म सूक्ष्मदर्शक’ हा डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांच्या करिअर मधील सर्वात महत्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय विज्ञानात त्यांची ओळख निर्माण करणारा आहे. या शोधासाठी त्यांना भारत सरकार ने २००२ मध्ये ‘तंत्रज्ञान दिवस’ या दिवशी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं आहे. सूक्ष्म सूक्ष्मदर्शक हा शोध वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी या संस्थेने महत्वपूर्ण शोध म्हणून मान्य केला आहे.

 

हे ही वाचा – ऑटोमोबाईल क्रांती – पहिल्या अविष्काराच्या जन्माची रंजक कहाणी वाचा!

२. ‘लाय डिटेक्टर’ म्हणजेच एखादी व्यक्ती खरं बोलत आहे की नाही हे आपल्या शरीरातील संवेदनाद्वारे सांगणारी मशीन आज जगात केवळ डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांच्या शोधामुळे उपलब्ध आहे.

३. इलेक्ट्रॉनिक ENT म्हणजेच एकाच मशीन द्वारे कान, नाक, घसा तपासण्याचं यंत्र हा शोधसुद्धा डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांचा शोध आहे.

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एका संशोधनावर काम करणे, त्याला आवश्यक ते ‘पेपर वर्क’ करणे हे अत्यंत खर्चिक काम असल्याचं मुखर्जी सरांनी सांगितलं आहे.

या कामासाठी त्यांनी आपली पूर्ण कमाई पणाला लावली होती. इतकं करूनही, युरोपियन देशातील शास्त्रज्ञ हे शोध डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांचेच आहेत हे सुरुवातीला मान्य करत नव्हते.

पण, जेव्हा डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांनी पेटंट दाखल केलं आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली तेव्हा हे शोध मान्य झाले.

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांच्या करिअरची सुरुवात सुद्धा नोकरीतूनच झाली होती. १९८५ मध्ये त्यांनी एचसीएल या कंपनी मध्ये काम करायला सुरुवात केली. नोकरी करत असताना संशोधनाचं काम सुरू ठेवणाऱ्या मुखर्जी सरांना नोकरीमध्ये बढती मिळत होती.

त्यांच्या कामाची, प्रवासाची वेळ ही सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत इतकी असायची. १९९७ पर्यंत मुखर्जी सरांनी ही कसरत सुरू ठेवली. पण, एक वेळ आली जेव्हा त्यांना नोकरी की सूक्ष्मदर्शक या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागला आणि त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. १९९८ मध्ये सूक्ष्म सूक्ष्मदर्शक हा पूर्णपणे तयार झाला.

१९९८ मध्ये यांच्या कार्याची सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. त्या वर्षी एकूण ५०,००० सूक्ष्म सूक्ष्मदर्शक तयार करण्यात आले आणि त्याची जगभरात विक्री करण्यात आली. खिशात सहजपणे बसणाऱ्या या यंत्राचा उपयोग हा शालेय विद्यार्थी, डॉक्टर्स यांनी अभ्यासासाठी करायला सुरुवात केली.

रोज एक तास वापरण्याची क्षमता असलेल्या या यंत्राचा वापर डॉ. रामेन्द्र मुखर्जी हे कित्येक सामाजिक संस्थांसोबत विज्ञानावर व्याख्यान देतांना करत असतात.

बालपण कसं होतं?

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांना लहानपणापासूनच विज्ञानाची प्रचंड आवड होती. आपल्या आजोबांकडे असतांना त्यांना एका भिंतीमध्ये गोलाकार असलेलं एक छिद्र दिसलं. उत्सुकतेपोटी ते त्या छिद्रापर्यंत गेले आणि तशीच अजून असंख्य छिद्र त्यांनी भिंतीवर केली. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे पालकांनी या कामासाठी रामेन्द्र यांना अजिबात रागवले नाहीत.

 

 

काही दिवसांनी रामेन्द्र यांनी एका औषधाच्या खोक्यावर हा प्रयोग केला. त्यांनी एका पिनच्या सहाय्याने त्या औषधाच्या खोक्यावर एक छिद्र केलं. त्या छिद्रातून प्रकाश येऊ शकत होता. त्यांनी तसंच एक छिद्र त्या खोक्याच्या वर केलं. यामुळे त्या खोक्यात वरून आणि बाजूने प्रकाश येऊ लागला आणि त्यांना रिकाम्या खोक्यात बघणं शक्य झालं.

इयत्ता नववीमध्ये असतांना जेव्हा ‘पिन होल कॅमेरा’ म्हणजे काय? हे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत शिकवण्यात येत होतं तेव्हा त्यांनी शिक्षकांना हे सांगितलं की, “मी तर हे लहापणीच शिकलो आहे.” ५९ वर्षीय डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांना हे आज सांगतांना किती आनंद होत असेल याची कल्पना आपण करू शकतो.

‘सूक्ष्मदर्शक’ हाच शोध का लावला ?

१९७५ मध्ये इयत्ता नववीमध्ये असतांना रामेन्द्र यांच्या भावाने त्यांना दोन लेन्स भेट म्हणून दिल्या. सुरुवातीला त्याचा वापर ते पेपर वाचण्यासाठी करायचे. पेपर मधील अक्षरं कशी मोठी होतात याबाबत त्यांच्या मनात खूप कुतूहल निर्माण झालं होतं.

इतर गोष्टी सुद्धा लेन्स वापरून अश्याच मोठ्या दिसतील हे लक्षात येऊन त्यांनी टॅल्कम पावडरला मोठ्या आकारात बघायचं ठरवलं. त्यासाठी रामेन्द्र यांनी एका लाकडी तुकड्यावर पावडर ठेवली, एक स्विचबोर्ड घेतला आणि आणि त्या लेन्स द्वारे ते त्या पावडरचं निरीक्षण करू लागले.

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांना त्या पावडरमध्ये असलेले बारीक कीटक दिसू लागले. थोड्या वेळाने त्यांना त्या कीटकाच्या रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसू लागल्या. हे दाखवण्यासाठी ते जिवशास्त्राच्या शिक्षकाकडे गेले.

शिक्षकांना हा सूक्ष्मदर्शक बघून खूप आनंद झाला आणि त्यांनी रामेन्द्र यांना ‘कंपाउंड’ म्हणजेच संयुग सूक्ष्मदर्शक चा शोध लावल्याबद्दल अभिनंदन केलं.

 

हे ही वाचा – विद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते

त्या दिवसापासून रामेन्द्र मुखर्जी यांच्या संशोधनाला सुरुवात झाली. बंगाली मिडीयमच्या शाळेत शिकणाऱ्या मुखर्जी आणि त्यांच्या शिक्षक, वर्ग मित्रांसाठी सूक्ष्मदर्शक बघता येणं ही फार मोठी गोष्ट होती.

अभियांत्रिकी शिक्षण घेत असतांना सुद्धा रामेन्द्र यांच्या डोक्यात अजून बारीक गोष्टींना कसं स्पष्टपणे बघता येईल? हाच विचार सतत चालू होता. सध्या दिसत आहे त्यापेक्षा १०० पटीने अधिक स्पष्ट एखादी वस्तू, जीव दिसावा या दृष्टीने त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते.

१९७५ मध्ये सुरू झालेला हा प्रवास २३ वर्षांनी म्हणजे १९९८ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि सूक्ष्म सूक्ष्मदर्शक हा लोकांना वापरण्यासाठी मिळाला.

२०२० मध्ये ‘इंटलेक्च्युएल प्रॉपर्टी’ या ऑफिसने ७ दिवसांची मुदत देऊन या सूक्ष्म सूक्ष्मदर्शकाचं प्रात्यक्षिक द्यायला सांगितलं होतं. सुरुवातीला तयार केलेल्या मॉडेल चे त्यांनी सुटे भाग केले होते. ते परत जोडून त्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केलं आणि मग त्यांना दोन दिवसात ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ चं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं होतं.

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांनी या व्यतिरिक्त, छोट्या ‘ईसीजी मशीन’ चा सुद्धा शोध लावला. चंदिगढ मध्ये नोकरी करत असतांना त्यांच्या वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे आणि ऑफिस च्या जागेत वेळेनंतरही काम करण्याची परवानगी दिल्याने शक्य झालं होतं.

कोरोना आजार पसरत असतांना डॉ. रामेन्द्र मुखर्जी एका अश्या ‘स्टरलायझर’ चा शोध लावला ज्यामुळे कोणतीही वस्तू ही काही क्षणात ‘सॅनेटाईझ’ होईल. या ‘स्टरलायझर’चा वापर आज ‘बिर्ला प्लॅनेटेरीयम’ आणि इतर काही चित्रपटगृह करत आहेत.

२०१९ मध्ये डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांना भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातून बोलावलं गेलं. त्यांना ही विनंती करण्यात आली की त्यांनी ‘पाण्यावर साचणाऱ्या प्लास्टिक’ ला बघता येणाऱ्या सूक्ष्मदर्शकाची निर्मिती करावी.

३ आठवड्याचा कालावधी मिळालेलं हे काम डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांनी २ आठवड्यातच पूर्ण करून दाखवलं होतं.

 

 

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांनी ‘RLMSCOPE’ हा ट्रेडमार्क त्यांच्या एकूण २०० हून अधिक संशोधनासाठी नोंदणीकृत केला आहे.

आपल्या कर्तृत्वामध्ये कुटुंबाचा आणि पत्नी वैशाली यांचा मोलाचा हातभार आहे हे सांगायला डॉ. रामेन्द्र मुखर्जी हे विसरत नाहीत. त्यांनी जेव्हा एचसीएल ची नोकरी सोडली तेव्हा त्यांचा मुलगा हा केवळ दिड वर्षांचा होता. नोकरी करत संशोधन करतांना आणि नोकरी सोडतांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाने त्यांची नेहमीच साथ दिली आहे.

“आपल्या संशोधनाचं कार्य कोणत्या नेमक्या कारणामुळे, कामाच्या पद्धतीमुळे अविरत सुरू आहे ?” या प्रश्नाचं उत्तर देतांना डॉ. रामेन्द्र मुखर्जी हे सांगतात की, “मला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करायला खूप आवडतं. माझ्या डोक्यात नेहमीच पुढचा शोध कोणता ? हेच विचार सुरू असतात. मला स्वप्न सुद्धा नवीन शोधाचेच पडतात.”

डॉ. रामेन्द्र मुखर्जी यांच्या इतकी कामात चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही कामात यश मिळणं हे तितकं अवघड रहात नाही. भारतातून असेच शास्त्रज्ञ तयार होऊन ‘जय विज्ञान’ हे ब्रीद सार्थ करतील अशी आशा करूयात.

===

हे ही वाचा – ‘पेटंट’ आपल्या नावावर करून घेणं म्हणजे नक्की काय? ते कसं मिळवलं जातं?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version