आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भुताटकी या गोष्टीवर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास नसेल. एक काळ होता, जेव्हा लहान मुलांना नेहमी भुताच्याच गोष्टी सांगितल्या जायच्या. चिंचेच्या झाडाखालून जाणं किंवा घरातील एका खोलीत अंधार असणं अश्या काही गोष्टी त्यावेळी लहान मुलांसाठी फार भीतीदायक होत्या.
कोणत्याही अंधुक प्रकाशाच्या ठिकाणाहून जातांना त्या काळात लहान मुलं ओरडत जायची. मात्र आजची मुलं वेगळी आहेत. त्यांना कंटाळा येईलही, पण कशाचीही अनाहूत भीती वाटत नाही. याचं कारण म्हणजे आज मुलांच्या कथा या मूल्यवर्धित शिक्षण म्हणजेच जीवन मूल्यांची माहिती सांगणाऱ्या कथा आहेत.
आज मुलांना भूत म्हणजे काय ? हा प्रश्न पडतो ते भुलभुलैय्या किंवा दुर्गामतीसारखा सिनेमा बघतांना. भूत म्हणजे अतृप्त आत्मा अशी एक व्याख्या सांगून आजचे पालक मुलांच्या या प्रश्नांपासून सुटका मिळवत असतात.
गंमत आणि आवड म्हणून भुताटकीचा सिनेमा किंवा टीव्हीवरील एखादी मालिका बघणारे लोक सुद्धा खूप आहेत. ‘रामसे बंधू’ यांचे सिनेमे आवडीने बघितलेल्या एका पिढीला आज टीव्हीवरील ‘फियर फॅक्टर’चे भाग बघून आपली मनोरंजनाची भूक भागवावी लागते.
घाबरण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही भारतातील काही जागांची माहिती देत आहोत ज्यांच्याबद्दल आजही त्यांना “भुतानं झपाटलं” असं म्हटलं जातं. या जागा दुसऱ्या कोणत्या नसून भारतातातील काही ‘रेल्वे स्टेशन्स’ आहेत. जिथे काही लोक प्रवास करण्यासाठी येतात तर काही त्यांना सोडायला आलेले असतात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
इतक्या गर्दीच्या ठिकाणी भुतं कशी असू शकतात? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. भारतातील ७ अशी निर्मनुष्य रेल्वे स्थानकं आहेत, जिथे ‘भूतबाधा’ आहे असं आजही मानलं जातं.
मिनिटाला लोकल जाणाऱ्या मुंबईचं कोणतंही रेल्वे स्थानक या यादीत नसेल यात शंकाच नाही. कोणत्या आहेत या भुतांचे रेल्वे स्थानक म्हणून ‘चर्चिल्या’ जाणाऱ्या जागा? जाणून घेऊयात.
१. बरोग स्टेशन, शिमला
शिमला येथील बोगदा क्रमांक ३३ जवळ असलेलं बरोग रेल्वे स्थानक येथे भुताटकी असल्याचं बोललं जातं. बरोग स्टेशन हे इंग्रजांच्या काळात ब्रिटिश इंजिनियर आणि कर्नल बरोग यांनी बांधलं होतं.
एका गुन्ह्याचा निकाल लावतांना कर्नल बरोग यांच्याकडून एक चूक झाली होती. या चुकीमुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मजूर लोकांसमोर अपमान सहन करावा लागला होता. मनाने संवेदनशील असणाऱ्या कर्नल बरोग यांना हा अपमान जिव्हारी लागला.
या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कर्नल बरोग यांनी या बोगद्याच्या शेजारी आत्महत्या केली होती. कर्नल बरोग यांच्या मृतदेहाला या रेल्वे स्थानकाच्या जवळच पुरण्यात आलं होतं.
या घटनेनंतर कर्नल बरोग यांचा अतृप्त आत्मा या जागेत फिरतो असं स्थानिकांकडून म्हटलं जातं. लोक अचानक गायब होण्यासारख्या संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या आहेत.
२. बेगूनकोडर रेल्वे स्थानक, पश्चिम बंगाल
‘भुताटकी’साठी प्रसिद्ध झालेलं हे रेल्वे स्थानक चक्क ४२ वर्ष बंद ठेवण्यात आलं होतं. जेव्हा हे रेल्वे स्थानक सुरू होतं तेव्हा रात्री इथे जे प्रवासी उतरायचे त्यांना एका ‘स्त्री’ भुतासोबत भांडण करावं लागायचं असं म्हटलं जातं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या स्थानकावर उतरणं लोकांनी बंद केलं.
ज्याला ते ‘स्त्री’ भूत दिसतं तो जिवंत रहात नाही अशी आख्यायिका १९६७ पासून प्रचलित आहे. एका मजुराला हे ‘स्त्री’ भूत दिसलं आणि त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर ही कथा प्रचलित झाली.
२००९ पासून बेगूनकोडर या रेल्वे स्थानकावर पुन्हा रेल्वे थांबण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण, लोकांच्या मनातले इथले भय अजूनही संपलेलं नाही असंच दिसून येतं.
===
हे ही वाचा – आजही या किल्ल्यावर ऐकू येतात ७ तरुणींच्या किंकाळ्या…!!
===
३. नैनी रेल्वे स्थानक, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील नैनी जेल हे स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांनी दिलेल्या प्रचंड त्रासामुळे कुप्रसिद्ध आहे. नैनी जेलमधून पळून जाऊन कित्येक क्रांतिकारी लोकांनी नैनी रेल्वे स्थानकाशेजारी आत्मदहन केल्याची इतिहासात नोंद आहे.
इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे, की रोज अंधार झाल्यावर त्या सगळ्यांचा अतृप्त आत्मा इथे फिरत असतो. पण, त्याचा लोकांना कोणताही त्रास झाल्याची नोंद नाही.
४. चित्तूर रेल्वे स्थानक, आंध्रप्रदेश
अंधार पडल्यावर चित्तूर रेल्वे स्थानकात संशयास्पद घटना घडतात, असं मागील काही वर्षात समोर आलं आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये सीआरपीएफचे जवान हरी सिंग यांच्यावर चित्तूर रेल्वे स्थानकावर उतरल्यावर काही लोकांनी हल्ला केला होता.
===
हे ही वाचा – भारतातील या हॉंटेड जागा तुमचा भयपटाहून अधिक थरकाप उडवतील
===
चित्तूर रेल्वे स्थानकावर येण्याआधीच हरी सिंग जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे हरी सिंग यांचा मृत्यू झाला होता. आपल्यावर झालेल्या या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी हरी सिंग यांचा आत्मा चित्तूर रेल्वे स्थानकाभोवती फिरत असतो असं स्थानिक लोक म्हणत असतात.
५. लुधियाना रेल्वे स्थानक, पंजाब
लुधियाना रेल्वे स्थानकात आरक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा कामावर असतांना अचानक मृत्यू झाल्याची नोंद आहे. या अधिकाऱ्याचं त्याच्या कामावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळेच त्याचा आत्मा अजूनही त्या कार्यालयातच आहे असं म्हटलं जातं.
त्यांच्या जागेवर किती तरी लोकांनी बसायचा प्रयत्न केला. पण, त्यांना तिथे सतत अस्वस्थ वाटायचं असंही म्हटलं जातं.
६. एमजी रोड मेट्रो स्टेशन, दिल्ली
मेट्रो स्टेशनचं बांधकाम सुरू असतांना एका महिलेचा या जागेत अपघाती मृत्यू झाला होता. गुरुग्राम इथे असलेल्या या रेल्वे स्थानकात लोकांना संशयास्पद घटना घडताना आढळल्या आहेत असं अनेकजण सांगतात. मेट्रोच्या प्रवाश्यांना त्यामुळे काहीच त्रास होत नाही, असं ही म्हटलं जातं.
७. रबिंद्र सरोबर मेट्रो स्टेशन
रबिंद्र सरोबर हे कोलकत्ता मेट्रोचं एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक इथे होणाऱ्या संशयास्पद घटनांमुळे नेहमीच चर्चेत असतं. रात्री १०.३० वाजता इथून शेवटची मेट्रो जाते आणि तेव्हा लोकांना इथे उतरून जातांना नेहमीच अस्वस्थता वाटते, भुतासारखी एक आकृती दिसते असं काही प्रवासी सोशल मीडियावर म्हणत असतात.
तुम्ही जर अशा एखाद्या घटनेचे साक्षीदार असाल, तर आपलं मत नक्की नोंदवा. किती लोकांचा विश्वास बसेल हे सांगता येत नाही. पण, अनुभव व्यक्त केल्याने तुम्हाला शांत वाटेल.
कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा या लेखाचा उद्देश नाही. उपलब्ध माहिती आणि इतरांच्या अनुभवातून आपण सतर्क रहावं इतकीच आमची इच्छा आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.