मुंबईत झालेल्या नास्तिक परिषदेचा आढावा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
काल, दिनांक ९ एप्रिल २०१७ रोजी, मुंबई नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रनिष्ठान च्या प्रांगणात नास्तिक मेळावा संपन्न झाला. त्या मेळाव्यात आलेल्या अनुभवाचा हा आढावा.
मेळाव्याला हजर रहाणाऱ्यांनी वेबसाईटवर नोंदणी करताना नास्तिक जाहिरानाम्यावर स्वीकृती द्यावी लागते. त्या जाहिरनाम्यातील काही वाक्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं.

===
“माझे नास्तिक्य विचारपूर्वक असून त्यात कोणताही अहंकार नाही”, असे शहीद भगतसिंग म्हणत. तीच आमची भूमिका आहे.
===
आणि
===
नास्तिक म्हणून आमची सर्वसाधारण ओळख आहे. तरी विचारांच्या वैविध्यामुळे काही जण स्वत:ला अज्ञेयवादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, मुक्तचिंतक इत्यादी नावानी संबोधतात.
===
भगतसिंगांचे विचार आणि ते विचार व्यक्त करण्याची भाषा – दोन्हीही फार स्पष्ट होते हे त्यांचं लिखाण वाचलं की कळतं. त्यांचा ‘Why I am an Atheist’ लेख वाचल्यावर मी कित्येक दिवस भारावून गेलो होतो. त्या लेखात अहंकार दिसत नव्हता. खूप खोल विचार दिसत होता. पण सर्वच नास्तिकांमध्ये हे दोन्ही – अहंकाराचा अभाव आणि खोल विचार – दिसत नाहीत.
“माझ्यात अहंकार नाही” हे नास्तिक मेळावा आयोजकांनी सर्व नास्तिकांकडून वदवून घेणं कौतुकास्पद वाटलं. त्या जाहिरानाम्यावर स्वीकृती देणाऱ्या प्रत्येकाने टिचकी मारताना ह्या वाक्याचा गांभीर्याने विचार केला असेल आणि ते किमान पुढे आचरणात आणण्याचा निश्चय केला असेल तर ती एक मोठीच क्रांती ठरेल. कारण नास्तिक म्हणजे उर्मट असा सर्वसाधारण समज आहे आणि तो चूक नाही.
उठसुठ धार्मिक भावनांची खिल्ली उडवण्यात खोल विचारही नसतो आणि विनम्रताही नसते. परंतु बहुतांश नास्तिक तेच करताना दिसतात. मेळाव्याच्या निमित्ताने ह्याबद्दल प्रबोधन घडलं तर बरं होईल – असं हा जाहीरनामा वाचल्यावर वाटलं.

नास्तिक लोक स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणतात हे नास्तिकांनीच म्हणणं म्हणजे स्वतःच स्वतःला प्रेमाने कुरवळण्यासारखं वाटलं. हा प्रकार फेसबुकवर देखील जाणवतो. नास्तिकांचे कंपू आपापसात आपल्या नास्तिक्याला आणि स्वयंघोषित प्रखर बुद्धिप्रामाण्याला कुरवाळत असतात. वर आम्ही अहंकारी नाही म्हणून खालीच लगेच विपरीत वर्तन झालंय असं वाटलं.
असे कित्येक नास्तिक आहेत ज्यांना बुद्धिप्रामाण्यवादी चर्चा कशाशी खातात हे कळत नाही हे स्पष्ट दिसतं. आजच्या चर्चांवर इतिहासाची, ऐतिहासिक महापुरुषांची, त्यांच्या लेखांची आजच्या काळाला अप्रस्तुत उदाहरणं द्यायची हा देवभोळेपणा आणि पोथीनिष्ठता अनेक नास्तिकांत मुरलेली दिसते.
नास्तिक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे नास्तिक असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न अश्यात जोर धरतोय. मेळावा आयोजित करणाऱ्यांनी त्यात चांगलीच भर घातल्यासारखी वाटली. अर्थात, हा मेळावा आयोजित करून त्याचे सर्व आयोजक फार कौतुकास्पद काम करत आहेत. त्यांना नावं ठेवणं हा हेतू नाही, फक्त नास्तिक मेळाव्याच्या निमित्ताने हे कच्चे दुवे जाणवले, इतकंच.
नास्तिकांबद्दल माझ्या मनात मिश्र भावना आहेत. भारताला आदरणीय नास्तिकांचा मोठाच इतिहास आहे. शिवाय परिचयातले काही नास्तिकसुद्धा विद्वान आणि विनम्र आहेत. परंतु आजूबाजूचे बहुतांश नास्तिक विविध दैवतांचा, धर्मांचा केवळ थट्टा मस्करीचा विषय करणारे.
त्यामुळे एखादा मनुष्य नास्तिक आहे म्हटल्यावर जसे इतर लोक चपापतात तसा मी सुद्धा सावरूनच बसतो. कालच्या नास्तिक मेळाव्यात कुठल्याच धर्मांची, दैवतांची निंदा नालस्ती झाली नाही – हे फारच सुखावह होतं.
नास्तिकांच्या कंपू बाहेरील माझ्यासारख्या माणसाला, काल काही महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या.
पहिली म्हणजे ज्या ब्राईटस समूहाने हा प्रपंच मांडला आहे, त्यांची त्या मागची भूमिका स्पष्ट झाली.
लोकांनी कर्मकांडात, धर्माच्या गुंत्यात अडकून स्वतःचा भौतिक विकास करण्याकडे दुर्लक्ष करणं थांबवावं म्हणून लोकांनी नास्तिक व्हावं हा मूळ विचार आहे. ह्या समूहातील सर्वच लोक अंनिसच्या मुशीतून पुढे आलेले आहेत, हे देखील कालच कळालं.
ह्या मूळ अंनिसमधून आलेले असल्यामुळे जी धर्मविरोधी, देव विरोधी स्पष्ट भूमिका अंनिस घेत नाही, ती भूमिका घेता यावी ह्यासाठी हे ब्राईटस नावाचं पिल्लू अंनिसने सोडलं आहे – असा आरोप आहे म्हणे…! ह्या आरोपावर खुलेपणाने चर्चा करण्याचं धाडस देखील मुक्तचिंतन बैठकीत झालं.
अंनिसचे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते आले होते. बहुतेक कार्यकर्त्यांचा एक फार स्पष्ट सूर दिसला. तळागाळात काम करताना, सरळ धार्मिक मान्यतांना छेदून काम होत नाही, त्यामुळे हळुवार उकल करत लोकांमधील केवळ अनिष्ट प्रथा संपवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची नीती दाभोळकरांनी “ठरवून दिली आहे” आणि तो विचार ह्या सर्वच अंनिस कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी पटलेला दिसला.

त्या पुढे जाऊन – अंनिस कार्यकर्ते ह्या प्रवासातून जाऊन आपोआपच नास्तिक होतात, हे ऐकून अप्रत्यक्ष वैचारिक जडघडण कशी होते हे अजून एकदा लक्षात आलं.
परंतु हे भान – जे अंनिसला आहे, ते नास्तिकांना आहे की नाही – हा प्रश्न नेहेमीच पडत आलाय. हा प्रश्न मी तिथे उपस्थित केला.
लोकांचं भलं व्हावं ह्या हेतूने जर नास्तिक्य पसरावं असं वाटत असेल तर लोकांच्या श्रद्धांवर थेट हल्ला चढवून चालणार नाही. लोकांनी आपल्या कर्मकांड, देवभोळेपणातून बाहेर पडून आपल्या भौतिक उत्कर्षाकडे लक्ष द्यावं हा विचार पटवायचा जर हेतू असेल तर त्यासाठी सुसंवाद व्हायला हवा.
“पण आपल्या आजूबाजूला दिसणारे नास्तीक देवांची आणि धर्माची खिल्ली उडवण्यापलीकडे काही करत नाहीत – मग बदल घडणार कसा? गणेश विसर्जनानंतर भग्न अवस्थेतील मूर्तींचे फोटो, ‘ख्या ख्या ख्या…हा बघा ह्यांचा देव’ – असं कॅप्शन देऊन जर शेअर केले जात असतील तर नास्तिकांशी संबंध आणि संवाद ठेवण्याची कुठल्या नास्तिक नसणाऱ्याची (मग ते अज्ञेय असोत वा आस्तिक) इच्छा होईल?”
त्यामुळे शक्य असेल तर, ब्राईटस तर्फे, नास्तिकांनी आधी नास्तिकांतच प्रबोधन घडवून आणायला हवं.
— हे मत मी शक्य तितक्या स्पष्टपणे व्यक्त केलं.
नास्तिकांवर, नास्तिक मेळाव्यावर डाव्या लोकांचा प्रभाव आहे आणि हे मेळावे डाव्या विचारांच्या प्रसारासाठी आणि संघ/उजव्या विचारांच्या अपमानासाठीच आहेत – असा सार्वत्रिक समज आहे. माझ्या गेल्या २ दिवसांच्या पोस्ट्सवर तश्या कमेंट्सचा खच पडलाय. परंतु एकदोन हलके फुलके उल्लेख सोडले तर संपुर्ण मुक्तचिंतनात असं अजिबात आढळलं नाही. अर्थात, अनेक “कॉम्रेड्स” ची उपस्थिती नजरेत भरण्यासारखी होतीच. आयोजकांवर ह्या कॉम्रेड्सचा आशिर्वाद आहे हे ही दिसलंच. पण मेळावा “हायजॅक” झाल्यासारखं काही बोललं गेलं नाही. हे सुद्धा बरं वाटलं.
दोन गोष्टींचं मात्र वाईट वाटलं.
पहिली म्हणजे “आजच्या इहवादी समस्या सोडवायला हव्यात” अशी मूळ वैचारिक बैठक असलेल्या मेळाव्यावर इतिहास आणि महापुरूषांच्या वादाची सावली पडलीच.
गणेशोत्सव-टिळक असा संदर्भ एका प्रश्न विचारणाऱ्याकडून आला. प्रश्न इतिहासाशी संबंधित नव्हता, आजचा गणेशोत्सव साजरा करताना आस्तिक प्रियजनांच्या भावना जपाव्यात की कठोर नास्तिक बनून त्यांना तोडावं – असा प्रश्न होता. त्यावर आयोजकातील एकाने सार्वजनिक गणेशोत्सवामागे टिळकांचा खरा ‘राजकीय’ हेतू काय होता ह्यावर अजिबातच गरज नसलेली टिपणी केली. दुसरा प्रेक्षक त्वेषाने उठून शिवजयंतीचा संदर्भ घेऊन आला. आणखी एक आयोजक त्या संर्भावर काहीतरी बोलून गेले…आणि काही सेकंदांसाठी हलकल्लोळ माजला.
ही खूप छोटी गोष्ट आहे, भारतीय मानसिकतेतील इतिहास आणि महापुरुषांचे touchy spots बघता असं काही होणं फार गंभीरही नाही. परंतु आयोजकांकडून इतिहासावर चटकन वळण घेऊन तो विषय सुरूच नं होऊ देण्याची अपेक्षा होती – कारण हे आयोजक नास्तिक, विज्ञानवादी, विवेकवादी (no sarcasm) आहेत म्हणून.
दुसरी गोष्ट म्हणजे हिंदूंच्या वाढत्या कट्टरवादाचं स्पष्ट आकलन करण्यास अजूनही हे लोक एकतर कमी पडत आहेत किंवा कुठल्यातरी कारणामुळे मागे सरकत आहेत.
कारण काय असेल ते असो, कट्टर हिंदुत्व आणि त्यातून पुढे येणारी हिंसा ही प्रतिक्रियात्मक आहे आणि ती तो पर्यंत थांबणार नाही जो पर्यंत आपण प्रतिक्रियेमागील कारणं सोडवणार नाही — हे मान्य होताना दिसत नाही. संपूर्ण कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहाराच्या वेळी आयोजकांसोबत माझी फार थोड्यावेळ चर्चा झाली, त्यातून मला हे जाणवलं. मुद्दा हिंदुत्ववादी कट्टरपणाच्या समर्थनाचा नाही. रूट कॉज अनॅलिसिस आणि त्याच्या सोल्युशनचा आहे. दोन्ही कट्टरता वाईटच पण दोन्हींचे मूळ वेगळे आहेत म्हणून इलाजही वेगळे असावेत – असा तर्क मी मांडू पहात होतो. वेळे अभावी जमलं नाही. असो.
मेळाव्याचे प्रमुख वक्ते फार जोरदार होते. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, प्रसिद्ध वकील असीम सरोदे आणि समाजसेवक विश्वम्भर चौधरी. त्यामुळे मेळाव्याला जाताना सुरेख वैचारिक आतिषबाजी अनुभवायला मिळेल अश्या अपेक्षेने गेलो होतो. पण गिरीश कुबेर ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे येऊ शकले नाही, त्यामुळे फारच हिरमोड झाला.
असीम सरोदे सरांचा विषयच (रद्द करावेत/सुधारणा करावेत असे कायदे) जरा क्लिष्ट होता. महत्वाचा होता तरी वैचारिक फटकेबाजीच्या मर्यादा असणारा होता. विश्वम्भर चौधरी सरांना धर्मनिरपेक्षता ह्या विषयावर अनेकदा ऐकलं, वाचलं आहे त्यामुळे त्यातून नवं काय सापडणार ह्यावर देखील मर्यादाच होती.
पण असीम सरोदे सरांची हातोटी विलक्षण आहे. रुक्ष आणि किचकट विषय अत्यंत मनोरंजक आणि सोपा करण्याची त्यांची पद्धत असल्याने मजा आली. चौधरी सरांच्या भाषणातील छोटे-छोटे खुमासदार anecdotes देखील संस्मरणीय होते. त्यांचा व्यासंग किती चौफेर आहे हे वाक्यावाक्याला जाणवत होतं.
एकंदरीत कालचा मेळावा समाधानकारक होता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.