Site icon InMarathi

‘पेशावरचा मुलगा’ असा बनला भारतातील आयटी सेक्टरचा जनक!

f c kohli tcs inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात मागच्या काही वर्षात आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. अमेरिका ही जरी आजही जगात ‘आयटी सुपरपॉवर’ असली तरीही हे साध्य करण्यात भारतीय मनुष्यबळाचा खूप मोठा वाटा आहे हे ते सुद्धा मान्य करतील.

काही वर्षांपूर्वी भारतात इंटरनेट स्वस्त झालं आणि सुरुवातीला महाग वाटणारा ‘स्मार्टफोन’ हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला. मोबाईल, इंटरनेट बँकिंगद्वारे बँकेची सगळी कामं केली जाऊ शकतात, याची काही वर्षांपूर्वी कोणीच कल्पना केली नसेल.

आज तुम्ही नोकरीमध्ये असा किंवा व्यवसाय करत असा, तुमची कंपनी ‘आयटी स्मार्ट’ नसेल आणि ‘डिजिटल मार्केटिंग’वर भर देणारी नसेल तर अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी संघर्ष तुमच्यासाठी अटळ आहे.

 

 

भारताच्या लोकसंख्येकडे जगातील सर्व प्रमुख देश हे आता एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. भारतात तुम्ही कोणतीही वस्तू तयार करू शकता आणि विकू सुद्धा शकता. आज व्यवसाय करण्यासाठी फक्त तुमच्या कंपनीची एक वेबसाईट असावी आणि त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट्स ‘ऑनलाईन’ खरेदी करण्याची सोय असावी. वस्तू, सेवांचा दर योग्य असेल तर तुमच्या व्यवसायाची गाडी सुसाट धावू शकते.

भारतीय लोकांची झपाट्याने होत चाललेली ही ‘टेक्नो’ मानसिकता लक्षात घेऊनच ‘टेस्ला’सारख्या ‘टेक्नो कार’ बनवणाऱ्या कंपनीने भारतात आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार केला असेल हे सगळेच मान्य करतील.

कुठून आली ही आयटीची लाट? ती कोणती व्यक्ती आहे जिच्यामुळे मागच्या २० वर्षांत भारतभर इतक्या प्रोग्रामर, सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर्ससाठी नोकऱ्या तयार होत आहेत? हा पाया कोणी रचला असेल? जाणून घेऊयात.

‘फकीरचंद कोहली’ ही ती व्यक्ती आहे ज्यांना ‘भारताच्या आयटी इंडस्ट्रीचे जनक’ या नावाने ओळखलं जातं. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’ (TCS) या कंपनीचे संस्थापक आणि पहिले CEO म्हणून त्यांनी काम केलं आहे. याशिवाय, भारताच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेलं मोलाचं योगदान यासाठी आपण त्यांचे ऋणी असायला हवं.

 

 

===

हे ही वाचा – …आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…!

===

आज ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’ ही भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस देणारी कंपनी आहे. १९५१ पासून ‘फकीरचंद कोहली’ यांनी टाटा ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली होती. अमेरिकेतील कंपनीत काम करत असतांना त्यांनी भारतात परतून टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

अशी केली करिअरची सुरुवात?

‘फकीरचंद कोहली’ यांचा जन्म १९ मार्च १९२४ रोजी पेशावर इथे पंजाबी घराण्यात झाला. पेशावर हे तेव्हा ‘मिल्ट्री सेंटर’ म्हणून ओळखलं जायचं.

त्यांचं शालेय शिक्षण हे पेशावरमधील खालसा मिडल स्कुल आणि नॅशनल हायस्कुलमधून त्यांनी पूर्ण केलं. बीए आणि बीएससी या पदवीचं शिक्षण त्यांनी पंजाब विद्यापिठामधून घेतलं. त्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असतांना त्यांच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं होतं. ‘फकीरचंद कोहली’ यांची इंडियन नेवीमध्ये निवड झाली होती. नेवीमध्ये जॉइनिंगचं ठिकाण आणि तारीख कळेपर्यंत क्वीन्स कॉलेज ऑफ कॅनडाच्या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी अर्ज भरला होता. हा अर्ज १९४८ मध्ये मान्य झाला आणि त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बीएससी (हॉनर्स) करण्यासाठी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला.

पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कॅनेडियन इलेक्ट्रीक कंपनीमध्ये नोकरी केली आणि नोकरी करतांना १९५० मध्ये त्यांनी पदव्युत्तर मास्टर ऑफ सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं.

 

 

१९५१ मध्ये भारतात परतून त्यांनी टाटा इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम सुरू करून त्यांनी ‘लोड डिस्पॅच सिस्टीम’ हा प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यांच्या काम करण्याच्या प्रामाणिक पद्धतीमुळे त्यांना १९६३ मध्ये जनरल सुप्रीटेंडेंट आणि १९६७ मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून पदोन्नती देण्यात आली.

टाटा इलेक्ट्रिक कंपनीमध्ये तयार होणाऱ्या विद्युत उपकरणांचं डिझाईन, ‘पॉवर लाईन कंट्रोल’ संगणकीकृत पद्धतीने व्हावीत अशी मागणी त्यांनी जे आर डी टाटा यांच्याकडे केली आणि ती मान्य झाली.

टाटा इलेक्ट्रिक कंपनीने मुंबई आणि पुण्यामध्ये पहिली ‘पॉवर लाईन कंट्रोल’ सिस्टीम त्यांनी सुरू केली. ही सुविधा असलेली टाटा ही जगातली केवळ तिसरी कंपनी होती.

‘फकीरचंद कोहली’ यांच्या पुढाकारानेच टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये पहिलं ‘सिडीसी ३६०० मेनफ्रेम’ कम्प्युटर हे भारतात आलं.

१९७२ मध्ये टीसीएसने Burroughs कॉर्पोरेशन सोबत करार केला आणि सॉफ्टवेअर्स तयार करण्याचं काम सुरू केलं. या पूर्ण डिव्हिजनचं नेतृत्व ‘फकीरचंद कोहली’ यांनी पुढील ३४ वर्ष केलं आणि त्याला भारतातील सर्वात मोठी आणि जगातील नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक करून मगच त्यांनी निवृत्ती स्वीकारली. टाटा ग्रुपमध्ये टीसीएस ही सर्वात जास्त नफा कमावून देणारी कंपनी म्हणून सुद्धा ओळखली जाते.

 

 

===

हे ही वाचा – मुहम्मद अली जिनांना तोंडावर थेट नकार – भारतात विप्रो जन्मण्याची मुहूर्तमेढ!

===

टाटा ग्रुपमधील इतर कंपनी जसं की टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा हनिवेल यांच्या समितीवर सुद्धा ते बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून काम बघत होते.

‘फकीरचंद कोहली’ यांचं कार्य टाटा ग्रुपपुरतं मर्यादित नसून ते एअरलाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, एअरलाईन फायनेन्शियल सपोर्ट, अबॅकस डिस्ट्रिब्युशनच्या डायरेक्टर बोर्डवर होते. त्याशिवाय, इंडियन आयटी सर्विस बॉडीचे ते प्रेसिडेंट होते.

१९९५ ते १९९६ या कार्यकाळात त्यांनी भारताने आयटी क्षेत्राला पुढे आणण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार केले पाहिजेत याचं मार्गदर्शन सरकारला केलं.

भारतात ‘टेक्निकल एज्युकेशन’ शिकवण्यात यावं यासाठी ते नेहमीच आग्रही होते. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणेच्या चेअरमनपदी सुद्धा त्यांनी काम केलं आहे. ‘कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’चे सुद्धा ते प्रेसिडेंट होते.

१९९९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रौढ साक्षरता, जल शुद्धीकरण, प्रादेशिक भाषेत संगणक ज्ञान उपलब्ध करुन देणे आणि टीसीएसच्या सल्लागारपदी काम करणं हे सुरूच ठेवलं होतं. भारतीय आयटी इंडस्ट्रीला १९० बिलियन युएस डॉलर्स पर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं नेहमीच म्हटलं जातं.

 

 

‘फकीरचंद कोहली’ यांना त्यांच्या या योगदानाबद्दल २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच वर्षी, इकॉनॉमिक टाइम्सने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

२६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचं हृदयविकाराच्या आजाराने त्यांचं मुंबईमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते.

‘फकीरचंद कोहली’ हे त्यांच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानामुळे नेहमीच लोकांच्या नेहमीच स्मरणात राहतील. हे वाचल्यावर १९ मार्च या त्यांच्या जन्मदिनी भारतातील आयटीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांचे आभार मानतील हे नक्की.

===

हे ही वाचा – आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version