आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
व्ही के कृष्ण मेनन, नाव ऐकलं की काय लक्षात येत? साम्यवादी विचारसरणीचा नेता ज्याच्यामुळे १९६२ च्या युद्धात पराभव पहावा लागला!
नेहरूंचा उजवा हात, देशाचा संरक्षणमंत्री, डिप्लोमॅट? असे अनेक मुद्दे हे लक्षात येतात. त्यातल्या त्यात इंडो चायना वॉर विषय हा जास्तीचा अधोरेखित केला जातो.
त्याला कारणं पण तशीच होती. असो, मुद्दा तो नव्हे!
याच कृष्ण मेनन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अशी काही जोरदार फलंदाजी केलेली की काश्मीर विषय परिषदेत मांडणाऱ्या अमेरिकेसोबत पाकिस्तानला पण माती खावी लागली होती.
हे तेच कृष्ण मेनन आहेत, ज्यांनी इंग्लंड मध्ये राहून इंग्लंडच्या विरोधात बोलून भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. आज त्याच कृष्ण मेनन यांच्या बद्दल आपण बघणार आहोत, ज्यांच्यापासून अमेरिका, इंग्लंड सारखे देश दोन हात लांब राहायचे.
व्ही के कृष्ण मेननसारख्या लोकांसाठीच निदा फाजली यांनी काही शब्द लिहून ठेवले असावेत ते असे की ,’उसके दुश्मन है बहुत,आदमी अच्छा रहा होगा।’
शीत युद्धाच्या काळात थेट साम्यवादाला पाठिंबा देणे, ज्याच्यामुळे आफ्रिकेतील साम्राज्यवाद नाहीसा झाला, ज्या पाश्चिमात्य देशात जाईल तिथल्या व्यवस्थेवर मुद्देसूद टीका करणारा, इतकी कारणं मेनन यांच्यावर खार खाण्यासाठी पाश्चिमात्य देशांना पुरेसे होती.
आणि त्यामुळेच त्यांच्या शत्रूंची संख्या ही जास्त होती. ब्रिटिश राजनैतिक अलेक्झांडर क्लटरबक मेनन यांना नेहरूंचा ‘जिनियस एव्हील’ अर्थात बुद्धीमान सैतान म्हणतो.
हॅराल्ड मॅकमिलन मेनन यांना नेहरूंचा हॅरी हॉपकिन्स म्हणतो.(हॉपकिन्स अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचा विशेष सहकारी होता.)
शीतयुद्धाच्या काळातला अमेरिकी सिनेट त्यांना पॉईजनस बास्टर्ड, भारताचा रासपुतीन, भारताचा विशेस्की म्हणत! मेनन यांना दिल्या गेलेल्या विशेषणावरून त्यांचा युरोप आणि अमेरिकेत असलेला दरारा दिसून येतो!
तर, १९४७ पासून १९६४ पर्यंत मेनन नेहरूंच्या खास लोकांपैकी एक होते. मेनन यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव पडला तो हेराल्ड लास्की या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसरमुळे.
लंडनमध्ये नेहरूंना भेटल्यानंतर नेहरूंना त्यांची भारतासाठी असलेली गरज जाणवली आणि त्यांना भारतात बोलवून घेतले.
===
हे ही वाचा – काश्मीर प्रश्न, नेहरू आणि संयुक्त राष्ट्रसंघ : काश्मीर आणि भारतीय जनमानस ४
===
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मेनन यांना ब्रिटन मधला भारताचा पहिला हाय कमिशनर नियुक्त केले गेले.
जिथे जिथे भांडवलशाही आणि साम्यवाद यांची टक्कर झाली तिथे त्यांनी भांडवलशाहीचे वाभाडे काढले. कोरिया युद्ध असो, सुवेझ कालवा प्रकरण असो सगळ्या बाबतीत पाश्चिमात्य देशांचा असलेल्या स्टँडवर त्यांनी आपलं मत मांडून त्यांचा असलेला हेतू स्पष्ट केला.
शीतयुद्धाच्या काळात तर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले गेले. १९५१ साली तर ब्रिटनच्या एटली सरकारने नेहरूंना मेनन यांना परत माघारी बोलवण्याचे निवेदन पाठवले होते. साम्यवादी लोकांशी असलेली त्यांची मैत्री ब्रिटनला खटकत होती.
शीत युद्धाच्या काळात नेहरू जिथे न्यूट्रल राहायचा प्रयत्न करत होते, तेच मेनन यांचे कृत्य आणि भाष्य हे रशियाच्या बाजूने असल्याचे दिसून येत होते. ज्यामुळे आपसूकच अमेरिकेची नाराजगी नेहरू ओढवून घेत होते.
त्यामुळे कधीही मुलाखत देताना नेहरू पत्रकारांना आधीच सांगून ठेवायचे, ‘मला कृष्णा आणि काश्मीर या व्यतिरिक्त काहीही विचारा.’
तर येऊया मूळ मुद्द्यावर. मेनन जरी साम्यवादाच्या बाजूने असले तरी भारताप्रती असलेलं त्यांचं प्रेम साऱ्या जगाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाहिले.
परिषदेत मेनन यांनी केलेल्या तब्बल आठ तासांच्या भाषणामुळे आज काश्मीर भारताचा भाग आहे. तर बघूया नेमकं प्रकरण काय होत.
शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने गेला आणि भारताने तटस्थ राहायचा निर्णय घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाक दोघे काश्मीर मुद्द्यावर भांडत होते.
अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणला आणि अमेरिकेने सुरक्षा परिषदेत आपली असलेली ताकद लावून काश्मीर प्रश्न परिषदेत लावून धरला.
१९५७ मध्ये अमेरिकेने काश्मीरमध्ये जनमत व्हावे हा मुद्दा ठेवून काश्मीर प्रश्न मांडला. पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भाषणानंतर मेनन पाकिस्तानने केलेल्या प्रश्नांना काउंटर करण्यासाठी आले.
पाकिस्तानच्या जनमतच्या मुद्द्यावर बोलताना मेनन म्हणाले, ज्यांनी आजतागायत बँलेट बॉक्स कसा असतो ते नाही पाहिले, तो कसा असतो ते माहीत नाही, ते जनमताची भाषा करत आहेत?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुजाहिद्दीनच्या वेशात आपली फौज पाठवून काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न करणारे जनमताची भाषा करत आहेत? यांना जनमत म्हणजे नेमकं असतं काय ते तरी माहीत आहे का?
तब्बल सात तास ४८ मिनिटं चाललेल्या या भाषणामध्ये त्यांनी पाकिस्तानसोबत अमेरिकेचे वाभाडे उभ्या जगासमोर काढले.
जेवढे देश काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजूने होते ते सगळे या मुद्द्यावर न्यूट्रल झाले. रशियाने आपला विटो पावर वापरून भारताच्या बाजूने मतदान केले आणि सुरक्षा परिषदेने अमेरिकेने चर्चेला आणलेल्या या विषयाला केराची टोपली दाखवली.
जवळपास ८ तास चाललेल्या या भाषणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
मेनन त्यांच्या या भाषणामुळे अख्या जगाची काश्मीर विषयावर असलेली मतं बदलली आणि मेनन यांना ‘हिरो ऑफ काश्मीर’ म्हणून संबोधले जाऊ लागले.
जेव्हा मेनन भारतात परतले तेव्हा मुंबईच्या विमानतळावर मूळ काश्मिरी असलेल्या लोकांची मेनन यांच्या स्वागतासाठी तुडुंब गर्दी जमा झालेली. ब्रिटिश राजनैतिक अधिकारी मॅकडोनाल्ड म्हणतात,
सरदार पटेलांचे खास व्ही पी मेनन यांनी काश्मीरचा भारतात विलय केला, तर नेहरूंचे खास व्ही के मेनन यांनी काश्मीर भारतापासून लांब होण्याच्या सगळ्या शक्यता या दूर करून टाकल्या.
===
हे ही वाचा – कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)
===
योगायोग असावा तो असा. याच कृष्ण मेनन यांच्या या हिमालया सारख्या कर्तृत्वाचा बट्ट्याबोळ केला तो १९६२ च्या भारत चीन युद्धाने.
वरिष्ठ पत्रकार कुलदीप नैयर आपल्या पुस्तकात ‘बियोंड द लाईन्स’ मध्ये लिहितात, जेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही त्या विषयावर काहीच का नाही बोलत.
तेव्हा मेनन म्हणाले,’माझी कहाणी माझ्या सोबतच दफन होईल. जर मी काही बोललो तर नेहरूंवर आरोप होणार, आणि मी माझी त्यांच्याप्रती असलेली निष्ठा कमी होऊ देणार नाही.’
६ ऑक्टोबर १९७४ ला चीन युध्दासंबंधी असलेले सगळे रहस्य स्वतः सोबत मेनन इहलोकी घेवून गेले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.