Site icon InMarathi

म्हटलं तर “तसली” बाई, म्हटलं तर २० भाषांमध्ये रसाळ अभंग रचणारी महान स्त्री!

gauhar jaan featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ती आशिया खंडातली पहिली गायिका होती जिचा आवाज ग्रामोफोनवर उमटला. ब्रिटिश आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या तिच्या आईच्या पुर्नविवाहामुळे केवळ नावच नाही तर संपूर्ण आयुष्यच बदललं.

तेराव्या वर्षी लैंगिक शोषणाला बळी पडलेली ती मोठेपणी केवळ कणखर स्त्री म्हणून नाही तर भारतीय संगीत इतिहासात आदबीनं घेण्याचं नाव बनली. जन्मानं ब्रिटिश, सावत्र वडिलांमुळे मुस्लिम बनलेली मुलीनं ख्याती मिळवली बंगाली किर्तन आणि भजनांसाठी. कोण आहे ही जगावेगळी मुलगी?

तवायफ़ म्हणजे “बाजारू औरत’, “ दो टके की औरत”, “मर्दो को अदाओं से फ़ुसलानेवाली बेवफ़ा औरत” ही सगळी डायलॉगबाजी हिंदी चित्रपटानं आदळून आपटून वास्तवातल्या तवायफ़ समाजाची विचित्र अशी प्रतिमा सामान्य माणसासमोर उभी केली. ही प्रतिमा इतकी प्रखर आहे की तवायफ़ आणि इज्जत/आब्रु हे विरोधार्थी शब्द बनून गेले.

 

 

मात्र वास्तव हेच आहे की, एक जमाना होता जेंव्हा नवाब, महाराज यांचे सुपूत्र राजघराण्याच्या तवायफ़कडे “तहजीब”, “राजकारण’, “शिष्टाचार” यांचे धडे गिरवायला पाठवले जात. या तवायफ़ना केवळ तहजीब , शिष्टाचार यांचीच जाण असायची असं नव्हे तर संगीत, नृत्य आणि गायनाची कलाही अवगत असे.

प्रेझेंटेबल कसं रहावं, म्हणजेच आजच्या काळातलं ग्रुमिंग, याचे धडे तवायफ़ यांच्याकडून घ्यावेत इतका हा समाज आदबशिर, उच्चभ्रू फॅशन सेन्स असणारा असे.

मुक्कदर का सिकंदर मधली जोहरा, उमराव जान मधली उमराव, देवदास मधली चंद्रमुखी ही पडद्यावरच्या तवायफ़ची ग्लॅमरस रुपं. वास्तवातल्या अनेक तवायफ़ अशा आहेत ज्यांचं नाव आजही अत्यंत अदबिनं घेतलं जातं.

 

हे ही वाचा – मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा

ओळख करून घेऊ अशाच काही तवायफ़विषयी लेखशृंखलेतून. या शृंखलेत पहिलं नाव आहे गौहर जान यांचं.

गौहर जान

इतिहासातील अत्यंत प्रसिध्द अशी ही नृत्यांगना. हिचं मूळ नाव एंजलिना योवर्ड होतं. आई व्हिक्टोरिया आणि वडिल विल्यम यांची ही अत्यंत देखणी मुलगी.

व्हिक्टोरिया स्वत: निपूण नर्तकी होती. व्हिक्टोरिया आणि विल्यम यांचा एंजलिना सहा वर्षांची असताना घटस्फोट झाला आणि व्हिक्टोरियानं कलकत्त्यातल्या मलक जान याच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळेस एंजलिना सहा वर्षांची होती. या दुसर्‍या वडिलांनीच एंजलिनाला नविन नाव दिलं, “गौहर जान”.

 

 

आईकडून गौहर नृत्य, गायन शिकली आणि त्यात पारंगत झाली. अल्पावधीतच ती ध्रुपद, खयाल, ठुमरी आणि बंगाली किर्तन यात इतकी पारंगत झाली की तिची कीर्ती सर्वदूर पसरायला लागली.

ही दक्षिण आशियातली पहिली गायिका होती जिची गाणी ग्रामोफोन कंपनीनं ध्वनीमुद्रीत केली. युट्यूबवर आजही त्यांचा आवाज उपलब्ध आहे. २० भाषांमधून ठुमरी ते भजन गाणारी ती महान गायिका होती.

ज्या काळात भल्या भल्या गायकांनी त्यांचा आवाज ध्वनी मुद्रीत करायला नकार दिला होता त्या काळात गौहरनं अगदी बिनधास्तपणे आपला आवाज तबकडीवर येऊ दिला. त्याकाळात शास्त्रीय गायकांची अशी धारणा होती की, तासन तास आळवले जाणारे राग काही मिनिटांच्या तबकडीवर आणणं केवळ अशक्य आहे.

शिवाय जर तबकडीवर आवाज आला तर तो घराघरात पोहोचेल आणि त्यांची गायकी “एक्स्क्लुजिव्ह” रहाणार नाही. मात्र या कशाचीच फिकीर न करता गौहरनं तिचा आवाज तबकडीवर येऊ दिला हे भारतीय संगीताच्या वाटचालीतलं अत्यंत महत्वाचं आणि धाडसाचं पाऊलच म्हणायला हवं.

 

 

गौहर हे नाव केवळ आदबीनं घेतलं जायचं असं नाही तर वास्तवातही तिचा आब रूबाब अनोखा होता. असं सांगतात की जेंव्हा नवाब तिला मेैफिलीसाठी आमंत्रण पाठवत तेंव्हा तिच्या प्रवासासाठी बोगी नव्हे तर संपूर्ण रेल्वे बुक करत असत.

ती आणि तिच्या साथीदारांशिवाय इतर कोणीही या रेल्वेतून प्रवास करत नसे. एकूणच ताम झाम असणारं असं आयुष्य गौहर जगली.

तिच्या ग्रामोफोनवरच्या रेकॉर्डिंगच्या उत्पन्नाचेच आकडे त्याकाळात करोडोंमध्ये होते. त्याकाळातल्या ब्रिटिश अधिकार्‍यांच्या किंवा करोडपतींच्या रहाणीमानासारखं तिचं रहाणीमान होतं. तिचे कपडे असोत की दागिने त्याकाळातल्या राण्यांकडेही बरेचदा नसायचे.

प्रत्येक रेकॉर्डिंगसाठी गौहर नविन कपडे शिवत असे आणि नवे दागिने घडवून घेत असे.

 

 

दुर्दैव हेच की गौहरवर मुक्तहस्ते पैसा उधळायला तयार असणारे तिच्याशी लग्न करून तिला विवाहितेचा दर्जा द्यायला मात्र तयार नव्हते. त्याचप्रमाणे बरोबरीच्या पुरूष गायकांना समाजात जी प्रतिष्ठा होती ती देखील तिला कधीच मिळू दिली नाही.

गायकीतला मान सन्मान, पैशांच्या राशी तिच्या पायाशी समाजानं ओतल्या तरिही ती कायम एक तवायफ़, बाजारू औरतच राहिली. यामुळेच तिच्या प्रत्येक प्रेमप्रकरणात तिच्या पदरी अपयश आलं.

प्रौढावस्थेतील गौहरनं आपल्या वयाहून निम्म्या असणाऱ्या पठाणाशी लग्न केलं. या पठाणानं गोड बोलून तिची सगळी संपत्ती त्याच्या नावावर करून घेतली. सहाजिकच नंतर त्यांच्यात भांडणं होत दुरावा येत गेला.

एकेकाळी अख्खी रेल्वे बुक करून प्रवास करणारी गौहर नातेवाईक रूपात असणार्‍या गिधाडांच्या तावडीत सापडली. विश्वासघाताला बळी पडली आणि कोर्ट कचेर्‍या करताना चक्क रिक्षामधून उन्हा तान्हात फ़िरली.

शेवटच्या दिवसांत गौहर एकाकी होती. आपल्या आवाजानं देश आणि जग गाजवणाऱ्या या गायिकेचा हलाखीच्या अवस्थेत दक्षिण भारतात मुत्यू झाला तेंव्हा कोणाला याचा थांगपत्ताही नव्हता. एक मात्र खरं की आजही संगीत क्षेत्रात गौहर जानचं नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं.

तिच्या आयुष्यावर विक्रम संपत यांनी माय नेम इज गौहर जान हे पुस्तक लिहिलं आणि त्यावरुन प्रभावित होत लिलिएट दुबे यांनी गौहर नावाच्याच नाटकाची निर्मिती केली तर श्याम बेनेगल यांनी सरदारी बेगम हा चित्रपट निर्माण केला. ज्यात गौहरची भूमिका साकारली आहे राजेश्र्वरी सचदेव हिने.

 

हे ही वाचा – चेहऱ्यावर घावांसकट जगणारी, आपल्या गायकीने सगळ्यांना मोहात पाडणारी “छप्पनछुरीवाली” गायिका

खूप कमीजणांना ठाऊक आहे की, गौहर जान यांच्यावर त्या तेरा वर्षांच्या असताना बलात्कार झाला होता. खरंतर कोवळ्या वयातल्या या भयानक अनुभवानंतर कोणीही खचून गेलं असतं.

मात्र गौहर जान संगीताच्या मदतीनं या धक्क्यातून केवळ सावरल्याच नाहीत तर त्यांनी त्यांचं आयुष्य संगीत साधनेला वाहून टाकलं.

गौहर यांची कहाणी ही १९०० च्या सुरवातीच्या दशकातील महिलांवर होणार्‍या अत्याचाराची, मुस्कटदाबीची आणि शोषणाची आहे. जगण्याचा संघर्ष करावा लागणार्‍या स्त्रीची गोष्ट म्हणजे गौहरची गोष्ट आहे जी कोणत्याही शाईनं कोणत्याही कागदावर उमटणंही अशक्य आहे आणि सिनेमाच्या चकचकीत पडद्यावर येणंही तितकंच अशक्य.

ऐंशीच्या दशकापर्यंत हिंदी सिनेमात दिसणार्‍या तवायफ, त्यांचे कोठे आणि त्यांचे मुजरे आता सिनेमातून जवळपास हद्दपार झालेले आहेत.

सामान्य माणसाला तवायफ, वेश्या या शब्दाची इतकीच संकुचित ओळख असली तरिही तवायफ हा समाज नसून राजे राजवाड्यांच्या काळात एक आदब आणि अदा यांची खानदानी परंपरा होती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version