' देशातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात उपचारानंतर बिल भरणं हा प्रकारच नाही! – InMarathi

देशातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात उपचारानंतर बिल भरणं हा प्रकारच नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

==

सध्याच्या जगात काही फुकट मिळत असेल यावर विश्वासच बसत नाही. उलट सध्या अशी परिस्थिती आहे की, ज्या गोष्टीची तुम्हाला सर्वात जास्त तातडीने गरज आहे ती वस्तू सर्वाधिक महाग केली जाते.

कित्येक व्यवसायिक हे कोणता आजार, साथीचे रोग यांना एक ‘व्यवसाय संधी’ म्हणूनच बघत असतात. याचं उदाहरण आपण मागच्या वर्षी पहिल्यांदा ‘मास्क’ ची विक्री सुरू झाली तेव्हा बघितलंच होतं. कालांतराने, किती तरी कंपन्यांनी मास्क तयार करण्याचं काम सुरू केलं आणि मास्क च्या किंमती कमी झाल्या.

 

mask inmarathi

 

कोरोनाची तपासणी अधिक पैसे घेऊन तपासणी करणारे आणि ‘हवा’ तो रिपोर्ट देणारे कित्येक बनावट खासगी दवाखान्यांवर सुद्धा मध्यंतरी कारवाई करण्यात आली हे आपण बघितलं.

“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” ही भावना आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला शिकवली आणि काही लोकांना या सेवेचा ‘व्यवसाय’ केला हे मधल्या काळात समोर आलं आहे. हॉस्पिटल मधल्या वाढत्या सुविधा, स्वच्छता, स्पेशालिस्ट डॉक्टरांचे वाढते मानधन या सर्वांचा भार सामान्य नागरिकांवर येत गेला.

आज लोकांना कोरोना होण्यापेक्षा कोरोना झाला तर हॉस्पिटल चा खर्च कसा झेपणार ? ही भीती जास्त आहे. कारण, कोणतीच विमा कंपनी आजही कोरोना झाल्यावर लागणाऱ्या खर्चाला ‘विमा कवच’ देण्यासाठी अजूनही पुढे येत नाहीये.

विमा कंपनी, बँक ने मधल्या काळात बरेच आरोग्य विमा सुरू केले ज्यामुळे लोकांना निदान अपघात, कॅन्सर सारखे रोग किंवा इतर शारीरिक व्याधींचा सामना करताना आर्थिक अडचण येत नाही ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. “आजारी पडायचं असेल तर श्रीमंत व्हा” हे मान्य करून आपण लोकांना चांगल्या हॉस्पिटल मध्ये नेऊ शकलो नाही ही खंत काही लोकांना नक्कीच असेल. पण, आता या दिशेने सामाजिक, धार्मिक संस्थांनी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.

लोकांनी दिलेले पैसे सत्कारणी लागावेत ही मागणी कित्येक वर्षांपासून होत होती. दिल्ली मधील ‘गुरू ग्रंथ साहिब गुरुद्वारा’ने लोकांची ही गरज ओळखून सर्व सोयींनी अद्ययावत हॉस्पिटल ची सुरुवात केली.

‘सरईकाले खान’ या दिल्ली-नॉएडा सीमेवर असलेल्या भागात सुरू झालेल्या या हॉस्पिटल मध्ये ‘बिलिंग काऊंटर’ हा प्रकारच नाहीये. गुरुद्वाराच्या जागेतच हे हॉस्पिटल सुरू करून या समितीने अजून एक कौतुकास्पद काम केलं आहे.

 

hospital inmarathi

‘किडनी डायलिसीस ‘ साठी प्रामुख्याने सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या काळात अजूनही रोगांच्या उपचाराची सुविधा करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा मानस आहे.

१०१ पलंग ची सुविधा असलेल्या या हॉस्पिटलचं  उदघाटन करण्यात आलं. दिल्लीच्या सीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी ने या पूर्ण हॉस्पिटल च्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आहे.

‘गुरुद्वारा बंगला साहिब गुरुद्वारा’ मध्ये सुरू झालेलं हे हॉस्पिटल सध्या भारतात उपलब्ध असलेल्या किडनी डायलिसिस च्या हॉस्पिटल पैकी सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. गुरुद्वारा कमिटी ने सुरू केलेल्या या हॉस्पिटल चं नाव ‘गुरू हरिकिशन इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च किडनी डायलिसीस हॉस्पिटल’ हे ठेवण्यात आलं आहे.

सर्व उपचार तर विनामूल्य आहेतच. त्यासोबत, या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या आणि त्याच्या सोबत असलेल्या एका नातेवाईकाच्या जेवणाची सुद्धा इथे ‘मोफत’ सोय करण्यात आली आहे. गुरुद्वारा मध्ये असलेल्या ‘लंगर’ मधून जेवणाची व्यवस्था केली जाईल असं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे.

 

gurudwara inmarathi

 

आपल्यापैकी ज्या लोकांना अमृतसर किंवा नांदेड येथील गुरुद्वारा मध्ये ‘लंगर’ मध्ये जेवण करण्याचा योग आला आहे त्यांना हे जेवण किती चवदार असतं हे ठाऊक असेल.

धार्मिक ठिकाणी जमा होणाऱ्या पैशांचा सदुपयोग आणि दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मनात सेवाभाव ठेवून त्याला शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचं वाटप करणे हे काम जगातील प्रत्येक गुरुद्वारा मध्ये रोज सुरू असतं. ‘समाजातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये’ या विचाराने सुरू करण्यात आलेली ही प्रथा कित्येक वर्षांपासून अविरत सुरू आहे.

बाहेरगावाहून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या ‘लंगर’ मधील जेवणाच्या व्यवस्थेमुळे खूप सोय होत असते. दवाखान्यात भरती झालेल्या रुग्णांची सुद्धा ही सोय होईल ही खूप सकारात्मक गोष्ट घडतांना बघायला मिळत आहे.

१०१ पलंग ची व्यवस्था असलेल्या या हॉस्पिटल मध्ये एका दिवसात ५०० रुग्णांना तपासता येईल इतकी क्षमता आहे. काही दिवसांतच या हॉस्पिटल मध्ये १००० रुग्णांना तपासता यावं यासाठी गुरुद्वारा कमिटी प्रयत्न करत आहे.

रुग्णांची क्षमता वाढवल्यावर हॉस्पिटल चा खर्च वाढेल हा अंदाज घेऊन गुरुद्वारा कमिटीने भारतातील उद्योगांकडून सामाजिक जबाबदारी अर्थात, ‘सीएस आर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसीबीलिटी) फंड द्वारे मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यासोबतच, सरकारच्या आर्थिक योजनांचा फायदा घेऊन ती मदत गरजूंना करावी असं ठरवण्यात आलं आहे.

 

kidney inmarathi

 

सध्या या हॉस्पिटल मध्ये प्रत्यक्ष येणाऱ्या लोकांना उपचारासाठी भरती केलं जात आहे. पुढच्या एका आठवड्यात इथे भरती होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा लोकांना येता येईल. दिल्ली मेट्रो ‘पिंक लाईन’ मुळे ‘सरईकाले खान’ या भागात पोहोचणं हे सहज शक्य आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाला याचं श्रेय न देता या हॉस्पिटलच्या उदघाटना प्रसंगी भारतीय किसान युनियनच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं.

लोकांचे पैसे काही प्रमाणात धार्मिक कार्यासाठी राखीव ठेवून अतिरिक्त पैसे या पध्दतीने ‘लोक कल्याण’साठी वापरण्यात यावेत हे प्रत्येक संस्थानांनी ठरवायला पाहिजे या मताशी सगळेच सहमत असावेत.

आपल्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत या ‘मोफत’ हॉस्पिटल ची माहिती पोहोचवून आपण त्यांची मदत नक्कीच करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?