' ‘वेगळ्या वळणाचा’ नायक ते हर्षद मेहता : मध्यमवर्गीय इंजिनिअरची अशीही कथा – InMarathi

‘वेगळ्या वळणाचा’ नायक ते हर्षद मेहता : मध्यमवर्गीय इंजिनिअरची अशीही कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक वेबसिरीज पाहणारा एक प्रेक्षक वर्ग मागच्या काही वर्षात भारतात तयार झाला आहे. आठ ते दहा भाग असलेल्या वेबसिरीजचे सगळे भाग एका बैठकीत संपवून टाकणारे कित्येक रसिक प्रेक्षक आपल्या माहितीत नक्कीच असतील.

वेबसिरीज बघणे म्हणजे एखादं पुस्तक वाचण्यासारखं आहे. एकदा कथा वाचायला सुरुवात केली, की कथा पूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक खाली ठेवावंसं वाटत नाही.

सध्याची किंवा आजवर तयार झालेल्या वेबसिरीज पैकी सर्वात चांगली वेबसिरीज कोणती? असा प्रश्न विचारल्यावर ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीजचं नाव अनेकांच्या तोंडी असणार यात शंका नाही.

 

scam 1992 inmarathi

 

‘स्कॅम १९९२’ ही वेबसिरीज येऊन ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. पण आजही या वेबसिरीजच्या कथेबद्दल, पात्रांबद्दल चर्चा सुरू असते.

हंसल मेहता आणि जय मेहता यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसिरीज म्हणजे एक सत्यकथा असल्याने आणि सोप्या शब्दात केलेल्या सादरीकरणामुळे लोकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. काही दिवसात जर वेबसिरीज अवॉर्डस् सुरू झाले तर २०२० चे सर्व प्रमुख पुरस्कार या वेबसिरीजला मिळतील असे कोणीही म्हणेल.

‘स्कॅम १९९२’ मधील सर्वात लोकप्रिय कलाकार, हा हर्षद मेहताचं मुख्य पात्र साकारणारा प्रतिक गांधी हा आहे. एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या या इंजिनियर मुलाचं या वेबसिरीज नंतर आयुष्य बदलून जाईल, असा विचार त्याने किंवा त्याच्या निकटवर्तीय लोकांनी सुद्धा कधी केला नसेल.

‘रातोरात’ स्टार झाला आहे असं वाटणाऱ्या प्रतिक गांधीला इथपर्यंत पोहोचायला १५ वर्ष वाट बघावी लागली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल.

 

pratik gandhi inmarathi

 

अति महत्वाकांक्षी असलेल्या हर्षद मेहताने शेअरमार्केट कसं चालतं? याचा अभ्यास केला आणि त्यातील काही खाचखळगे त्याने शोधून काढले. स्वतःचं एक कन्सल्टिंग ऑफिस त्याने सुरू केलं आणि त्याच्या ग्राहकांना फायदाच व्हावा यासाठी त्याने शेअरमार्केटमधील काही लोकांसोबत भ्रष्टाचार करून त्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पहिला आणि एकमेव आर्थिक घोटाळा केला आणि रातोरात तो श्रीमंत झाला.

===

हे ही वाचा – शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

===

हे पात्र पडद्यावर साकारताना प्रतिक गांधीने अक्षरशः आपण हर्षद मेहताला टीव्हीच्या पडद्यावर बघत आहोत ही भावना लोकांच्या मनात निर्माण केली आणि तिथेच तो जिंकला.

कोण आहे प्रतिक गांधी?

२२ फेब्रुवारी १९८९ रोजी सुरतमध्ये जन्म झालेल्या प्रतिकने सुरतमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असतानाच प्रतिकला नाटकात काम करण्याची आवड होती. महाविद्यालयीन आणि इंजिनियरिंगचं शिक्षण प्रतिकने जळगावमधून घेतलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सेल्समध्ये काम करत असताना दिवसा ऑफिस, संध्याकाळी जीम आणि रात्री रंगभूमीवर काम अशी कसरत त्याने केली होती. नोकरी करत असताना त्याने २ वर्ष सातारा, २ वर्ष पुणे आणि मग मुंबई असा टिपिकल नोकरी करणाऱ्या व्यक्तींसारखा प्रवास केला आहे.

प्रतिकला नायक बनण्याची पहिली संधी फिरोज भगत यांच्या गुजराती नाटकाद्वारे मिळाली. त्यानंतर गुजराती सिनेमात काम करून प्रतिकने आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली.

राष्ट्रीय पातळीवर प्रतिक गांधीच्या कामाची दखल घेतली गेली ती ‘मोहन्स मसाला’ या एकपात्री नाटकामुळे. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषेत हा एकपात्री प्रयोग प्रतिक सादर करायचा. या नाटकाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.

प्रतिकचा पहिला सिनेमा होता तो २०१६ मध्ये गुजराती भाषेत रिलीज झालेला ‘रॉन्ग साईड राजू’. या सिनेमाला त्यावर्षीचं सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि तिथून हिंदी निर्माता, दिगदर्शकांनी प्रतिक गांधीच्या कामाची दखल घ्यायला सुरुवात केली.

 

wrong side raju inmarathi

 

प्रतिक गांधीचा पुढचा प्रवासही सोपा नव्हता. २००६ मध्ये त्याला ‘युवर्स इमोशनली’ हा इंग्रजी सिनेमा ऑफर करण्यात आला. या सिनेमात त्याला एका गे व्यक्तीची भूमिका साकारायची होती. आपल्या अभिनयाशी प्रामाणिक असलेल्या प्रतिकने हा सुद्धा रोल तितक्याच ताकदीने केला.

हा सिनेमा LGBTQ आणि न्यूफेस्ट २००६ या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. समीक्षकांनी तिथे सुद्धा प्रतिकच्या कामाचं कौतुक केलं होतं. मध्यमवर्गीय परिवारातील मुलाने असं काम मोठ्या पडद्यावर करणं ही सुद्धा एक तारेवरची कसरत असते. प्रतिकने हे आव्हान सुद्धा लीलया पेललं होतं.

===

हे ही वाचा – कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

===

२०१४ मध्ये प्रतिकने ‘बे यार’ या अजून एका गुजराती सिनेमात काम केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि प्रतिकच्या करिअरचा हा टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमाच्या यशानंतर प्रतिकने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ८ वर्षांच्या धावपळीला पूर्णविराम देऊन केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.

नोकरी सोडल्यानंतर प्रतिककडे सहा नवीन सिनेमांची ऑफर चालून आली. ज्यामध्ये हिंदी मधील ‘लव यात्री’ या सिनेमाचा सुद्धा समावेश होता.

 

loveyatri inmarathi

 

२०१६ मध्ये हंसल मेहता ने ‘स्कॅम १९९२’ च्या स्क्रिप्ट वर काम करायला सुरुवात केली आणि प्रतिक ला हर्षद मेहता च्या रोल साठी नक्की करण्यात आलं. १२ वर्ष मुंबईत दिलेल्या विविध स्क्रीनटेस्ट चं आता चीज होणार होतं आणि ते झालं.
ऑक्टोबर २०२० मध्ये ‘स्कॅम १९९२’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आणि त्यासोबतच एका नायकाचा वेबसिरीजच्या दुनियेत स्वागत झालं.

आपल्या करिअरबद्दल एका वाक्यात सांगताना प्रतिक गांधी हा ‘स्कॅम १९९२’ मधील हर्षद मेहताच्या या डायलॉगचा वापर करतो, “सक्सेस क्या है? फेल्युअर के बाद आने वाला चॅप्टर!”

बॉलीवूडमध्ये सिनेमा करण्यापेक्षा पुढील काही वर्ष वेबसिरीज साठीच काम करण्याचं प्रतिक गांधीने ठरवलं आहे. सिनेमाची शुटिंग करा आणि तो बघण्यासाठी लोक येतील की नाही याची काळजी करा यापेक्षा वेबसिरीज हे कधीही सोपं मध्यम आहे असं प्रतिकचं मत आहे.

तुम्ही वेबसिरीजमध्ये काम करतांना फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. भारतात वेबसिरीजची सतत वाढत जाणारी मागणी, यामुळे नवीन कलाकार हे आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आता काम करू शकतात. हर्षद मेहताचं पात्र साकारून शेअरमार्केटचं ज्ञान वाढलं का? या प्रश्नावर उत्तर म्हंणून प्रतिक हसून नकार देतो.

 

pratik gandhi inmarathi

 

कोणतीही पूर्व पार्श्वभूमी नसतांना, आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात यश मिळवणाऱ्या प्रतिक गांधीला उत्तरोत्तर अजून प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देऊयात.

===

हे ही वाचा – प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?