आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – मुकुल रणभोर
===
अब्दुल कादर मुकादम यांनी ‘औरंगाबादच्या नामांतरास पर्याय..’ असा लेख लोकसत्तेच्या ७ मार्चच्या रविवारच्या पुरवणीत लिहिला आहे. औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचाराचे संदर्भ देताना त्यांनी इस्लाम, इस्लामी धर्मशास्त्र, कुराण यांना ‘दयाळू, कारुण्यमय, क्षमाशील’ ठरवून वैयक्तिक औरंगजेब कसा धर्मांध होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुराण कसे धर्मांध आणि हिंसक नाही, हे समजावून सांगायचं प्रयत्न केला आहे.
त्यासाठी त्यांनी कुराणातील एका आयतीचा संदर्भ दिला आहे. आणि ‘कुराणातील आयत आदर्श आहे, पण त्याचा आधार घेऊन वागणारा औरंगजेब किती धर्मांध आहे,’ असं प्रतिपादन अब्दुल कादर मुकादम यांनी केलं आहे.
सर्वप्रथम त्यांनी वापरलेली आयात आणि वापरलेलं स्पष्टीकरण खोटं किंवा अर्धसत्य आहे. मुकादम लिहितात,
‘आणि जोपर्यंत (धार्मिक) छळ थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी लढा, आणि त्यांनी जर तो छळ थांबविला तर ही गोष्ट लक्षात ठेवावी की आक्रमकांव्यतिरिक्त इतरांच्या बाबतीत शत्रुत्व ठेवण्याची परवानगी नाही.’
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
यातून असं ध्वनित होतं की छळ होतो आहे तोपर्यंत शत्रुत्व ठेवावं, छळ थांबविल्यावर शत्रुत्व ठेवू नये. आणि कोणीही माणूस असा विचार करू शकतो की हे बरोबरच आहे की, हिंदू धर्मात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या निधनानंतर शत्रुत्व उरत नाही, त्याप्रमाणेच हे आहे. तर हे तसं नाही.
–
हे ही वाचा – या मुस्लिम शासकांच्या कपटी राजकारणामुळे इतिहासावर काळेकुट्ट डाग पडले आहेत…
–
मुळात मुकादम यांनी कुराणातील आयात जशी आहे तशी लिहिलेली नाही. दावअतुल कुराणमध्ये या आयतीची शब्दरचना कशी आहे ते पाहू,
“’… आणि त्यांच्याशी लढा१ येथपावेतो की उपद्रव शिल्लक राहू नये आणि ‘दीन’ अल्लाहचाच व्हावा. २ आणि जर ते परावृत्त होतील तर अत्याचारी लोकांशिवाय इतर कोणाविरुद्ध आक्रमण योग्य नाही.३’”
आणि दावअतुल कुराणमध्ये या आयतीत गरजेच्या सर्व शब्दांचे पुरेसे सविस्तर स्पष्टीकरण दिलेले आहे.
१. येथे मुसलमान आणि मक्केचे इन्कार करणारे लोक यांच्यामध्ये जी तेढ होती ती चांगल्या प्रकारे समजावून घेतली पाहिजे. पवित्र कुराणचा दावा हा होता की, खान-ए-काबा (काबागृह) ज्याची बांधणी हजरत इब्राहिम (अ) यांनी एकेश्वरवादाच्या केंद्राच्या स्वरूपात केली होती. त्याच्या देखरेखीचे खरे हक्कदार इमान आणणारे लोक आहेत.
अनेकेश्वरवादी लोक नव्हेत. ज्यांनी त्याच्यामध्ये मुर्त्या बसविल्या होत्या. हजरत इब्राहिम (अ) यांचा प्रार्थनेचा स्वीकार करून सर्वश्रेष्ठ अल्लाहने ज्या पैगंबरांना निर्माण करण्याचा वायदा केला होता त्याची पूर्तता हजरत मुहम्मद (स) यांच्या उदयाने झाली होती.
या पैगंबरांच्याद्वारे या घराच्या मूळ उद्देशाची पुनःस्थापना करावयाची आहे. आणि म्हणून हे आवश्यक आहे की या घराला काफिर (नास्तिक) व मुश्रीफ (अनेकेश्वरवादी) लोकांच्या ताब्यातून मुक्त करून आणि कुफ्र (नास्तिकता) व शिर्क (अनेकेश्वरवादाच्या) मलिनतेपासून स्वच्छ करून मुसलमान समाजाच्या ताब्यात दिले जावे. कारण ते इस्लामचे केंद्रस्थान आणि इमान आणलेल्यांचा किबला आहे.
हा वस्तुतः हजरत मुहंमद (स) यांचा मूळ उद्देश होता आणि या उद्देशाच्या पूर्ततेच्या मार्गात जर कोणती शक्ती आडवी आली तर तिला मार्गातून दूर करण्यासाठी सामर्थ्याचा वापर करणे अगदी आवश्यक होते.
२. ही लढाई त्यावेळेपर्यंत चालू राहिली पाहिजे जोपर्यंत हरम च्या पवित्र भूमीतून अनाचाराची स्थिती संपत नाही आणि सत्य धर्माचा प्रभाव पडत नाही. कारण की अल्लाहच्या घराचे स्वरूप एकेश्वरवादाच्या केंद्राचे आहे. आणि म्हणून या पवित्र भूमीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मासाठी स्थान नाही.
३. जर हे परावृत्त होऊन इस्लामचा स्वीकार करतील तर मग त्यांच्या मागील अपराधांबद्दल त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. परंतु फक्त त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल जे आपल्या अत्याचारी मार्गावर कायम राहतील (संदर्भ – दावअतुल कुराण (खंड – १, पान १०४))
हे स्पष्टीकरण पुरेसे आहे. आयतीच्या स्पष्टीकरणामध्ये हे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सत्य धर्माचा प्रभाव पडत नाही आणि अनाचार संपत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील. यातल्या ‘अनाचार संपत नाही’ याचा सामान्यपणे आपण जो अर्थ घेतो तो होत नाही. व्यक्तीने किंवा समाजाने इस्लाम म्हणजे ‘सत्य न स्वीकारणे’ हा, मुसलमानांसाठी अनाचार आहे.
या अल्लाहच्या भूमीवर अनेकेश्वरवादी अस्तित्त्वात असणं हा इस्लाम पाळणाऱ्या लोकांवर होत असलेला अनाचार आहे.आणि पहिल्या स्पष्टीकरणात अल्लाच्या घराचे शुद्धीकरण हे फक्त काबागृहापुरते मर्यादित नाही.
–
हे ही वाचा – मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” अचंबित करणारा इतिहास...
–
अल्लाहचे घर म्हणजे ही ‘पृथ्वी’, ही पृथ्वी अनेकेश्वरवाद, कुफ्र याच्या मलिनतेपासून शुद्ध करायची आहे, त्याचा अर्थ आहे.आणि अब्दुल कादर मुकादम यांच्या लेखाच्या दृष्टीने आयतीच्या स्पष्टीकरणातला तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.
मुकादम जी शब्द रचना वापरतात तीच आपण वापरली तर ‘छळ’ थांबवणे म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे, असा अर्थ आहे.
आयतीत शब्द आहेत, ‘आणि जर ते परावृत्त होतील, तर शत्रुत्व ठेऊ नये’, यामध्ये असत्य धर्माच्या प्रभावातून जे परावृत्त होऊन सत्य धर्माकडे येतील त्यांच्याविरुद्ध शत्रुत्व ठेऊ नये. आणि एकदा हा इस्लाम स्वीकारला की त्यांच्या इस्लाम स्वीकारण्या पूर्वीच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा देऊ नये. आणि यानंतरही कोणाविरुद्ध लढाई सुरू राहील तर, जे आपल्या अत्याचारी म्हणजे असत्य धर्माचा प्रसार सुरू ठेऊन इस्लामवर अत्याचार करत राहतील त्यांच्याविरुद्ध.
दावअतुल कुराणमध्ये या आयतीचे जसे स्पष्टीकरण आलेले आहे, तसेच्या तसे मी इथे सांगितले. मुकादम यांनी कुराणला क्षमाशील आणि दयाळू ठरवून फक्त औरंगजेब कसा दोषी होता हे सांगितले आहे. कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण पहिले तर आपल्या लक्षात येईल की कुराणचाच आदेश औरंगजेबाने तंतोतंत पाळलेला आहे.
आपण फक्त दावअतुल कुराणच्या भाष्यावर विश्वास नको ठेवूया. इस्लामचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार म्हणजे सय्यद अब्दुल आला मौदुदी यांनी या आयतीबद्दल काय लिहिले आहे ते एकदा पाहूया.
“जोपर्यंत उपद्रव नष्ट होऊन अल्लाहचा धर्म प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करा. मात्र जर ते परावृत्त झाले तर लक्षात ठेवा की अत्याचा-यांशिवाय कोणाशीही शत्रुत्व उचित नाही.”
याठिकाणी ‘उपद्रव’ म्हणजे एखाद्या समूहाचा किंवा व्यक्तीचा केवळ या कारणास्तव छळ करणे की त्याने असत्य (बिगर इस्लामी धर्म) सोडून सत्य (इस्लाम) स्वीकारले आहे, हे अभिप्रेत होय. (संदर्भ – दिव्य कुरआन – सय्यद अबुल आला मौदुदी (पान – १००))
या दोन्ही स्पष्टीकरणातून आपल्या हे लक्षात येईल की व्यक्ती, समाज जोपर्यंत इस्लाम स्वीकारत नाही तोपर्यंत ती व्यक्ती, समाज मुसलमान समाजावर अत्याचार करतो आहे.
जोपर्यंत तो इस्लामचा स्वीकर करत नाही तोपर्यंत असत्य वाटेवरून मार्गक्रमण करतो आहे. आणि म्हणून त्याच्याशी युद्ध केले पाहिजे, अशी इस्लामची भूमिका आहे. युद्धात पराभव करून किंवा तो स्वयंप्रेरणेने सत्य धर्माकडे आकर्षित झाला तर त्याच्याशी शत्रुत्व ठेवू नये. त्याने इस्लामचा स्वीकार केला तर तो मुसलमान नसताना त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला शिक्षा सुद्धा करू नये, अशी इस्लामची भूमिका आहे.
मुकादम यांनी मुळात या आयतीच्या शब्दरचनेत फेरफार केली आहे. खोट्या आयतीचा आणि त्याच्या अन्वयार्थाच्या आधारे त्यांनी केवळ औरंगजेबाला दोषी ठरवले आहे आणि कुराणला म्हणजे धर्माला पूर्णपणे दोषमुक्त ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
वरील आयतीचे खरे अर्थ पहिले असता असे म्हणता येते की औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना जी वागणूक दिली ती तंतोतंत कुराणला अनुसरून दिली.शिवाय, मुकादम त्यांच्या लेखात लिहितात की औरंगजेबाने सत्तेसाठी केलेल्या पाशवी हिंसाचाराला इस्लामी धर्मशास्त्रात कसलाही आधार नाही. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाजरांचे उदाहरण घेतले आहे.
ते लिहितात, संभाजी राजांना मुकर्रब खानाने पडकून जेव्हा औरंगजेबासमोर उभे केले तेव्हा संभाजी राजे शरणागत अवस्थेत होते. आणि शरण आलेल्या शत्रूबद्दल शत्रुत्व बाळगू नये असा ‘कुराण’चा आदेश आहे. ती कुराणातली आयात आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी फेरफार करून सांगितली आहे, ते आपण वर पाहिलंच आहे. पण ज्या इस्लामी धर्मशास्त्राचा संदर्भ देऊन मुकादम बोलत आहेत, ते सुद्धा खोटंच आहे.
इस्लामी धर्मशास्त्र म्हणजे कुराण, हादीस आणि प्रेषितांचे चरित्र. तिन्हीही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. तिन्हींचा एकत्र अभ्यास केल्याशिवाय इस्लामच्या अनेक बाबींचे व्यवस्थिती आकलन होत नाही.
फेब्रुवारी ६२७ मध्ये झालेल्या खंदकाच्या युद्धाचा इथे मुद्दाम संदर्भ दिला पाहिजे. प्रेषित मुहम्मदांचा या युद्धात अभूतपूर्व विजय झाला. आणि बनी कुरैझा टोळीचा युद्धात पराभव झाला. त्यानंतर शरण आलेला सुमारे ८००-९०० ठार मारण्याचा निकाल प्रेषितांच्या आज्ञेवरून न्यायाधीशाने दिला. ((संदर्भ – स्पिरिट ऑफ इस्लाम – न्या. अमीर अली (पान – ८०)) इस्लामी इतिहासात खंदकाचे युद्ध ही अतिशय प्रसिद्ध घटना आहे.
मुकादम यांनी संभाजी महाराज ‘शरणागत’ होते असे लिहिले आहे, हेच मुळात सत्य नाही. पण शरण आलेल्या शत्रूबद्दल शस्त्रूत्व ठेवू नये, असे इस्लामी धर्मशास्त्राचा संदर्भ वापरून जे मुकादम लिहीत आहेत, तेही असत्यच आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे की शहराला मलिक अंबरचे नाव द्यावे यावर कोणतेही मत मी व्यक्त करत नाही. पण इस्लामी धर्मशास्त्र, कुराण यांना संपूर्ण दोषमुक्त ठरवण्याचा मुकादम यांनी जो प्रयत्न केला आहे, तो कसा असत्यावर उभा आहे हे मात्र सांगणे गरजेचे आहे.
– मुकुल रणभोर
– mukulranbhor111@gmail.com
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.