Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा : प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी प्रेमकथा!

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एक प्रचंड घनदाट जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव राहत होते. जंगलातून छोटे छोटे झरे वाहत होते. विशाल वृक्षे, सुंदर वेलींमुळे जंगल प्रसन्न असायचं. दाट झाडे असल्याने दिवसाउजेडी जंगलात अंधार असायचा.

झऱ्यातील वाहत्या पाण्याचा झुळूझुळू आवाज, पक्ष्यांचा मधूर ध्वनी, वाऱ्याने पानावर पान घासून तयार होणारा वाऱ्याचा आवाज, फुलांचा गंध अशा वातावरणाने वातावरण प्रसन्न वाटायचं. जणू काही हे प्राणी, पक्षी, झाडं, वेली परस्परांशी सुखसंवादाच्या गप्पा मारत आहेत, असचं वाटायचं.

जंगलात एका झऱ्याभोवती एक विशालकाय प्राचीन वृक्ष होता. त्या वृक्षाच्या खालीच छान छान, रंगीबेरंगी फुले बहरलेल्या वेली होत्या. त्या वेलींपैकी एका वेलीची फुले खूपच सुंदर होती. ती फुले दिवस उजाडला की उघडी असायची आणि दिवस मावळला की फुलांच्या पाकळ्या मिटून जायच्या. त्या फुलाजवळ फुलपाखरं यायची. फुलांवरील परागकणांचा आस्वाद घ्यायला पक्षी यायचे. फुलांचा गंध घ्यायला सरपटणारे प्राणी यायची.

एक फुलपाखरू आणि एक भुंगा नियमितपणे फुलांजवळ यायचे. जणू काही फुलांच्या गंधावर आणि आस्वादावर दोघांचेही जीवापाड प्रेम होतं. भुंगा यायचा काही वेळ फुलांजवळ घालावायचा आणि निघून जायचा. फुलपाखरू यायचं. फुलातील परागकण शोषून घ्यायचं आणि उडून जायचं. हे सगळं दृश्य मोठं प्राचीन झाड बघायचं.

=====

या बोधकथाही तुम्हाला आवडतील

शनिवारची बोधकथा : संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणारी गोष्ट!

शनिवारची बोधकथा : लाकडाच्या फळीची गोष्ट!

शनिवारची बोधकथा : मनाच्या उत्साहाचं रहस्य

=====

एकेदिवशी फुलपाखराला अहंकाराचा स्पर्श झाला. नेहमीप्रमाणे दिवस उजाडला. फुलपाखरू मोठ्या झाडाच्या खाली फुलाजवळ आले. भुंगा तिथं आधीच आलेला होता. फुलपाखराला राग आला. ‘‘हे भुंग्या तुझ्यापेक्षा या फुलावर माझं प्रेम जास्त आहे’’, असं म्हणत त्यानं भुंग्याला डिवचले.

भुंगा म्हणाला, ‘‘असू दे. मी माझ्या परीनं प्रेम करतो. तू तुझ्या परीनं प्रेम कर. प्रेमाचं कधी मोजमाप करू नये मित्रा.’’ त्यावर फुलपाखरू भडकलं. ‘‘मान्य कर. माझं तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे.’’

भुंगा म्हणाला, ‘‘कसं मान्य करू. हे फुलं म्हणजे माझं आयुष्य आहे. त्याला बघून मी माझा दिवस सुरु करतो.’’ यांचा वाद सुरु असतानाच शेजारचा विशालकाय वृक्ष बोलू लागला. ‘‘फुलपाखरा आणि भुंग्या तुमचं प्रेम तुम्ही सिद्ध करायला हवं.’’

फुलपाखरू म्हणालं, ‘‘कसं ते सांग?’’ ‘‘तुम्हा दोघांची मी एक परीक्षा घेतो. त्यात जे कोणी पास होईल. त्याचं फुलावर जास्त प्रेम आहे, असं समजण्यात येईल’’, झाड बोललं. ‘‘कसली परीक्षा?’’, भुंगा बोलला.

‘‘उद्या दिवस उजाडल्यानंतर जो कोणी या फुलाच्या जवळ सर्वांत आधी पोहोचेल; त्याचं फुलावर जास्त प्रेम असेल’’ झाडानं सांगितलं. दोघांनही ते मान्य केलं.

दुसरा दिवस उजाडण्याची तिघेही वाट बघू लागले. रात्र झाली. फुलपाखरानं सकाळी लवकर उठायची तयारी केली. भुंगा रात्रभर फक्त फुलाचाच विचार करू लागला. झाडाचीही उत्सुकता वाढली. दुसरा दिवस उजाडू लागला. फुलपाखरू उठलं. त्यानं वेगानं झऱ्यात जाऊन अंग स्वच्छ केलं.

फुलपाखरू उडत उडत फुलाजवळ आलं. फुलांच्या पाकळ्या मिटलेल्या होत्या. फुलपाखरू आनंदानं नाचू लागलं. आजूबाजूला कुठेच भुंगा दिसत नव्हता. फुलपाखरानं झाडाला विचारलं, ‘‘बघ मी जिंकलो की नाही?’’ झाडं म्हणालं, ‘‘थोडं थांब!’’ काही वेळातच फुलांच्या पाकळ्या उघडल्या. आणि फुलपाखरू थक्क झालं.

त्यावर झाड बोलू लागलं. ‘‘फुलपाखरा, भुंग्याला सकाळी लवकर पोहोचू शकू की नाही याची भीती वाटत होती. स्वत:चं खरं प्रेम सिद्ध करण्याची त्याला गरज नव्हती. पण स्वत:च्या प्रेमाबद्दल कोणी शंका घेण्याची त्याला भीती होती. त्यामुळं कालच फुलाजवळ आला आणि फुलाच्या आत जाऊन बसला. दररोजप्रमाणे रात्री फुल बंद झालं. दुर्दैवानं आत हवा पोहोचू शकली नाही आणि गुदमरल्याने भुंग्यांचा मृत्यू झाला. हा बघ भुंग्याचा देह तुला फुलात दिसत आहे.’’

त्यावर फुलपाखराला खूपच वाईट वाटलं, ‘‘पण भुंगा तर तुझ्यासारख्या मोठमोठ्या वृक्षांनाही पोखरून काढू शकतो. मग या फुलातून बाहेर पडणं भुंग्याला सहज शक्य होतं. तरीही फुलाला पोखरून तो बाहेर का नाही आला?’’

त्यावर वृक्ष अतिशय शोकाकुल मंद स्वरात म्हणाला, ‘’फुलपाखरा, आपलं कितीही सामर्थ्य असलं तरीही आपण आपलं सामर्थ्य आपलं ज्याच्यावर खरं प्रेम आहे, त्याच्याविरुद्ध कधीही नाही वापरू शकत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मग प्राण गेला तरीही बेहत्तर!’’

फुलपाखरानं मान्य केलं की भुंग्याचचं फुलावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम होतं. झाड आणि फुलपाखरू दोघांनीही भुंग्याला श्रद्धांजली वाहिली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version