' राग अनावर झालाय? पैसे द्या आणि शांत व्हा! वाचा नेमकी काय आहे भानगड… – InMarathi

राग अनावर झालाय? पैसे द्या आणि शांत व्हा! वाचा नेमकी काय आहे भानगड…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक व्यक्तीला थोड्या फार प्रमाणात राग येतच असतो. राग व्यक्त करण्याची प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगवेगळी असते, इतकाच काय तो फरक असतो.

राग येणं ही अगदीच वाईट गोष्ट आहे, असं नाही. राग आल्यानंतर तुम्ही काय कृती करता? हे सर्वात जास्त महत्वाचं आहे.

काही व्यक्ती असतात ज्यांना रागावलेलं अजिबात आवडत नाही. ते प्रत्येक वेळी त्यांचं काम चांगलंच होईल याची दक्षता घेत असतात. शाळेत शिकतांना आपण दोन प्रकारचे विद्यार्थी बघत असतो. शिक्षकांनी रागावलं म्हणून जास्त अभ्यास करणारे आणि नाराज होऊन कमी अभ्यास करणारे. दोन्ही पर्याय आपल्या समोर उपलब्ध असतात. राग आल्यावर त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे प्रत्येक व्यक्ती ठरवत असतो.

राग आल्यावर कसं वागावं ? याचं उत्कृष्ट उदाहरण सांगायचं तर ‘लक्ष्य’ सिनेमा मधील हृतिक रोशनचं पात्र आठवावं. आयुष्याचं काहीच ध्येय नसलेला एक मुलगा त्याला मिळालेल्या नकारामुळे इतका बदलतो आणि त्या रागात एक आर्मी ऑफिसर बनतो ह्याला आपल्या रागाचा सदुपयोग करून घेणं म्हणता येईल.

 

hritik lakshya inmarathi

 

राग आल्यावर वस्तू फेकणे, स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणं हे प्रकार आपण बघितले आहेत. काही शाळांमध्ये ‘अँगर मॅनेजमेंट’ यावर मुलांचं लहानपणीच खूप प्रबोधन केलं जातं.

राग येऊच नये हे शिकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा राग आल्यावर त्याला ‘मॅनेज’ कसं करायचं हे जर का आपण कमी वयातच शिकलो तर किती तरी भांडण, तंटे टाळता येतील.

तुमची जर बदल करण्याची तयारी असेल तर तुम्ही कधीही बदलू शकता. त्यासाठी फक्त मनाचा निग्रह असावा लागतो.

राग आल्यावर ज्यांना काहीच सुचत नाही, राग हा कृतीतून व्यक्त केल्याशिवाय शांत होतच नाही अश्या व्यक्तींसाठी ब्राझीलमध्ये एक विशेष सोय करण्यात आली आहे. आयोजकांनी या सोयीला व्यवसायाचं स्वरूप सुद्धा दिलं आहे.

“पैसे भरा आणि राग व्यक्त करा” या संकल्पनेवर ब्राझीलमध्ये ‘रेज रूम’ची सुरुवात करण्यात आली आहे. तुम्हाला कोणताही तणाव असेल, बॉससोबत पटत नसेल, चीडचीड होत असेल तर ४.६ डॉलर द्या आणि आपला राग इथल्या वस्तूंवर काढा असं या व्यवसायाचं स्वरूप आहे.

 

rage room inmarathi

 

‘रेज रूम’ हे एक वेअरहाऊस आहे जिथे जुने कम्प्युटर, टीव्ही, प्रिंटर सारख्या वापरात नसलेल्या वस्तू एकत्र करून ठेवण्यात आल्या आहेत. रागात असलेली व्यक्ती इथे भारतीय चलनाच्या प्रमाणात सांगायचं, तर ३०० रुपये भरून या खोलीत जाऊन पाहिजे तशी तोडफोड करू शकते.

या व्यवसायाला ब्राझीलच्या सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे. बेसबॉलची बॅट, हातोडा अशा वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत. या आधीच तुटलेल्या वस्तूंना पुन्हा तोडल्याने लोकांचा राग, तणाव कमी होतो अशी प्रतिक्रिया या सेवेचा फायदा घेणाऱ्या लोकांनी आणि आयोजकांनी दिली आहे.

हे ही वाचा – नेहमी येणाऱ्या रागाचं रूपांतर विधायक कामात करून यश कसं मिळवायचं ते शिका

वेंडली रॉड्रिक्स या ४२ वर्षाच्या व्यक्तीने ‘रेज रूम’चा व्यवसाय सुरू केला आहे. रागात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या खोलीत जातांना सेफ्टी शुज आणि हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

‘तुम्ही महत्वाचे आहात, निर्जीव वस्तूंवर तुमचा राग काढा’ असा संदेश वेंडली रॉड्रिक्सने लोकांना द्यायचा प्रयत्न केला आहे.

‘रेज रूम’ वापरण्यासाठी घालण्यात येणारी अजून एक अट ही आहे, की या खोलीच्या भिंतीवर तुम्हाला तुमच्या रागाचं एका शब्दात कारण लिहावं लागतं. तुम्हाला त्याचा तपशील, अपेक्षित बदल हे लिहायची गरज नाहीये.

‘रेज रूम’ चा वापर करणाऱ्या बहुतांश लोकांनी आपल्या रागाचं कारण हे ‘ब्रेकअप’, ‘बेरोजगारी’, ‘गरिबी’, ‘भ्रष्टाचार’ यापैकी एक किंवा अधिक कारणं लिहिली आहेत.

 

people in rage room inmarathi

 

२०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काहींना नोकरीचं टेन्शन, काहींना पगाराचं टेन्शन, काहींना आपल्या माणसांपासून लांब रहावं लागण्याचं दुःख अश्या प्रकारच्या लोकांनी मागच्या वर्षभरात ‘रेज रुम’च्या सेवेचा उपभोग घेतल्याची माहिती वेंडली रॉड्रीक्सने जाहीर केली आहे.

ब्राझीलच्या ‘साओ पावलो’ या शहरात ‘रेज रूम’ची सुरुवात करण्यात आली आहे. या शहरात रहाणाऱ्या लोकांना आपल्या घरातील जुन्या आणि विक्रीला न जाऊ शकणाऱ्या वस्तू ‘रेज रूम’मध्ये आणून द्याव्यात असं आवाहन आयोजकाने लोकांना केलं आहे.

आपण ठरवलेल्या, पण कोणत्याही कारणामुळे प्रत्यक्षात न घडू शकलेल्या गोष्टींबद्दल मनात कुढत राहण्यापेक्षा राग व्यक्त करा आणि हलके व्हा, असं आवाहन वेंडली रॉड्रिक्स हे नेहमीच करत असतात.

‘रेज रूम’चा वापर करणाऱ्या दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर सध्या फिरत आहेत. त्यापैकी एक ब्राझीलमध्ये जाहिरात क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे. सतत करावं लागणारं काम, दगदग यामुळे त्यांची तब्येत खराब होत होती. त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून त्यांनी ‘रेज रूम’चा वापर करायचं ठरवलं. याचा त्यांना फायदा झाला.

हे ही वाचा – राग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो? जाणून घ्या

मनातील भावना वृद्धिंन्ग्त करणाऱ्या ‘एड्रेनेलिन’ या संप्रेरकाचा निचरा हा राग व्यक्त केल्याने होतो. हे साध्य करण्यासाठी लोक ‘रेज रूम’चा लोक वापर करतांना दिसत आहेत.

‘लुसियाना होलंदा’ ही ३५ वर्षीय महिला घरात एकटीच कमावती आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. दोन मुलींची आई त्यांच्यासमोर राग व्यक्त करू शकत नव्हती. त्यामुळे काही वेळेस त्या ‘रेज रूम’चा पर्याय निवडतात. अशा व्यक्तींसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

 

luciana holanda smashing in rage room inmarathi

 

भारतात अजून तरी अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात असल्याचं ऐकिवात नाही. पण, ‘रेज रूम’सारखी संकल्पना जर भारतात राबवण्यात आली तर त्याला निदान मोठया शहरात तरी प्रतिसाद मिळेल असा काही मानसिक तज्ञांचा अंदाज आहे.

‘आता माझी सटकली, मला राग येतोय’ असं होणाऱ्या आणि ‘मुझे किसी को धोने का है’ असा विचार करणाऱ्या लोकांना ‘रेज रूम’सारखा पर्याय आवडू शकतो.

राग येऊ नये असं वाटणाऱ्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, गोष्टी वेळेत करणे, अपेक्षा कमी ठेवणे, कामाच्या निकालापेक्षा कामाची आवड निर्माण करणे अश्या काही टिप्स अमलात आणल्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल.

आपल्या माहितीतल्या रागीट व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांच्या ‘गेट वेल सुन’साठी प्रयत्न करा.

===

हे ही वाचा – राग आल्यावर त्रास करुन घेण्यापेक्षा या टिप्स वापरुन राग शांत करा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?