आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोनामुळे आपल्या जीवन शैलीत किती बदल झाला आहे हे आपण सगळे अजूनही अनुभवत आहोत. पहिल्या फेरीत म्हणजे मागच्या वर्षीच नाकात दम करणाऱ्या कोरोना ने २०२१ मध्ये पुन्हा आपली दुसरी फेरी सुरू केली आणि लोकांची काळजी परत एकदा वाढवली आहे.
“पुन्हा ‘लॉकडाऊन’ नको असेल तर काळजी घ्या” असं आवाहन सर्व स्तरातून सध्या होत आहे. लॉकडाऊन म्हणजे नोकरीवर गदा किंवा पगार कपात हे ज्यांच्या डोक्यात पक्कं झालं आहे ते लोक सतर्कतेने वागत आहेत. विनाकारण फिरणारे, गर्दी करणारे तेव्हाही होते. आजही आहेत.
ज्या कंपन्यांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेतलं आहे त्यांनी आज ही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘घरून काम करा’ हा सल्ला दिला आहे. आय टी क्षेत्रातील कित्येक लोकांनी एक वर्षांपासून आपल्या ऑफिसचं तोंड अगदी बोटावर मोजण्या इतक्याच वेळेस बघितलं असेल.
कोरोना मुळे हे ‘सोशल डिस्टन्सिंग’, ‘लॉकडाऊन’, ‘सॅनेटायझर’, ‘ऑनलाईन स्कुल’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’ हे काही इंग्रजी शब्द इतक्यांदा उच्चारण्यात आले आहेत की जणू आता हे मराठीच शब्द झाले आहेत.
लहान मुलं सुद्धा हे शब्द अगदी सहज वापरत असतात आणि एकमेकांना सांगत असतात की, “आज माझ्या बाबांचं वर्क फ्रॉम होम आहे.” सुरुवातीच्या काळात दंगा करणारी छोटी मंडळी ही आता आपल्या बाबा किंवा आईला घरून काम करण्यासाठी मदत करताना दिसत आहेत हा एक समाधानकारक बदल म्हणता येईल.
लंडन मध्ये राहणारे ‘संजीव गुप्ता’ हे एक असेच बाबा आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी, परिवाराने कोरोना काळात खूप साथ दिली ज्या मुळे ते त्यांच्या ऑफिसचं काम करू शकले. त्यात काय विशेष? असं कोणालाही वाटेल. पण, यात खूप काही विशेष आहे.
संजीव गुप्ता कोण आहेत? काय काम करतात?
५५ वर्षीय संजीव गुप्ता हे ‘ब्रिटिश प्रोफेसर’ आणि ‘भूगर्भशास्त्रज्ञ’ आहेत. भारतीय वंशाच्या संजीव गुप्ता यांना ‘नासा’ च्या ‘मार्स रोव्हर’ म्हणजेच मंगळयान या प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळाली आहे.
===
हे ही वाचा – अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा
===
ही जबाबदारी ते चोखपणे सांभाळत आहेत. ते सुद्धा ‘घरून काम करून’. होय, हे शक्य आहे. अटकेपार झेंडा लावणाऱ्या अजून एका भारतीय व्यक्तीने हे शक्य करून दाखवलं आहे.
१९६६ मध्ये आग्रा येथे जन्म झालेले संजीव गुप्ता सर हे वयाच्या पाचव्या वर्षापासून आपल्या परिवारासोबत इंग्लंड मध्ये राहतात. त्यांचे वडील हे संशोधन शास्त्रज्ञ होते. संजीव यांनी औषधीशास्त्र किंवा इंजिनियरिंगचं शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती.
पण, संजीव सरांना बाहेर फिरण्याची खूप आवड होती आणि त्यामुळे त्यांनी भूगर्भातील घडामोडींचा अभ्यास करून ‘भूगर्भशास्त्रज्ञ’ व्हायचं ठरवलं.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सेंट क्रॉस कॉलेज मधून संजीव गुप्ता यांनी पी.एच.डी. पूर्ण केली आहे. ‘आल्प्स पर्वत’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
संजीव गुप्ता हे सध्या ‘इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन’ या नामांकित महाविद्यालयात ‘प्रोफेसर’ म्हणून काम करत आहेत. पाच वर्षांपूर्वी संजय गुप्ता यांनी नासाच्या ‘मंगळ यान’ या कार्यक्रमावर काम करण्यास सुरुवात केली.
नासा मध्ये ‘प्लॅनर’ म्हणून काम करणारे संजीव गुप्ता हे नासाच्या ‘मंगळ संशोधन प्रयोगशाळा’ या विभागात काम करतात. मंगळावरील ‘गेल क्रेटर’ म्हणजेच उत्तरपश्चिमी भागावरील एका कोरड्या पात्राचा अभ्यास ते काही वर्षांपासून करत आहेत.
मंगळ ग्रहासोबतच हिमालयाची उत्पत्ती, इंग्लिश खाडीतील जमिनीचा भाग अश्या कित्येक विषयांवर सध्या संशोधन करत आहेत.
घरून काम का करावं लागत आहे?
चीनच्या अवकृपेने जगाला मिळालेल्या कोरोना व्हायरसचा फटका अंतराळातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा पडला आहे. नासाच्या व्यवस्थापन समितीने संजीव गुप्ता यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन लंडनहून कॅलिफोर्निया हा प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
===
हे ही वाचा – आता वर्क फ्रॉम होम नव्हे तर वर्क फ्रॉम “हिल” चालू करणारा अद्भुत प्रयोग
===
लंडनमध्ये आपल्या परिवारासोबत राहत असतांना त्यांना एकट्याला कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपल्या पत्नी आणि मुलांना त्यांच्या २४ ताशी कामाचा त्रास होऊ नये यासाठी ते एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहत आहेत.
खगोलप्रेमींना हे माहीतच असेल की, नासा ने पाठवलेलं यान ‘द पर्सिव्हरंस रोव्हर’ हे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळावर जाऊन धडकलं आहे. हे यान २०३० मध्ये परत येणार आहे.
१०४३ किलो वजन असलेलं हे यान हे मंगळावरील ‘जेझेरो क्रेटर’ या भागाची माहिती देऊ शकणार आहे.”मंगळावर कधी काळी जीवसृष्टी होती का ?” या प्रश्नाचं उत्तर हे यान परत आल्यावर मिळणार याकडे नासा आणि जगभरातील सर्व खगोलप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.
मंगळावरची माती घेऊन हे यान परतणार असल्याने त्यासोबत मंगळावरील जमीन, वातावरण आणि “माणसांना मंगळावर जाऊन राहणं शक्य आहे का?” याचं उत्तर सुद्धा मिळू शकणार आहे.
‘द पर्सिव्हरंस रोव्हर’ हे यान मंगळावर व्यवस्थित रहावं आणि ते सुखरूप परत पृथ्वीवर परतावं यासाठी संजीव गुप्ता हे सध्या २४ तास त्यावर लक्ष ठेवून आहेत. मंगळावरचा ‘एक दिवस’ हा पृथ्वीवरच्या एका दिवसांपेक्षा ४० मिनिटाने मोठा आहे. त्यामुळे हा काळ २४ तासांपेक्षा जास्त आहे.
संजीव गुप्ता सरांचे सगळे सहकारी हे जगभरातील विविध ठिकाणाहून काम करत असल्याने त्यांच्या वेळेतील फरक सांभाळून घेऊन संजीव हे सतत पाच कंप्युटर्स आणि व्हिडिओ मीटिंगसाठी लावण्यात आलेल्या दोन स्क्रीन समोर ठिय्या मारून बसलेले असतात.
ज्या खोलीत बसून संजीव गुप्ता हे मंगळावर लक्ष ठेवून आहेत ती खोली एका सलूनच्या दुकानाच्या वर आहे हे कळल्यावर सर्वांना आश्चर्य वाटत आहे.”चांगलं काम करण्यासाठी केवळ ज्ञान, इच्छाशक्ती असावी लागते.” हा संदेश संजीव गुप्ता सर सध्या आपल्या कार्यातून लोकांना संदेश देत आहेत.
‘ब्रिटिश डेली’ या वर्तमानपत्राने संजीव गुप्ता यांच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. त्यांना मुलाखत देतांना संजीव गुप्ता यांनी सांगितलं आहे की, “मी सध्या कॅलिफोर्निया येथील ‘जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळा’ मध्ये असायला हवा होतो. नासा चं हे ऑफिस म्हणजे मोठमोठ्या स्क्रीन असलेली जागा आहे.
शंभर पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि अभियंता हे सध्या आपल्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपवून बसले असतील. मी ते वातावरण सध्या खूप मिस करत आहे. आम्ही सध्या त्या जागेत बसून मंगळावर कधी काळी नदी होती का? यावर चर्चा करत असलो असतो.”
आज त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून नासाचे अधिकारी हे हा आणि अजून काही प्रकल्प संजीव सरांच्या नेतृत्वात सुरू करण्याच्या विचारात आहे.
“तुमची जर कामावर निष्ठा असेल तर कोणताही प्रश्न तुमच्यासाठी मोठा नसेल” ही शिकवण आपण संजीव गुप्ता यांच्या कार्यपद्धतीतून नक्कीच घेतली पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.