फाळणी नंतरही दोन्ही देशांची मूळ “रुह” कायम ठेवणाऱ्या रुहअफजाचा इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
उन्हाळ्याची चाहूल लागताच सगळ्यांच्या घरी रणरणत्या उन्हापासून बचावासाठी तयारी होते. कोणी कुलरची साफ सफाई करतं, कोणी डर्मीकुल पावडरचा साठा करून ठेवतं, कोणी घरासमोर हिरवं जाळीचं कापड लावतं, तर कोणी सरबतांचा साठा करून ठेवतं.\
उन्हाळ्यात कुलरमध्ये बसून, कॅरम खेळणं आणि गार गार सरबताचा आनंद घेण्याची मज्जाच काही और असते. गारव्यासाठी आसुसलेल्या आणि उकाड्याने हैराण झालेल्या जीवासाठी हे सरबत “कोरड्या जमिनीवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीसारखं वाटतं”.
याचबरोबर सरबत हे उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची पातळीही घटू देत नाही. त्यामुळे फक्त जिभवचेच चोचलेच नाही तर तब्बेतीची काळजी सुद्धा घेतली जाते.
आपल्याकडे उन्हाळ्यात प्रामुख्याने लिंबू, खस, वाळा, कोकम सरबत, कैरीचं पन्ह, थंडाई, ताक, या शिवाय अजून एका सरबताचा प्रकार फार लोकप्रिय आहे.
गुलाबाच्या अर्काने बनलेलं चविष्ट, गोड, आणि युनानी औषध शास्त्राच्या आधारावर बनवलेलं “रुह अफझा”. नुसतं सरबत, किंवा बर्फ गोळ्यावर घालून, मिल्क शेक मध्ये घालून, चिजकेक, फिरणी, आईसक्रीम आणि इतर मिठाई मध्ये घालून सुद्धा रुह अफझाचा आनंद घेण्याच्या अशा अनेक पद्धती आहेत.
रमजानच्या महिन्यात तर इफ्तारच्या वेळेला रुह अफझा प्रामुख्याने वापरलं जाणारं सरबत आहे. हमदर्द कंपनीचं हे रुह अफझा भारतीयांच्या मनामनात साठलंय. काय आहे रुह अफझा इतकं लोकप्रिय होण्यामागची गोष्ट जाणून घेऊया.
बॉलिवूडच्या एका चित्रपटाला चक्क रुह अफझ्याचं नाव देण्यात आलं तेव्हा पासून रुह अफझच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं. रुह अफझाची निर्मिती १९०७ साली जुन्या दिल्लीत “हमदर्द दवाखान्याचे” संस्थापक डॉक्टर (हकीम) अब्दुल हाफ़ीझ माजिद यांनी केली.
सुरुवातीला त्यांच्या दवाखान्यात युनानी औषध शास्त्रावर आधारित गुलाब आणि केवड्याचा अर्क घालून केलेले वेगवेगळे सिरप, वेगवेगळी सरबतं रुग्णांना औषध म्हणून दिली जायची.
दिल्लीच्या रणरणत्या उन्हापासून लोकांचा बचाव व्हावा म्हणून माजिद यांनी ही सगळी सरबतं एकत्र करून एक अत्यंत चवदार पेय बनवलं. हे पेय, ऊन लागणे, डिहायड्रेशन, जुलाब, यांच्यासारख्या उन्हामुळे होणाऱ्या आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवते.
===
हे ही वाचा – अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!
===
या शिवाय ह्या सारबतामुळे शरीरातील साखर सुद्धा कायम नियंत्रणात राही. त्यामुळे उन्हाळ्यात चक्कर येणे, फिट येणे साखर कमी होऊन मळमळणे ह्या प्रकारांपासून पण लोकांचा बचाव होई. आणि याचं नाव त्यांनी “रुह अफझा” म्हणजेच – मनः शांती प्रदान करणारं सरबत.
रुह अफझ्याचं नाव हे १२५४ साली लिहिल्या गेलेल्या “मस्नवी गुलज़ार – ए- अझीम” ह्या पंडित दयाशंकर नसीम यांच्या पुस्तकातल्या एका पात्राच्या नावावरून ठेवण्यात आलेलं होतं.
मूळ रुह अफझा हे अनेक औषधी वनस्पती जसे गुलाब, केवडा, पुदीना, मनुका, चंदन, पालक, गाजर, संत्र, अननस आणि वॉटर लिली अशा अनेक फळं, फुलं व भाज्यांच्या अर्काने बनवलं जायचं.
त्यामुळे कायम लक्षात राहील अशी चव आणि अनेक फायदे, या गुणांनी रुह अफझाला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. पण इतकी भरमसाठ प्रसिद्धी मिळण्यामागे रुह अफझाची फक्त चवच नाही तर त्याचं आकर्षक पॅकिंग आणि ते ज्या बाटल्यांमध्ये विक्रीला होतं यांचाही सिंहाचा वाटा आहे.
रुह अफझा हे पहिलं सरबत आहे जे ७०० मिली काचेच्या बाटल्यांमध्ये भरून वरून आकर्षक रंगीत लेबल लावून बाजारात विक्रीला उपलब्ध करण्यात आलं होतं. ह्या आधी कोणतंही सरबत हे वापरून धुवून घेतलेल्या वाईनच्या बाटल्यांमध्ये विकलं जाई.
त्या बाटल्यांना एकसारखा आकार नव्हता, लेबलं नव्हती. पण रुह अफझासाठी माजिद यांनी स्पेशल उभ्या आणि बारीक मानेच्या “पोल बॉटल्स” ह्या बाटल्या मागवून घेतल्या.
रुह अफझाचं लेबल मिर्झा नूर अहमद नावाच्या चित्रकाराने डिझाइन केले होते आणि त्याकाळी दिल्लीत प्रिंटिंगची कुठलीच सोय नसल्यामुळे मुंबईच्या “बोल्टन प्रेस” ह्या पारशी प्रिंटिंग प्रेस मधून विशिष्ट बटर पेपर वर प्रिंट करुन घेण्यात आले होते.
फाळणीनंतर हाफ़ीझ माजिद यांचे मोठे सुपुत्र भारतातच थांबले व त्यांचे लहाने चिरंजीव पाकिस्तानात स्थायिक झाले. आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत हमदर्द लॅबोरेट्रीजचे कारखाने व त्याची विक्री सुरू झाली होती.
===
हे ही वाचा – पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा ‘पश्चाताप’ झाला होता का?
===
पाकिस्तानी सरबताचं नाव फक्त रुह अफझा वरून “समर ड्रिंक ऑफ दि ईस्ट” हे ठेवण्यात आलं. पुढे १९७१ साली जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा ही कंपनी एका बांगलादेशी स्थानिक व्यावसायिकाला भेट म्हणून देण्यात आली.
पाकिस्तानची फाळणी झाल्यावर तिथे रुह अफझावर अनेक प्रयोग करण्यात आले, व तिथे “रुह अफझा गो” म्हणून रुह अफझाचे कार्बोनेटेड स्वरूप बघायला मिळाले. पण मूळ रुह अफझाच्या चवीपुढे आणि औषधी गुणांपुढे कोणताच प्रयोग यशस्वी ठरू शकला नाही.
सध्या सरबतापासून रुह अफझा देशांची ओळख बनू लागले. अनेक आकर्षक जाहिराती आणि स्लोगन ज्यांपैकी एक “लालच एक कला है” फारच गाजलं.
रुह अफझा, पुन्हा चर्चेत यायचं आणखीन एक कारण कि मागच्या वर्षी ट्विटर वर एका तरुणाने “बापरे! रुह अफझाला फॅन फॉलोविंग आहे” हे ट्विट केलं आणि अनेक लोकांच्या जुन्या बालपणीच्या आठवणी प्रतिक्रियांच्या रुपात उमळून पडल्या.
रुह अफझाचं हे फॅन फॉलोविंग काहीकेल्या कोणतीच स्पर्धक कंपनी कमी करू शकलेली नाही. बाजारात रुह अफझाला टक्कर द्यायला अनेक कंपन्या जसे हल्दीराम, डाबर (शरबत – ए – आज़म), मॅप्रो ह्या तत्पर होत्या.
इतके प्रसिद्ध आणि लोकप्रिय ब्रँड असूनही रुह अफझाची लोकप्रियता कमी करण्यात त्यांना अजिबात यश आलं नाही. ब्रँड नेम आणि लोकप्रियता असावी तर रुह अफझासारखी.
आज रुह अफझा भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अरब देश अशा आशियातील अनेक देशांत विकलं जातं आणि त्याचा खप दिवसेंदिवस वाढतच आहे.
===
हे ही वाचा – तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.