Site icon InMarathi

मुघलांच्या कचाट्यातून हे राज्य एकहाती वाचवणारा एक दुर्लक्षित योद्धा!

lachit divas inmarathi

scoopwhoop

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक काळ असा होता की भारतात सगळीकडे मुघलांची सत्ता होती. उत्तरेमध्ये तर मुघलांनी विशेष सत्ता गाजवली. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात असेही काही भाग आहेत जिकडे मुघल अनेक प्रयत्न करून सुद्धा सत्ता मिळवू शकले नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज आपण एका अशा वीर योद्ध्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या पराक्रमामुळे दिल्लीच्या सुलतानाला आणि मुघलांना पूर्वोत्तर राज्यांमध्ये विजय मिळाला नाही.

 

 

आसाम राज्यातील योद्ध्यांनी तब्बल १७ वेळा मुघलांचे आक्रमण परतवून लावले आणि पूर्वोत्तर राज्य अजिंक्य ठेवले.

ह्याच पराक्रमात सिंहाचा वाटा असलेल्या अनेक शूर राजांपैकी आणि योद्ध्यांपैकी आज आपण लाचित बोडफुकन ह्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा :

===

 

 

१६०० च्या शतकात मुघल साम्राज्य सत्तेच्या शिखरावर होते. जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होण्याकडे मुघल सत्तेची वाटचाल सुरु होती.

सर्वात मोठे साम्राज्य होण्यासाठी जी शक्तिशाली सेना लागते ती त्या काळी मुघल सत्तेकडे होती. साम, दाम, दंड, भेद ह्या सर्व मार्गांचा अवलंब करून मुघलांनी जवळ जवळ सर्व भारत आपल्या अंमलाखाली आणला होता.

त्यानंतर त्यांच्या क्रूर आणि धर्माध राज्यकारभारामुळे अनेक ठिकाणी उठाव झाले आणि मुघल राजवट काही कालांतराने संपुष्टात आली.

राजा प्रताप सिंघा ह्यांच्या काळात अहोम सैन्याचे सेनापती मोमाई तामुली पहिले बोडबरुआ म्हणजेच उत्तर आसामचे राज्यपाल सुद्धा होते.

त्यांचा मुलगा लाचित ह्याला त्यांनी लहानपणापासूनच सेना कौशल्य, शास्त्र आणि इतर सर्व प्रकारचे शिक्षण दिले.

 

 

लाचित ह्यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अहोम स्वर्गदेवच्या ध्वज वाहकाचे (सोलधर बरुआ) पद मिळाले. सोलधर बरुआ हे पद खाजगी सचिवाचे होते.

आपल्या वडिलांकडून लाचित ह्यांनी राज्य व कर्तव्याप्रती निष्ठा, आपली जबाबदारी कुठल्याही परिस्थितीमध्ये चोख सांभाळणे व प्रामाणिकपणा हे गुण घेतले होते.

त्यांनी स्वतःला युद्धाच्या तयारीमध्ये झोकून दिले. ते कडक शिस्तीचे होते व परिश्रम करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता.

त्यांची त्यांच्या कर्तव्याप्रती निष्ठा अढळ होती. समोर कोणीही असले तरी आपण आपले कर्तव्य करण्यापासून चुकायचे नाही हा त्यांचा दंडक होता म्हणूनच –

युद्धाच्या महत्वाच्या प्रसंगी जेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्यांचे काका कर्तव्यात कसूर करीत आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्या काकांचा शिरच्छेद केला.

ऑगस्ट १६६७ मध्ये लाचित ह्यांच्यासह अटन बुऱ्हागोहैन ह्यांनी गुवाहाटी येथे जाण्यासाठी अहोम सैन्याचे नेतृत्व केले.

त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर १६६७ मध्ये इताखुली किल्ला मुघलांकडून काबीज केला आणि मुघल सैन्याला मानसच्या पुढे नेले. त्यांनी फौजदार फिरुज खानला युद्धकैदी म्हणून बंदिस्त केले.

डिसेंबर १६६७ मध्ये बादशाह औरंगजेबाला मुघल सैन्याच्या पराभवाविषयी समजले. त्याने मोठे सैन्य अहोम सेनेचा पाडाव करण्यासाठी पाठवले.

त्यात त्याने इतर सैन्यासोबत ३०,००० पायदळ, २१ राजपूत सेनापती आणि त्यांची सेना, १८,००० घोडेस्वार तसेच २,००० तिरंदाज व ४० नौका पाठवल्या. शिवाय राजा राम सिंहाची स्वतःची मोठी सेना होतीच!

 

हे ही वाचा :

===

 

 

मुघल सैन्याने चाल खेळून अहोम सैन्यात अंतर्गत मतभेद निर्माण केले. त्यांनी एक बाण अहोम सैन्याच्या छावणीमध्ये सोडला.

त्या बाणासोबत एक पत्रही होते ज्यात लाचित ह्यांना मुघलांनी संदेश दिला होता की त्यांनी एक लाख रुपये घ्यावे व गुवाहाटी मधून सैन्य मागे घ्यावे.

ह्यामुळे अहोम राजाच्या मनात लाचित ह्यांच्याविषयी संदेह निर्माण झाला. पण अटन बुऱ्हागोहैन ह्यांनी राजाच्या मनात लाचित ह्यांच्याविषयी असलेले किल्मिष दूर केले.

ह्यानंतर मुघल सैन्याने अहोम सैन्याला आमने सामने लढत करण्यासाठी पठारावर बोलावले. अहोम राजाने लाचित ह्यांना हे आव्हान स्वीकारण्यास पाठवले.

अलाबोई येथे अहोम सैन्याचा सामना करण्यासाठी मुघल सैन्याची छोटी तुकडी सज्ज झाली. ह्या तुकडीचे तेतृत्व मीर नवाब करत होता.

अहोम सैन्याने ह्यासाठी मजबूत तयारी केली. आपले जास्तीचे सैन्य त्यांनी खंदकामध्ये लपवले व मुघल सैन्यावर हल्ला केला.

ह्याने मुघल सैन्याची दाणादाण उडाली व अहोम सैन्याने मीर नवाबला बंदिस्त केले. ह्या पराभवाने चिडलेल्या मुघल सैन्याने अहोम सैन्यावर जोरदार आक्रमण केले ज्यात १०,००० अहोम सैनिक शहीद झाले.

लाचित ह्यांनी ह्या पराभवानंतर आपले सैन्य इताखुली किल्ल्यापर्यंत हलवले. युद्ध सुरु असतानाच अहोम राजा महाराज चक्रध्वज सिंह ह्यांचे निधन झाले. ह्यानंतर उत्तराधिकारी म्हणून राजा उदयादित्य सिंह ह्यांची निवड झाली.

 

 

आपले कुठलेच डावपेच यशस्वी होत नाहीत हे पाहून राजा रामसिंह ह्याने अहोम सैन्याला संदेश पाठवला. “अहोम सैन्य गुवाहाटी मधून मागे घ्यावे. १६३९ साली झालेल्या कराराप्रमाणे आपल्या हद्दीमध्ये जावे. त्यासाठी त्यांना ३,००,००० रुपये देण्यात येतील.”

हा प्रस्ताव अटन बुऱ्हागोहैन ह्यांनी धुडकावून लावला. कारण त्यांना संशय होता की दिल्लीमधील मुघल सम्राट हे कदापीही सहन करणार नाही. ह्याचवेळी मुघल नौसेनेचा प्रमुख मुन्नावर खान रामसिंह ह्याला जाऊन मिळाला.

त्याने औरंगजेबाकडून संदेश आणला होता की अहोम सैन्याशी मैत्री नाही तर युद्ध करण्यात यावे.

रामसिंहला आता परत पूर्ण शक्तीनिशी अहोम सैन्यावर चालून जाण्याखेरीज पर्याय उरला नाही. ह्यावेळी लाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळे युद्धाकडे नीट लक्ष देऊ शकले नाहीत.

अलाबोई येथील पराभवामुळे अहोम सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्यात मुघलांचे इतके प्रचंड सैन्य पाहून त्यांचा धीर खचला. तेथून पळून जावे असे सैन्याच्या मनात येऊ लागले.

ह्या सगळ्याची कल्पना येताच लाचित ह्यांनी आजारपणातून उठून ७ युद्धनौका समुद्रात सोडण्याचा आदेश दिला व स्वतः ह्या मोहिमेचे सारथ्य करण्यास ते सज्ज झाले.

त्यांनी ठामपणे सांगितले कि काहीही झाले तरी मातृभूमी सोडून ते कुठेही जाणार नाहीत.

आजारपणातून उठून समोर उभ्या राहिलेल्या आपल्या सेनापतींचा निग्रह पाहून आणि त्यांचे बोल ऐकून अहोम सैनिक परत युद्धासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज झाले. सर्व सैनिक लाचित ह्यांच्या बरोबर उभे राहिले आणि सैन्याचा आकडा वाढू लागला.

नदीच्या मध्ये लाचित ह्यांनी त्यांच्या नौका आणल्या व मुघल सैन्याचा सामना करण्यास ते सज्ज झाले. अहोम सैन्याच्या नौका लहान होत्या पण युद्धातील डावपेचात्मक हालचाली करण्यास त्या सक्षम होत्या.

ह्या उलट मुघल सैन्याच्या अजस्त्र नौकांच्या हालचालींवर त्यांच्या आकारामुळे मर्यादा होती. मुघल नौका हालचाल करू शकत नसल्याने नदीमध्ये अडकल्या व तुंबळ युद्धामध्ये अहोम सैन्याने मुघल सैन्याचा दारूण प्रभाव केला. मुघल नौसेनाधीपती मुन्नावर खान युद्धात ठार झाला.

 

 

ह्याशिवाय अनेक सैनिक व सेनापती सुद्धा ह्या युद्धात ठार झाले. अहोम सैन्याने मुघल सैन्याचा मानस पर्यंत पाठलाग केला.

मानस ही अहोम राज्याची पश्चिम सीमा होती. लाचित ह्यांनी त्यांच्या सैनिकांना मुघलांच्या पलटवाराविषयी सजग राहण्यास बजावले होते.

हे युद्ध १६७१च्या मार्च महिन्यात झाले असा अंदाज आहे. ह्या सैन्यामध्ये लाचित ह्यांनी त्यांच्या सैन्यासह पराक्रम गाजवून अहोम राज्याचे रक्षण केले व अहोम राज्याचा सन्मान परत मिळवून दिला.

परंतु युद्धाच्या परिश्रमांमुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्या आजारपणातून ते बरे होऊ शकले नाहीत. अखेर एप्रिल १६७२ मध्ये लाचित ह्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजा उदायादित्य ह्यांनी लाचित ह्यांची समाधी लाचित मैदान हूलुंगपारा, जोरहाट येथे बांधली.

खडकवासला येथील National Defense Academy येथे २००० साली आसामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल एस.के.सिन्हा ह्यांनी लाचित बोडफुकन ह्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

 

हे ही वाचा :

===

 

 

दर वर्षी National Defence Academy येथून उत्तीर्ण होणाऱ्या सर्वोत्कृष्ट कॅडेटला लाचित मेडलने सन्मानित केले जाते. तसेच २४ नोव्हेंबर हा दिवस लाचित दिवस म्हणून लाचित बोडफुकन ह्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

भारताच्या इतिहासात लाचित बोडफुकन ह्यांचे योगदान मोठे आहे. ह्या पराक्रमी योद्ध्यास मानाचा मुजरा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version