Site icon InMarathi

इस्लाम व सुधारणा : एक ऐतिहासिक हिंसक, व्यापक आणि अटळ शोकांतिका…

muslim feature 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – योगेश परळे 

===

इस्लाम व सुधारणा: एक अटळ शोकांतिका..

जगामधील कोणत्याही धर्मासंदर्भातील सुधारणांचा प्रवास हा कायमच संघर्षमय व हिंसक राहिला आहे. किंबहुना, आधुनिक समाजव्यवस्थेस अनुकूल ठरतील, अशा समतेचा व स्वातंत्र्याच्या पायावर आधारलेल्या सुधारणांना प्राणपणाने विरोध हेच बहुसंख्य धर्मव्यवस्थांचे एक प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल.

काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विविध धर्मांमध्ये लोकशाहीस पोषक असे हे संघर्ष उद्भवत गेले आणि त्यानुसार त्या विशिष्ट धर्मांमधील लोक लोकशाही व्यवस्थेस अधिकाधिक “लायक’ बनत गेले. धर्म व त्या अनुषंगाने त्या समाजांमध्ये घडलेल्या राजकीय-सामाजिक सुधारणांचाच हा परिपाक होता.

कालांतराने या सुधारणांचा अंतर्भाव झालेल्या धर्मांची त्या समाजमनांवरील पकड बोथट होऊन त्या मनामध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता यांसारखी आधुनिक मूल्ये नांदू लागली. मात्र जगामधील एक प्रमुख धर्म असलेला इस्लाम या प्रक्रियेस अपवाद ठरला आहे.

सर्वच धर्म हे मूलत: लोकशाहीविरोधी आहेत. मात्र इस्लाम वगळता कालपरत्वे जगातील इतर सर्व मुख्य धर्म व मूळ लोकशाही विचारामधील प्रत्यक्ष संघर्ष आता बहुतांशी शमला आहे. उदा. वर्तमान काळात राज्यघटनेचा त्याग करुन जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे पालन करावे, यासाठी कोणी संघर्ष करत नाही. वा आधुनिक राज्यव्यवस्था मोडीत काढून त्या जागी पोपच्या नेतृत्वाखालील धर्मसत्तेचे पुनरुज्जीवन केले जावे, अशी सक्रिय मागणीही दृष्टोपत्तीस पडत नाही.

 

 

इस्लाममधील हा संकल्पनांचा संघर्ष मात्र अद्यापी प्रदीप्त आहे. त्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. तेव्हा या अटळ संघर्षामागील ऐतिहासिक कारणांचे विश्लेषण करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

इस्लाम व आधुनिकतेमधील या संघर्षासंदर्भात दोन प्रमुख संकल्पनांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही व आधुनिक मूल्यांचा समावेश असलेले तत्वज्ञान हे पाश्चिमात्य देशांकडून जगाच्या इतर भागांत निर्यात झाले. या विचारास जगातील विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला.

हे ही वाचा – दिल्लीचा असा एक धर्मांध सुलतान ज्याने गैर-मुस्लिम भिकाऱ्यांवर सुद्धा लादला होता जिजिया कर

कोणाला हे धर्मावरील आक्रमण वाटले; तर कोणाला संस्कृतीमधील हस्तक्षेप वाटला. युरोपिअन साम्राज्यवाद स्थिरावल्यानंतरच्या काळात(साधारणत: १९ व्या शतकामध्ये) इस्लामने आधुनिकतेच्या या विचारास दिलेल्या प्रतिसादामधून जागतिक इस्लामिस्ट चळवळीची बीजे रोवली गेली.

ही चळवळ व त्यामध्ये मिसळलेले इतर प्रवाह ही आधुनिक मूल्ये व इस्लामचे द्वंद्व समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक मुख्य संकल्पना आहे. याचबरोबर, जवळजवळ इस्लामच्या जन्मापासूनच एका अंतर्गत वैचारिक संघर्षाने इस्लामला सोबत केली आहे. या संघर्षाची व्याप्ती व खोली शिया-सुन्नी अशा ढोबळ संघर्षापेक्षा कितीतरी अधिक आहे.

“खरा मुसलमान कोणाला म्हणावे,’ हा तो संघर्ष होय. या दोन्ही संकल्पनांसंदर्भात शतकानुशतके झालेल्या वैचारिक घुसळणीने इस्लामला सद्यस्थितीतील रुप प्रदान केले आहे. मात्र तत्पूर्वी अन्य एका घटकाचा विचार करणे निकडीचे आहे.

इस्लामचा जन्म झाल्यानंतरच्या काही वर्षांतच स्वीकारण्यात आलेल्या धार्मिक (इस्लामविषयक) संकल्पना व परंपरांचा अभ्यास हीच वर्तमान काळातील मुस्लिम समाजांचा अभ्यास करण्यासाठीची किल्ली आहे, असा एक प्रभावी विचारप्रवाह आहे.

’मुस्लिम एक्सेप्शनॅलिज्म’ या नावाने हा विचारप्रवाह ओळखला जातो. अर्नेस्ट गेल्नर या ज्येष्ठ विचारवंताने केलेल्या मांडणीनुसार त्या काळामध्येच मुस्लिम समाजास मिळालेल्या एका ’घटनात्मक चौकटी’मधून आदर्श मुस्लिम समाजरचनेची एक ’ब्ल्यू प्रिंट’ तयार झाली आहे.

 

 

या काळात अस्तित्वात आलेली सामाजिक व राजकीय व्यवस्था मुस्लिम समाजांस आजही आदर्शवत व अनुकरणीय वाटते, असा याचा अन्वयार्थ आहे. भूतकाळातील या आदर्शवत वाटणाऱ्या संकल्पनांचा पगडा इतका प्रचंड आहे की त्या तुलनेमध्ये आधुनिक काळामधील आर्थिक, सामाजिक, राजकीय वा तांत्रिक (टेक्नॉलॉजिकल) बदलांस विरोध वा त्यांचा मर्यादेमध्येच स्वीकार करण्याची मुस्लिम समाजाची धारणा बनली आहे. या विचारप्रवाहाचा निष्कर्ष अर्थातच अत्यंत गंभीर आहे.

इस्लामच्या जन्मानंतर काही वर्षांतच घडलेल्या विविध घटनांच्या (विशिष्ट भूतकाळ) अमीट प्रभावामुळे इस्लाममध्ये वैचारिक उत्क्रांतीची शक्यता अत्यंत धूसर झाली आहे. यामुळेच मुस्लिम समाजांचे सार्वत्रिक लोकशाहीकरण अशक्य होऊन बसले आहे. इतर धर्मीय समाजांमध्ये इतिहासाचा प्रवाह विविध वळणे घेत समाज वैचारिकदृष्ट्या विकसित करत जातो; इस्लाममध्ये मात्र वारंवार इतिहासाची पुनरावृत्ती पहावयास मिळते आहे.

मुस्लिम समाजमनांची निर्णायक पकड घेणारा हा विशिष्ट भूतकाळ नेमका कोणता, यामध्ये इस्लामच्या अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. इस्लामच्या जन्मानंतर सुमारे चार दशके टिकलेल्या ’आदर्श खिलाफती’चा हा काळ आहे; वा मध्ययुगीन काळात मुस्लिम बहुसंख्यांक झाल्यानंतर झाल्यानंतर इस्लामच्या नावाखाली राज्यव्यवस्था दृढमूल झालेला हा काळ आहे, यासंदर्भात अनेक मतप्रवाह आहेत.

मात्र एकोणिसाव्या शतकामध्ये एक वैचारिक व्यवस्था म्हणून साचेबंद झालेल्या इस्लामचा सामना पाश्चिमात्य देश प्रतिनिधित्व करु लागलेल्या आधुनिकतेशी झाला.

राजकीय, आर्थिक, वैचारिक, सामाजिक, तांत्रिक यांसह मानवी आयुष्यास स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांत पाश्चिमात्य देशांचे प्रभुत्व प्रस्थापित होण्याचा हा काळ होता. या काळातील पहिल्या काही वर्षांत आधुनिक मूल्यांसंदर्भात इस्लामकडून व्यक्त करण्यात आलेल्या भूमिकांमधून जागतिक इस्लामिस्ट चळवळीची पायाभरणी झाली.

एकोणिसाव्या शतकाचा हा काळ लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य अंग असलेल्या धर्मनिरपेक्षतेचे मूल्य दृढमूल होण्याचाही काळ होता. धर्मनिरपेक्षतेचे (सेक्युलॅरिज्म) हे मूल्य इस्लामी धर्मशास्त्रात वा समाजव्यवस्थेमध्ये नवेच होते. त्याआधी इस्लाममध्ये धर्मसत्ता व राज्यसत्ता स्वतंत्र करण्यासंदर्भातील ही संकल्पना नव्हतीच.

कारण मूळ धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेचा जेथून जन्म झाला; त्या ख्रिश्चन धर्मामधील ’रेग्युलर व सेक्युलर क्लर्जी’शी साधर्म्य असलेली व्यवस्थाच इस्लाममध्ये नव्हती. याशिवाय, ख्रिश्चन धर्मीयांसारख्या ’परंपरागत शत्रु’कडून धर्मनिरपेक्षतेची ही संकल्पना इस्लामी व्यवस्थेस पर्याय म्हणून मांडण्यात आली.

जग पादाक्रांत करुन एकधर्मीय करण्याचा अभिनिवेश बाळगणारे इस्लामचे ते सुवर्णयुग नामशेष झालेच होते; याचबरोबर “श्रद्धेय खिलाफती’चे त्या काळात प्रतिनिधित्व करणारया ऑटोमान टर्किश साम्राज्याच्या उडू लागलेल्या शकलांमधून अरेबिया व पश्चिम आशियातील इस्लामी जगावर पडत असलेली पाश्चात्य साम्राज्यवादाची छायाही दृगोच्चर झाली होती. अशा पार्श्वभूमीवर प्रख्यात फ्रेंच विचारवंत अर्नेस्ट रेनान यांच्या एकंदरच धर्म व विशेषत: इस्लामवरील कडव्या टीकेस प्रख्यात मुस्लिम विचारवंत जमालुद्दीन अफगाणी यांनी दिलेल्या उत्तरामधून इस्लामकडून धर्मनिरपेक्षतेस व एकंदरच आधुनिकतेस मिळालेला प्रतिसाद घडण्यास प्रारंभ झाला.

रेनान यांनी इस्लामवर केलेली टीका अत्यंत प्रखरच होती. “या आमच्या काळातील अत्यल्प शिक्षण घेतलेल्या कोणासही मुस्लिम देशांची सध्याची झालेली शोचनीय अवस्था, इस्लामची सत्ता असलेल्या राज्यांना लागलेली उतरती कळा; आणि केवळ याच धर्मापासून सभ्यता व शिक्षण प्राप्त केलेल्या वंशांचा वैचारिक वांझपणा दिसेल.

पूर्वेस (ओरिएंट) वा आफ्रिकेस भेट दिलेल्या सगळ्यांना ’खऱ्या श्रद्धावाना’चा (मुस्लिम) वैचारिक संकुचितपणा; वैज्ञानिक संकल्पनांस वा कोणत्याही नव्या कल्पनेच्या स्वीकारास पूर्णत: नकार देणारी त्याची मानसिकता पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

 

धार्मिक शिक्षणाच्या सुरुवातीपासून, वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षापासून मुस्लिम बालक अचानक धर्मवेडे (फॅनॅटिक) बनते. त्याची श्रद्धा हेच अंतिम सत्य असल्याची त्याची गर्विष्ठ कल्पना होते.

संपत्ती व सत्ता ही अल्ला ज्याला लायक मानतो त्यालाच मिळते, त्याचा शिक्षण वा वैयक्तिक गुणवत्तेशी काहीही संबंध नाही, अशी धारणा झाल्याने मुस्लिमांना शिक्षण, विज्ञान वा युरोपिअन ’स्पिरिट’चे प्रतिनिधित्व करत असलेल्या अन्य कोणत्याही घटकाचा कमालीचा तिटकारा आहे,” अशा शब्दांत रेनान यांनी इस्लामवर कठोर टीकेचे आसूड ओढले होते.

(इस्लाम अँड सायन्स – रेनान, २९ मार्च १८८३) इस्लामवरील या टीकेची धार अधिक प्रखर असली तरी त्या काळात जगातील कोणताही भाग व धर्म आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या युरोपिअन वैचारिक हल्ल्यापासून सुटला नाही!

धर्म हेच विविध समाजांच्या मागासलेपणाचे मुख्य कारण असून आता होऊ लागलेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे लवकरच धर्म अस्तित्वशून्य होतील, अशी त्या काळामधील अनेक विचारवंतांची धारणा होती. रेनान यांच्या मांडणीमध्येही याच वैचारिक मूल्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. इस्लामवरील त्यांची टीकाही याच दृष्टिकोनामधून अभ्यासावी लागेल.

रेनान यांच्या या कठोर टीकेच्या पार्श्वभूमीवर अफगाणी यांनी ’अर-रद आला अद-दाह्रियिन’ (दी अन्सर टू टेम्पोरॅलिस्टस) हा जगप्रसिद्ध निबंध लिहिला. युरोपिअन धर्मनिरपेक्षतावाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमामधून अफगाणींना मुस्लिम जगामध्ये मानाचे स्थान मिळाले.

धर्मनिरपेक्षतावाद्यांचा उल्लेख या निबंधामध्ये टेम्पोरॅलिस्टस (दाह्रियिन) (टेम्पोरल – सेक्युलर – या जगातील!) असा करण्यात आला होता. कुराणाचा संदर्भ असलेल्या या शब्दाचा मूळ प्रयोग त्या काळातील नास्तिकांसाठी (अथेइस्टस) वापरण्यात आला होता.

थोडक्यात, अफगाणी यांनी या विशिष्ट शब्दप्रयोगामधून (टर्मिनॉलॉजी) सातव्या शतकामध्ये प्रेषितांना विरोध करणारे ’पाखंडी’ व एकोणिसाव्या शतकामधील धर्मनिरपेक्षतावाद्यांमध्ये ‘साधर्म्य’ दाखविले. अफगाणी यांच्या वैचारिक मांडणीचा प्रभाव असा आहे; की तेव्हापासून मुस्लिम जगामध्ये धर्मनिरपेक्षतावाद ही नास्तिकपणाच वा त्याच्या बहुतांशी जवळ जाणारी मांडणी असल्याची कल्पना दृढमूल झाली आहे.

अफगाणी यांच्या नंतर आलेल्या विचारवंतांनी या संघर्षामध्ये आणखी भर घातली. त्यांनी धर्मनिरपेक्षतेसाठी ’लादिनी’ हा शब्दप्रयोग केला. लादिनी या शब्दाचा अर्थ बिगरधार्मिक (अरिलिजियस) असा आहे.

लादिनीनंतर धर्मनिरपेक्षतेसाठी ’इल्मानी’ (या जगातील) या शब्दाची योजना करण्यात आली. अर्थात तोपर्यंत धर्मनिरपेक्षता व इस्लाममधील संकल्पनांचा हा संघर्ष पुरेसा स्पष्ट झाला होता. यामुळे धर्मनिरपेक्षतेचे हे तत्त्व हे इस्लामपासून दूर नेणारे आहे; वा धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारणे म्हणजेच इस्लाम, इस्लामी संस्कृती-सभ्यता, श्रद्धा सोडणे आहे, अशी धारणा इस्लामी वैचारिक वर्तुळात तयार झाली. इतकेच नव्हे; तर धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे इस्लामने शिकविलेली ’नैतिकता’ सोडणे व पूर्वजांचा गौरवास्पद वारसा सोडणे, हा विचारप्रवाह हळुहळू स्थिरावत गेला.

 

 

या अटळ वैचारिक संघर्षामधून घडलेल्या ध्रुवीकरणाने नंतरच्या काळातील सामाजिक व्यवस्था, राजकारण, धार्मिक, ऐतिहासिक यांसहित सर्वच क्षेत्रांमधील मांडणीस व विचारप्रवाहांस प्रभावित केले. या ध्रुवीकरणाचा सर्वांत महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे वर्तमानामध्ये इतर कुठल्याही धर्माच्या तुलनेमध्ये (विस्तारभयास्तव हिंदू वा ख्रिश्चन धर्मामधील अशा प्रकारची उदाहरणे येथे देता येत नाहीत) इस्लाम हा धर्मनिरपेक्षता व एकंदरच आधुनिक मूल्यांना कडाडून विरोध करणारा धर्म असल्याची प्रतिमा प्रस्थापित झाली आहे. यामध्ये तथ्य अर्थातच आहे.

इतर धर्मांचा प्रवास हा अधिकाधिक वैयक्तिक स्वातंत्र्याकडे होत असताना या विशिष्ट वैचारिक संघर्षामुळे इस्लामचा प्रवास मात्र वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाधिक संकोच व समुदाय (कम्युनिटी) व शासन व्यवस्थेप्रती (स्टेट सिस्टीम) संपूर्ण शरणागती असा विरुद्ध दिशेने होतो आहे.

हे दोन्ही घटक लोकशाहीच्या मूळ तत्त्वावरच घाव घालणारे आहेत. यामधूनच ‘इस्लाम विरुद्ध मानवाधिकार’, ‘इस्लाम विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘इस्लाम विरुद्ध आधुनिकता’ अशा प्रकारची द्वंद्वे निर्माण होताना दिसत आहेत. शिवाय, इस्लाम व धर्मनिरपेक्षतेमधील संघर्षाची ही केवळ वैचारिक बाजू असल्याचे भान येथे ठेवणे आवश्यक आहे.

मुस्लिम विचारवंतांपलीकडे सामान्य राजकीय व सामाजिक वर्तुळांमध्ये उमटलेली प्रतिक्रिया ही अधिक प्रखर होती. ‘इस्लामी तत्वांवर चालणारी सत्ता कणखर राहिली नसल्यानेच पाश्चिमात्य देशांचा सर्व क्षेत्रांतील हस्तक्षेप वाढत चालला आहे. तेव्हा धर्मनिरपेक्षता वा आधुनिकता नाकारून इस्लामचे सुवर्णयुग परत आणण्यासाठी पुन्हा ‘मूळ इस्लाम’कडे वाटचाल,’ हाच विचारप्रवाह पश्चिम आशियात अधिकाधिक शक्तिशाली होत गेला आहे.

यामधूनच १९२४ मध्ये खिलाफत नष्ट झाल्यानंतर जागतिक इस्लामिस्ट चळवळीचा जन्म झाला. मात्र तत्पूर्वीच अफगाणी व अन्य मुस्लिम विचारवंतांनी ‘नॅरेटिव्ह’ची उभारणी केली होती.

’पॅन इस्लामिजम’च्या अफगाणींच्या संकल्पनेने भारतीय उपखंडामधील अबुल कलाम आझाद, मुहम्मद इकबाल सहित सैद नुरसी, नामिक केमाल, मेहमेत आकिफ एर्सोय यांसारख्या ऑटोमान टर्किश साम्राज्यामधील इतर नेत्यांनाही प्रभावित केले. किंबहुना २० व्या शतकामध्ये जन्मास आलेल्या मुस्लिम ब्रदरहूड वा जमाते इस्लामी यांसारख्या इस्लामिक पुनरुज्जीवनवादी चळवळींनी अफगाणी यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणूनच पाहिले आहे.

 

 

मुहम्मद अब्दुह, रशीद रिदा, कासीम अमिन, ओस्मान अमीन वा लुत्फी अल-सय्यिद यांसारख्या इजिप्तमधील महत्त्वपूर्ण विचारवंतांवरदेखील अफगाणींच्या मांडणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

”मुस्लिम हे आज अशा शोचनीय अवस्थेत अवस्थेत का आहेत, असा प्रश्न कोणी विचारल्यास त्यावर काय उत्तर देता येईल? माझे उत्तर असे आहे – जेव्हा ते ’खरे मुस्लिम’ होते तेव्हा जगाने त्यांचे कर्तृत्व पाहिले.

आता सध्याच्या अवस्थेबद्दल मला इतकेच म्हणावयाचे आहे – कोणतेही लोक जोपर्यंत अंतर्गत बदल करत नाहीत तोपर्यंत परमेश्वरही अशा लोकांची अवस्था बदलत नाही,” – अफगाणींच्या काळानंतर उदयास आलेल्या इस्लामी पुनरुज्जीवनवादी चळवळींना त्यांच्या अक्षय्य शब्दांनी सतत सोबत केली आहे!

किंबहुना अफगाणींच्या मांडणीनंतर चेतलेल्या इस्लामी पुनरुज्जीवनवादाच्या वन्हीने आणखी एका वैचारिक संघर्षास पुनर्जन्म दिला.

इस्लामची जन्मभूमी असलेल्या पश्चिम आशियामध्ये स्थिरावलेल्या पाश्चिमात्य साम्राज्यवादाकडून कालांतराने मुसलमान राज्यकर्त्यांकडे सत्ता सूत्रे आली. मात्र खिलाफत नष्ट करण्यात आल्यानंतर जागृत झालेले आत्मभान प्रश्न विचारु लागले- केवळ जन्माने एखादा मनुष्य मुसलमान झाल्यास तो खरा मुसलमान असतो काय? अथवा स्वत:स मुस्लिम म्हणवून घेण्यासाठी त्याने काही विशिष्ट कृती करावयास हवी; वा काही संकल्पनांचा स्वीकार करावयास हवा? त्याचबरोबर एखादा सत्ताधीश मुसलमान आहे म्हणजे ती सत्ता इस्लामी म्हणविली जाऊ शकते काय?

एखादी इस्लामी सत्ता ही गैरइस्लामी देशास मदत करणारे धोरण राबवित असेल; तर त्या सत्तेस इस्लामी सत्ता म्हटले जाणे योग्य आहे काय? इस्लाम मान्यता देत नसलेली एखादी बाब जर जन्माने मुसलमान झालेला एखादा इसम वा समुदाय करत असेल तर त्यास इस्लामी म्हणावे काय? याचाच राजकीय अर्थ म्हणजे इस्लाम मान्यता देत नसलेल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहत असलेल्या(व इस्लामी सत्ता, म्हणजेच खिलाफत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नसलेल्या) मुसलमानांस “खरे मुसलमान’ म्हणावे काय? असे अनेक प्रश्न या गेल्या शतकामध्ये उपस्थित झाले.

या पार्श्वभूमीवर इस्लाम म्हणजे काय व मुसलमान कोणास म्हणावे, या प्रश्नांची उत्तरे पुन्हा एकदा शोधली जाऊ लागली. मौलाना मौदुदी वा सय्यद कुत्ब यांसारख्या आधुनिक काळातील इस्लामच्या दर्शनिकांनी या वैचारिक संघर्षात भर घालत’तक्फीर’च्या या संघर्षास आधुनिक परिमाण प्राप्त करुन दिले.

“एखाद्या इस्लामी समुदायाने विचारांती शरीयाचा स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला असेल, स्वत:ची राज्यघटना वा शरीया वगळता अन्य कुठल्याही नियमांचा स्वीकार केला असेल; तर असा समुदाय अल्लाबरोबर असलेल्या त्यांच्या कराराचा भंग करतो आणि इस्लामी म्हणवून घेण्याचा अधिकार गमावतो,” – मौलाना मौदुदी(इस्लामिक लॉ अँड इट्स इंट्रोडक्शन)

ऑटोमन टर्किश साम्राज्याच्या विघटनानंतर सुरु झालेल्या पाश्चिमात्य वसाहतवादाच्या काळामध्ये खिलाफतीचे तुकडे पडले; व त्यांमधून वेगवेगळे इस्लामी देश अस्तिवात आले. याच देशांना नंतर ’स्वातंत्र्य’ मिळाले!

इस्लाममधील मूळ राजकीय व्यवस्था असलेल्या खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी व परवानगी नंतर मिळालीच नाही. यानंतर इस्लामी देशांमध्ये पाश्चिमात्य देशांमधील समाजवाद वा तत्सम विचारसरणींचा प्रभाव असलेलीच राज्यव्यवस्था उदयास आली.

यामुळे लोकतांत्रिक असो वा हुकूमशाही; या खिलाफतीच्या मूळ भूमीमधून इस्लामी तत्वांवर चालणाऱ्या राज्यव्यवस्थेचे समूळ विघटन झाले आणि तेथे आधुनिक पाश्चिमात्य मूल्यांच्या आधारावर राज्यशकट हाकणारे राज्यकर्ते उदयास आले. मात्र मुस्लिम विचारवंतांवरील खिलाफतीच्या संकल्पनेचा अमीट प्रभाव मात्र नष्ट झाला नाही. त्यामुळे पश्चिम आशियामधील लोकशाही वा अन्य स्वरुपाची राज्यव्यवस्था बळाशिवाय मूळ धरु शकली नाही.

साधारणत: १९४०-५० च्या दशकांपासून सुरु झालेल्या या संघर्षाने आयसिसपर्यंतच्या सर्व इस्लामिस्ट दहशतवादी संघटनांना वैचारिक आधार पुरविला आहे. मात्र तत्पूर्वी तक्फीरसंदर्भातील या संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे. तक्फिरसंदर्भातील या तात्त्विक संघर्षाची सुरुवात थेट इस्लामच्या पहिल्या पिढीपासून (खारिजी) होत असली; तरी पुढील एक हजार वर्षे या विचारवंताचा प्रभाव राहिल, असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या विचारवंताने तेराव्या शतकामध्ये आधुनिक काळातील इस्लामिस्ट विचारास मार्गदर्शन करणाऱ्या या राजकीय विचाराचा पाया खऱ्या अर्थी रचला.

इमाम इब्न तमिय्याहचा जन्म झाला(१२६३) त्यावेळी अब्बासीड खिलाफत नष्ट होऊन तार्तारांचे(मंगोल) राज्य प्रस्थापित झाले होते. त्याआधीच्या काळात बगदाद राजधानी असलेल्या मुस्लिम सत्तेचा दबदबा जगभर होता. मात्र तार्तारांच्या एका धडकेने हे साम्राज्य धाराशयी झाले.

 

 

मुस्लिमांचे केवळ राजकीय साम्राज्यच नष्ट झाले असे नव्हे; तर एकंदरच मुस्लिम सभ्यतेस या आक्रमणाने जबर धक्का बसला. इस्लामी नियम, संस्कृती, परंपरा अशा सर्वच बाबी तार्तारांच्या टाचेखाली आल्या. बगदादमधील हजारो नागरिकांची निर्घॄणपणे कत्तल करण्यात आली.

एकंदरच मुस्लिम इतिहासामधील हा एक अंधकार काळ होता. अशा पार्श्वभूमीवर तमिय्याहच्या प्रेरणेमधून एका नव्या संघर्षाचा जन्म झाला. आधुनिक काळामधील इस्लामिस्ट चळवळीस अत्यंत प्रेरक ठरलेले तक्फिरचे तत्त्व तमिय्याहने प्रथमत: राजकीय पार्श्वभूमीवर आक्रमकपणे मांडले.

इस्लामला नवे आत्मभान मिळवून देण्यामध्ये त्याने अमूल्य योगदान दिले. तमिय्याहने ऍरिस्टोटल सारख्या ग्रीक तत्त्ववेत्यांच्या वैचारिक मांडणीवरही कडाडून हल्ला चढविला. या मांडणीस प्रतिवाद करताना इस्लामी विचारांचे प्रारूप त्याने आक्रमकपणे मांडले. तेव्हा राजकीय व वैचारिक अशा दोन्ही पातळ्यांवर तमिय्याह हे आधुनिक काळातील इस्लामिस्ट चळवळीचे स्फुर्तीस्थान आहे.

तमिय्याहचे महत्त्व समजावून घेण्यासाठी दोन बाबी आधी ध्यानी घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे बगदादपासून दूरवरच्या भागांमध्ये इस्लामधर्मीय राजे आपले स्वातंत्र्य टिकवून होते. मात्र कोणाचीही तार्तारांच्या रासवट ताकदीसमोर उभे राहण्याची हिंमत झाली नाही. दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे.

तांत्रिकदृष्ट्या तार्तार हे इस्लामधर्मीयच होते. त्यांनी सुन्नी इस्लाम स्वीकारला होता. मात्र इस्लाम स्वीकारताना त्यांनी तार्तारांच्या परंपरा व सांस्कृतिक मूल्ये व खिलाफतीमधील इस्लामी कायद्याचे मिश्रण केले. उदाहरणार्थ, तार्तारांनी ‘दोन प्रशासन व्यवस्था’ रुजविल्या.

वैयक्तिक बाबींसाठी (उदा. विवाह) इस्लामी कायदा आणि अर्थव्यवस्था, राजकीय प्रशासन, दंडविधान (न्यायव्यवस्था) यांसाठी तार्तारांच्या पारंपारिक ’यासा नियमावली’ची अंमलबजावणी त्यांच्याकडून करण्यात येत होती.

’तार्तारांनी सुन्नी इस्लाम स्वीकारला असला तरी ते खरे मुसलमान नाहीत. कारण त्यांनी शरिया या अल्लाच्या कायद्याऐवजी मानवनिर्मित कायद्याची निवड केली आहे. म्हणजेच ते अजूनही इस्लामपूर्व अज्ञानकाळातच (जाहिलियत) जगत आहेत,’ असे तार्तारांविरुद्ध जिहादची घोषणा करताना तमिय्याहने स्पष्ट केले.

तमिय्याह याचा हा तक्फिरसंदर्भातील फतवा फारच संवेदनशील आहे. कारण जाहिलियतची त्याने केलेली व्याख्या थेट विसाव्या शतकामधील मौदुदी व कुत्ब यांच्या मांडणीमध्येही डोकावताना दिसते. या दोन्ही महत्त्वपूर्ण विचारवंतांनी विसाव्या शतकाच्या संदर्भासहित तमिय्याहच्या शिकवणुकीचा पुरस्कार केला.

तमिय्याहने ग्रीक, रोमन व तार्तार यांच्या तत्त्वज्ञानाची ’जाहिलियत’ म्हणून संभावना केली होती. मौदुदी व कुत्ब यांनीही आधुनिक काळामधील लोकशाही, समाजवाद वा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांस ’जाहिलियत’ हेच नाव दिले आहे. पुनःपुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती हेच वैशिष्ट्य असणारे मुस्लिम एक्सेप्शनलिज्म ते हेच!

याचबरोबर, तार्तारांविरुद्ध संघर्ष करण्यास अनुत्सुक असलेल्या ईजिप्तच्या मामलुक सुलतानासही तमिय्याहने तीव्र शब्दांत इशारा देत या जिहादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ’अन्यथा आधी ईजिप्तच्या सुलतानाविरुद्ध युद्ध करुन त्याला पदच्युत करण्यात येईल; आणि मग तार्तारांविरुद्ध जिहाद सुरु होईल,’ असे तमिय्याहने स्पष्ट केले! हे दोन्ही घटक वर्तमान काळातील इस्लाम व आधुनिकतेमधील संघर्षासंदर्भात फारच महत्त्वाचे आहेत.

इस्लामचे सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित करणारी व अन्य कोणतीही मानवनिर्मित व्यवस्था नाकारणारी वैचारिक मांडणी; आणि मूळ इस्लामच्या तत्त्वांनुसार वागण्यास तयार नसलेल्या मुस्लिम शासकांविरोधात उठाव(खुरुज) या दोन्ही घटकांची स्पष्ट मांडणी ही तमिय्याहने इस्लामी विचारवंतांस दिलेली देणगीच म्हणावी लागेल. मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, आयसिससह इतर दहशतवादी संघटनांनी आणि एकंदरच इस्लामिस्ट चळवळीने या तत्त्वांचा पुरेपुर फायदा करुन घेतला आहे.

तमिय्याहची ही तत्त्वे आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये कशी दिसतात? १९७० मध्ये ईजिप्त-इस्राईलमध्ये करण्यात आलेल्या शांतता कराराने मुस्लिम जगास पहिला धक्का दिला. इस्राईलसारख्या ज्यू देशाबरोबर शांतता करार? तमिय्याहने शियांना धर्मभ्रष्ट म्हणून घोषित केले होते आणि मुस्लिम राज्यकर्त्यांविरोधातच प्रथम जिहादची घोषणा केली होती.

ज्यूंबरोबर शांतता करार करुन मुळात त्यांच्या अस्तित्वास मान्यता देणारा हा करार म्हणजे तमिय्याहस आदर्श मानणाऱ्या तत्कालीन इस्लामी विचारवंतांच्या दॄष्टीने धर्मभ्रष्टतेचा कडेलोटच झाला असावा!

हे ही वाचा – हैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” का आहेत? विचारात पाडणारं “जळजळीत” वास्तव…

इजिप्तबरोबरच इतर काही देशांनीही इस्राईलबरोबर राजकीय संबंध प्रस्थापित केले आणि विरोध करणाऱ्या धार्मिक संघटना, नेत्यांची गळचेपी केली. यानंतर १९९० मध्ये सौदी अरेबिया व अमेरिकेमध्ये जगप्रसिद्ध संरक्षणाचा करार झाला व त्याअन्वये गैरइस्लामी सैन्याची पाऊले इस्लामच्या श्रद्धास्थानांजवळ पडू लागली. यास विरोध करणाऱ्या सर्व मुस्लिम विचारवंतांना सौदीकडून शासन करण्यात आले.

विशुद्ध इस्लाम मान्यता देत नसलेल्या अशा अनेक गोष्टी ७० ते ९० च्या दशकांत घडत राहिल्या. त्यांमधून मुस्लिम राज्यकर्त्यांच्या या तक्फिरीबद्दल त्यांच्यावर टीका करणाऱ्या इस्लामिस्ट चळवळीस ऊर्जा मिळत राहिली.

 

 

२००१ मध्ये इस्लामिक अमिरात अशी बव्हंशी मान्यता असलेल्या अफगाणिस्तानवर अमेरिकेने केलेला हल्ला व त्यास बहुतेक मुस्लिम देशांनी दिलेला पाठिंबा, यामधून या संघर्षास सर्वाधिक ऊर्जा मिळाली. इस्लामनुसार न वागणाऱ्या एका मुस्लिम राज्यकर्त्यास हटविण्यासाठी मदत करण्यास अनुत्सुक असलेल्या दुसऱ्या मुस्लिम राज्यकर्त्याविरोधात जिहादची घोषणा तमिय्याहने केली होती.

आधुनिक काळामध्ये तर एका मुस्लिम सत्तेने दुसऱ्या मुस्लिम सत्तेविरोधात लढणाऱ्या गैरइस्लामी सत्तेस मदत केली. (असे अक्षरश: अनेक वेळा घडले!) तेव्हा मुस्लिम देशांच्या शासनकर्त्यांच्या सत्ताप्रेमाचा आणि धर्मभ्रष्टतेचा याहून मोठा पुरावा तो काय असणार?! पश्चिम आशिया, पाकिस्तान येथील मुस्लिम राज्यकर्तेच ‘विशुद्ध इस्लाम व जाहिलियत’च्या या संघर्षामधील पहिला अडसर आहेत, या तामिय्याहच्या प्रेरणेमधून स्फुरलेल्या विचाराराची नैसर्गिक परिणती अमेरिकेसहितच ‘इस्लामी’ न राहिलेल्या इतर मुस्लिम देशांविरुद्ध जिहाद या भूमिकेमध्ये झाली आहे.

आधुनिक काळातील या संघर्षाचे ढोबळमानाने दोन भाग करता येतात. अफगाणिस्तानमध्ये थेट रशियन हस्तक्षेप झाल्याची घटना ही यासंदर्भातील’वॉटरशेड मोमेंट’ मानता येईल. त्याआधीचा संघर्ष हा तुलनात्मदृष्ट्या कमी हिंसक व एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेमध्ये सुरु होता.

याचबरोबर, मूलत: पाश्चिमात्य देशांच्या मुस्लिम देशांमधील हस्तक्षेपास विरोध व’खऱ्या इस्लाम’चा शोध असे या संघर्षाचे स्वरुप होते. मात्र अफगाणिस्तानमधील ’गॉडलेस सोव्हिएत’विरुद्धच्या संघर्षाने इस्लामी पुनरुज्जीवनवादास अत्यंत जगड्व्याळ असे परिमाण आले.

व्यूहात्मकदृष्ट्याही या संघर्षाची व्याप्ती वाढली आणि वैचारिकदॄष्ट्याही हा संघर्ष पुढील पातळीवर गेला. ’यापुढे केवळ इस्लामिक देशांमधील पाश्चिमात्य हस्तक्षेपास विरोध हे संघर्षाचे रुप असू शकत नाही; तर शरिया, खिलाफत अशा मूळ इस्लाममधील व्यवस्थांचा अंतर्भाव असलेली विशुद्ध इस्लामी सत्ता हेच या संघर्षाचे अंतिम ध्येय असावयास हवे,’ ही वैचारिक धारणा ८० च्या दशकानंतर हळुहळू बळकट होत गेली.

अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युनियनचा हस्तक्षेप व त्यानंतर दोन दशकांनी अमेरिकेने केलेला हल्ला या काळात अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांच्या माध्यमामधून पश्चिम आशियातील मूळ इस्लामिस्ट विचार व मौदुदींची प्रेरणा असलेला पाकिस्तानमधील इस्लामिस्ट विचार यांचा संयोग आफ-पाकमध्ये घडला. सध्याच्या जागतिक दहशतवादाची हीच जन्मभूमी आहे.

इस्लाम व आधुनिकतेमधील हा वैचारिक संघर्ष सतत प्रखर राहण्यामागे इतरही कारणे अर्थातच आहेत. मात्र आधुनिकतेच्या मूल्यांशी ओळख होताना इस्लामकडून मिळालेला प्रतिसाद व तो विशिष्ट प्रतिसाद मिळण्यामागील इस्लामची ऐतिहासिक भूमिका या घटकांचा विचार न करता या वैचारिक तिढ्याचे उत्तर मिळणे अशक्य आहे.

या संघर्षाचे भविष्य काय आहे? आधुनिक विचारास अपेक्षित असलेली मूल्ये संपूर्णत: इस्लामी असलेल्या देशांमध्ये लागु केली जाऊ शकतील काय? असे व या स्वरुपाचे इतर अनेक प्रश्न या अप्रतिहत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित करता येऊ शकतील. मात्र निव्वळ भाबड्या आशावादाची कास धरायची नाही, असे ठरविल्यास इस्लाम व लोकशाही विचारामधील वैचारिक संघर्ष कधीतरी संपेल, असे म्हणवत नाही.

इस्लाममधील अंतर्गत संघर्ष आणि इस्लाम विरुद्ध इतर’मानवनिर्मित’ व्यवस्थांचा संघर्ष अशा दोन्ही पातळ्यांवरील या संघर्षाची आग कमी-जास्त प्रखरतेने सातत्याने भडकतच आहे व त्याचे पडसाद जगभर उमटताना दिसत आहेत.

खिलाफतीची राजकीय व्यवस्था औपचारिकरित्या नष्ट होऊन आता ९४ वर्षे उलटली आहेत. मात्र अजूनही या संकल्पनेचा वैचारिक प्रभाव जगभरातील मुस्लिम मनांवर आहे; हे आयसिसच्या उदाहरणामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अशा गंभीर पार्श्वभूमीवर लोकशाही विचार व इस्लाममधील द्वंद्व संपविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पैगंबरांचे थेट वंशज व जॉर्डनचे सन्माननीय राजे किंग अब्दुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येताना दिसतो आहे.

 

 

९/११ च्या जगप्रसिद्ध दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अत्यंत तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल्लाह यांनी नोव्हेंबर २००४ मध्ये’अम्मान मेसेज’ची घोषणा केली.

इस्लामच्या सर्व महत्त्वपूर्ण पंथांमधील धर्मपंडितांनी एकत्र येऊन केलेले हे आवाहन आहे. यामध्ये दहशतवादाचा स्पष्ट निषेध, धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार आणि इस्लाम धर्माच्या खऱ्या स्वरूपास(ट्रू नेचर) पाठिंबा देण्यात आला आहे. ”खऱ्या इस्लाममध्ये अनाठायी आक्रमकता आणि दहशतवादास परवानगी नाही. तसेच त्यामध्ये बिगर मुस्लिमांसाठी धार्मिक स्वातंत्र्य, शांतता, न्याय आणि सौहार्दाची भावना आहे. हा सर्व जगासाठी मैत्री व आशेचा संदेश आहे,” अशी भूमिका किंग अब्दुल्ला यांनी अम्मान मेसेजची घोषणा करताना मांडली होती.

अम्मान मेसेजने तीन मुख्य प्रश्नांची उत्तरे दिली होती. मुस्लिम कोणाला म्हणावे, एखाद्याला धर्मभ्रष्ट(तक्फिर) ठरविणे शक्य आहे काय आणि फतवा काढण्याचा अधिकार कोणाला आहे- हे ते तीन प्रश्न होते.

जुलै २००५ मध्ये किंग अब्दुल्ला यांनी निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक परिषदेमध्ये ५० देशांमधील २०० पेक्षा जास्त धर्मपंडितांना संबोधित करताना या तीन मुलभूत प्रश्नांची उत्तरे फतव्याद्वारे देण्यात आली.

त्यानुसार इस्लाममधील मुख्य आठ पंथांचे पालन करणारे सर्व खरे मुस्लिम आहेत, मुस्लिमांमध्ये तक्फिरीची घोषणा करण्याची धर्मशास्त्रानुसार परवानगी नाही या दोन अत्यंत संवेदनशील बाबींना मान्यता देण्यात आली. याचबरोबर, या फतव्याची रचना करणाऱ्या जागतिक पातळीवरील धर्मपंडितांनी फतवा घोषित करण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता व अटींची घोषणाही यावेळी केली. यामुळे ’बेकायदेशीर’पणे घोषित केल्या जाणाऱ्या फतव्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.

अब्दुल्ला यांनी निवडलेला हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे, हे वेगळे सांगावयास नकोच. ही केवळ सुरुवात आहे. शतकानुशतकांची पार्श्वभूमी असलेल्या या संघर्षाची धग केवळ एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेने कमी होणार नाही, हेदेखील स्पष्टच आहे. शिवाय, त्यांच्या या प्रयत्नास इस्लामिक जगाकडून प्रतिसाद कसा मिळेल हेदेखील अद्यापी पुरेसे स्पष्ट व्हावयाचे आहे(आत्तापर्यंतचे चित्र फारसे सुखावह नाही).

मात्र अशा मोहिमेची निकड प्रचंड आहे. इस्लाममधील अंतर्गत संघर्ष किमान मवाळ होणे व उर्वरित जगाशी इस्लामचा सुसंवाद प्रस्थापित होणे, ही काळाची फार मोठी गरज आहे. कारण इस्लामी देशांमधील राजकीय व्यवस्था या सतत्याने ढासळत आहेत, दहशतवादी संघटनांना त्यामधून ताकद मिळते आहे, इतर लोकशाही देशांमधील मुस्लिम नागरिकांविषयी सातत्याने नकारात्मकतेची भावना निर्माण होते आहे, युद्ध वा अन्य कारणांमुळे इतर देशांत होणारे मुस्लिमांचे स्थलांतर व त्यामुळे निर्माण होणारे तणाव वाढत आहेत.

अशा पार्श्वभूमीवर इस्लाम व आधुनिकतेमधील संघर्षाची ही शोकांतिका सर्व जगासाठीच अटळ व अक्षम्य ठरु नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच आपल्या हातात आहे.

===

हे ही वाचा – ८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version