Site icon InMarathi

तुमचं प्रोडक्ट विकायचंय? “पार्टी” करा! टप्परवेअरच्या यशाची झकास गोष्ट!

tupperware party inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल कुठेही गेलात, तर टप्परवेअरचे डबे तुम्हाला दिसतात. अगदी लोणचं चटणी भरुन नेण्याएवढ्या छोट्या डब्यांपासून ते धान्य भरायला उपयोगी पडतील असे मोठे ड्रम पण आपण पाहतो.

कितीतरी गृहिणी घरातूनच टप्परवेअरच्या वस्तू विकायचा उद्योगही करतात. फ्रीजमध्ये निवडलेल्या भाज्या ठेवायला, एखादा खाद्यपदार्थ हवाबंद करून ठेवायला टप्परवेअरचे डबे किती उपयुक्त आहेत ते तुम्हाला माहित असेल.

नीटनेटकेपणा, टिकाऊपणा आणि दिखाऊपणा या सर्व गोष्टी माणसाला हव्या असतात. म्हणजेच आखुडशिंगी.. बहुदुधी.. लाथा न मारणारी.. चारा कमी खाणारी गाय लोकांना हवी असते.

टप्परवेअरचे डबे, पाण्याच्या बाटल्या, कंटेनर, लंच बाॅक्स, चाॅपर स्वयंपाकघरात वापरायच्या अनेक वस्तू!!! या किंमतीला जरा महाग असतात.. पण त्याचा टिकाऊपणा पाहिला, तर लक्षात येतं की खूप कमी वेळात त्यांनी बाजारपेठ का काबीज केली.

 

 

कसा झाला जन्म या टप्परवेअरचा?

१०० हून अधिक देशातील गृहिणींची पसंती ठरलेली टप्परवेअरची विविध उत्पादने‌ आपण या दहा वर्षांत पाहू लागलो. पण या उत्पादनांची सुरुवात १९४० साली अमेरिकेत अर्ल टप्पर यांनी केली.

त्यांच्या डोक्यात आपली उत्पादने कशी असतील, असावीत याचा विचार पक्का होता. रेफ्रीजरेटर, गॅसच्या जमान्यात त्यांना असं काहीतरी करायचं होतं, असे काही डबे तयार करायचे होते जे अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ ताजे ठेवतील.

तो काळ हा स्टील, अॅल्युमिनिअम, काच, तांबे, पितळ या वस्तूंचा होता. यांच्या विविध मर्यादा होत्या. अन्नपदार्थ गरम असताना जर यांपैकी कोणत्याही डब्यात भरला तर तो घामेजल्यासारखा होई. गार झाल्यावर भरला तर त्याची चव बिघडून जाई.

काचेच्या बाटलीत दूध ओतलं तर बाटली तडकायची भीती, प्लॅस्टीकच्या बाटलीत भरलं तर प्लॅस्टीकचा वास लागायची शक्यता. दूध नासून जायची शक्यता. या सर्व‌ गोष्टी लक्षात घेऊन अर्ल असं उत्पादन बनवू इच्छित होते जे या सर्व शक्यतांवर मात करु शकेल आणि लोकप्रिय होईल.

 

 

अर्लनी त्यांचे प्रयत्न सुरु केले. १९४६ साली त्यांनी आपली कंपनी सुरु केली. आणि त्यांनी असे प्राॅडक्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला जे डबे सगळे पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि बाहेरही उपयुक्त ठरतील.

असं प्लॅस्टीक त्यांना बनवायचं होतं, जे घरगुती वापरासाठी उपयोगी ठरेल. १९४९ साली त्या प्रयत्नांना यश आलं. त्यांनी अशा उत्पादनांची मालिका तयार केली. त्याचं पेटंट घेतलं आणि मग ते मार्केटमध्ये उतरले. त्याच्या पुढची पायरी होती ती उत्पादनं विक्री करणे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये त्यांनी आपली उत्पादनं विक्रीला ठेवायचा प्रयत्न केला.

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

लोकांना डबे सील करून ठेवणं ही संकल्पनाच नवीन होती. ती कुणाच्याही पचनी पडेना. कारण त्यांना पारंपरिक पद्धतीने करण्याची साठवणूकच माहिती होती. लोक सहजासहजी मिळालेली वाट सोडायला तयार होत नाहीत. आता मोठा प्रश्न होता, तो म्हणजे हे सगळं लोकांना पटवून कसं द्यायचं?

‘असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर..’ असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्यांचा प्रवास असाच काहीसा होता.

एक वर्ष असंच गेलं. १९५० मध्ये टप्परवेअर कंपनीत एक कर्मचारी रुजू झाली. तिचं नांव होतं ब्राऊनी वाईज. तिने यावर एक फार मस्त आणि वेगळा उपाय योजला. तिनं आपल्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्या महिलांना डोअर टू डोअर विक्री करायचं काम सांगितलं.

 

 

या विक्री दरम्यान या विक्रेत्या महिलांना टप्परवेअरचे प्रात्यक्षिक सादर करायची संकल्पना सांगितली. पण ते सादरीकरण काही पारंपरिक पद्धतीने नव्हतं. त्यासाठी नवी युक्ती होती पार्टी ठेवण्याची. मार्केटिंगचा हा एकदम वेगळा आणि मस्त फंडा ठरला.

या पार्टीत त्यांनी टप्परवेअरची सारी उत्पादनं सादर केली. कशी वापरायची ही उत्पादने? याची झाकणं कशी सीलबंद करायची? लोकांना कोणतीही गोष्ट निव्वळ सांगोवांगी समजत नाही. त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं. ब्राऊनीनं तीच कल्पकता वापरून टप्परवेअरचे वापर पार्टीत सादर केले.

वेगवेगळे डबे, त्यांची सील करुन हवाबंद करायची पद्धत तिनं सादर केली. तोवर लोकांना हे समजत नव्हतं. ही पार्टी म्हणजे टप्परवेअर ब्रँडचा यशाचा फॉर्म्युला ठरली. बास… लोकांना पटलं, रुचलं आणि आवडलंही. टप्परवेअरची उत्पादने रिटेल स्टोअर्समध्ये दिमाखात रुजू झाली.

 

 

हळूहळू लोकांना टप्परवेअरची विविध उत्पादने इतकी आवडली. की बघता बघता बाजारपेठ या उत्पदनांमुळे व्यापली. कंपनीचे शेअर्स थेट न्यूयॉर्क शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले.

टप्परवेअरची विविध उत्पादने प्लॅस्टीकची आहेत. तीसुद्धा पर्यावरण पूरक बनवण्याला कंपनीने प्राधान्य दिलं. बघता बघता लोकप्रिय ठरलेली ही उत्पादने केवळ अमेरिकेत नव्हे तर इतर देशांतही प्रसिद्ध झाली.

डंकेल प्रस्ताव पास झाला आणि बाजारपेठ मुक्त झाली. जगातील सर्व उत्पादने सर्व लोकांना माहिती झाली. खुल्या बाजारपेठेनं जगाचं रुपांतर एका खेड्यात केलं. इंटरनेटच्या माध्यमातून तर जग अजून जवळ आलं.

पूर्वी जे ब्रँड केवळ आणि केवळ श्रीमंत लोकांना माहिती होते ते आता सर्वांना माहीत झाले. ही टप्परवेअरची उत्पादने मध्यमवर्गीय घरांमध्येही जाऊन विसावली. पाण्याच्या बाटलीपासून ते लंच बाॅक्सपर्यंत, स्वयंपाकघरात लागणारी साधने, कटलरी, पर्सनल केअर सबकुछ टप्परवेअरने व्यापलं आहे.

 

 

या सगळ्या गोष्टींची सुरुवात मात्र ब्राऊनी वाईज या महिलेनं‌ केलेल्या पार्टी या अभिनव उपक्रमाने झाली आहे.

===

हे ही वाचा – घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version