' परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणारे, त्या सगळ्यांना पुरून उरणारे ‘बालाजी वेफर्स’ – InMarathi

परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणारे, त्या सगळ्यांना पुरून उरणारे ‘बालाजी वेफर्स’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतीयांना स्नॅक्स खाण्यात कमालीचा रस आहे. त्यातही कोरडे चमचमीत स्नॅक्स सगळ्यांना आवडतात. स्नॅक्सच्या यादीत पहिला नंबर असतो तो बटाटा वेफर्सचा.

लेजचे वेफर्स भारतात प्रसिद्ध आहेत. अर्थात लेज ही एक परदेशी कंपनी आहे. त्यांचं मार्केटही मोठं आहे. त्यांची ॲडव्हर्टायझिंग पॉलिसीदेखील खूप चांगली राबवली जाते. जाहिराती करणं त्यांच्यासाठी अवघड मुळीच नाही. अशा कंपनीला भारतातल्या एका साध्या कुटुंबातील मुलांनी टक्कर देणे साधी गोष्ट नव्हती. पण ही किमया केली आहे बालाजी वेफर्सच्या विराणी बंधूंनी.

 

virani brothers inmarathi

 

त्यांची कथा खरोखरच स्फूर्तिदायक आहे. चंदूभाई विराणी, भिकुभाई विराणी, मेघजीभाई विराणी असे ३ भाऊ गुजरातमधील जामनगर मधल्या एका छोट्या खेड्यात जन्मले. त्यांचे वडील शेतकरी. त्यामुळे घरचे उत्पन्न जेमतेमच. कसाबसा खर्चाचा आणि पोटाचा मेळ घातला जायचा. शेतीच्या अनियमित उत्पन्नामुळे घरची परिस्थिती खालावली.

१९७२ मध्ये शेवटी तिन्ही भावांनी असे ठरवले, की मोठ्या गावी जाऊन काहीतरी कामधंदा करावा. स्वतःचाच काहीतरी व्यवसाय चालू करावा. ते तितकं सोपं नव्हतं. कारण यांच्या जवळ काहीही भांडवल नव्हते.

त्यांनी वडिलांना सांगितले, की ही जमीन विका आणि ते पैसे आम्हाला द्या. आम्ही यातून काहीतरी व्यवसाय करू. शेवटी वडिलांनी ती जमीन विकली आणि त्याचे वीस हजार रुपये मुलांना दिले.

त्यानंतर हे तिघे भाऊ राजकोटला गेले. या तिघांनी तिथून शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांना फार काही यश आले नाही. जवळचे सगळे पैसेही संपले. आता कोणत्या तोंडाने गावाला जायचे? असा प्रश्न त्यांना पडला. पदरी आलेले अपयश घेऊन जाणे त्यांना नको वाटले.

शेवटी त्यातल्या एकाने राजकोटमधील एका सिनेमा थिएटरमध्ये डोअर कीपर म्हणून नोकरी स्वीकारली. आणि ती नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे ते करू लागले.

 

theatre inmarathi

 

दोन वर्ष त्यांचा प्रामाणिकपणा बघून त्या सिनेमा थिएटरच्या मालकाने त्यांना १९७४ मध्ये सिनेमा थिएटरमधील कॅन्टीन त्यांना चालवायला दिले. ते कॅन्टीन व्यवस्थितरीत्या चालवण्याचे चॅलेंज त्यांच्यासमोर होते.

तिथे मात्र त्यांनी जीव तोडून काम करायला सुरुवात केली. त्या कॅन्टीनमध्ये त्यांनी त्यांच्या बायकांनी तयार केलेले सँडविच आणि वेफर्स विकायला सुरुवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुढील पंधरा वर्ष त्यांचे ते कॅन्टीन व्यवस्थित सुरू होते. तोपर्यंत त्यांचे वेफर्स त्या भागात प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना वाटायला लागले, की आता आपला व्यवसाय वाढवायला हवा. मग त्यांनी ते तयार वेफर्स घरोघरी जाऊन विकायचे ठरवले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.

वाढता प्रतिसाद बघून त्यांनी १९८९ मध्ये वेफर्स करिता सेमी ऑटोमॅटिक प्लांट उभारला. त्याच वेळेस त्यांनी त्यांचा ‘बालाजी वेफर्स’ हा ब्रँड तयार केला. ग्राहकाला आवडेल, रुचेल असा हा पदार्थ त्यांनी अत्यंत वाजवी दरात विक्रीसाठी ठेवला.

 

potato-chips-inmarathi

 

ह्या बालाजी वेफर्स ब्रँडची प्रसिद्धी करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग घरोघरी जाऊन त्यांनी ही वेफर्सची पाकीटे विकायला सुरुवात केली.

त्यांच्याकडे जी काही प्रसिद्धी होती, ती केवळ लोकांना आलेल्या अनुभवाचीच. सुरुवातीला नवीन लोक हे नवीन वेफर्स घेण्यास तयार नसायचे. दुकानांमधून वेफर्स ठेवायलाही तयार नसायचे. त्यांना बल्कमध्ये मोठी ऑर्डर मिळायची नाही. मग सुरुवातीला, ‘आम्ही वेफर्स ठेवून जातो, विकले गेले तर पैसे द्या’ या बोलीवर त्यांनी वेफर्स दुकानदारांना द्यायला सुरुवात केली.

आधीचे वेफर्स दिलेले, त्याचे पैसे नाहीत. परत नवीन माल तयार करायचा त्यासाठी पैसे हवेत. अशा अनेक अडचणी विराणी बंधुंसमोर सुरुवातीला उभ्या ठाकल्या. परंतु या तिघांनीही हार मानली नाही. अत्यंत चिकाटीने त्यांनी हा उद्योग सुरूच ठेवला.

हळूहळू त्यांच्या वेफर्सची ख्याती पसरू लागली. आधी राजकोट ,नंतर जामनगर आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी त्यांचे वेफर्स मिळायला लागले. आता हा बिजनेस इतका मोठा झाला आहे, की त्यांच्या वलसाड आणि राजकोटमधल्या प्लांटमध्ये दररोज ३८ टन आणि २४ टन वेफर्स बनतात.

बालाजी वेफर्स हा ब्रँड आज भारतातील स्नॅक्स उद्योगातील एक मोठे नाव झाले आहे. भारतात प्रस्थापित असलेल्या परदेशी कंपन्यांना प्रतिस्पर्धी म्हणून बालाजी वेफर्स सध्या आघाडीवर आहे.

बालाजी वेफर्सने वेफर्स बरोबर आता इतर नमकीन देखील बाजारात आणले आहेत. बटाटा वेफर्स बरोबर आता केळी वेफर्स, मसाला वेफर्स, टोमॅटो वेफर्स, शेव, कुरकुरीत चना डाळ, गांठीया, कुरकुरीत मुंग दाल इत्यादी अनेक प्रकार आणले आहेत.

 

balaji wafers inmarathi

 

भारतात ५०००० कोटी रुपयांचा स्नॅक्सचा व्यवसाय चालतो. त्यातील ४० टक्के मार्केट हिस्सा हा केवळ वेफर्सचा आहे. २०२० या वर्षी बालाजी वेफर्सने २४०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

शब्दशः ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’ म्हणजे काय, हे विरानी बंधूंकडे पाहिल्यावर कळते. त्यांची गोष्ट खरोखरंच प्रेरणादायी आहे. अपयश आले तरी हार न मानता येणाऱ्या प्रसंगाला तोंड दिले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले आहे. जिद्दीने काम केल्यास यश मिळते हेही त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?