आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
शीत युद्ध चालू झाले आणि सोबतच चालू झाली ती वेडी शस्त्रस्पर्धा. याला खरंच वेडी स्पर्धा म्हणायची की काळाची गरज हे सांगणे त्या त्या कालखंडाचा आणि त्या काळी झालेल्या काही ठळक घटनांचा अभ्यास केल्यानंतरच ठरवता येईल. एक गोष्ट मात्र नक्की की शीत युद्धात तयार झालेली शस्त्रास्त्रे ही प्रतिक्रिया या एकमेव कारणामुळे झाली आहेत. ही प्रतिक्रिया तयार झाली संशयी वृत्तीमुळे!
संशयी वृत्ती बळावली एकमेकांच्या गोष्टींची लवकरात लवकर माहिती मिळवण्यासाठी, अशी माहिती जीचं भांडवल करून एकमेकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नामोहरम करता येईल! अशीच माहिती घेण्यासाठी तयार झाली खास विमाने! ह्या खास विमानांची उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख दर्शवू लागला शीत युद्धातील डावपेचाची प्रगती, कुटणीती करणाऱ्यांच्या टेबलवर आणि देशांच्या अध्यक्षांच्या निवडक समूहात! चला मग भेट घेऊ अजून एका रशियन विमानाची, मिग-२५ ची!
आणि अशी पेटली ठिणगी:
द्वितीय महायुद्धामध्ये खांद्याला खांदा लावून लढलेले दोन जिगरबाज देश युद्ध संपल्यावर एकमेकांचे वैरी झाले. त्यातच युरोपची वाटणी होऊन सत्ताकेंद्रे स्थापन झाली. पश्चिम युरोप गेला अमेरिकन कंपूत आणि पूर्व युरोप गेला रशियन कंपूत!
मग जन्माला आल्या दोन मोठ्या लष्करी संघटना, नाटो आणि वॉर्सा तह! या संघटनांच्या निर्मितीमुळे दोघा देशांमधला तणाव आणखीनच वाढला.
असं वाटू लागलं की पुन्हा युद्ध होतं की काय? तणाव हा दिवसेंदिवस वाढतच होता. अशात लष्करी अधिकारी स्वस्थ बसणार नव्हते. त्यांना पाहिजे होती शत्रुपक्षाची इत्यंभूत माहिती! त्यांच्या छावण्या कुठे आहे? कोणती विमाने आहे? किती मनुष्यबळ असेल? अशी माहिती आधी भेटली तरच उद्याचा दिवस पाहता येईल, अन्यथा नाही! पण टेहळणी करणार कशी? उपग्रहांचा जन्म तर आत्ताच झाला होता. त्यांचा लष्करी उपयोग होण्यासाठी अजून काळ पुढे सरकला नव्हता! मग एकच उपाय होता, विमानाला कॅमेरा बसवा! असा कॅमेरा जो उंचीवरून शत्रू प्रदेशाच्या एका एका इंचाच्या भूभागाचे छायाचित्रे काढेल! मग हीच छायाचित्रे वापरून लष्करी अधिकारी डावपेच बनवतील.
सगळे पाहिजे तसे घडले आणि १९६० च्या मे महिन्यात सेंट्रल इंटेलिजन्स एजंसीचे U-२ (हेरगिरी करणारे) विमान रशियन अवकाशात टेहळणी करायच्या उद्देशाने उडाले.
या विमानामध्ये पाहिजे तसाच कॅमेरा बसवला होता. ह्या विमानाचा उद्देश होता हवाई छायाचित्रित टेहळणी (photographic aerial reconnaissance). या विमानाला सोविएत रशियाच्या आंतरखंडीय अग्निबाणांच्या तळांचे छायाचित्र काढायचे आदेश होते. लक्ष्य पूर्ण होण्याआधीच रशियन मिसाईलने विमानाला अचूक टिपले. क्षणार्धात विमान कोसळले आणि वैमानिक पकडला गेला! अमेरिकेने हे विमान निव्वळ हवामान संशोधनाचे आहे असे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न काही सफल झाला नाही! शीत युद्धातली ही एक मोठी घटना होती. या घटनेने संरक्षण क्षेत्रातील संशोधनाला एक ऊर्जा दिली.
थोड्याच काळात स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आकाशात घिरट्या घालू लागली. त्या काळी सर्वात मोठा धोका समजले गेले ते स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सला! कारण एक तर ते उंचीवरून उडत आणि त्यांना मारणे सोडाच, मार्गात पकडणेसुद्धा मुश्किल होते. उंचीवरून मग ते टेहळणी करू लागले. असे समजले जाई की जेवढी उंची तेवढी सुरक्षितता! यथावकाश त्यांना मारणारे विमानेपण तयार झाली! हाहा म्हणता विमानांमध्ये मोठे बदल झाले. वेगवेगळ्या मिशनसाठी वेगवेगळी विमाने. त्यात विमानांचा वेग वाढला, त्यांची जमिनीपासून उडण्याची उंची वाढली, हवेतल्या हवेत मारा करणारी मिसाईल तयार झाली. पण यांना मात देत अमेरिकेने जन्म घातले जगातील वेगवान विमानांना. North American XB-70 Valkyrie
आणि Lockheed SR-71 Blackbird!
असा झाला ‘Foxbat’ चा जन्म:
साहजिकच रशियन पॉलिटब्युरो आणि त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अमेरीकी विमानांचा सामना कसा करायचा यावर चर्चा सुरु झाली! काही ठळक उद्देश ठेवून उद्देश ठेवून Mikoyan Design Bureau ला हे काम सोपवण्यात आले. ते उद्देश होते Improved avionics and weapon system, Improved combat efficiency, आणि Interception capability, उंचीवरून टेहळणीची क्षमता (photographic reconnaissance). हे विमान बनवणे म्हणजे त्याला लागणाऱ्या सुट्या भागांची सुद्धा निर्मिती करणे, जे एक मोठे आव्हानात्मक काम होते! त्यात या विमानाचा वेग जास्त असल्यामुळे कोणता धातू वापरावा हेसुद्धा एक मोठे दिव्य होते!
यासाठी खास वेल्डिंग तंत्र शोधून काढण्यात आले (14, 00,000 welding points), नवीन इंधन तयार करण्यात आले, उष्णतारोधक सुटे भाग सुद्धा तयार करण्यात आले, R -१५ नावाचे मोठे इंजिन बनवले (सोव्हिएत रशियासाठी नाविन्यपूर्ण) आणि त्याला आतुन ५ किलो चांदीचा मुलामा लावण्यात आला ! विमानाच्या चाचण्यांमध्ये रशियन लाल चांदणीचा रंग लगेच २-३ फेऱ्यांमध्येच उडू लागला! पट्ठ्यांनी यासाठीसुद्धा नवीन रंग तयार केला, शेवटी लाल चांदणी म्हणजे विमानाची शान! आणि हे सर्व बनवले फक्त तीन वर्षात, खरंच तीन वर्षात!
एवढं सगळं होऊन तयार झालं सोव्हिएत रशियाचं सगळ्यात वेगवान विमान, ध्वनीपेक्षा तीनपट वेगाने जाणारं!
हे विमान रशियन वैमानिकांचं गळ्यातील ताईत बनलं, कारण एकच वेग आणि आधुनिकता! याशिवाय काय वेगळे पाहिजे वैमानिकांना?
ज्या XB-70 Valkyrie विरुद्ध हे विमान तयार झाले, ते मोठया प्रमाणात तयार करण्यात आले नाही आणि प्रायोगिक विमान म्हणून इतिहासात जमा झाले. राहिला विषय Lockheed SR-71 Blackbird चा, त्याला तयार करण्यासाठी २४ तासांचा अवधी लागायचा. शिवाय खडतर प्रक्रियेमधून जाऊन वैमानिक निवडले जायचे, त्यांचा खर्च आणि त्यांना मोठया प्रमाणात तयार करण्याची आवश्यकता, इत्यादी दिव्य! पण, मिग-२५ उडवायचे तर कधी पण सांगा, शत्रू विमाने पाडायला हे विमान लगेच तयार होई!
या विमानाला गमतीने ‘मद्य वाहक’ (Booze Carrier) म्हणत! कारण विमानाच्या वेगवेगळ्या भागांना थंड ठेवण्यासाठी आणि वैमानिकांसाथीच्या AC साठी अल्कोहोल आणि डिस्टिल्ड पाण्याचे २४० लिटर मिश्रण वापरले जाई! ग्रॉऊंड कृ ने तर नाव दिले ‘उडते उपहारगृह’! काही जण तर म्हणायचे मिग-२५ तळ म्हणजे सोव्हिएत रशियामधील सगळ्यात आनंदी जागा!
क्रमशः
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.