आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुन्हेगारी जगात लोक कोणत्या तरी कारणामुळेच ओढले जातात हे आपण ऐकत आलो आहोत. कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याची परिस्थिती ही त्याला गुन्हा करायला भाग पाडते हे आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल.
सिनेमातील उदाहरण सांगायचं तर, ‘वास्तव’ मधील संजय दत्त ने साकारलेला ‘रघु’. प्रामाणिकपणे ‘पाव भाजी’ ची गाडी लावून काम करत असतो.
पण, काही गुंड येतात आणि त्याच्या गाडीचं नुकसान करतात. नुकसान करणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी रघु हातात शस्त्र उचलतो आणि गुन्हेगारीच्या दलदलीत अडकतो.
अतिरेकी लोक हे कोणीतरी डोक्यात राग भरवून दिल्यानेच दहशतवादी कारवाया करायला सुरुवात करतात आणि इतरांचं, स्वतःचं आयुष्य संपवतात. पण, गुन्हेगारी जगात एक व्यक्ती अशी सुद्धा होऊन गेली आहे जो काहीही पार्श्वभूमी नसतांना गुन्हेगारी क्षेत्रात आला.
‘चार्ल्स सोभराज’ – हे नाव आपण लहानपणी ऐकलं होतं. १९७० च्या दशकातील एक कुख्यात गुन्हेगार म्हणून या व्यक्तीची ख्याती जगभरात पसरली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
श्रीमंत घरात जन्मलेला चार्ल्स हा कोणतेही कारण नसतांना “नायक नही खलनायक हूं मै” हे ठरवूनच नेहमी वावरायचा. पाकिटमारीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास हा कित्येक मोठ्या गुन्ह्यांपर्यंत का पोहोचला? याचं नेमकं कारण कोणीही शोधू शकलं नाही.
हा विषय घेण्यामागे ते कारण शोधणे, त्याचं कौतुक करणे किंवा लोकांना गुन्हे कसे करावेत? हे शिकवणं अजिबात नाहीये. आपल्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असल्यास ‘सतर्क रहावे’ हे सांगणे हा केवळ या विषयाबद्दल लिहिण्यामागचा उद्देश आहे.
चार्ल्स सोभराजची गुन्हे करण्याची पद्धत ही समकालीन गुन्हेगारांपेक्षा अगदी वेगळी होती. एखाद्या मुली सोबत खूप घनिष्ठ मैत्री करायची आणि मग तिच्याच घरात चोरी करून, तिचा खून करून फरार व्हायचं हे चार्ल्ससाठी अगदी सहज काम होतं.
काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला रणवीर सिंग चा सिनेमा ‘लेडीज वर्सेस रिकी बहेल’ मधील रिकी हे पात्र जर तुम्हाला आठवत असेल तर तसंच चार्ल्स सोभराजचं पूर्ण करिअर आहे.
आपल्या व्यक्तिमत्वाने, बोलण्याने मुलींना आकर्षित करायचं, त्यांना स्वतःबद्दल ची खोटी माहिती द्यायची आणि ती माहिती त्या मुलीला ‘पटली’ की मग आपला हेतु साध्य करून गायब व्हायचं. चार्ल्सने आयुष्यभर अशीच कामं केली आहेत.
===
हे ही वाचा – जगातील अनेक खतरनाक षडयंत्राची सुपारी घेणारा जॅकाल
===
आज जशी कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती सहज उपलब्ध होऊ शकते, तशी त्याकाळात उपलब्ध होत नसल्याने त्या ७० च्या दशकात लोकांमध्ये एक ‘भाबडेपणा’ होता असं म्हणता येईल.
तो असं का करत होता?
चार्ल्स सोभराजला ‘अँटी-सोशल डिसऑर्डर’ म्हणजेच समाजातील व्यक्तींबद्दल एक प्रकारचा राग असणे आणि त्या भावनेतून त्यांना संपवणे हा आजार होता हे कालांतराने समोर आलं होतं.
कोण आहे ही विचित्र व्यक्ती? आज कुठे आहे?
चार्ल्स सोभराजचा जन्म ६ एप्रिल १९४४ रोजी व्हिएतनाम मध्ये झाला. त्यांचे वडील हे हाथचंद सोभराज हे भारतीय व्यवसायिक होते, तर आई ‘ट्रान लोन फुंग’ ही मूळची फ्रेंच असून त्या व्हिएतनाम मध्ये एका दुकानात काम करायची.
व्हिएतनामच्या ‘सिगाव’ मध्ये चार्ल्सचं बालपण गेलं होतं. विभिन्न देश, सवयी असलेला हाथचंद सोभराज आणि ट्रान लोन फुंग यांचा संसार फार वर्ष टिकला नाही. विभक्त झाल्यानंतर ‘चार्ल्सला आईच्या फ्रेंच पतीने दत्तक घेतलं होतं.
पण, इतर मुलांसमोर तो नेहमीच दुर्लक्षित व्हायचा आणि तिथून त्याच्या मध्ये एक ‘विद्रोही’ स्वभाव तयार झाला. सतत झालेल्या देश बदलांमुळे कोणतंही शिक्षण पूर्ण करणं शक्य झालं नाही, म्हणून शिक्षणानंतर नोकरी असं सरळ आयुष्य जगण्याची संधी मिळाली नाही.
वयाच्या १९ व्या वर्षी १९६३ मध्ये चार्ल्स सोभराजला पॅरिस मध्ये चोरी केल्याच्या आरोपात सर्वात पहिल्यांदा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. जेलमध्ये असतांना चार्ल्सने जेल अधिकाऱ्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आणि सुटका झाल्यानंतर त्याच्या घरी रहायला गेला.
गरिबीत वाढलेला चार्ल्स हा अचानक आलेली श्रीमंती अनुभवत होता. पण, मूळ स्वभाव थोडीच बदलणार होता. उंची पार्ट्यांमधून लोकांशी ओळखी वाढवणे आणि मग त्यांना फसवणे हा चार्ल्सचा जणू एक छंदच होता.
कॅम्पगेन नावाच्या एका पर्शियन मुलीला त्याने लग्नासाठी विचारलं होतं. पण, त्याच दिवशी ते ज्या कार मधून फिरत होते ती चोरीची आहे हे कळल्यावर पोलिसांनी चार्ल्सला अटक केली होती.
८ महिन्याची शिक्षा भोगल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. कॅम्पगेन गरोदर असतांना हे दोघे ईस्टर्न युरोपच्या विमानातून मुंबईला येण्यासाठी प्रवास करत होते. विमानातील एका सहप्रवासी व्यक्तीचे महत्वाचे कागदपत्र आणि पैश्याच्या चोरीच्या आरोपाखाली चार्ल्सला अटक करण्यात आली.
कॅम्पगेन ने मुंबईत ‘उषा’ या मुलीला जन्म दिला. त्या दोघींना मुंबईतच ठेवून चार्ल्स सोभराज हा गुन्हेगारी विश्वात मार्गस्थ झाला. स्मगलिंग, कार चोरी आणि जुगार खेळणे हे तीन त्याचे प्रमुख उत्पन्नाचे साधन होते.
===
हे ही वाचा – भारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या सत्यकथा तुमची झोप उडवतील
===
१९७३ मध्ये हॉटेल अशोकामधील ज्वेलरीच्या दुकानात चोरी करताना ‘चार्ल्स सोभराज’ रंगेहात सापडला. पण, कॅम्पगेन च्या विनंतीवरून त्याला सोडण्यात आलं होतं. पण, काही दिवसांनी दुसऱ्या गुन्ह्यात मात्र त्याला अटक करण्यात आली.
जामीन मिळवण्यासाठी त्याने वडिलांकडून अतिरिक्त पैसे मागवले आणि उरलेल्या पैश्यातून तो काबुल या देशात पळून गेला. तिथे प्रवासी लोकांना फसवत असल्याचं कळल्यावर त्याला अटक करण्यात आली.
पण, आजारी असल्याची सबब दाखवून त्याला इराण मध्ये हलवण्याची परवानगी देण्यात आली. तो एकटाच इराण ला गेला आणि कॅम्पगेन ही चार्ल्सच्या गुन्हेगारीला कंटाळून फ्रांसला कायमची परतली.
चार्ल्स सोभराजच्या नावावर जगभरात १२ खून केल्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अशी ओळख निर्माण करणाऱ्या चार्ल्सच्या नावावर थायलंड, नेपाळ, पाकिस्तान, भारत, मलेशिया, फ्रांस, अफगाणिस्तान, तुर्की, ग्रीक इतक्या देशांमध्ये गुन्हे केल्याची नोंद झाली आहे.
कोणत्याही नवीन व्यक्तीला आपली ओळख एखाद्या वस्तू किंवा सेवेचं विक्रेता म्हणून ओळख करून घ्यायची, ड्रग्जचा पुरवठा करणे आणि मग त्या व्यक्तीचे पासपोर्ट चोरणे हा चार्ल्स सोभराजचा नित्यक्रम होता.
‘सीएटल’ च्या टेरेसा क्नोल्टन या तरुणीला फसवून तिला थायलंडच्या एका तळ्यात बुडवून मारून चार्ल्सने बिकीनी मधील मुलींचा खून करण्याच्या पद्धतीला सुरुवात केली. यानंतर अश्या घटना पट्टाया, हॉंगकॉंग मध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं. या कामामुळे ‘चार्ल्स सोभराज’ ला ‘बिकीनी किलर’ हे नाव देण्यात आलं होतं.
===
हे ही वाचा – या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो!
===
१९७६ मध्ये भारतात आल्यावर इस्रायलच्या एवोनी जॅकब या तरुणीचा खून केला होता. वेगवेगळ्या पासपोर्टने प्रवास करत सिंगापूर, भारत, बँकॉक याठिकाणी फिरून चार्ल्सने आपल्या चोरीच्या मालमत्तेत वाढ केली.
थायलंडच्या पोलिसांनी त्या देशाच्या पर्यटन क्षेत्रावर फरक पडू नये यासाठी सोभराजच्या काही गुन्ह्यांची चौकशी केली नाही असं ही नंतर समोर आलं होतं.
अजय चौधरी, लेक्लेरेक हे साथीदार चार्ल्स सोभराजने आपल्या जोडीला घेऊन बरेच अवैध ड्रग्ज सारखे बरेच गुन्हे सिंगापूर, भारतात केले आहेत. पण, त्यानंतर अजय चौधरी आणि लेक्लेरेक हे १९७६ मध्ये मलेशियाला पळून गेले आणि नंतर कोणालाही कधीच सापडले नाहीत.
मलेशिया मध्ये काही वर्ष असेच काही गुन्हे केल्यानंतर चार्ल्स सोभराजने दिल्ली कडे आपला मोर्चा वळवला. त्याच्या टोळीत तीन भारतीय महिला सुद्धा समाविष्ट झाल्या होत्या. या चौघांनी मिळून काही फ्रेंच पर्यटकांना गुंगीचं औषध देऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला.
पण, फ्रेंच पर्यटकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. ‘चार्ल्स सोभराज’ आणि त्याच्या तिन्ही महिला साथीदारांची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
आपल्या संपत्तीच्या जोरावर चार्ल्सने तिहार जेल च्या कोठडीला हॉटेल सारखं स्वरुप दिलं होतं. टीव्ही, पलंग, चांगलं अन्न यामुळे १२ वर्षाचा कारवास हा आराम करण्याचं ठिकाण झालं होतं.
याचं प्रक्षेपण त्या काळात बातम्यांमध्ये दाखवण्यात आलं होतं. पण, कोणावरही काहीही कारवाई करण्यात आली नव्हती. आपल्या शिक्षेच्या दहाव्या वर्षी १९८६ मध्ये चार्ल्स सोभराजने तिहार जेल च्या सर्व अधिकाऱ्यांना, कैद्यांना जेलमधूनच एक पार्टी दिली. ज्यामध्ये सर्वांना ड्रग्ज, झोपेच्या गोळ्या या अन्नातून देण्यात आल्या होत्या.
जेलमधील सगळे जण बेशुद्ध झाले आणि त्याचा फायदा घेऊन चार्ल्सने तिथून स्वतःची सुटका करून घेतली होती. एखाद्या सिनेमात दाखवतात तशीच ही घटना होती.
दोन वर्ष शिक्षा राहिलेली असतांना केलेलं हे कृत्य चार्ल्सला महागात पडलं होतं. त्याची केस ही नंतर मुंबईच्या ‘मधुकर झेंडे’ यांना सुपूर्द करण्यात आली होती.
काही महिन्यातच या मराठी पोलिसाने ‘चार्ल्स सोभराज’ ला गोव्यात जाऊन पकडलं आणि त्याची शिक्षा पुढे दहा वर्षांसाठी वाढवण्यात आली. १९९७ मध्ये चार्ल्सची जेलमधून सुटका करण्यात आली आणि भारत सरकारने त्याला फ्रांसला परत पाठवून दिलं.
कथा इथेच संपली नाहीये…
२००३ मध्ये चार्ल्स सोभराज काठमांडू मध्ये एका कसिनो मध्ये एका पत्रकाराला दिसला. दोन आठवडे पाठलाग केल्यानंतर त्या पत्रकाराने ही कव्हरस्टोरी फोटोज सकट ‘द हिमालयन टाईम’ मध्ये प्रकाशित केली.
नेपाळ मध्ये पाण्याचा कारखाना लावण्यासाठी आलेल्या चार्ल्स सोभराजला नेपाळ पोलिसांनी अटक केली. २००४ मध्ये नेपाळ न्यायालयाने चार्ल्सला ‘आजन्म कारावासाची’ शिक्षा सुनावली.
२०१४ मध्ये नेपाळ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ‘चार्ल्स सोभराज’ च्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
नेपाळमध्ये जेलमध्ये असतांना वयाच्या ७६ व्या वर्षी ‘चार्ल्स सोभराज’ ने आपल्या वकिलाची मुलगी ‘निहिता बिस्वास’ सोबत लग्न केलं. हे लग्न नेपाळच्या जेलमध्ये करण्यात आलं होतं, ज्याला की नेपाळ पोलिसांनी विरोध केला होता.
निहिता बिस्वास ही काही वर्षांपूर्वी बिग बॉस हिंदीच्या पाचव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती.
चार्ल्स सोभराजच्या गुन्हेगारीवर आधारित ‘द सेरपेंट’ ही वेबसिरीज बीबीसी वर्ल्डवर मध्यंतरी प्रदर्शीत झाली होती.
बॉलीवूड मध्ये ‘मै और चार्ल्स’ हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता ज्यामध्ये रणदीप हुड्डा ने ‘चार्ल्स सोभराज’ चा रोल केला होता. अपेक्षेप्रमाणे, प्रेक्षकांना ही कथा आवडली नव्हती.
आपल्या आयुष्याची ३५ वर्ष जेल मध्ये जगलेल्या आणि एक गोष्ट सरळ न केलेल्या ‘चार्ल्स सोभराज’ कडून ‘कसं वागू नये’ हेच शिकण्यासारखं आहे.
चार्ल्स हा भारतीय वंशाचा असल्याने त्याबद्दल आपण थोडं तरी कनेक्ट होऊ शकतो. अन्यथा, असे कित्येक गुन्हेगार सध्या जगभरात असतील. मुलांचं बालपण, त्यांच्यावर लहानपणी योग्य संस्कार करणं किती आवश्यक आहे हे चार्ल्स सोभराजच्या प्रवासाबद्दल वाचल्यावर तुम्हाला सुद्धा वाटत असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.