आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अमिताभ बच्चन – एक महानायक. गाठीशी १०० हुन अधिक चित्रपटांचा अनुभव असलेल्या ह्या महानायकाच्या जीवनात इतके चढ उतार आले, की एक वेळ तर अशी होती जेव्हा अमिताभने पुन्हा चित्रपटांत काम करण्याची इच्छा सोडून दिली.
जेव्हा “मी पुन्हा कुठले संवाद बोलू शकेन का, पुन्हा अभिनयाशी मैत्री करू शकेन का?” ह्या प्रश्नांनी त्यांचं मन खिन्न झालं होतं. आत्मविश्वास गमावलेला सिंह, तडफडत पुन्हा उठून उभे राहण्याची उमेद सोडून बसला होता.
तेव्हा त्यांना आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला तारलं ते एका सुपर डुपर हिट, रेकॉर्ड ब्रेकिंग यश संपादन करून बॉक्स ऑफिस दणाणून सोडणाऱ्या सिनेमाने.
हा तोच सिनेमा होता ज्याने टीनु आनंद आणि अमिताभ बच्चन यांना नवीन ओळख मिळवून दिली. हा तोच सिनेमा होता, ज्याने “अमिताभ कोणीतरी होता” या वाक्याला “अमिताभ अजून आहे, आणि पुढेही सिनेजगात घट्ट पाय रोवून उभा राहणार आहे” या वाक्यात परिवर्तित केलं.
===
हे ही वाचा – बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!
===
राजकारणामुळे पूर्णतः बुडालेल्या अमिताभच्या सिनेसाम्राज्याला तारलं, ते त्यांना पुन्हा शहँशाह बनवणाऱ्या “शहँशाह” ह्या चित्रपटाने.
“रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम हैं शहँशाह” सारखे डायलॉग देणारा हा सिनेमा, इतका हिट झाला होता की उत्तर प्रदेशात तर नाट्यगृहांच्या बाहेर सकाळी ४ वाजता पासून लोकांची गर्दी असायची फक्त आणि फक्त शहँशाह तिकिटं मिळवण्यासाठी. आणि हे दृश्य फक्त उत्तर प्रदेशाचंच नाही संपूर्ण भारताचंच होतं.
ह्या वर्षी १२ फेब्रुवारीला शहँशाह ३० वर्षे पूर्ण झाली. एखादा चित्रपट अजरामर होण्यामागे काय तारेवरची कसरत असते ते आज आपण पाहणार आहोत.
DC कॉमिक्सच्या सुपरमॅन या पात्रावरून प्रेरित होऊन टीनु आनंद आणि त्यांचे वडील इंदर राज आनंद यांनी शहँशाहची कथा लिहायला सुरु केले.
सुपरमॅन हा सिनेमा टीनु आनंद यांना, त्यात असलेल्या मुख्य पात्राच्या, क्लार्क केंट – घाबरट पत्रकार आणि वाईटाचा नाश करून सत्याला विजय मिळवून देणारा सुपरमॅन, ह्या “मल्टीपल पर्सनॅलिटीज” मुळे खूप आवडला.
आणि काही दिवस त्या विषयावर विचार विनिमय करून त्यांनी विजय – एक घाबरट भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी, आणि शहँशाह – जगातील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी विजयनेच घेतलेलं एक रूप, अशा २ पात्रांची रचना केली.
हा चित्रपट लेखक इंदारराज आनंद ह्यांच्या जीवनातील शेवटचा आणि अत्यंत यशस्वी चित्रपट ठरला.
शहँशाह चे संवाद जसे, ” तू अतिष- ए- दोहजत से डराता हैं जिन्हें, वो आग को पी जातें हैं पानी करके”, “रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम हैं शहँशाह” हे बऱ्यापैकी उर्दूत होते.
टीनु यांना संवादांमध्ये जास्त प्रमाणात उर्दू वापरण्यावर जरा संशय होता. हे संवाद किती लोकांना समजतील, नायक अभिनय करताना नीट म्हणू शकतील का, हिंदी भाषिक प्रेक्षकांना किती आवडतील असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते.
पण त्यांनी आपल्या वडिलांशी ह्याबाबत बोलणं केल्यावर, इंदर साहेबांनी टीनु आनंदना दिलेलं उत्तर पण अमिताभच्या अभिनयाचा माहिमाच सांगतं, अमिताभ एक नट म्हणून हा महामेरू पेलायला किती समर्थ आहेत हे त्यांनी ह्या उत्तरात दर्शवून दिलं.
ते म्हणाले “टीनु तुझ्या चित्रपटात काम करणारा नट हा सिंह आहे, आणि त्याला त्याचं आवडतं खाद्य मांस – मटण देण्याऐवजी, तू शाकाहारी थाळी देतोयस? तो अतिशय उत्तम नट आहे, अगदी सहज पणे ह्या संवादांना आपलंसं करून अभिनय करून दाखवेल.”
आणि तसंच घडलं. अमिताभ अलाहबादी असल्याने आणि त्यांचे वडील लेखक असल्याने त्यांना उर्दूची बऱ्यापैकी सवय होती. हे संवाद पाठ करून अभिनय करायला अजिबात कठीण गेलं नाही. आणि शहँशाहच्या प्रत्येक डायलॉगवर नाट्यगृहात शिट्ट्या आणि टाळ्या पडू लागल्या.
===
हे ही वाचा – “शोले”बद्दल खूप चर्चा होतात – पण शोलेबद्दलच्या या पडद्यामागील १५ गोष्टी फार कमी जणांना माहिती असतील!
===
शहँशाहचं पात्र रंगवताना त्याच्या वेशभूषेतून तो काय आहे, का आहे आणि त्याचं उद्देश्य काय आहे हे कळावं अशी टीनु आनंदची इच्छा होती. त्यासाठी, त्यांनी अमिताभचे ड्रेस डिझायनर अकबर यांच्यासोबत बसून एक ड्रेस तयारही करून घेतला होता.
तो ड्रेस पूर्ण काळ्या रंगाचा असून, शहँशाहच्या हातात त्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेला दोरखंड सुद्धा देण्यात आला होता. त्या ड्रेसला आधी केप (सुपर हिरोच्या ड्रेसच्या मागे असलेला लांब लचक पदर) नव्हता.
शहँशाहचं शूटिंग सुरु होणार होतं, ड्रेस बनून तयार होता पण इतक्यात अजून एक आपत्ती कोसळली. अमिताभला Myasthenia gravis ह्या आजाराने ग्रासलं. आणि अमिताभ आता पुन्हा कधीच जास्त काम करू शकणार नाही असं डॉक्टर्सने स्पष्ट जाहीर केलं.
अमिताभने हे टीनुला कळवलं आणि सांगितलं की “माझ्या कडे जे २ सिनेमे आहेत ज्यांचं चित्रीकरण सध्या सुरू आहे, मी फक्त तेच करेन, मला माफ करा. शहँशाह साठी तुम्ही प्लिज दुसरा नट शोधून घ्या.”
ह्या बातमीनंतर आनंद कुटुंबावर तर डोंगरच कोसळला. सगळे संवाद, पात्र ज्या अमिताभला डोळ्यांपुढे ठेऊन रंगवण्यात आले होते त्यासाठी दुसरा नट शोधणे म्हणजे समुद्रातून सुई शोधून काढण्याइतके अशक्य होते.
तरी टीनु आनंद वर्ष – दीड वर्ष नटाच्या शोधात होते. वेड लागल्यासारखा एकच विचार त्यांच्या डोक्यात यायचा, कि आता नट कुठून मिळेल व शहँशाह कसा होईल.
तोपर्यंत, दक्षिणेत एक दिग्दर्शक जितेंद्रला घेऊन एक सिनेमा काढत होते त्यांना अकबर ने शहँशाह साठी बनवलेला पोशाख विकून टाकला. कारण हा चित्रपट पुन्हा होईल की नाही, ह्यात खूप शंकाच होती.
पण देवाची कृपा झाली आणि अमिताभ आजारापणातून ठणठणीत होऊन बाहेर पडले. पुन्हा शूटिंगला आले. ड्रेस नसल्याने पुन्हा काही महिने चित्रिकारणास विलंब होत होता.
नवीन डिझायनर, किशोर बजाज बरोबर बसून टीनु आनंदने कमीत कमी त्यांची १००० मासिकं चाळून बघितली, पण हवा तसा पोशाख मिळत नव्हता. एकदा,
रस्त्याला लागून एका ताराच्या फेन्सिंग कंपनीची जाहिरात आनंद ह्यांनी बघितली व त्यांना ड्रेसची कल्पना आली, आणि तिथूनच शहँशाहच्या कॉस्च्युम मधला स्टीलचा हात आणि केप ह्या ड्रेसला जोडला गेला. ह्या ड्रेस चे वजन २० किलो होते. हा ड्रेस आणि अमिताभच्या अभिनयाने पूर्ण चित्रपट गाजवला.
अमिताभ दोन भूमिका साकारत होते, विजय आणि शहँशाह. दोन्ही पत्रांमध्ये आकाश पाताळा एवढं अंतर पण इंदरराज आनंदचे वेगवेगळ्या स्टाईलचे डायलॉग आणि अमिताभने व्यवस्थित पणे ओळखलेला दोन पात्रांमधला फरक आणि त्यानुसार केलेला अभिनय यामुळे हा सिनेमा अजरामर झाला!
अमिताभच्या राजकारणाने त्यांच्याशी वैर घेतलेली शिवसेना जिने या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळेस आक्रमक भूमिका घेतली होती, आणि “अमिताभच्या कुठल्याच सिनेमाला प्रदर्शित होऊ देणार नाही” अशी ठाम भूमिका बजावण्याचा निश्चयच केला होता!
अशा सगळ्या प्रसंगांचं, गमतींचं, पाच वर्षांचा संघर्ष अशा सगळ्या घटकांचं कॉम्बिनेशन म्हणजे अजरामर “शहँशाह.” ज्याने अमिताभला बॉलिवूडचा शहँशाह म्हणून पुन्हा प्रस्थापित केलं. आजही किंबहुना येणाऱ्या काळातही आपल्या मनातलं त्याचं स्थान अढळ आणि अबाधित ठरवण्यात यशस्वी ठरेल.
===
हे ही वाचा – १६ वर्षांच्या तपश्चर्येनंतर भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणारा पहिला ‘महागडा’ सिनेमा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.