Site icon InMarathi

अन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली!

commons.wikimedia.org

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान यांच्या स्वारीनंतर त्यांच्या मोठ्या सैन्याच्या ताकदीपुढं आपल्या लहान स्वराज्याचा काही फार काळ निभाव लागणार नाही हे चाणाक्ष शिवरायांनी नसते ओळखले तरच नवल होतं. म्हणून जयसिंगसोबत राजांनी तहाची बोलणी सुरु केली. मिर्झा राजांनी सुद्धा तहाला मान्यता दिली, त्याला इतिहासात ऐतिहासिक ‘पुरंदर तह’ म्हणून ओळखलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच बरोबर शिवरायांनी उत्तरेत जाऊन औरंगजेब बादशाहाची भेट घ्यावी असा जयसिंगाचा आग्रह होता. त्यानुसार शिवरायांनी मोठ्या निग्रहाने आईसाहेब, व इतर सहकाऱ्यांकडे स्वराज्याची सूत्रे देऊन उत्तरेत निघण्याची तयारी केली.

 

pinterest.com

शिवरायांची उत्तरेतील ही पहिलीच ‘मोहीम’!

सोबत छोट्या संभाजीलाही घेऊन शिवराय, निराजी रावजी, माणको हरी, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जंद इ मंडळी व निवडक मावळे घेऊन सैन्य दि ५ मार्च १६६६ रोजी आग्र्याकडे रवाना झाले.

 

भीमसेन सक्सेना नावाच्या लेखकाने त्यांच्या तारीख -ए- दिलकुशा या पुस्तकात लिहिलं आहे की,

शिवराय औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पाहायला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली. हाच काय तो मराठ्यांच्या राजाचा दरारा, डौल आणि आदर..!

तब्बल महिने मजल दरमजल करत शिवराय आपल्या सहकाऱ्यांसोबत आग्र्यात पोहोचले. मराठ्यांचा राजा, एक पराक्रमी योद्धा प्रथमच दिल्लीत आला होता. शिवराय आग्र्याला पोहोचले तेव्हा त्यांचे केलेलं वर्णन राजस्थानी पत्रांमध्ये आहे, ते सोबत दिलं आहे.


१२ मे १६६६, शहेनशहा ए हिंदोस्तां औरंगजेबाचा तो ५०वा वाढदिवस! त्या निमित्ताने सगळ्या मुघल सरदार व दरकदारांना त्याने निमंत्रण दिले होते.

भर दुपारची वेळ, भेटीची वेळ येईपर्यंत दिवाण ए आम संपून दिवाण ए खास चा दरबार सुरु झाला होता. औरंगजेब बादशाहच्या नावे ललकारी झाली आणि औरंगजेब येऊन तख्तासीन झाला.

सगळ्या आमीर उमरावांचे कुर्निसात झाले, सगळ्यांचे नजराणे औरंगजेबाने आनंदाने स्वीकारले. कुंवर रामसिंह हा शिवराय व राजपुत्र संभाजी यांसमवेत दरबारी आला. सगळा दरबार कावराबावरा होऊन बघत होता.

बलदंड अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा, जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या शायिश्त्याची बोटं कापून त्याला पळता भुई थोडं करणारा दक्खनचा सेर शिवराज आज त्यांच्या समोर उभा ठाकला होता.

आपल्या सरदारांना यमसदनी धाडणाऱ्या त्या शिवाजीला आज तो दिल्ली दरबार प्रथमच पाहत होता. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

 

commons.wikimedia.org

मुघल दरबाराचे काही नियम होते. कोणीही मान वर करून बादशाहकडे न पाहणे, तख्ताला पाठ न दाखविणे, बादशहा समोरचं बोलणं संयमी असावं असे शाही रिवाज अदबीने स्वीकारून सारा दरबार बादशहाच्या स्वागताला उभा होता. शिवराय व शंभूराजे दरबारात हजरच होते.

बादशहाच्या दरबारी चांगली वागणूक मिळेल हेच त्यांना अपेक्षित होते. ५०व्या वाढदिवसानिमित्ते बादशहाच्या मर्जीतील निवडक सरदार आले होते.

शिवराय व शंभूराजांनी सादर केलेल्या नजर निसारचा स्वीकार करून बादशाहाने त्या तेजसंपन्न पिता पुत्राला न्याहाळले.. मात्र सलोख्याचा एक शब्दही न उच्चारता..!

दरबारात निवडक सरदारांना खिलती देण्यात आल्या. मात्र शिवाजी राजांना त्यापासून वगळण्यात आले होते. आधीच त्या दरबारी राजांना बादशहाने दुर्लक्षित ठेवले त्यात खिलतीपासूनही वंचित!

आणि हे सारे कमी की काय तर महाराजांना जसवंतसिंगच्या पाठीमागे उभे करण्यात आले.

राजांचा संताप वाढतच होता. मर्द मराठ्यांना पाठ दाखवून रणभूमीवरून पळून जाणाऱ्या जसवंतसिंगला आपल्या समोर पाहून राजांच्या सहनशीलतेचा अंत झाला. शाही दरबारात झालेल्या या अनपेक्षित अपमानाने लाही झालेला सह्याद्रीचा वाघ अखेर गरजलाच…

राssssssम सिंह sss, यह हमारे सामने कौन खडा है?

दिल्लीच्या बादशहासमोर त्याच्याच ‘दिवाण ए खास’ मध्ये वरचढ आवाजात गर्जणारा हा कोण, या प्रश्नाने साऱ्या दरबाराची नजर मागे वळली.

सगळा दरबार वेड्यासारखा बघू लागला. भेदरलेला रामसिंह महाराजांना विचारू लागला,

क्या हुआ राजे?

राजे उसळून म्हणले,

अरे जो कोंढण्यावरून आमच्या सैन्याचे वार पाठीवर घेवून पळून गेला तो जसवंतसिंग आमच्या पुढे कसा, मी शांत राहीन असं वाटलंच कसं?

ही माझी जागा नाही! मी स्वतंत्र राजा आहे!

अपमान करायला इतक्या लांब बोलावलं असेल तर काही गरज नाही मला तुमच्या सन्मानाची, हा मी चाललो.

 

revivaloftrueindia.com

आणि शंभुबाळाचा हात धरून त्या तख्ताला पाठ दाखवून महाराज दरबारातून निघून गेले. बादशहाने राजांची खिलत देऊन समजूत काढण्यासाठी रामसिंहला पाठविले. राजांनी तीही धुडकावून लावली.

बादशहाचा असा अपमान यापूर्वी कधीच झाला नव्हता. बादशहाचे आप्तस्वकीय त्यास शिवाजीला ठार करण्यासाठीच सुचवू लागले.

झालेल्या अपमानाने आणि शिवाजीमुळे निर्माण होणाऱ्या भावी संकटांच्या विचाराने बादशहा खदखदत होता. अखेर काफर सिवाला ठार करण्याचे बादशहाने फर्मान सोडले.

ही बातमी समजताच महाराजांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतलेल्या रामसिंहाने हे फर्मान रद्द करावे अशी विनवणी केली. बादशहाने विचारांती ते फर्मान थांबविले खरे परंतु मनात मात्र अनेक कारस्थाने उचंबळ्या खात होती.

पुढे काबुल कंदाहरच्या मोहिमेवर शिवाजी राजांना नेऊन तिथे घातपात करण्याचा बादशहाचा बेतही अयशस्वीच ठरला आणि अखेर बादशहाच्या कट कारस्थानी बुद्धीचे शिवशंभू शिकार झालेच.

‘शुक पंजरी वा हरीण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी’ अशीच गत झाली त्या मराठयांच्या राजा आणि राजपुत्राची!

बादशहाने महाराजांच्या शामियान्याला वेढा घातला आणि कैद केले दक्खनच्या पराक्रमी योद्ध्याला !

 

travellerkiduniya.blogspot.in

फुलादखानाच्या सक्त पहाऱ्यात महाराज शंभूराजांसह अडकले. महाराज चिंतेत बुडाले होते. तिथे राजगडी मासाहेबांनाही ही वार्ता समजली. एकीकडे स्वराज्य आणि दुसरीकडे आपलं काळीज शिवशंभू! त्या माऊलीची व्यथा काय सांगावी!

तुळशीबेलाचा शब्द राखणारा रजपूत रामसिंहही अगतिक झाला होता. सारे वातावरण चिंताक्रांत अन् गंभीर झाले होते. एक एक दिवस विचित्र विचारांनी पोखरून निघत होता.

पण म्हणतात नं ‘नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची..’ !!!

सह्याद्रीचा वारा प्यायलेले, झुंजाराची रीत आईच्या गर्भातच उमगलेले ते मराठेच शेवटी! जिथे शक्ती अपुरी पडते तिथे युक्तीची सांगड घालत महाराजांनी अगदी खुबीने आजारपणाचे सोंग घेतले. दिवसेंदिवस गंभीर होणारी राजांची प्रकृती पाहून बादशहा आणि रामसिंह ही चपापला होता.

आजारातुन आराम मिळावा यासाठी काही दानधर्म करावा अशी इच्छा महाराजांनी व्यक्त केली. बादशहाकडून मिळालेल्या होकारानंतर साधुसंत, फकिरांना मिठाई पाठविण्याचे आदेश राजांनी सहकाऱ्यांना दिले. आणि राजांच्या शामियान्यातून मिठाईचे पेटारे निघू लागले. आणि संधीचं सोनं करत अखेर महाराज श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ , दि १८ ऑगस्ट १६६६ रोजी पेटाऱ्यात बसून राजे पसार झाले.

 

fadquip.com

गनिमी कावा बुद्धीतच भिनलेल्या महाराजांनी तिथून निघताच दक्षिणेकडे न जाता उत्तरेकडे कूच केले. लहानग्या शंभूराजांना हा राजगडपर्यंत धावपळीचा खडतर प्रवास झेपणार नाही या हेतूने त्यांना मथुरेत मोरोपंत पिंगळेंच्या सासरी ठेवण्यात आले. आणि महाराज अखेर स्वराज्याकडे वाटचाल करू लागले.

संदर्भ –

१) जेधे शकावली
२) छत्रपती शिवाजी- सेतू माधवराव पगडी
३) छत्रपती शिवाजी- प्र न देशपांडे

संयुक्त लिखाण – कल्याणीताई गावणंग व शुभम क्षीरसागर

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version