Site icon InMarathi

भारतातील पहिलीवहिली ‘ऑइल रिफायनरी’ जिथे स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशही काम करत होते!

digboi oil refinery inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘तेलाचा स्रोत’ म्हंटलं, की आपल्या डोळ्यासमोर आखाती देशांची नावंच आधी समोर येतात. तेलाची आयात करावी लागते आणि म्हणून ते महाग असतं हे सर्वसाधारणपणे सर्वांनी मान्य केलं आहे.

सध्या सुरू असलेलं इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन आणि वाढत्या वापरामुळे येणाऱ्या दिवसात भारताची आणि जगाची तेलावर विसंबून राहण्याची गरज कमी होईल हे चित्र स्पष्ट होत आहे.

आखाती देशात सापडणारं तेल हे भारतात का सापडत नसावं? हा प्रश्न नेहमीच लोकांना पडत असतो. भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण या सर्वांचा हा परिणाम आहे असं म्हणता येईल. पण, भारतात क्रूड तेल हे कधी सापडलंच नाही असं नाहीये. आसाममधील ‘दिग्बोई’मध्ये क्रूड तेलाचे साठे सापडले होते. याबाबत फारसं कोणाला माहीत नसावं.

 

 

‘दिग्बोई’ शहरात भारतातील सर्वात पहिला तेलसाठा सापडल्याने, भारताची ‘ऑइल सिटी’ म्हणून ओळखलं जातं.

१८६६ मध्ये इथे तेल सापडण्याची शक्यता आहे, असं इंग्रजांना लक्षात आलं होतं. त्याच वर्षी तेल विहिरीसाठी उत्खनन करण्यास सुरुवात करण्यात आली आणि त्याला यश मिळालं.

१९०१ मध्ये ‘दिग्बोई’मध्ये भारतातील पहिली ‘ऑईल रिफायनरी’ सुरू करण्यात आली होती. रिफायनरीमध्ये क्रूड तेलाचं रूपांतर पेट्रोलमध्ये करण्यात येतं. ‘दिग्बोई’ मध्ये सापडलेली तेल विहीर ही सर्वात जुनी आणि आजही वापरात असलेली तेल विहिर आहे.

आसाम ऑइल कंपनी या नावाने सुरु झालेल्या कंपनीमध्ये त्या काळात कित्येक ब्रिटिश लोक काम करायचे. १९५७ पर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दहा वर्षांनंतरसुद्धा आपल्या भारतात ब्रिटिश लोक नोकरी करत होते हे ही एक आश्चर्यच म्हणता येईल.

‘दिग्बोई’ शहराकडे त्या काळातील श्रीमंत शहर म्हणून बघितलं जायचं. प्रशस्त रस्ते, बंगले, गोल्फ क्लबसारख्या वास्तू या शहरात त्यावेळी होत्या. आसाममधील पर्यटन वाढवण्यासाठी ‘दिग्बोई’ या शहराकडे तेव्हा बघितलं जायचं.

‘दिग्बोई’ हे नाव म्हणजे एखादा आसामी शब्द असल्याचं आपल्याला वाटू शकतं. पण, हे नाव या शहराला देण्यामागे एक गमतीशीर कारण आहे. एक इंग्रजी अधिकारी हे तेल विहिरीचं खोदकाम सुरू असताना तिथल्या कामगारांना नेहमीच ‘डिग-बॉय-डिग’ असं म्हणायचा. याचा अर्थ असा, की तेल सापडेपर्यंत खोदकाम सुरू ठेवा.

१८६७ मध्ये या जागेत आसाम रेल्वे आणि ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी या जागेत तेल सुद्धा असेल असं एका इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं होतं. त्यांना ही जाणीव होण्यामागचे कारण सुद्धा मजेशीर आहे.

एका हत्तीचा पाय चिखलात अडकला होता आणि तो काढतांना हत्तीच्या पायाला तेलाचा वास येत असल्याची जाणीव काही लोकांना झाली होती. ही शक्यता भारतीय कामगारांनी बोलून दाखवल्याने पुढचं काम सुरू झालं.

 

 

१८८९ मध्ये ही शक्यता खरी आहे का हे तपासण्यासाठी काम करण्यास सुरुवात झाली आणि भरताला आणि आशिया खंडाला पहिली ऑइल रिफायनरी मिळाली. १८९९ मध्ये आसाम ऑईल कंपनीची स्थापना करण्यात आली.

७००० बॅरल्स प्रति दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात तेल त्या काळी या भागात सापडत होतं. दुसरं महायुद्ध सुरू असतांना वाढत्या मागणीमुळे जास्त तेलनिर्मिती व्हावी यासाठी आसाम ऑईल कंपनीवर इंग्रज सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकण्यात येऊ लागला.

नवीन तेल तयार होण्यासाठी तेल विहिरींमध्ये एक कमीत कमी साठा नेहमी जपून ठेवणं आवश्यक असतं. वाढत्या मागणीमुळे या गोष्टीकडे काही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. याच कारणामुळे नवीन तेल उत्पादनात घट होऊ लागली. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर नवीन तेल उत्पादन अगदीच कमी झालं.

आज ‘दिग्बोई’ च्या जमिनीतून केवळ २४० बॅरल्स इतकंच तेल उत्पादन होत आहे. इतक्या वर्षात ‘दिग्बोई’मध्ये एक हजारांपेक्षा जास्त विहिरींचं खोदकाम करण्यात आलं आहे.

१९८९ मध्ये भारतीय पोस्टाने ‘दिग्बोई’च्या तेल विहिरींना १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक पोस्ट तिकीट काढलं होतं.

 

 

कच्च्या तेलाचं उत्पादन कमी झालं असलं, तरीही ‘दिग्बोई’ हे आजही भारतातील सातत्याने तेलाचं उत्पादन करणारं एकमेव शहर आहे. ‘दिग्बोई रिफायनरी’ ही आज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा भाग आहे.

हाताने खोदकाम करण्यात आलेली ‘दिग्बोई’ ही पहिली आणि एकमेव तेल विहीर आहे. पहिल्या वेळी १०२ फुटांपर्यंत खोदकाम करून सुद्धा तेल मिळालं नव्हतं. दुसऱ्या वेळेस मात्र ‘दिग्बोई’ पासून २३ किमी अंतर असलेल्या जागेवर लगेच तेल लागल्याने ब्रिटिश सरकारने अजून विहिरी खोदण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

तेव्हापासून आज आसाम ऑईल डिव्हिजनचा भाग बनून आज वेगवेगळ्या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या ‘दिग्बोई रिफायनरी’ला गुणवत्ता राखण्यासाठी ISO-14001 आणि OHSMC या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा – भारतात सोन्याचा धूर निघायचा, तो ‘मिनी इंग्लंड’ मानल्या जाणाऱ्या या खाणीतून!

एडविन ड्रेकने सर्वात पहिल्यांदा म्हणजे १८५९ मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम तेलाच्या शोधासाठी विहीरी खणल्या होत्या. हा प्रयत्न बघूनच इंग्रज अधिकाऱ्याला भारतात हा प्रयत्न करावा असा विचार आला होता.

आसाम रेल्वे ट्रॅकचं काम करत असतानाच कामगारांना हत्तीमुळे तेलाचा शोध लागला आणि त्याचं पुढे इतकं मोठं स्वरूप झालं ही भारताची परकीय देशाकडून कच्च्या तेलाची आयात काही प्रमाणात का होईना, पण कमी झाली आहे.

आसाम हे भारताला चहाचं उत्पादन करून देण्यासोबतच कच्च्या तेलाची गरज सुद्धा भागवत आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या सुरुवातीनंतर १० वर्षांनी इंग्रजांच्या लक्षात आलं, की या डोंगराळ भागात चहाचं उत्पादन सुद्धा होऊ शकतं आणि मग आसाममध्ये चहाचे मळे सुद्धा तयार झाले. तेल आणि चहा एकाच राज्यात तयार होणारं आसाम हे एकमेव राज्य आहे.

 

 

१९२१ मध्ये इंग्लंडच्या अनुभवी बर्मा तेल कंपनीने ‘दिग्बोई’चं व्यवस्थापन स्वतःकडे घेतलं आणि तेव्हापासून ‘दिग्बोई’चं तेल उत्पादन वाढून ४५०० बॅरल्स प्रतिदिन इतकं झालं.

१९८१ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये समावेश झाल्यापासून ‘दिग्बोई रिफायनरी’ ही जगातील सर्वात जुन्या तेल कंपन्यांपैकी एक आहे.

‘दिग्बोई’मध्ये सापडलेल्या सर्वात पहिल्या विहिरीच्या आजूबाजूच्या परिसरात एक वस्तू संग्रहालय बांधण्यात आलं आहे. प्रत्येक पर्यटकाने हे वस्तू संग्रहालय बघून ‘दिग्बोई’च्या तेलाच्या शोधाची कथा प्रत्यक्ष बघावी असं आवाहन व्यवस्थापक नेहमीच करतात.

ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं आणि भारतीयांना खूप छळलं हे आपण जाणतोच. रेल्वे आणि ‘दिग्बोई’सारखे काही प्रकल्प करून तो त्रास काही प्रमाणात कमी केला असं म्हणता येईल.

आता फक्त पेट्रोल हे कमीत कमी दरात उपलब्ध व्हावं आणि ‘दिग्बोई’पर्यंत ‘बाय रोड’ जाऊन हा प्रकल्प बघता यावा अशी आशा व्यक्त करूयात.

 

 

===

हे ही वाचा – महाराष्ट्रातील या दोन “लोकप्रिय” रेल्वे घाटांनी तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेतलाय

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version