आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखिका – – प्राजक्ता महाजन, पुणे
===
WhatsApp Forwards साठी ‘ढकलगप्पा’ असा छान शब्द आहे आणि itinerary सारख्या लांबलचक अवघड शब्दाला मराठीत ‘प्रवासरेखा’ असा अर्थपूर्ण शब्द आहे, हे तुम्हांला माहित आहेत का? असे नवे आणि अर्थपूर्ण शब्द “मराठी शब्द” नावाच्या फेसबुक समूहात शोधले आहेत. हा समूह ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार ह्यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन सुरू झाला आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिवसानिमित्त माझ्या एका मैत्रिणीने, वृषालीने, मला महेश एलकुंचवारांचं मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल काळजी व्यक्त करणारं अतिशय प्रभावी भाषण पाठवलं होतं.
सध्याची जी मराठी आहे, विशेषतः शहरी लोकांची मराठी, तिच्याइतकी बाधित भाषा कुणी बोलत नसेल, अशी खंत ते व्यक्त करतात.
खेड्यामध्ये मात्र सहज प्रतिशब्द तयार होतात असं सांगून त्यांनी मोबाईल फोनला कानशा किंवा लाऊड स्पीकरला बोंबल्या अशी उदाहरणं दिली आहेत. आपण आत्मपरीक्षण करणार, मराठी टिकवण्यासाठी काही करणार, की “गेली मराठी तरी हरकत नाही” असं म्हणणार असा प्रश्न ते विचारतात.
माझ्या मैत्रिणीने हे भाषण माझ्यासारखंच इतरही बऱ्याच लोकांना पाठवलं होतं. पण काही मोजके लोक सोडले तर बहुतेकांनी ते भाषण ऐकायचीही तसदी घेतली नव्हती. तिला वाईट वाटलं आणि म्हणून गेल्या वर्षी तिने २७ फेब्रुवारीला त्या भाषणाचा गोषवारा लिहून बऱ्याच लोकांना पाठवला. हा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. पण ह्याच्याहून जास्त काहीतरी करायला हवं; असं एक भाषण आणि एक लेख एवढ्यावरच थांबता येणार नाही, असं मला त्या दिवशी प्रकर्षाने वाटलं आणि म्हणून जागतिक मराठी दिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला ‘मराठी शब्द’ हा फेसबुक समूह सुरू केला.
‘मराठी’ ही नीट मराठीत बोलली जावी. जिथे मराठी शब्द आहेत, ते शोधले आणि वापरले जावे. जिथे इंग्लिश शब्द रुळलेले नाहीत, तिथे प्रतिशब्द शोधावे हा ह्या समूहाचा मुख्य आणि प्राथमिक उद्देश आहे.
“हा माझा personal choice आहे”, असं बोलणाऱ्या माणसाला it’s आणि my असे दोन इंग्लिश शब्द शिकवावे आणि “इंग्लिश तरी धड बोल” असं मनापासून सांगावंसं वाटतं. खोलीला room म्हणू नये, इतका साधा विचार आहे. त्यातून पुढे जाऊन “मला ह्याचं exposure नव्हतं” किंवा “तुझी itinerary पाठव” अशी वाक्यं व्यवस्थित मराठीतही म्हणता येतील आणि ती कशी म्हणावी ह्यासाठी, ह्यावर चर्चा करण्यासाठी हा समूह आहे.
–
हे ही वाचा – “हिंदीमुळे इतर भाषा मरतात”: या प्रचारावर एका अस्सल मराठीप्रेमीचं विवेचन विचारात टाकतं
–
एखादी संकल्पना किंवा वस्तूसाठी मराठीत उत्तम शब्द आहे. पण त्या मराठी शब्दाचा वापर न होता इंग्लिश शब्द वापरला जात आहे. उदा. crux म्हणजे कळीचा मुद्दा. पण crux हा शब्द बस, टेबल इतका खोलवर रुळलेला नाही. बरेच जण ‘कळीचा मुद्दा’ वापरतातही. पण crux वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. हे असंच चालू राहिलं तर काही वर्षांनंतर “कळीचा मुद्दा” नामशेष होऊन, crux हा पूर्णपणे रुळेल.
मराठी भाषा फक्त कर्ता आणि क्रियापदापुरतीच राहू नये असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी हा समूह आहे. या समूहात जनसहयोगातून, चर्चा करून खूप चांगले मराठी शब्द आम्हांला मिळाले आहेत.
उदाहरणच द्यायचं, तर crowd sourcing ला ‘जनसहयोग’ किंवा default option ला ‘आपसूक पर्याय’ असे समर्पक शब्द इथे शिकायला मिळाले.
याखेरीज आपली मराठी शब्दसंपत्ती वाढावी म्हणून वळेसर, खेंगट यांसारखे वापर कमी झालेले शब्द आणि विलोल, दु:खकालिंदी यांसारख्या सुंदर शब्दांवरही चर्चा होते. शब्दांच्या छटा आणि बारकावे ह्यावरही चर्चा होतात. “प्रत्यय आणि प्रचीती ह्यात काय फरक आहे” किंवा “आमंत्रण आणि निमंत्रणात काय फरक आहे” अशासारख्या चर्चांमुळे आमची सगळ्यांची मराठी भाषेची समज वाढू लागली आहे.
या समूहात मराठीच्या सर्व बोलीभाषांचा, सर्व शैलींचा, प्रमाण भाषेचा, फार्सी शब्दांचा आणि संस्कृतचाही आदर राखला जातो. ज्यांना ग्रामीण मराठी शब्द आवडतात, त्यांनी ते वापरावे. ज्यांना संस्कृतप्रचुर शब्द आवडतात, त्यांनी ते वापरावे, अशी भूमिका आहे.
जात्यावरच्या ओव्या, लोकगीतं, किशोर कुमार, बेगम अख्तरच्या गजला आणि कुमारांची मैफल या सगळ्यात संगीत असतं. काहींना सगळीकडचं संगीत भावतं. तर काही एकच टोक धरून बसतात. भाषेचंही तसंच आहे. एकच टोक धरून बसणाऱ्या लोकांनी दुसऱ्याच्या आवडीला कमी लेखू नये, हे धोरण आम्ही कटाक्षाने पाळतो.
बऱ्याच प्रतिशब्दांची चर्चा होते. ते यादीतही घेतले जातात. पण यादी बरेच लोक बघत नाहीत. प्रत्यक्षात वापरतात का, हा अजूनच वेगळा मुद्दा आहे. जास्तीत जास्त मराठी शब्द “वापरणे” हे महत्त्वाचं आहे. म्हणून ‘भाषांतर’ आणि ‘गोधडी’ असे दोन नवे उपक्रमही सुरू केलेले आहेत.
दर आठवड्याला भाषांतरासाठी दोन परिच्छेद दिले जातात. त्यावर टिप्पण्या म्हणून वेगवेगळे सदस्य त्याचं भाषांतर किंवा भावानुवाद लिहितात. त्यातून काही नवे शब्द हाती लागतात, तर काही विस्मरणात गेलेले वर येतात. शिवाय मराठीच्या वेगवेगळ्या शैली वापरूनही भाषांतर करता येतं. ज्यांना ग्रामीण ढंगात सांगायचं आहे, ते तसं लिहू शकतात.
या महिन्यातच सुरू केलेल्या ‘गोधडी’ उपक्रमात कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चांगली चालना मिळत आहे. ह्यात एकमेकांशी संबंध नसलेले ८-९ शब्द दिले जातात. त्यांत ह्या समूहाने शोधलेल्या एक-दोन नव्या शब्दांचाही समावेश असतो. ह्यातले किमान ५ किंवा जास्त शब्द वापरून, आटोपशीर व अर्थपूर्ण (जणू एखाद्या लेखाचा भाग वा एखाद्या नाटकातील संवाद) असा परिच्छेद लिहायचा असतो. नुसताच वाक्यात उपयोग नाही, तर सर्व वाक्यांचा एकमेकांशी ताळमेळ घालून ‘छोटा’ परिच्छेद लिहिण्यात एक वेगळंच आव्हान आणि मजा येते.
–
हे ही वाचा – मराठीच्या संवर्धनासाठी सर्व राजकीय पक्षांना खुले पत्र
–
पहिल्या गोधडीसाठी गणगोत, अवडंबर, पायपोस, वेषसंकेत, हडबडणे, उत्कट, कर्बठसा, भन्नाट, डबघाईला येणे, अजागळ असे शब्द दिले होते. ते एकमेकांना जोडून लोकांनी खूप वेगवेगळ्या छान छान गोधड्या तयार केल्या.
कुठल्याही चांगल्या कामात “ह्याने काय साध्य होणार” किंवा “काहीच साध्य कसं होणार नाही” असं म्हणणारी माणसं भेटली नाहीत, तर खरं म्हणजे चुकल्या-चुकल्यासारखं होतं. त्यामुळे इथेही असले प्रश्न अधूनमधून येतच असतात. ह्या समूहातून काय साध्य होणार? सध्या सोप्या मराठी शब्दांऐवजीही इंग्लिश शब्द सर्रास वापरले जाताना दिसतात. ‘अडचण’ऐवजी प्रॉब्लेम, ‘अवलंबून’ म्हणण्याऐवजी डिपेंड, वगैरे. तर दुसरीकडे आम्ही प्रतिशब्द शोधून वापरायचा प्रयत्न करत आहोत.
कदाचित परिणाम ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असेल. नक्की कुणीच सांगू शकणार नाही. पण प्रतिशब्द आणि मराठी शब्द ह्यांच्यावर विचार आणि चर्चा सुरू केल्यापासून आमच्यासारख्या अनेकांचा मराठीचा, मराठी शब्दांचा वापर वाढला आहे. आता पुन्हा मराठीत विचार करण्याची सवय लागली आहे. तयार केलेल्या प्रतिशब्दांपैकी काही शब्द रुळतील किंवा नाहीतही रुळणार; पण त्या ‘व्यायामा’मुळे मराठी वापरण्याची ‘प्रकृती’ सुधारत असेल, तर ते खूप मोलाचं आहे.
ह्या समूहात काही लेखक, पत्रकार आणि भाषांतरकारही सहभागी झालेले आहेत. त्यांच्याद्वारे हे शब्द आणि ‘बाधित’ नसलेली मराठी सर्वदूर पोहोचावी, अशी आशा नक्कीच आहे.
माझी मित्रमंडळी हर्षद, अमित आणि स्मिता हे सगळे ह्यात मनापासून कार्यरत झाले आणि ह्या समूहाला एक वर्ष कधी पूर्ण झालं, ते समजलंही नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं योगदान हे आमच्या अनेक व्युत्पन्न, उत्साही, कल्पक आणि मराठीप्रेमी सदस्यांचं आहे.
मराठीचे इतके वेगवेगळे पैलू, बारकावे आणि भन्नाट शब्द ही मंडळी रोज घेऊन येतात, की त्यामुळे रोजच्या नेमस्त जगण्याला एक वेगळीच रंगत आली आहे. आमच्या ह्या आनंदात ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी https://www.facebook.com/groups/510586202796504 समूहात अवश्य यावे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.