आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ज्या सहजतेने किशोरीबाईंनी आयुष्यभर ख्यालाची सम गाठली त्याच सहजतेने त्यांनी मृत्यूची देखील सम गाठावी हा सामान्यपणे योगायोग वाटत असला तरी एक ध्येयासक्त गानसाधिका म्हणून त्याचा तो अधिकारच आहे. विधात्याच्या ख्यालाच्या या समेवरही त्या अशा नजाकतीने आल्या की इथेही श्रोत्यांचा अंदाज चुकला. गाण्याच्या मैफीलीत असा अंदाज चुकल्यानंतर जी एक विलक्षण बुध्दीगम्य आणि गंभीर शांतता पसरते तसे बाईंच्या जाण्याने भारतीय संगीताचे झाले आहे. त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी संगीतात न्हाउन निघालेल्या भाविक श्रोत्यांचा जसा या घटनेने धीर खचला आहे. तसाच प्रगत आणि बुध्दीप्रधान सांगीतिक विचारसरणीच्या संगीत साधकांचा आधारवडच कोसळला आहे. जयपूर अत्रौलीची घरंदाज गायकी गळयावर चढविणे ती टिकविणे आणि पुढे नेणे हा फार मोठा लांब पल्ल्याचा प्रवास करणा-या महान कलाकार म्हणून त्यांचे नाव नेहमीच घेतले जाईल.
वरकरणी बाईंच्या गायकीची भाषा गूढ, अभविष्यनीय आणि आंतरीक तत्वाशी संवाद साधणारी वाटत असली तरी जयपूर गायकीची समज असणा-यांसाठी तो फार मोठा आदर्श आणि वस्तुपाठ आहे. परंपरेचे जतन करतांना बाईंनी ज्या पध्दतीने राग गायले ते साधकांनी अभ्यास करण्यासारखे आहेत. मातोश्री स्व. मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडून बाळकडू म्हणून मिळालेला जयपूर अत्रौलीचा विचार आत्मसात केल्यानंतर त्यांनी जी वैचारीक तपश्चर्या केली तो त्यांच्या अखंड रियाजाचा भाग होता.
कोण किती वेळ रियाज करतो याविषयी संगीतक्षेत्रात फार कुतुहलाने गप्पा मारल्या जातात मात्र बाईंचा रियाज हा संगीत समजण्याच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत अखंड असला पाहिजे असे मला वाटते. हरीभक्ताला ज्याप्रमाणे चराचरात व्यापलेला भगवंत दिसतो त्याप्रमाणे बाईंनी गाण्याचे दर्शन ठायीठायी घेतले म्हणून तर त्यांना ते श्रोत्यांना घडविता आले.
त्यांची गायकी ही केवळ वठलेली तालीम नव्हती तर त्यात स्वतःचे म्हणून सौष्ठव होते. भौमितीक आकृत्यांचे अनुबंध तयार करतांना त्यांनी मूळ रागापेक्षा वेगळे सूर मांडण्याची बंडखोरी केली, मात्र हे धाडस त्यांनी रागाची आणि परंपरेची पूर्ण तालीम आणि जाण आत्मसात केल्यानंतर केले हे लक्षात येते. त्यामुळे “खयाल” म्हणजे स्वतःचा रागविचार हे त्यांनी जरुर मांडले. पण त्याआधी परंपरेचा, गायकीचा आणि रागाचा “खयाल” म्हणजे विचार समजून उमजून याच चैकटीच्या अंतर्गत दडलेली खयाल प्रकीया त्यांनी स्वप्रतिभेने उलगडून दाखविली. अशा प्रकारे त्यांनी त्यांची प्रतिभा उत्श्रुंखलपणे न वापरता रागाचा विचार टिकवून ठेवण्यासाठी वापरली हे फार महत्त्वाचे आहे.
भारतीय संगीताकडे एक नवलाई म्हणून बघणा-या वर्गाची सांगीतिक समज विस्तारण्यासाठी बाईंनी फार वेगळया उंचीने काम केलेले आहे. आपल्या गाण्यातून जी काही रहस्ये मांडली जात आहेत ती लयीच्या आणि सुरांच्या भाषेत सर्वसामान्य सांगीतिक समज असणा-यांसाठी समजण्यास अत्यंत कठीण आहेत हे त्या जाणून होत्या म्हणून गायनातून प्रकट झालेली त्यांची प्रतिभा शब्दरुप धारण करीत असे, मग ते शब्दसंवाद असोत किंवा स्वरार्थरमणीसारखा साहित्यिक आविष्कार असो. त्यांची विचारप्रक्रिया काय होती हे या शब्दमांडणीमुळे समजण्यास सुलभ झाले आहे. गायकीच्या सूक्ष्मातून त्यांनी जे आभाळ उभे केले ते कुणाच्याच मुठीत मावणारे नव्हते म्हणून त्यांचे परखड विचार शब्दांची फटकारे आणि जळजळीत वाग्बाण हे देखील विद्वन्मान्य होते.
बाईंचे अश्रृतपूर्व गायन ऐकतांना देहभान हरपण्याचे अनेक क्षण येतात, मात्र रागसंगीत म्हणून बौध्दिक प्रक्रियेवर जागे राहून ऐकले तर त्याचे विचार कोणत्या उंचीवरुन आविष्कृत होत आहेत हे कळते. लयीचा तो केवळ लडिवाळपणा नसतो तर त्यातून प्रकटणा-या श्रुति आणि गाजणारी मिंड यातून रागाचे अखंडत्व सिध्द होते. सुरांच्या बढतीवर प्रत्येक सुरावर त्याच रागाची मुद्रा ठसठशीतपणे दिसून येते यालाच ‘प्रत्येक सुरात राग दिसणे’ असे म्हणावे लागते. त्यांना प्रत्येक श्रुतीचा नाद करता येतो, त्यांना प्रत्येक श्रुतीचा नाद करता येतो आणि त्यांच्या लयीत या नादाचेच जोडलेपण अखंडत्व आणि विरघळणे असते. यामागे दिसून येते ते त्यांचे अथक लयचिंतन आणि श्रुतीचिंतन. गायन साधकाची ही अपवादात्मक परमोच्च अवस्था त्यांनी फार लवकर गाठली आणि फार काळ उपभोगली. ऐकणा-याचे जिथे देहभान हरपते तिथे गाणा-याचे देहभान कोणत्या अवस्थेवर असेल याचा कुणी विचारच करु शकत नाही असे किशोरीबाईंचे गुणवर्णन करावे लागेल.
कष्टाची साधना केल्यामुळे बाईंची कारकीर्द ही फार झळाळीने लौकीकाला आली. गायन ऐकणा-या समाजामधला बुध्दीजीवी वर्ग हा त्यांनी सहजासहजी आपलासा केला असे नाही, तर त्यासाठी त्यांनी अथक ध्येयासक्त आणि ज्ञाननिष्ठ प्रवासाचाच मार्ग अवलंबिला. हा मार्ग अत्यंत खडतर होता, मात्र बाई शेवटापर्यंत पोचल्या आणि म्हणूनच त्यामार्गावरुन नवीन पिढीला आज चालावेसे वाटते आहे. साधकाच्या साधनेच्या कक्षा रुंदावणारे गायन त्यांनी लोकप्रीय केले ही काही सामान्य गोष्ट नव्हे हे आजच्या मनोरंजनप्रीय वर्गाने लक्षात घेतले पाहिजे. बाई गेल्याने सांगीतिक नुकसान असे झाले आहे की त्यांना अभिप्रेत असणारे संगीतार्थही आता धोक्यात आले आहेत. त्यांनी उलगडून ठेवलेल्या अर्थांच्या आधारे साधक वाट चालतील तर बरेच आहे. मात्र त्यांच्या विचारांची ओढाताण करुन चिंतनात्मक अभ्यासाचे एक मोठे घबाड कसे आणि कुणाच्या हाती लागावे हाही मोठा प्रश्नच आहे.
संगीतातले “राग” हे आधीही होतेच, यापुढेही राहतीलच. मात्र मधल्या काळात या रागांना बाईंनी जे काही हक्काचे शुध्द आणि पवित्र “आसन” दिले होते ते बाईंच्या जाण्याने रिकामे झाले आहे.
लेखक: सचिन चंद्रात्रे, नाशिक
===
श्री. राजेंद्र मणेरीकर यांनी २०१४ साली गुरुपौर्णिमेनिमित्त किशोरी ताईंसाठी एक कविता लिहिली होती. ती कविता पुढे देत आहोत.
वंदन गुरुपुनवेचे
माई सरस्वतीची कन्या । शिष्या तिचीच अनन्या ।
किशोरी नाम धन्या । वंदितो ऐसी ।।
हा गानप्रवाहो । जयापासोनी उपजताहो ।
त्या रवळनाथा हो । शरण जी ।।
तये बहुतां मागे । विश्वलयालागे ।
एक नाद रंगे । रंगविला ।।
तया अनाहताचे । भेद करूनी साचे ।
मग सप्तरंगीसुरांचे । नवल केले ।।
जसे कधी आभाळी । इंद्राची उधळण आगळी ।
धनुष्याकृतीं उधळी । अंतरभेद ।।
इथे म्हटले आहत । जे सकलां साधत ।
श्रोतयांसी आकळत । सुगम्य म्हणोनी ।।
तरी साधकां न ते साध्य । तयां ते जीवन आराध्य ।
अन्य कशास तो बध्य । मानी ना कधी ।।
म्हणावे एका लय । दुजां स्वर-सूरांचे आलय ।
पावती जेथ विलय । एकमेकीं ।।
तयां एक मानावे । किं तें भेद जाणावे ।
हे लागे चिंतावे । गवयालागी ।।
थोर जयाचा गुरु । रागविद्येचा दातारू ।
तोची होत आधारू । ऐशा प्रश्ना ।।
गुरूने जे गायिले । तेचि जया अनुसरले ।
तयासीच उकलले । सूरलय नाते ।।
तरी म्हटला सूर्य । अवघाचि तेजोमय ।
प्रकाश तयाचा काय । वेगळा असे ।।
तत्परी गंगानदीचे । पावित्र्य वानिती साचे ।
ते तिचेचि अंगियेचे । दुजे नसे ।।
तसे लय हन सूर । मिळूनी एकस्वर ।
अनाहत ओंकार । मूळ असे ।।
तयाते जो उपासी । तयाचेचि तापसी ।
राग येत जन्मासी । सहजभावे ।।
ओंकार जरी आदि । तयाते माया भेदी ।
मग रागविश्व संवादी । प्रगट जाहले ।।
अशी ही मूळकथा । जाणी जो तत्त्वता ।
तोचि गुरु जगता । होई वंद्य ।।
इयाकारणे ताई । सुरालयीचे ठाई ।
रागनिश्चय करूनी गाई। हे श्रवणगम्य ।।
तियेचा सूर हो भला । लयीचे अधिष्ठान जयाला ।
मग राग सहजी निघाला । एकभावे ।।
राग हाचि भाव । एकरचनास्वभाव ।
द्वैता तेथ वाव । मुळीं नसे ।।
राग एक निर्गुण । गाता होई सगुण ।
परि मानवी अवगुण । न लिंपती तया ।।
तो विशुद्ध निर्मळ । जसा अंतरात्मा केवळ ।
अथवा गंगोत्रीचे जळ । अनुपम्य ।।
व्हावया तो प्रसन्न । केले सर्व साधन ।
एकाग्रतेचे अधिष्ठान । राखोनिया ।।
राग गुह्य पुरे जाणोनी । तदनंतर आविष्कारोनी
श्रोतयांचे सुश्रवणी । सहज घातले ।।
विद्या विद्येसाठी । म्हणोनी झाली गाठी ।
पुढे झाली गोठी । प्रौढत्वाची ।।
मग नादावले आवघे । जो तो इतरां सांगे ।
म्हणे किशोरीचे मागे । कोण असे ।।
म्हणा कुणी रसिक । अथवा कुणी गायक ।
तरुणवृद्धबालक । हिचा प्रेमी ।।
अशी केली संपादणी । जगां झाली नयनी ।
मार्ग दावी देखणी । पुढिलांस ।।
संगीतसाधकांस । हिचा जगी वास ।
हन गानसहवास । महान झाला ।।
जे इये करावे । ते आपणासी जमावे ।
तयालागी कष्टावे । आनंदाने ।।
अशी वाट दाविली । क्षेत्रीं थोर जाहली ।
म्हणोनी नमस्कारिली । येथ मियां ।।
जरी माझे गुरु आणिक । मराठे रामनामक ।
मधुसूदन तसे एक । तयांचेच कृपेने ।।
जाणूनी हिची थोरवी । आकळली तरी म्हणावी ।
ती नित्य नूतननवी । दिसे सकलां ।।
असो येथे ठाकितो । कवनास आवरितो ।
राजेन्द्र हा वंदितो । गुरुपुनवेस ।।
– राजेन्द्र मणेरीकरकृत ‘किशोरी आमोणकर वंदना’ किशोरीताईंस अर्पण!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.