आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पेट्रोल दरवाढ झाली आणि सगळीकडे नुसती खळबळ उडाली. पेट्रोल महागलं की आपोआपच बाकीचे सर्व खर्च वाढतात. साहजिकपणे प्रवासही महागतो. या दरवाढीने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे.
सोशल मिडियावर मीम्सनी धुमाकूळ घातला आहे. पूर्वी फक्त अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या जात. त्यात आता इंटरनेट आणि गाडी हे वाढीव नग झाले आहेत.
पूर्वी गावं छोटी छोटी होती. शहरं कमी होती. बहुतेक सर्व ठिकाणं जवळपासच असायची. लोक सगळीकडे चालतच जायचे. बसने प्रवास हा सर्रासपणे केला जायचा. चारचाकी गाडी हे प्रकरण फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांसाठीच असायचं.
क्वचित एखाद्या घरी स्कूटर, किंवा मोटारसायकल असायची. बाकी शाळेत काॅलेजला जाताना सगळेच सर्रासपणे सायकल वापरत. त्यात कुणालाही कमीपणा वाटत नव्हता.
पुढं यांत्रिकीकरण झालं कारखाने सुरू झाले. उपजिविकेसाठी लोक गाव सोडून बाहेर पडू लागले. शहरांची वाढणारी हद्द, कार्यालयीन कामकाज, दूर दूर असणारी उपनगरं यांनी गाडी अत्यावश्यक गोष्ट कधी बनली ते कुणालाही समजलं नाही.
गाडी घेणं हे जवळपास पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे. गाडीचं तेलपाणी, अधूनमधून करावं लागणारं सर्व्हिसिंग, दुरुस्ती हे किती खर्चिक आहे हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!!! त्यातच वारंवार होणारी इंधनाची दरवाढ सामान्य माणसाला घायकुतीला आणते. यावर मात करून नवं काहीतरी, जगावेगळं करणाऱ्या तरुणाची ही आहे प्रेरणादायी कथा.
त्याचं नाव आहे अभिषेक माने!!! संरक्षण मंत्रालयातील आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन यानं २००४ साली स्वतःचा व्यवसाय उभा करायचं ठरवलं आणि तो पुण्यात परतला. किती धाडस म्हणायचं..
सरकारी नोकरी, गलेलठ्ठ पगार, सवलती, स्थैर्य हे सोडून आपला व्यवसाय सुरु करायला परत येणं ही चेष्टा नव्हती!!! तेही थोडंसं वेगळं काहीतरी, ज्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल असं काही!!!! सोलर पॅनल उत्पादन करणं आणि इन्स्टाॅल करायचा व्यवसाय..
–
हे ही वाचा – एका मुंबईकर स्त्रीने अशी शक्कल लढवली, की वीजबिल झटक्यात कमी झालं!
–
अभिषेकने बरीच वर्षे सौरऊर्जेचा सखोल अभ्यास केला. पॅनल कशी तयार केली जातात? ती कशी इन्स्टाॅल करतात आणि सौरऊर्जा कशी वापरली जाते हे सारं त्याने अभ्यासलं. हेच पर्यावरणपूरक उत्पादन आपण का बनवू नये? हा विचार त्याच्या मनात आला.
आपणही हे करायचं, असं ठरवून २०१५ साली बहीण दिपाली शिंदे हिला सोबत घेऊन दिवा सोलर मॅन्युफॅक्चरर या नांवाने सोलर पॅनल आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व भाग तयार करायचा कारखाना त्याने सुरू केला.
ती सर्व उपकरणं त्यानं त्याच्या घरीही बसवली आहेत. आज त्याच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साधनं सौर ऊर्जेचा वापर करुन चालतात. स्वयंपाक घरातील साधने, टीव्ही, वाॅशिंग मशीन, वाॅटर पंप वगैरे सर्व साधने सबकुछ सोलर एनर्जी!!!
सर्वसाधारणपणे एका कुटुंबाला लागणारी वीज दरमहा पाच हजार रुपये बिल आकारुन दिली जाते. या कुटुंबातील सदस्य म्हणजे एक लहान मूल आणि चार मोठी माणसे. अशा पंचकोनी कुटुंबात राहाणाऱ्या लोकांना साधारणपणे दरमहा पाच हजार रुपयांची वीज लागते. अभिषेक माने यांच्या घराचे वीज बिल केवळ ७० रुपये आहे. झालात ना थक्क?
२०१६ ला त्यांनी आपल्या घरातील सर्व उपकरणे सौर ऊर्जेचा वापर करुन चालवायचं ठरवलं. बरं हे काही एका रात्रीत झालं नाही. टप्प्याटप्प्याने त्यांनी सौरऊर्जा एकेका उपकरणासाठी वापरायला सुरुवात केली. कुटुंबातील सदस्य सुद्धा त्यांना उत्तम सहकार्य करतात. गरज नसेल तेव्हा लाईट बंदच केले जातात. पाणी जपून वापरलं जातं. त्यामुळे उर्जेची भरपूर बचत होते.
कालांतराने अभिषेकने २५० वॅटचे १० सोलर पॅनल बसवले, जे दिवसाला तब्बल २५ किलो वॅट ऊर्जा निर्माण करतात. त्यांचा वापर करून अभिषेकचे कुटुंबीय दिवसा इलेक्ट्रीक कार चार्ज करतात आणि रात्री लाईट-पंखे यांचादेखील वापर करतात!!!
जसजशी आपण एखादी सिस्टीम वापरु लागतो, तसतसे त्यातील बारकावे आपल्याला कळू लागतात. अभिषेकला सुद्धा यात सुधारणा करायची संधी मिळाली आणि २०१९ साली त्याने या १० सोलर पॅनलपैकी काही पॅनल काढून टाकली. ३३० वॅटची नवी पॅनल बसवली. या पॅनलमुळे आता दिवसाला ७ किलो वॅट ऊर्जा निर्माण होते. आणि त्यावर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कार पण चार्ज करता येतात.
वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे; जनतेला आणि सरकारलासुद्धा! यावर उपाय म्हणून आता इलेक्ट्रीक कार हा पर्याय वापरला जाऊ शकतो. येत्या काळात इलेक्ट्रिक गाड्या हा एक अत्यंत उत्तम पर्याय ठरू शकतो यात शंका नाही.
टाटांनी सुद्धा या उत्पादनात लक्ष घातलं आहे. टेस्लाचं सुद्धा नवीन इलेक्ट्रीक कारचं माॅडेल लवकरच आपल्या सेवेसाठी रुजू होईल. उद्या जेव्हा इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध होतील, तेव्हा अशी सोलर पॅनल पाॅवर स्टेशनला लावून ही समस्या मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईलच.
शालेय जीवनात आपण विज्ञान शिकतो. सूर्य हा ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे, हे फक्त ‘एका वाक्यात उत्तरे द्या’ या प्रश्नाचे उत्तर म्हणून पाठ करतो. मार्क मिळाले की सोडून देतो, विसरुन जातो.
अभिषेक माने यांनी तो धडा गिरवला आणि लोकांना नवा विचार देणारा अवलिया ठरला आहे. पेट्रोल, डिझेल हे मर्यादित इंधन साठे आहेत. ते किती दिवस आख्ख्या जगाची इंधनाची तहान भागवणार? यावर आता उपाय शोधणे गरजेचे आहे.
अभिषेक माने या अवलियाने या समस्येचं उत्तर आपल्यापुरतं तरी शोधून त्याचा पाठपुरावा करून आपलं राहणीमान समृद्ध केलं आहे. समृद्धी ही फक्त पैशातच मोजतात का? नाही. ही समृद्धी विचारांची असते, वागणुकीची असते. देशासाठी, देशबांधवांना आपला उपयोग व्हावा म्हणून केलेल्या कामाची असते. ही समृद्धी अभिषेकच्या घरादारात, कुटुंबात ठायीठायी दिसते आहे.
===
हे ही वाचा – भारताची “सौर उर्जा” तळपत आहे! २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.