आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘मुंबई-पुणे-मुंबई’ ही वारी आपल्यापैकी सर्वांनीच कित्येकदा केली असेल. मुंबई आणि पुणे ही फक्त दोन शहरं नसून ती जागतिक पातळीवर महाराष्ट्राची एक ओळख आहे. राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रगतीला खूप आधीच सुरुवात झाली.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला प्रत्येकवेळी साथ मिळत होती ती पुणे शहराकडून. मुंबई आर्थिक बाबतीत पुढे तर पुणे शहर हे शिक्षण, ऑटोमोबाईल आणि आय टी क्षेत्रात आपलं योगदान देत होतं.
मोठा भाऊ, लहान भाऊ प्रमाणे हे दोन्ही शहरं आज राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहेत.
प्रगतीसाठी पुरक असल्याचं नेमकं कारण?
कोणत्याही दोन शहरांमध्ये वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण तेव्हाच होऊ शकते जेव्हा दोन्ही शहर हे कमी अंतरावर आहेत किंवा त्यांच्यातील अंतर कमी करण्यात आलं आहे. मुंबई-पुण्याला जोडणारा ‘एक्सप्रेस हायवे’ हा दोन्ही शहरांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे.
१५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन्ही शहरातील लोक आता नोकरीसाठी, व्यवसायासाठी अगदीच सहज प्रवास करत असतात. पुणे शहराची औद्यगिक वाढ ही तळेगाव, कान्हे, लोणावळा पर्यंत झाली आहे.
===
हे ही वाचा – जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!
===
काही वर्षात पुणे-मुंबई या रस्त्यावर पूर्णपणे गृहनिर्माण, कंपनी यांचं बांधकाम बघायला मिळेल अश्या पद्धतीने सध्या या भागात कामं सुरू आहेत. महाराष्ट्रातील ही दोन प्रमुख शहरं दोन तासांच्या अंतरावर आल्याने ‘रस्ते चांगले असतील तर प्रगती होतेच’ याचा प्रत्यय सध्या येत आहे.
पुणे आणि मुंबई हे जोडले जावेत यासाठी खूप वर्षा आधीच प्रयत्न सुरू झाले होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. मुंबई-पुणे-मुंबई हे सहज साध्य करणाऱ्या या रस्त्याचा इतिहास जाणून घ्यायला तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल:
२०० वर्ष जुना इतिहास असलेल्या या रस्त्यात सुरुवातीच्या काळात केवळ डोंगराळ भाग आणि झाडीच होती. पुणे ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी त्या काळात एक आठवडा लागायचा हे कळल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
मराठा सैन्य आणि ब्रिटिश सैन्यात झालेली लढाई यामुळे या रस्त्याची निर्मिती करण्यात आली हे सुद्धा फार कमी जणांना माहीत असेल.
१८१८ मध्ये झालेल्या या लढाईमुळे तळेगाव ते मुंबई हा रस्ता कमीत कमी वेळात पार करता यावा अशी योजना करण्यात आली. आज अस्तित्वात आलेलं पिंपरी-चिंचवड, वाकड हा भाग तेव्हा अर्थातच नव्हता. खडकी – तळेगाव – मुंबई असं या रस्त्याचं नियोजन करण्यात आलं होतं.
नेमकं काय झालं होतं?
१७७८ मध्ये इंग्रज सरकारने त्यांचं पूर्ण लक्ष हे मध्य भारत म्हणजेच मुंबई आणि आसपासच्या परिसरावर केंद्रित केला होता. ब्रिटिश सरकार हे मुंबईकडे एक समुद्राने वेढलेलं शहर म्हजेच एक बंदर म्हणून बघायचे.
या शहरावर ताबा असावा आणि त्या शहरापर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध जमिनीवर सुद्धा आपलं साम्राज्य प्रस्थापित करावं असा इंग्रजांचा मनसुबा होता.
मराठा राज्याची राजधानी असलेल्या पुणे शहराची धुरा त्या काळात पेशव्यांकडे होती. मराठा आणि फ्रेंच सरकारकडून आपल्याला सर्वाधिक धोका असल्याचं इंग्रजांच्या लक्षात आलं होतं.
पुणे शहरावर आपला झेंडा फडकवणं अत्यंत आवश्यक आहे हे इंग्रजांनी हेरलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली.
नाना फडणवीस हे तेव्हा पेशवे सरकारमधील एक जबाबदार मंत्री होते. रघुनाथराव पेशवे हे तेव्हा आपल्याला वरिष्ठ पद मिळावं यासाठी इंग्रजांना मदत करण्यास तयार झाल्याचं भासवत होते.
रघुनाथराव पेशवे यांना पाठिंबा देऊन पुणे शहरात आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव इंग्रज सरकारने तयार केला होता. खंडाळा गावापासून पुणे शहरावर आक्रमण करण्यास इंग्रज सैन्याने सुरुवात केली होती.
नाना फडणवीस यांनी आपलं सैन्य तळेगाव, वडगाव, खोपोली आणि पिंपरी, चिंचवड या गावात ब्रिटिश सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैनात केलं होतं.
===
हे ही वाचा – पुण्यातील प्रत्येक पेठेमागे आहे स्वतंत्र इतिहास! अस्सल पुणेकरांना तर हे माहित हवंच…
===
मराठा सैन्याने या लढाईत ब्रिटिश गुरीला आक्रमण पद्धतीने हैराण करून सोडले आणि या लढाई नंतर इंग्रज सैन्याला अक्षरशः पळता भुई थोडी अशी वेळ आली होती.
मराठा सैन्याने हे युद्ध जिंकलं आणि ब्रिटिश सैन्याला मुंबई शहर, भरूच आणि सुरत मधील त्यांचा गाशा गुंडाळावा लागला होता. रघुनाथराव पेशवे हे या लढाईत जिंकले आणि त्यांच्या साम्राज्यात या सर्व शहरांची वाढ झाली होती.
पुणे आणि मुंबई रस्त्यावरील ‘भोर घाट’ने या लढाईत निर्णायक भूमिका बजावली होती. घोडदळ, पायदळ या दोन प्रकारात आपल्या सैन्याची विभागणी करणाऱ्या मराठा सैन्याची हीच सर्वात मोठी जमेची बाजू ठरली होती.
कारण, इंग्रज सैन्य ही लढाई केवळ मोठ्या बंदुका, मोठं सैन्य, रणगाडे हा ताफा घेऊन त्यांना हा रस्ता कापून पुणे शहरात त्यांना पोहोचणं शक्य नव्हतं. युद्धात हरलेल्या ब्रिटिश सैनिकांनी ही परिस्थती बदलण्याचं ठरवलं.
१८०२ मध्ये सुद्धा मराठा साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होतं. मराठा साम्राज्याचा विस्तार हा तेव्हा ग्वाल्हेर, बीजापूर पर्यंत झाला होता. इंदोरचे प्रशासक यशवंतराव होळकर यांनी हे साम्राज्य संपुष्टात आणण्याचं ठरवलं.
त्यांनी सर्व शक्तीनिशी रघुनाथराव यांचे सुपुत्र दुसरे बाजीराव पेशवे यांच्यावर हल्ला केला. या लढाईत मराठा सैन्याला हार पत्करावी लागली होती. पेशव्यांना या लढाईनंतर इंग्रजांकडून मदत घ्यावी लागली होती. ही मदत करण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात ‘वसईचा तह’ करण्यात आला होता.
३१ डिसेंबर १८०२ रोजी झालेल्या या तहानंतर बाजीराव पेशवे हे पुण्याच्या ‘गादीवर’ बसलेले होते. पण, राज्य हे इंग्रजच करत होते असा आपला इतिहास सांगतो.
ईस्ट इंडिया कंपनीची भारतात ताकत वाढत होती. ब्रिटिश सरकारने पश्चिम भारतात आपलं साम्राज्य वाढवण्याचा धडाका या विजयानंतर सुरू केला होता. ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ अशी ही परिस्थिती होती.
१८०३ मध्ये झालेल्या दुसऱ्या लढाईत इंग्रजांनी इंदोर, ग्वाल्हेर, मध्य भारतातील सर्व मराठा किंवा त्यांना साथ देणाऱ्या राजांचा पराभव केला आणि भारतावरची आपली पकड मजबूत केली.
पुणे शहरावर आपलं नियंत्रण मिळवल्यानंतर मुंबई सोबत त्याला जोडण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न सुरू केले आणि या दोन शहरांत रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं. आर्थर वेलीस्ले या इंग्रज अधिकाऱ्याने दुसऱ्या लढाईचं नेतृत्व केलं होतं.
ही अशी लढाई होती जी की, मैदानापेक्षा मैदानाबाहेर आपल्या लोकातील मतभेदाच्या जोरावर जिंकण्यात इंग्रजांना यश मिळालं होतं. पुणे – मुंबई हे शहर रस्त्याने जोडले जावेत ही आर्थर वेलीस्लेची इच्छा होती आणि ती त्याने प्रत्यक्षात खरी करून दाखवली होती.
पुढे या रस्त्याचं रूपांतर एक्सप्रेस हायवे मध्ये झालं आणि हे अंतर अजूनच कमी झालं असं म्हणता येईल.
जुना मुंबई-पुणे रस्ता हा आज खूप कमी प्रमाणात वापरला जात असला तरीही हा रस्ता एक पर्यायी रस्ता म्हणून नेहमीच लोकांसाठी उपलब्ध आहे. आज हा रस्ता खडकी-औंध-तळेगाव-लोणावळा-खोपोली-मुंबई असा आहे ज्याचं नियोजन आर्थर वेलीस्लेने केलं होतं.
सुरुवातीला हा रस्ता केवळ घोडे वजन वाहून नेतील इतकाच रुंद होता. पुणे – मुंबई हे अंतर कापायला या रस्त्याने त्या काळात ३ दिवस लागायचे. रस्त्यातील घरांना टपालाद्वारे संदेश पोहोचवणे हा यामागचा उद्देश होता. १८३० मध्ये जॉन मॅल्कम या रस्त्यामध्ये अजून सुधारणा करवून घेतल्या.
१८६३ मध्ये सुरुवात झालेल्या ‘ग्रेट इंडियन पेनिंन्सुला रेल्वे’ या प्रकल्पा अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यामुळे पुणे – मुंबई मधील अंतर हे ३ दिवसांवरून काही तासांवर आणण्यात ब्रिटिश सरकारला यश मिळालं होतं.
मुंबई-चेन्नईपर्यंत रस्ते बांधण्याचं काम तत्कालीन ब्रिटिश सरकारने स्वतःच्या सोयीसाठी करवून घेतले होते. पुणे – मुंबई रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं तेव्हा भोर घाटात जमिनीपासून २०२७ फुट उंचीवर एक रिव्हर्सिंग स्टेशन तयार करण्यात आलं होतं.
‘ग्रेट इंडियन पेनिंन्सुला रेल्वेचं’ एक कार्यालय तिथे बांधण्यात आलं होतं. पश्चिम घाटांना ओलांडून जाव्या लागणाऱ्या या रस्त्यात २५ बोगदे आणि २२ पुलांचं बांधकाम करण्यात आले होते.
आज ज्या रस्त्यावरून प्रवास करायला आपण आनंदाने तयार असतो त्या रस्त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठा प्रवास करावा लागला हे जाणून घेणं हे सर्वांना नक्कीच आवडलं असेल.
एका सर्व्हेक्षणानुसार NH48 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एका दिवसात रस्त्यावरून ४०,००० कार दररोज प्रवास करतात आणि १ लाख कार रोज चालू शकतील इतकी या रोडची क्षमता आहे.
भारताचा पहिला सहा पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे. २००२ मध्ये अस्तित्वात आलेला हा रस्ता भारतातील सर्वात व्यस्त रस्ता म्हणून आज ओळखला जातो.
सुरुवातीला पुणे-पनवेल हायवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याला पनवेल पासून पुढे बोटीने प्रवास करावा असा आर्थर वेलीस्ले यांचं नियोजन होतं. त्याचं रूपांतर काही वर्षात दोन पदरी रोडमध्ये झालं आणि विसावं शतक संपताना एक्सप्रेसवेची भेट नागरिकांना मिळाली.
NH4 म्हणजेच जुन्या पुणे-मुंबई रस्त्याला NH48 हा नवीन हायवे पर्याय म्हणून उपलब्ध झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर रस्त्यांबाबत झालेली ही सर्वात मोठी प्रगती म्हणून नेहमीच ओळखली जाईल.
पुढच्यावेळी या रस्त्यावरून जातांना या घटनांमधील काही क्षण तरी प्रत्येकाला आठवतील आणि चेहऱ्यावर एक स्माईल येईल हे नक्की.
===
हे ही वाचा – राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात? जाणून घ्या…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.