मराठी रंगभूमीवरील ८ अजरामर नाटकं, ५ व्या आणि ८ व्या नाटकाने रचलाय इतिहास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मराठी रंगभूमी ही किती समृद्ध आहे हे काही कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. कला साहित्य संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी पाऊल हे नेहमीच पुढे आहे आणि राहील. खासकरुन कला आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात मराठी रंगभूमी आणि मराठी साहित्य हे श्रेष्ठच मानलं जातं.
खासकरुन मराठी रंगभूमी ही सदैव नवनवे प्रयोग आपल्यासमोर आणत असते शिवाय अत्यंत बोल्ड विषय हाताळण्यात मराठी रंगभूमी ही नेहमीच अग्रेसर आहे. बालगंधर्व पासून प्रशांत दामले पर्यंत कित्येक दमदार कलाकार आणि कलाकृती या रंगभूमीने आपल्याला दिल्या.
वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर,डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ.श्रीराम लागू, विक्रम गोखले, राजन भिसे, प्रशांत दामले अशा कित्येक रंगकर्मी लोकांमुळे ही मराठी रंगभूमी नावारूपाला आली आणि इतकी मोठी झाली.
पण गेली काही वर्षे आणि खासकरुन हा कोरोनाकाळ मराठी रंगभूमीसाठी तितकासा खास नव्हता. मराठी नाटक आता कितपत चालेलं, लोकं नाटक बघायला येतील की नाही अशी शंका वर्तवली जात आहे.
===
हे ही वाचा – मराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा! BookMyShow मराठीत येतंय!
===
काही अंशी ही गोष्ट खरी आहे कारण सिनेमा, आणि आता फोफावलेले ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यामुळे प्रेक्षकांची आवड पूर्णपणे बदलली आहे. लोकांना सगळं झटपट हवंय मग ती आयपीएल क्रिकेट मॅच असो किंवा दीड तासाचा सिनेमा, लोकं आता वेळ काढून ३ अंकी नाटकं बघण्यापेक्षा टीव्हीच्या मालिका बघणं जास्त पसंत करतात.
अर्थात यात त्यांचीदेखील चूक नाही म्हणा, गेल्या काही वर्षात मराठी रंगभूमीवर इतिहास घडवतील अशी अजरामर नाटकं आलीत तरी कुठे?
प्रशांत दामले, शरद पोंक्षे सारखे एक्का दुक्का कलाकार सोडले तर असे फार कमी कलाकार आहेत जे अजूनही रंगभूमी ही त्यांची कर्मभूमी मानतात!
याच रंगभूमीवर काही अजरामर नाटकं होऊन गेलीत ज्यांनी एक वेगळा इतिहास रचला, ती नाटकं जर तुम्ही पाहिली नसतील तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करताय. जाणून घेऊया याच ८ नाटकांविषयी!
१) ती फुलराणी :
जॉर्ज बेरनाल्ड शॉ यांच्या नाटकावरून प्रेरीत लोकप्रिय साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांनी एक अजरामर नाटक लिहिलं ते म्हणजे ‘ती फुलराणी’!
भक्ती बर्वे यांनी या नाटकात फुलवालीची भूमिका वठवली होती. या फूलविक्रेतीला समाजात मानानं जगता यावं म्हणून झटणारा प्रोफेसर आणि त्या फुलवालीची ही गोष्ट!
पु ल यांचं लिखाण इतकं जबरदस्त होतं की हलक्या फुलक्या नाटकातूनसुदधा त्यांनी बरंच बोल्ड भाष्य केलं होतं.
भक्ती बर्वे यांची ओळख निर्माण करण्यात या नाटकाचा सर्वात मोठा सहभाग आहे! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हे स्वगत तर त्या काळात कित्येक मुलींनी पाठ केलं होतं.
नवीन संचात हे नाटक बऱ्याच अभिनेत्रींनी केलं पण भक्ती बर्वे यांची सर कुणालाच नाही. युट्युबवर अमृता सुभाष हिने केलेलं नाटक आहे ते तुम्ही बघू शकता!
२) मी नथुराम गोडसे बोलतोय :
मराठी रंगभूमीवरील सर्वात जास्त वादग्रस्त नाटक म्हणून कोणतं असेल तर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय!’ गांधीजी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्यावर बेतलेलं हे नाटक सुरुवातीच्या काळापासून सदैव वादाच्या भोवऱ्यात होतं.
या नाटकावरून बरेच वाद विवाद झाले मधला काही काळ नाटक बंद सुद्धा करावं लागलं पण शरद पोंक्षे आणि कै.विनय आपटे यांसारख्या बेधडक लोकांमुळे हे नाटक सुरू राहिलं आणि लोकांनी हे नाटक डोक्यावर घेतलं.
काही लोकांना वाटत की या नाटकात नथुरामचं उदात्तीकरण झालं तर काहींना वाटलं की नथुरामने जे केलं ते योग्य होतं.
पण हे नाटक ज्या पद्धतीने लिहिलं गेलं त्यासाठी हे नाटक खासकरुन ओळखलं जातं, कोणताही पक्षपात न करता दोन्ही बाजू हे नाटक ज्या स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलं गेलं त्यामुळेच लोकांना हे नाटक आवडलं आणि इतका विरोध होऊन सुदधा ते जोमात सुरू राहिलं.
आता याचे प्रयोग थांबले असून, शरद पोंक्षे यांनी याच धर्तीवर आणखीन एक नाटक काढलं पण दुर्दैवाने शरद पोंक्षे हे कॅन्सरच्या विळख्यात अडकले आणि ते नवीन नाटकही बंद करावं लागलं. आता हे नाटक पुन्हा रंगभूमीवर कधी येईल सांगता येणं कठीण आहे!
===
हे ही वाचा – घरबसल्या मनस्ताप वाढवणाऱ्या निगेटिव्ह बातम्यांपेक्षा हा क्लासिक विनोदी चित्रपटांचा खजिना एकदा बघाच
===
३) तो मी नव्हेच :
१९५५ -६० च्या दरम्यान माधव काझी नावाच्या माणसाने नुसता उत्पात माजवला होता. कित्येक बायकांना लग्नाची स्वप्न दाखवून त्यांना लुबाडून त्यांच्याकडून पैसे घेऊन लंपास झालेला हा माणूस आणि त्याचा लखोब लोखंडेचा मुखवटा या नाटकाच्या रुपात लोकांच्या भेटीला आला.
त्या वेळेस घडलेल्या या सत्य घटनांवर हे नाटक बेतलेले असल्याने लोकांना ते नाटक फार आवडले. शिवाय प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला लखोबा लोखंडे आजही कित्येक लोकांच्या स्मरणात आहे.
हजारोंच्या वर प्रयोग झालेल्या या नाटकाची सर नवीन संचातल्या नाटकाला नाही, जुनं नाटक प्रभाकर पणशीकर यांना घेऊन खास चित्रीकरणासाठी शूट केलेलं नाटक तुम्ही युट्युबवर बघू शकता!
४) कट्यार काळजात घुसली :
संगीत नाटक म्हंटलं की आपल्या सगळ्यांच्या समोर येतं ते कट्यार काळजात घुसली! नुकतंच या नाटकाचा सिनेमा केला आणि त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
मुळात पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित या नाटकाची कथाच इतकी काळजाला भिडणारी आहे की ती कोणत्याही स्वरूपात सादर केली तरी लोक त्या जुन्या नाटकाखातर नवीन कलाकृती बघतातच.
शिवाय जुन्या काळी जेंव्हा हे नाटक लोकप्रिय झालं ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामुळे, फैयाज बकुळ पंडित अशा तगड्या कलाकारांमुळे आणि वसंतराव देशपांडे यांच्या दमदार अभिनय आणि गायकीमुळे.
यातली सगळीच गाणी आजच्या पिढीलाही तोंडपाठ आहेत यावरून आपल्याला समजून येईल की ही कलाकृती किती काळाच्या पुढची आहे ते. मूळ नाटक तुम्ही सध्या कुठेच बघू शकत नाही कारण त्या वेळेस चित्रीकरण एवढं प्रगत नव्हतं पण यावरच बेतलेला सिनेमा आणि त्यातली गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील!
५) कुसुम मनोहर लेले :
पुण्यातल्या आणखीन एका भयानक सत्यघटनेवर आधारित हे नाटक आजही आपल्याला सुन्न करतं. सरोगसी सारख्या बोल्ड विषयावर केलं गेलेलं भाष्य आणि समाजातील काही विकृत माणसं यांचा पर्दाफाश करणारं हे नाटक आजही काळाच्या पुढचं आहे.
विनय आपटे दिग्दर्शित हे नाटक जेंव्हा रंगभूमीवर आलं तेंव्हा लोकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. मनोहर लेले सारखी इतक्या उलट्या काळजाची माणसं या उच्चभ्रू समाजात असतात याची जाणीव करून देणारं हे नाटक आजही आठवलं तरी अंगावर काटा येतो.
सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि गिरीश ओक यांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक तुम्ही आजही युट्युबवर बघू शकता!
६) सखाराम बाईंडर :
विजय तेंडुलकर लिखित आणि कमलाकर सारंग दिग्दर्शित हे नाटक ७० च्या दशकातलं सर्वात बोल्ड नाटक होतं.
सखाराम बुक बाईंडर याचा सामाजाकडे बघायचा दृष्टिकोन आणि स्त्री ही फक्त भोगाची वस्तू असल्याची त्याची मानसिकता याविषयी भाष्य करणारं हे नाटक म्हणजे त्यावेळच्या समाजाच्या तोंडावर एक जबरदस्त चपराक होती.
पण बराच काळ या नाटकावर बंदी होती तरी याच्या प्रोड्युसरनी हे नाटक जितक शक्य होईल तितकं लोकांसमोर सादर करायचा प्रयत्न केला.
निळू फुले, लालन सारंग यांची अदाकारी ज्यांनी ज्यांनी बघितली आहे ती लोकं हे नाटक उभ्या जन्मात विसरू शकणार नाही. सैयाजी शिंदे या गुणी कलाकाराने हे नाटक नव्या संचात केलं आहे जे तुम्ही युट्युबवर बघू शकता!
७) नटसम्राट :
वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज लिखित हे नाटक म्हणजे मराठी स्टेजवरील माईलस्टोन आहे. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी यांच्यापासून नाना पाटेकर, मोहन जोशी अशा कित्येक नटांना ही भूमिका करायचा मोह आवरता आलेला नाही.
आजवर वेगवेगळ्या पिढ्यांनी वेगवेगळं नटसम्राट पाहिलं पण सर्वात जास्त काम आवडलं ते डॉ. लागू आणि सतीश दुभाषी यांचंच. याचा अर्थ असा नव्हे की इतरांनी वाईट कामं केली पण लोकांच्या लक्षात राहीले ते २ नटसम्राटच!
कीत्येक स्वगतं आणि कुसुमाग्रज यांच लिखाण यासाठी प्रसिद्ध असलेले हे नाटक तुम्ही युट्युबवर बघू शकता!
===
हे ही वाचा – मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात…
===
८) श्रीमंत दामोदर पंत :
मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा गंभीर मुद्द्यावर इतकं हलकं फुलकं आणि धम्माल विनोदी नाटक आजवर झालेलं नाही.
केदार शिंदे सारख्या संवेदनशील माणसाचे लिखाण दिग्दर्शन शिवाय भरत जाधव, विजत चव्हाण सारख्या मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने हे नाटक एका वेगळयाच उंचीवर पोचलं आहे.
यातलं भरतने साकारलेल दामू हे पात्र, त्याची स्टाईल, त्याचा तो विचित्र नाच आणि विजय चव्हाण यांनी साकारलेला गणपत या दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीसाठी आणि कॉमिक टायमिंग साठी हे नाटकं आजही लोकं आवर्जून बघतात. हे नाटक सुद्धा तुम्हाला युट्युबवर अनुभवायला मिळेल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.