' इंजिनियर म्हणून कमवायचा २४ लाख आणि शेती करून कमावले २ करोड रुपये! – InMarathi

इंजिनियर म्हणून कमवायचा २४ लाख आणि शेती करून कमावले २ करोड रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला भारत म्हणजे कृषिप्रधान देश! पण बदलत्या काळानुसार आपल्या देशाची ही प्रतिमा हळूहळू पुसत चालली आहे. काही अपवाद वगळता आजकाल सर्वच तरुण करियर म्हणून विविध आकर्षक क्षेत्रांकडे धाव घेतात.

शेती मध्ये देखील करियर केलं जाऊ शकतं, त्यातून अमाप पैसा मिळवता येऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच नाही. शेती करून कुठे एवढा घाम गाळत बसायचा? त्यातून मिळून मिळून कितीसे पैसे मिळणारेत? असा त्यांचा विचार दिसतो.

 

farmers-marathipizza02

 

शेतीविषयी अश्या प्रकारची नकारात्मक मानसिकता आजच्या तरुण पिढीच्या मनात निर्माण झालीये. पण याच मानसिकतेला तडा देणारी कामगिरी करून दाखवली आहे याच सुशिक्षित पिढीतील एका तरुणाने!

छत्तीसगड राज्यातील बिलासपुर जिल्ह्यामध्ये मेढपार नावाचे एक गाव आहे. या गावातील गृहस्थ वसंत राव काळे यांनी आयुष्यभर सरकारी नोकर म्हणून काम केले.

निवृत्ती मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या मनातील एक राहून गेलेली गोष्ट आजमावून बघायची होती. ती म्हणजे त्यांचे शेतीतील कौशल्य!

शेती हा त्यांचा जीव की प्राण! पण आयुष्याच्या धावपळीत ते शेतीपासून दुरावले ते कायमचे, पण निवृत्त झाल्यावर पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यात दबलेली आशा पल्लवित झाली.

या वसंतरावांचा सचिन हा नातू!

त्याला देखील गावाची आवड! आजोबांचे शेतीबद्दलचे प्रेम तो देखील जाणून होता. त्यांच्या सोबत शेतीबद्दलचे ज्ञान मिळवत त्याला देखील शेती करावी असे वाटू लागले.

 

sachin-kale-marathipizza

 

पण कुटुंब मध्यमवर्गीय असल्याकारणाने त्याच्या आईवडिलांना त्याने खूप शिकून चांगली नोकरी धरावी असे वाटत होते. सचिनने देखील आपल्या आईवडीलांच्या इच्छेचा मान राखीत मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले.

त्यानंतर एमबीए पूर्ण केले. पुढेही अजून शिकायचे म्हणून त्याने कायद्याची पदवीही संपादन केली.

काही काळाने त्याला एका पॉवरप्लॅन्ट प्रोजेक्टमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तेथून अगदी काही वर्षांतच आपल्या हुशारीने आणि मेहनतीने त्याने आपले करियर घडविले.

सारं काही सुरळीत सुरु असताना २००७ साली सचिनने developmental economics मध्ये पीएचडी घेण्याचे ठरवले. त्यातून शिकता शिकता त्याच्या मनातील उद्योजक जागा झाला. एव्हाना त्याच्या जवळ सगळं होतं… संपत्ती, घर, गाड्या!

पण शेवटी तो नोकरी करत होता, “दुसऱ्या कोणासाठी तरी काम करत होता” ही गोष्ट त्याला खटकू लागली.

सचिनचे आजोबा त्याला नेहमी सांगायचे की ‘माणसला जगायचे असेल तर त्याला अन्न हवेच’. अर्थात हे खरंच आहे! अन्न नसेल तर माणसाचे अस्तित्व फार काळ टिकू शकत नाही.

आजोबांच्या याच शिकवणीने त्याला मार्ग सापडला. त्याने स्वत: अन्न पिकवण्याचे ठरवले आणि कृषीउद्योजक होण्याचे दिशेने पहिले पाऊल टाकले. अर्थात त्याला त्याचे आजोबा वसंतराव काळे याची साथ देखील होती.

 

sachin-kale-marathipizza01

 

२०१३ मध्ये त्याने गुरगावमधील आपली अलिशान नोकरी सोडली. जेथे त्याला वर्षाला २४ लाख रुपये पगार मिळायचा. ती नोकरी सोडून आता तो थेट शेतात राबणार होता.

त्याने आपली सर्व संपत्ती या शेतीमध्ये ओतली. जर अपयश हाती आले तर पुन्हा नोकरी करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

पण त्याचं नशीब उजळलं. पुन्हा एकदा त्याच्या मेहनत आणि हुशारीने त्याला या व्यवसायामध्ये यश मिळवून दिलं.

हळूहळू त्याला शेतीमध्ये नफा होऊ लागला. आता त्याच्या पुढे ध्येय होते की आपल्याला हाच नफा इतर शेतकरी बांधवांना मिळवून द्यायचा आहे.

याच दृष्टीने पाउले टाकीत २०१४ साली सचिनने Innovative Agrilife Solutions Pvt. Ltd नावाची स्वत:ची कंपनी सुरु केली. या कंपनीची संकल्पना भन्नाट होती.

यामध्ये खरेदीदार आणि शेतकरी यांच्यामध्ये एक करार होतो. ज्या करारानुसार खरेदीदार ग्राहकाला शेती करण्यासाठी येणारा सर्व खर्च पुरवतो. त्याबदल्यात शेतकऱ्याने खरेदीदाराच्या पद्धतीनुसार तो सांगेल ते पिक घ्यायचे.

मालाची किमान किंमत आधीच ठरलेली असते. त्यामुळे जरी बाजारभाव कमी असेल तरी त्याचा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर काहीही परिणाम होत नाही.

===

एवढंच नाही जर बाजारभाव जास्त असेल तर शेतकऱ्याला देखील नफ्यातला काही भाग मिळतो. म्हणजे येथे शेतकरी खुश आणि खरेदीदार पण खुश!

यामुळे शेतकऱ्याला देखील आधुनिक शेतीची माहिती होण्यास मदत होते.

 

sachin-kale-marathipizza02

 

पहिली दोन वर्षे कोणीही व्यावसायिक एखाद्या म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर पैसे लावायला तयार होत नव्हता. पण जेव्हा सचिनने सर्व जबाबदारी स्वत: घेण्याचे आश्वासन दिले तसे हळूहळू लोकांनी या नवीन संकल्पनेमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली.

आज सचिनची ही कंपनी उत्तम सुरु आहे. त्याला ही कंपनी भारतातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्यायची आहे. जेणेकरून त्यांच्या मागचे भोग संपतील आणि ते देखील आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील.

सध्या आपल्या कंपनीमधून आणि शेतीच्या व्यवसायामधून सचिन वर्षाकाठी २ करोड रुपये कमावतो, ज्यासमोर त्याचा २४ लाख रुपये पगार अगदीच नगण्य आहे.

जर तुम्हालाही सचिनच्या या कार्याबदल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही infoagrilife@gmail.com या मेल आयडीवर त्याच्याशी संपर्क साधू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?