ऐकावं ते नवलंच : या गावात नवरदेवाला हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप दिले जातात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोणत्याही समाजात, कोणत्याही देशात लग्न करणं अनिवार्य आहे. म्हणजे सक्ती नसली तरी एक ठराविक वय झालं की नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी “कधी देता लाडू” विचारायला लागतातच.
पूर्वी पंचक्रोशीतील मुलगा, मुलगी बघितली जायची. आपापल्या तोलामोलाची स्थळं पाहून लग्न केलं जायचं. त्यातही मुलगी द्यावी श्रीमंताघरी..आणि सून आणावी गरीबाघरची असा संकेत होता, तो पाळला जायचाच असं नाही. कारण, लग्न हा व्यवहार असला तरी गोष्ट योगाची असते. या लग्नात वरदक्षिणा हा एक भाग असायचा. म्हणजे नवऱ्या मुलाला काही रक्कम किंवा मौल्यवान वस्तू दिली जायची. हीच वरदक्षिणा म्हणजे हुंडा!
हा हुंडा खूप वेगवेगळ्या स्वरुपात असायचा. कधी रोख रक्कम, कधी सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिना. बदलत्या काळात हुंड्याचं स्वरुपही बदलत गेलं. फ्लॅट, गाडी, सोन्याचं कड, लाॅकेट असं काहीही पण महागातलं महाग!
या हुंड्याच्या प्रथेनं खूप मुलींची आयुष्यं उद्ध्वस्त पण केली. कितीतरी गरीब घरातील मुलींची केवळ हुंडा देण्याची परिस्थिती नाही म्हणून लग्नं ठरली नाहीत किंवा मोडली.
या हुंड्याच्या प्रथेनं पुढं इतकं अक्राळविक्राळ रूप घेतलं की पैशाची हाव असलेल्या लोकांनी बिनदिक्कतपणे सुनांचा जीवही घेतला.
पुण्यातील १९८२ साली घडलेलं मंजुश्री सारडा हे प्रकरण याच हुंडाबळीची करुण कहाणी आहे. हुंड्यासाठी लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात सासरच्यांनी मंजुश्रीचा खून केला होता. यावर स्त्री संघटनांनी आवाज उठवला होता.
अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता या हुंडाबळीच्या घटनेनं, इतका की शाळा-शाळांमधून मुलींनी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही अशी शपथही घेतली होती.
–
हे ही वाचा – सडलेले अन्न खाणे ते रोज एक तास रडणे – विविध देशांतील लग्नाच्या “१२ अचाट प्रथा.”
–
अशा वाईट रिती आजही चालू आहेत. आजही या कारणावरुन मुलींचे छळ होतात. कितीतरी आत्महत्या होतात. पण आता आश्चर्य वाटेल अशी एक हुंड्याची पद्धत आहे जी वाचल्यानंतर आयुष्यात कधी कुणी हुंडा घेणार नाही अशी शपथच घेईल.
कार, मोटारसायकल सोनं नाणं, फ्लॅट वगैरे हुंडा म्हणून देतात पण भारतात एके ठिकाणी अजब रीत म्हणजे हुंडा म्हणून २१ विषारी साप दिले जातात!
फुटला ना घाम? हो.. पण ही खरी गोष्ट आहे. खरोखर आपल्या देशात एका समाजात लग्नात मुलीचा बाप हुंडा म्हणून जावयाला २१ विषारी साप देतो. मध्यप्रदेशातील गौरिया या जमातींमध्ये अशी प्रथा आहे.
या समाजात अशी समजूत आहे, जर मुलीसोबत जावयाला साप दिले नाहीत तर मुलीचं लग्न टिकणार नाही. काहीतरी अपशकून होऊन लग्न मोडेल पण साप दिले तर मुलगी सासरी सुरक्षित राहील. तिचं वैवाहिक जीवन सुखी राहील.
गौरिया समाजात मुलीचं लग्न ठरलं की वधुपिता हुंडा जमवायच्या म्हणजे साप पकडण्याच्या कामाला लागतो. तो जर ठराविक वेळेत साप पकडू शकला नाही तर ते लग्न मोडतात.
–
हे ही वाचा – प्रेमाची स्वप्नं पाहताना “या” गोष्टींचा विचार न करता लग्नाच्या बेडीत अडकणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा
–
कोण आहे गौरिया
ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे. आता हे गौरिया समाजातील लोक कोण? हे म्हणजे आपल्याकडं ज्यांना गारुडी म्हणतात ते! सापांचे खेळ दाखवून आपली उपजीविका करणारी ही एक जमात.
पूर्वी खूपदा गारुडी यायचा. शहरातील लोकांना त्याचं किती अप्रूप.. बुट्टीत झाकणाखाली नाग असायचा. बुट्टीचं झाकण काढलं की फणा काढून नाग उभा रहायचा. मग हे गारुडी लोक बीन वाजवून वेगळे वेगळे खेळ करत. लोक पैसे देत. हे दृश्य या पिढीतील मुला मुलींनी पाहिलं नसणार. मागच्या पिढीतील मुलं-मुली या दृश्याची..या खेळाची साक्षीदार आहेत.
हे सापांचे खेळ करणारा गारुडी म्हणजेच गौरिया समाज. थोडक्यात सांगायचं तर हे साप त्यांच्या उपजिविकेचं साधन आहे.
नागपंचमीच्या दिवशी हे लोक नागाचं दर्शन देतात आणि त्यावर पैसे मिळवतात. नागाचं विष काढून विकतात. आणि याचसाठी गौरिया समाजात हुंडा म्हणून २१ विषारी साप द्यायची प्रथा आहे. ज्यामुळे आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित राहील. हे साप मुलीच्या वडीलांनीच गोळा करायचे असतात.
हे साप गोळा करताना सापाच्या सुरक्षेची पण काळजी घेतली जाते. तेही रिवाज अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. हे २१ साप जिवंत असले पाहिजेत.
समजा बुट्टीमध्ये ठेवलेला एखादा साप मेला तर सगळ्या कुटुंबाला मुंडण करावं लागतं. इतकंच नव्हे तर, पूर्ण गौरिया समाजात असलेल्या लोकांना जेवण द्यावं लागतं. त्यामुळे हे लोक केवळ प्रथा म्हणून साप पकडून मोकळे होत नाहीत तर त्यांच्या रक्षणाचीही जबाबदारी घेतात.
गारुड्याचे खेळ ही तशी स्वस्तातली करमणूक. हे लोक नागपंचमीच्या दिवशी नाग दाखवून नागासाठी दूध आणि पैसे गोळा करतील. कधीकधी सापांचे खेळ करतील. पण आता भारतात चालू झालेल्या पशू अधिकार चळवळीमुळे आणि वन्य प्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे हे खेळ आता बंद पडले आहेत.
आता प्रश्न असा आहे, हे खेळ बंद पडले.. पण ही हुंड्याची पद्धत बंद होईल का? आणि समजा ही प्रथा जर आपल्या सुशिक्षित समाजात सुरू झाली तर करेल का कुणी धाडस हुंडा सांगायचं?
वास्तविक हुंड्याची पद्धत इतकी वाईट आहे ती काही ठराविक समाज वगळता आजही सगळीकडे या ना त्या मार्गाने चालूच आहे. ती बंद होणंच गरजेचं आहे. ती बंद करायला हा मार्ग अवलंबायला हरकत नाही..निदान भितीपोटी तरी लोक हुंडा नको म्हणतील!
–
हे ही वाचा – भारतातील या राज्यात ‘किन्नर’ करतात चक्क देवाशी लग्न ते सुद्धा एका दिवसापुरतं!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.