आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मुंबईची ओळख ज्या अनेक कारणांसाठी आहे त्यापैकी एक म्हणजे इराणी हॉटेल्स. मुंबईबरोबरच इतरही काही शहरात ही इराणी हॉटेल्स असली तरीही मुंबईत त्यांची संख्या लक्षणीय आहे. काय आहे इराणी हॉटेल्स किंवा कॅफेचा इतिहास? जाणून घेऊया-
मुंबई आणि इराणी हॉटेल्स हे एक पक्कं समीकरण आहे. पु. ल. देशपांडेंच्या गोष्टींमधून भेटलेली, दिसलेली ही इराणी हॉटेल्स मुंबईकर नसलेल्या प्रत्येकासाठी कुतुहलाची गोष्ट आहे.
अलीकडे पुन्हा एकदा या इराणी कॅफेजची क्रेझ झपाट्यानं पसरत असली, तरीही जुनी आणि टिपिकल लूक, मेन्यू असणारी इराणी हॉटेल्स यांना लोक शोधून शोधून भेट देत असतात.
एक दोन पिढ्यांपूर्वी अगम्य वाटणारा बनमस्का हा पदार्थ आज घराघरात बनू शकत असला तरीही इराणी कॅफेची चव त्याला येत नाही हेच खरं.
कालौघात आज अनेक इराणी कॅफे दुर्दैवानं नष्ट झालेले असले तरीही काही कॅफे आजही जुन्या लूक आणि मेन्युसह उभे आहेत. खादाडांना आणि इतर सगळ्यांनाही भुरळ घालत आहेत.
इराणी कॅफे ही मुळात चालू केली गेली, ती विसाव्या शतकात. ब्रिटिश इंडियातील स्थलांतरित झोराष्ट्रियन इराणी मंडळींनी याची सुरुवात केली. भारतात मुंबई आणि हैद्राबाद येथे या कॅफेजची सुरवात झाली.
त्याकाळी भारतात नवलाईचा इराणी चाय झपाट्यानं लोकप्रिय झाला. १९५० साली संपूर्ण भारतात साधारणपणे ३५० इराणी कॅफे सुरू झाले होते. यापैकी आज अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिल्लक आहेत.
या कॅफेजचं रुप सर्वत्र सारखंच असायचं. उंच छताची हॉटेल्स, काळ्या, पांढर्या चौकड्यांची फरशी असलेली जमीन, मार्बलचा टॉप असणारी लाकडी टेबल्स आणि वेताच्या किंवा लाकडाच्या खुर्च्या, टेबलवरचा लाल-पांढर्या चौकड्यांचा टेबलक्लॉथ, काऊंटरवर कुकिज, बिक्सिट, केक असलेले भले मोठे काचेचे जार, भिंतीवरचे भले मोठे आरसे आणि या सगळ्यासोबत बोलबच्चन असा मालक.
प्रत्येक गिर्हाईकाशी प्रेमळ संवाद साधत, त्याची ऑर्डर घेणारा आणि ती तात्काळ देणारा असा डोक्यावर टोपी आणि अंगात बंडी बनियन असलेला पारसी हेलात बोलणारा मालक सर्वांचा लाडका असे. आज इराणी हॉटेलची उंच छतं गायब झालेली आहेत, आता मालक गप्पा मारत नाही त्याऐवजी आदबशिर वेटर्स ऑर्डर घेतात. बाकी लूक, जामानिमा तोच असतो.
याशिवाय आणखी एक काळाच्या ओघातही न बदललेली किंवा अट्टाहासानं जपलेली गोष्ट म्हणजे पदार्थांची चव. ती मात्र पिढ्यानुपिढ्या तीच आहे.
पानी कम चाय हा वाक्प्रचार आपण सर्रास वापरतो. गंमत म्हणजे, इराणी हॉटेल्सची हा पानी कम चाय खासियत आहे. पाणी अगदी कमी असलेला कडक चहा!
खारी चाय (एकदम कडक चहा) , मटण सामोसा, खिमा पाव, अकुरी (स्क्रॅब्मल्ड एग आणि भाज्या), बेरी पुलाव, व्हेजिटेबल पफ, तूर डाळीत मांस किंवा भाज्या घालून केलेला शाकाहारी किंवा मांसाहारी धनसाक, मऊ लुसलुशित बन मस्का किंवा थोडा कडक असा ब्रुन मस्का, चेरी क्रिम कस्टर्ड, चीज खारी बिस्कुट, प्लेन खारी बिस्कूट, कोकोनट जाम आणि मिल्क बिस्कूट आणि सगळ्यात मोठी खासियत असणारं रास्पबेरी ड्रिंक. वर्षानुवर्षं इराणी हॉटेल्स/ कॅफेजमध्ये हा लोकप्रिय असणारा मेन्यु आहे.
मुंबईतल्या धोबी तलाव येथील कयानी ॲण्ड सन्सला ११५ वर्षांचा इतिहास आहे. या कॅफेमध्ये राज कपूर हे शुटिंगला जाण्यापूर्वी नाष्ट्यासाठी नियमितपणे येत असत.
या कॅफेमध्ये घडलेली एक रोमँटिक अशी गोष्टही आहे. आज या कॅफेचे मालक असणारे फारुक शोक्री सांगतात, की त्यांच्या आजोबांनी त्यांच्या आजीला याच कॅफेमध्ये इराणी चहा देत लग्नासाठी मागणी घातली होती आणि आजीनंही लाजत लाजत लग्नाला होकार दिला होता.
यादझी बेकरी किंवा सस्सानिआन कंपनीसारखी एकेकाळी पारसी खाद्यपदार्थांसाठी प्रचंड लोकप्रिय असणारी इराणी हॉटेल ही काळाच्या ओघात तोट्यात गेल्यानं बंद पडली. या हॉटेलचे मालक परवेझ पटेल यांना व्यवसायात आलेल्या नुकसानानं खचवलं आणि त्यांच्या पुढील पिढीनं या व्यवसात स्वारस्य न दाखवल्यानं ही हॉटेल बंद पडली.
–
हे ही वाचा – या १६ हॉटेल्सचं स्वातंत्र्यपूर्व भारताशी आहे एक अपूर्व, अनोखं नातं…
–
काही इराणी मंडळींनी काऊंटरवर बसून टिपिकल पारसी हेलामध्ये आवाजातल्या ऑर्डर्स स्वयंपाकघरात पोचवण्याण्याऐवजी उच्च शिक्षण घेत परदेशातली मोठ्या पगारांची करियर्स निवडली. पुढच्या पिढीतली उच्चशिक्षित मंडळी हॉटेल्स बंद करून कायमची परदेशात स्थायिक झाली.
कोहिनूरच्या ब्रिटानिया आणि कंपनीसारखी हॉटेल्स मात्र या परिस्थितीला अपवादही ठरली आणि नशीबवानही निघाली. आज यांची चौथी पिढीही याच व्यवसायात आहे आणि हा वारसा अधिकाधिक समृद्धपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. पर्शियन मेहमान नवाझी आणि पर्शियन खाद्यसंस्कृती आजही या ठिकाणी जपली जाते.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हॉटेल ताजसोबत आणखी एक नाव चर्चेत आलं आणि ते म्हणजे कुलाब्याचं कॅफे लिओपोल्ड! साधारण दीडशे वर्षं जुनं असं हे १८७१ साली बांधलेलं हॉटेल आहे.
शेरजाद दस्तूर या इराणी इसमानं हे हॉटेल बांधलं. गंमत म्हणजे याची सुरवात हॉटेल म्हणून झालेली नव्हती, तर कुकिंग ऑईलचं होलसेल दुकान म्हणून झालेली होती. याचबरोबर बदलत्या काळानुसार, फार्मसी आणि रेस्टॉरंट असं त्याचं रूप बदलत गेल्यानं त्याचं नाव लिओपोल्ड कॅफे ॲण्ड स्टोअर्स असं आहे.
बॉम्बहल्ल्या होण्यापूर्वीपर्यंत परदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणून याची ओळख होती. आजही उत्तम चालणारे असे जे काही मोजके इराणी कॅफे आहेत त्यापैकी हा एक आहे.
मुंबईबरोबरच पुण्याच्या खाद्यसंस्कृतीतही इराणी हॉटेलला खास स्थान आहे. कोणे एकेकाळी गोर्या साहेबाचं लाडकं ठिकाण असणारं दिराबजी ॲण्ड सन्स हे हॉटेल.
सोराबजी दोराबजी हा इराणी ईसम सुरवातीच्या काळात पुण्याच्या कॅम्प परिसरात बनमस्का आणि इराणी चहा विकत असे. याचे हे पदार्थ इतके लोकप्रिय होते, की गोर्या साहेबासोबतच स्थानिक लोकांतही तो लोकप्रिय होता. या लोकप्रियेतेपायी आणि खास लोकग्राहस्ताव दोराबजीनं उपहारगृह अर्थात रेस्टॉरंट उभं केलं.
या उपहारगृहाची खासियत म्हणजे त्याकाळात ब्रिटिश जेवायला जात त्या उपहारगृहात भारतीयांना प्रवेश नसायचा, मात्र हे उपहागृह त्याला अपवाद ठरलं. त्यानं आपली दारं भारतीयांसाठीही खुली केली.
आज जवळपास शंभरी ओलांडून पुढे आलेलं दोराबजी चौथ्या पिढीतही तितकंच लोकप्रिय आहे. भारतातील अनेक जुन्या पारसी-इराणी हॉटेलपैकी हे एक आहे. याशिवाय गुडलक हे १९३५ साली चालू झालेलं इराणी हॉटेल पुण्याचा लॅण्डमार्क समजलं जातं.
इराणी हा भारतीय उपखंडातील इथ्नो रिलिजस असा समाज आहे. ब्रिटिश इंडियाच्या कालखंडात स्थलांतरित झालेला हा समाज झोराष्ट्रियन्स म्हणून परिचित असला तरीही अनेकदा इराणी आणि पारसी यांच्यात गल्लत केली जाते.
विशेषत: इराणी कॅफे पार्सी लोकांचे आहेत असा आजही समज आहे. वास्तवात पार्सी आणि इराणी दोघेही झोराष्ट्रियन्स असले तरीही या दोघांतही सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक खूपच फरक आहे.
इराणी भारतात आले त्याही आधी बराच काळ पारसी ग्रेटर इराणमधून भारतात स्थलांतरित झालेले होते. अनेक इराणी हे आजही पारसी आणि दारी बोलतात. या दोन समाजात अंतर्गत होणारे विवाह आता वाढले आहेत. इराणी हे generic surname म्हणून वापरण्याची पध्दत प्रचलात आहे. भारतातील नामवंत इराणी म्हणजे-
अर्देशर इराणी, अरूणा इराणी, बख्तियार इराणी, बोमन इराणी, फिरोज इराणी, इंद्र कुमार (अरूणा इराणी यांचे बंधू), डेझी इराणी, सी. आर, इराणी, देलनाझ इराणी, फरूद्दीन इराणी, हनी इराणी, जेनी इराणी इत्यादी.
===
हे ही वाचा – तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.