Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा : निरोगी आयुष्य सहज जगता येतं, हे पटवून देणारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही कथा आहे एका चौकोनी कुटुंबाची; आई-वडील आणि त्यांची दोन मुलं असं ‘हम दो हमारे दो’ या संकल्पेनेत चपखलपणे बसणारं कुटुंब!

ऐन तारुण्यात असलेली कन्या आणि तिचा दादा, अनेक वर्षं रोजीरोटीसाठी नोकरी करून आता निवृत्तीनंतरची सेकंड इनिंग अनुभवत असलेले बाबा आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी, आजही घरात राबत असलेली गृहिणी म्हणजेच दोन तरुणांची माता, असे चार जण या कुटुंबाचे सदस्य होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

निवृत्तीनंतर हमखास वास्तव्याला येणारा पाहुणा म्हणून मधुमेहाने सुद्धा हजेरी लावली होती. सुंदर आणि सुखी आयुष्य जगत होतं हे कुटुंब. चौघांना आरामदायक ठरेल आणि सामान व्यवस्थित ठेवता येईल अशी चारचाकी, दोन दुचाकी अशा सगळ्या सोयीसुविधाही घरात होत्या.

असं सुखासमाधानाचं आयुष्य सुरु असताना कुटुंबप्रमुखाच्या आयुष्यात हायपरटेन्शनने एंट्री घेतली. कुटुंबातील सगळ्यांचंच टेन्शन वाढलं.

आजारपण आलं म्हणजे डॉक्टरकडे धाव घेणं आलंच. कुठल्याही सामान्य कुटुंबाने जे केलं असतं तेच या कुटुंबाने केलं. कुटुंबप्रमुख डॉक्टरांकडे निघाले.

 

 

जवळपास पाऊणतास वाट पाहिल्यावर डॉक्टरांची भेट झाली. त्रासातून बाहेर पडण्यासाठी औषधं घ्यावी लागतील, असं सांगून डॉक्टरांनी ५-६ गोळ्या लिहून दिल्या. महिनाभर तरी त्या गोळ्या घेण्याशिवाय आता पर्याय नव्हता.

आजच्या पेशंट्सच्या यादीत पहिला क्रमांक असूनही डॉक्टरांची भेट होण्यासाठी पाऊण तासाचा वेळ का गेला, या प्रश्नाचं उत्तर मात्र थोडंसं आश्चर्यकारक ठरलं. ती डॉक्टरांची योगासनं करण्याची वेळ होती. गेली वीस वर्षे सातत्याने योगासनं आणि प्राणायाम करत असलेले डॉक्टर आजही ‘फिट अँड फाईन’ होते.

आपल्याला महागडी औषधं घ्यायला सांगणारे डॉक्टर स्वतः मात्र औषधांपासून दूर आहेत, हे लगेचंच त्यांच्या लक्षात आलं. चार दिवसांतच औषधांचा परिणाम दिसून आला. तब्येतीत सुधारणा झाली. असं असूनही आणखी काही काळ काळजी घ्यावीच लागणार होती. कुटुंबातील सगळीच मंडळी या कामात व्यस्त होती.

 

 

एकूणच कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणाचा तणाव आणि घरचं सगळं बघणं, याचा घरातील गृहिणीवर व्हायचा तो परिणाम झालाच. डोकेदुखीच्या त्रासाने त्याचं डोकं वर काढलं.

मध्यमवर्गीय कुटुंबाबतील व्यक्तीचा डोकेदुखीच्या त्रासावरील उत्तम उपाय म्हणजे डोकेदुखी थांबवणाऱ्या गोळ्या घेणं. मेडिकलमध्ये जाऊन या गोळ्या आणायची जबाबदारी घरातील मोठ्या मुलाने घेतली.

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : कथा वाचल्यानंतर तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल…

या गोळ्या घेऊन येताना, दुकानाचे मालक दिसले नाहीत म्हणून त्यांची चौकशी मुलाने केली. ‘डोकेदुखीचा त्रास कमी व्हावा म्हणून मालक दालचिनी आणि सुंठेचा काढा प्यायला घरी गेलेत साहेब’ असं नोकराने दिलेलं उत्तर विचारात पाडणारं होतं.

याच गोष्टीचा विचार करत तो गोळ्या घेऊन घरी आला. या गोळ्यांच्या प्रभावाने डोकेदुखी थांबली, तरी आईच्या डोक्याचा व्याप थोडीच कमी होतोय.

जिममध्ये जाऊन व्यायाम करून, बॉडी बिल्डिंग करण्याची इच्छा असलेला तरुण मुलगा आणि मॉडेलिंग करू इच्छिणारी तरुणी घरात असताना, आईचं डोकं शांत कसं राहणार!

जिम ट्रेनरने मुलाला खास विदेशी दूध पिण्यास सांगितलं होतं. हे दूध अख्ख्या पंचक्रोशीत फक्त एकाच ठिकाणी मिळत असे. या डेअरीत दूध आणायला गेल्यावर, शेकडो जर्सी गाईंच्या ताफ्यात त्याने, हिरवा चार खात असलेल्या दोन भारतीय गाई बघितल्या.

 

 

या गाई तिथे असण्याबद्दल त्याने विचारणा केली. सगळ्यांना जर्सी गाईचं, विदेशी दूध सोन्याच्या भावाने विकणारे डेअरीचे मालक स्वतः मात्र साधंसुधं देशी दूध पीत असत. कुलदीपक पुन्हा विचारात पडले.

अशीच काहीशी स्थिती कन्यारत्नाची सुद्धा होती. हेअर स्पा आणि फेशियल करून घेण्यासाठी त्या ब्युटीपार्लरला गेल्या. तिथे स्पा करणाऱ्या ताईच्या केसांचा सुगंध उत्तम होता. त्याबद्दल विचारणा केल्यावर असं कळलं, की त्या केसांना खोबरेल तेल आणि कापूर यांचं मिश्रण लावल्यामुळे केस सिल्की होतात. चेहरा उत्तम राहण्यासाठी सुद्धा या ताई  नैसर्गिक फेसपॅक वापरत असत.

महागडी हेअर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा घरच्याघरी केस आणि चेहरा यांची काळजी घेता येऊ शकते, हा धडा कन्यारत्नाने सुद्धा घेतला.

या सगळ्याच प्रसंगांबद्दल चौघांनी घरी चर्चा केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की चांगलं आरोग्य राखण्यासाठी केवळ महागड्या गोष्टींची आवश्यकता नाही.

त्यानंतर मग सगळ्यांचंच ठरलं आणि कुटुंबप्रमुखाने योगासनं सुरु केली, चिरंजीवांनी देशी गाईचं दूध आणि साजूक तूप खायला सुरुवात केली, आईने वेगेवेगळ्या आजारांवर उपलब्ध असलेले आयुर्वेदिक उपचार शोधून काढले आणि कन्यारत्न सुद्धा सोशल मीडियावर चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठीचे उपाय शोधून काढायला सुरुवात केली.

 

 

थोडक्यात काय, तर सगळ्यांनीच महागडे उपाय बाजूला सारले आणि निरोगी आयुष्याकडे वाटचाल केली.

या चौकोनी कुटुंबाच्या गोष्टीचं तात्पर्य हेच, की निरोगी आणि सुखकर आयुष्य जगण्यासाठी केवळ  महागड्या गोष्टींची गरज नसते. सहज प्राप्त होणाऱ्या आणि स्वस्त असलेल्या गोष्टी सुद्धा गुणकारी ठरतात.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : शक्तीपेक्षा “श्रद्धा” श्रेष्ठ! आयुष्यात ‘गुरूं’चं महत्त्व स्पष्ट करणारी कथा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version