' आळसाची सुट्टी: जीवनाला कलाटणी देणारी ही संकल्पना समजून घेणं अत्यावश्यक आहे! – InMarathi

आळसाची सुट्टी: जीवनाला कलाटणी देणारी ही संकल्पना समजून घेणं अत्यावश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सगळ्या लोकांचं एकच साधं आणि छान स्वप्न असतं. एक दिवस अगदी लोळत काढावा. कुणी लवकर उठ..लवकर आवर इकडं जायचं आहे..तिकडं चल असं म्हणणारं कुणी नसावं!

हे काम आहे, ते काम आहे ही भुणभुण मागं नसावी..एक दिवस असाही आरामशीर घालवावा. स्वर्ग कुठं असेल तर तो इथंच आहे! इथंच आहे!! इथंच आहे!!! पण हे शक्य होतं का हो?

 

holiday inmarathi

 

नोकरी करणाऱ्या स्त्रीयांना मिळणारा सुट्टीचा एकमेव दिवस म्हणजे हाराकिरीचा दिवस. एकाच दिवशी भाजी आणायची, निवडून जागेवर ठेवायची, जास्तीचे कपडे धुवायचे, मुलांसाठी वेगळी डिश करायची घराची साफसफाई करायची, काय काय म्हणून करायचं?

पुन्हा सोमवारी ड्यूटीवर हजर व्हायचं! एकंदरीत काय आराम हराम आहे हेच सूत्र आजवर सगळे लोकं पाळत आले आहेत. पण आजकाल एक नवा फंडा वापरला जातो आहे. सुट्टी म्हणजे केवळ सुट्टी, नो काम..ओन्ली आराम!

जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. आपल्याकडं नोकरी म्हणजे ठराविक वेळेतच, ठराविक क्षेत्रात, ठराविक अंतरावर असा एक चाकोरीबद्ध साचा तयार होता.

पण आयटी युग अवतरलं आणि आयटीतले लोक ऐटीत राहू लागले. बेदम काम, भरपूर पगार..पाच दिवसांचा आठवडा. शनिवार रविवार हे विकएंड. मग या दोन दिवसांत पाच दिवस केलेल्या कामाचं, त्यामुळं झालेल्या शारीरिक मानसिक दमणुकीचं उपटं काढायचं म्हणून फक्त आणि फक्त आराम करायचा.

===

हे ही वाचा यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य!

===

ही गोष्ट आपल्या लोकांना पचनी पडायला कठीण आहे. कारण ‘लवकर निजे लवकर उठे त्याला ज्ञान आरोग्य संपत्ती मिळे’ असं मानणारी आपली संस्कृती!

 

indian guy sleeping inmarathi

 

गेली कित्येक वर्षे.. कित्येक पिढ्या आपल्याकडं याच न्यायानं राबल्या, शिकल्या, मोठ्या झाल्या! पण हा उशिरा उठायचा मंत्र काही आपल्याकडं झेपत नाही.

या उशीरा उठण्याची, नाष्टा करायची वेळ जेवायची वेळ आळसात दिवस घालवणं याची तुच्छतेने चेष्टा केली जाते.

सुट्टी असताना दिवस कामात न घालवता लोळणं, संध्याकाळी केवळ भटकायला बाहेर पडणं हे न रुचणारंच आहे. कितीतरी वेळा आपल्याकडं असं म्हणणाऱ्या बायका पण आहेत, सुट्टी असली तरी लवकर उठून लवकर आवरा म्हणजे धुणं भांडी आवरता येतील. दिवसभर त्याच कामात अडकून पडायला होतं. विश्रांती म्हणून मिळत नाही.

मग नंतर लोळत पडा.. पण हे ऐटीत राहणारे लोक काही ते मानत नाहीत. शनिवार रविवार हक्काचे सुट्टीचे दिवस. त्याची तयारी शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू करतात. रात्री उशिरापर्यंत जागरण करायचं.. मग आपोआपच शनिवारी सकाळी उठायला उशीर होतो. सकाळी अकरा बारा वाजता उठायचं, नाश्ता एक वाजता करायचा!

जेवण तीन चार वाजता करायचं.‌ संध्याकाळी गाडी घेऊन फिरायला बाहेर पडायचं.. शनिवारी रात्री पण उशीरापर्यंत बाहेर जायचं, रविवारी अगदी शनिवारची पुनरावृत्ती. मग निवांतपणे घालवलेला रविवार आणि सोमवारी मस्त रुटीन चालू.

ही लाईफस्टाईल आपल्याला पटते का? याचं उत्तर नाही असंच आहे! पण यावर झालेल्या चर्चा काही वेगळंच सांगतात बरं का!

उशीरा उठणं, दिवस आळसात घालवणं योग्य आहे असं डॉक्टरांपासून अभ्यासकांपर्यंत अनेकांकडून सांगितलं आहे. हे संशोधन सांगतं की एक दिवस स्वतःला आळशीपणा करायची परवानगी द्या. काय आहेत ही कारणं?

 

१. शारीरिक विश्रांती –

 

relax inmarathi

 

सर्वसाधारणपणे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कामाचा अतिशय ताण असतो. कामाचे तास अनियमित असतात. दिलेली टार्गेट्स पूर्ण करायची असतात. यासाठी वेळेचंही बंधन नसतं. मग जी शारीरिक मानसिक दमणुक होते ती खूप जास्त प्रमाणात असते.

मग शरीराला, मनाला विश्रांतीची सक्त गरज असते. या विश्रांतीमुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. मनावर आलेला ताण काही अंशी कमी होतो. भरपूर झोप ही आरोग्यासाठी अतिशय चांगली असते.

भरपूर आणि शांतपणानं घेतलेली झोप ही तुम्हाला पुढं कामाला ऊर्जा देते. अंथरुणात पडून राहील्यानं स्नायू आणि हाडांना व्यवस्थित विश्रांती मिळते.

 

२. मानसिक विश्रांती –

 

peaceful mind inmarathi

 

शरीराच्या विश्रांती इतकीच मनाला विश्रांतीची पण गरज असते. या विश्रांतीनंतर मनही अतिशय ताजतवानं होतं, टवटवीत होतं. पुढं येणारी आव्हानं नव्या दमानं पेलायला मानसिक ताकद लागते ती पण या विश्रांतीमुळे मिळते.

या विश्रांतीचा एक फायदा असा होतो, जे मानसिक ताण तणाव असतात त्यापासून काही काळ तरी सुटका होते. विश्रांतीनंतर यातील काही अडचणींवर आपल्याला एखादा उपायही सापडतो.

 

३. कल्पकतेचे उगमस्थान –

 

innovative idea inmarathi

 

मानवी मन हे एक मोठी गुहा आहे, अलिबाबाची गुहा! जिथं अनेक कल्पना नवनवीन प्रयोग करण्याच्या उर्मी मनमुक्तपणे बागडत असतात. पण या कामाच्या धबडग्यात, वाढलेल्या ताणतणावाच्या दबावाखाली त्या दबून गेलेल्या असतात.

या उर्मीला बाहेर काढण्यासाठी मनाची विश्रांती अजून एक चांगला उपाय आहे. या विश्रांतीमुळे मनावर असलेलं दडपण, दबाव यांना आपण बऱ्याच अंशी सांभाळू शकतो.

===

हे ही वाचा पैसा कमवायला फार काही नको, तुमच्यामध्ये हवे हे फक्त १२ गुण!

===

काही वेळा व्यावसायिक, मानसिक शारीरिक आर्थिक ताण तणाव यांना हीच विश्रांती औषध ठरते. मानसिक आरोग्य हीच विश्रांती सुधारायला उपयोग ठरते. काही वेगवेगळ्या कल्पना याच विश्रांतीच्या काळात सुचू शकतात.

 

४. ताणतणावांचं व्यवस्थापन –

 

Stressed corporate job Feature Inmarathi

 

सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे म्हणतात. पण हा विश्रांतीचा दिवस त्या दुःखाकडंही बघायचा दृष्टिकोन बदलू शकतो. सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस केलेलं प्रचंड काम तुम्हाला इतर कोणताही आनंद मिळू देत नाही.

कारण आनंद झाला तरी तो बघयला पण वेळ नसतो तुमच्याकडून. पण या दोन दिवसांत सिनेमाला जाणं, बाहेरचं खाणं, जवळपासच्या एखाद्या ठिकाणी वेळ घालवणं, ज्याला क्वालिटी टाईम असं म्हणतात यानं वेळ चांगला जातोच पण स्ट्रेस मॅनेजमेंट हा भागही आपसूकच होतो.

 

५. आत्मपरीक्षण –

 

self complex inmarathi

 

जेव्हा आपलं मन शरीर निवांत असेल तर त्यादरम्यान आपल्याला आत्मपरीक्षण करता येते. आपल्या वागण्याची परीक्षा इतरांपेक्षा आपणच जास्त उत्तम रितीने करु शकतो. या विश्रांतीनंतर आपलं मन अगदी फ्रेश होतं. कधी कधी आपणही ताणतणावाच्या भरात काही चुकीचं वागतो, बोलतो, कुणाकुणाला कळत नकळत दुखावतोही.

पण या दरम्यान आपल्याला तीही संधी मिळते आपण आत्मपरीक्षण करु शकतो. चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेऊ शकतो. स्वतःमध्ये योग्य आणि चांगले बदल करु शकतो.

हे सारं काही या विकएंड मध्ये केलेल्या आऊटिंगचा, विश्रांतीचा परीणाम असतो. म्हणजेच हे आळसावणं, आराम करणं चांगलं आहे, पटलं ना?

===

हे ही वाचाखरं वाटणार नाही, पण यशस्वी लोकांना कायम भीती वाटते! कशाची? वाचाच

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?