घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बांधकाम क्षेत्र हे खूप स्पर्धेचं आहे हे आपण सगळेच जाणतो. रोज नवनवीन पद्धतीने कोणतेही घर, दुकान, जागा विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी येणाऱ्या जाहिराती आपण बघतच असतो.
पहिला फ्लॅट घेतांना लोकांना या पूर्ण प्रक्रियेबद्दल फार कमी माहिती असतं. कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.
साधारणपणे दहा-पंधरा वर्ष काम केल्यानंतर बरेच जण दुसऱ्या फ्लॅटचा, एक तर मोठं घर म्हणून विचार करतात किंवा अतिरिक्त असलेले पैसे गुंतवणूक करण्यासाठी पर्याय निवडत असतात.
आपल्याला बऱ्याचवेळा असं वाटतं, की केवळ घर विकत घेण्यासाठी बराच मोठा प्रवास करावा लागतो. पण ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त फ्लॅट आहेत त्यांच्या समस्या अजून वेगळ्याच असतात. विशेष करून त्यावेळेस जेव्हा लोक परदेशात नोकरीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी जातात.
प्रॉपर्टीची तेव्हा कोण काळजी घेणार? तुम्ही रहात असता तोपर्यंत ते तुमचं घर असतं, रहात नसल्यावर ती फक्त एक ‘प्रॉपर्टी’ असते. त्याची एक वास्तू होते, ज्याची देखभाल करण्यासाठी तुम्हाला तरतूद करावी लागते.
‘तनुज शोरी’ या भारतीय तरुणाला असाच प्रश्न पडला होता. ते परदेशात स्थायिक झाले होते त्यावेळी त्यांनी विचार केला, की त्यांच्या मुंबईतील घराची काळजी कोण घेणार? भाडेकरू कोण शोधणार? दरवर्षी करार कोण करणार किंवा नवीन भाडेकरू कोण शोधून देणार?
तनुज शोरी यांना असं वाटलं, की हे प्रश्न कित्येक भारतीयांना पडत असतील जे परदेशात स्थायिक आहेत. तुम्ही किती दिवस नातेवाईकांना या कामाला लावणार? त्यांनी या प्रश्नांकडे एक व्यवसायिक संधी म्हणून बघितलं.
परदेशातील भारतीयांसाठी ‘प्रॉपर्टी मॅनेजमेंट’ करणारी एक कंपनी सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं आणि २०१३ मध्ये ‘स्क्वेअर यार्ड्स’चा जन्म झाला.
एकाच वेळी भारत, गल्फ, अमेरिका या ठिकाणी शाखा सुरू करणारी बहुधा ही पहिलीच स्टार्टअप कंपनी असावी. आज स्क्वेअर यार्ड्सचा व्यवहार १० देशांमध्ये सुरू आहे. ज्यामध्ये भारत, युएई, हाँग काँग, सिंगापोर, लंडन, ऑस्ट्रेलिया, कतार, ओमान, अमेरिका आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे.
–
हे ही वाचा – परदेशात अब्जावधी कमावत असूनही भारतीयांना नोकरी देणारा ‘दिलदार मनाचा माणूस’!
–
‘स्क्वेअर यार्ड्स’मध्ये ३ हजारपेक्षा जास्त लोक काम करतात, ज्यामध्ये बहुतांश लोक हे भारतीय आहेत. मुंबईतील एका तरुणाच्या जागतिक रियल इस्टेट क्षेत्रात झालेल्या या प्रगतीचं सध्या बिजनेस जगतात कौतुक होत आहे.
कोण आहेत तनुज शोरी?
मुंबईत एका मध्यमवर्गीय घरात जन्म झालेल्या तनुज यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनौमधून MBA चं शिक्षण घेतलं. करिअरच्या सुरुवातीला तनुज यांनी ८ वर्ष स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक, लेहमन ब्रदर्स आणि नोमुरा या तीन ठिकाणी काम केलं.
शेअर मार्केटसाठी काम करत असतांना, भारतीय आणि अमेरिकन मार्केटचा म्हणजेच लोकांच्या कोणत्याही वस्तू किंवा सेवा खरेदी-विक्री करण्याच्या पद्धतीचा त्यांनी जवळून अभ्यास केला.
आपल्या शिक्षणात नेहमीच अव्वल असलेले तनुज हे नोकरीमध्ये सुद्धा तितकेच लक्ष केंद्रित करून काम करणारे होते. ‘नोमुरा’ या जपानच्या कंपनीत अल्पावधीतच एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती.
‘स्क्वेअर यार्ड्स’ नेमकं काय करते?
तनुज शोरी आणि त्यांची पत्नी कनिका शोरी हे हॉंगकॉंगमध्ये नोकरी करत होते. भारतात एक फ्लॅट घ्यायचा त्या दोघांनी विचार केला. फ्लॅट विकत घेण्यासाठी ब्रोकर शोधताना झालेला त्रास त्यांनी लक्षात ठेवला. बिल्डरने फ्लॅटची ठरवलेली किंमत आणि ग्राहकांपर्यंत येणारी रक्कम यामध्ये त्यांना खूप तफावत दिसली.
आपल्याला एक घर विकत घेण्यासाठी झालेला त्रास इतर अनिवासी भारतीयांना होऊ नये या उद्देशाने शोरी दाम्पत्याने एक ‘बिजनेस मॉडेल’ तयार केलं.
ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा स्वतःचं घर भाड्याने द्यायचं आहे ते लोक एक करार करून ‘स्क्वेअर यार्ड्स’ला ते काम सोपवणार. त्यासोबतच, जे लोक स्वतः बिल्डर आहेत त्यांना घर विक्रीसाठी ‘स्क्वेअर यार्ड्स’ आपली सेवा देईल आणि वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिकांचा फायदा होईल हे सुद्धा बघेल.
घर शोधणाऱ्या व्यक्तीला ते कमी वेळात मिळेल आणि ज्याला आपली प्रॉपर्टी विकायची आहे त्याला लवकर ग्राहक मिळेल हा उद्देश समोर ठेवून ही संकल्पना सुरू करण्यात आली.
घर घेतांना कोणत्याही व्यक्तीला खूप प्रश्न असतात आणि प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला बिल्डरला वेळ नसतो. तेव्हा ‘स्क्वेअर यार्ड्स’ हे मध्यस्थ म्हणून तुमच्या शंकांचं निरसन करतात.
भारताबाहेरील बांधकाम, खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अल्पावधीतच ‘स्क्वेअर यार्ड्स’ आज प्रमुख संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
दुबईमधून सुरुवात झालेल्या या प्रवासात ज्या देशात बरेच भारतीय आहेत, जसे कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादीसारख्या देशातील लोक हे ‘स्क्वेअर यार्ड्स’कडे एक भारतीय कंपनी म्हणून बघतात आणि त्यांना जगात कुठेही घर किंवा जागा विकत घ्यायची असेल तर त्याची माहिती लोकांना आपल्या भाषेत ऐकायला मिळते जी की अनिवासी भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट आहे.
प्रत्येक देशातील व्यवसाय विस्तारात भारतीय तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देणं ही बाब तनुज शोरी यांनी केली. ही बाब त्यांना अजून लोकप्रिय बनवते.
‘स्क्वेअर यार्ड्स’ने अल्पावधीतच ‘स्क्वेअर ग्लोबल’ आणि ‘स्क्वेअर कॅपिटल’ या दोन कंपन्यांची स्थापना केली. आज स्टॉक मार्केटमधील आर्थिक गुंतवणूकीसाठी सुद्धा कमीत कमी दरात योग्य ते मार्गदर्शन करत आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून त्यांनी ग्राहकांची माहिती एकत्रित ठेवण्यासाठी तयार केलेलं CRM हे त्यांच्या प्रगतीला मदत करणारं होतं असं तनुज शोरी यांचं म्हणणं आहे.
–
हे ही वाचा – लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय !
–
२०१९ मध्ये ‘स्क्वेअर यार्ड्स’ ही अशी एकमेव कंपनी होती ज्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना ‘यमुना एक्सप्रेसवे’च्या लगत तयार होणाऱ्या बांधकामात गुंतवणूक करण्यास योग्य ती मदत केली.
एकूण ५५० करोड रुपयांच्या गुंतवणुकीपैकी ४०% गुंतवणूक परदेशातील नागरिकांनी केल्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुडगावमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक करण्यात यश मिळवणे ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे.
एकाच ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला घर शोधण्यापासून ते गृहकर्ज, ताबा आणि पुढे गरज असल्यास भाड्याने देणे हे सर्व सहज शक्य असल्याने या ग्रुपला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे असं म्हणता येईल.
आज कित्येक नवीन स्टार्टअप उदयास येत आहेत आणि लोकांना सहज सेवा पुरवत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मदत होत आहे. मोबाईल ऍप्लिकेशनवर जगभरातील बांधकामांची यादी, माहिती क्रमांक, बुकिंग करण्याची सोय, ऑफर्स यामुळे ग्राहकांना ‘स्क्वेअर यार्ड्स’मुळे सोय झाली आहे.
या कंपनीने भारतात मुंबई, अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, जयपूर, हैद्राबाद, कोलकत्ता, नोएडा, पुणे, विशाखापट्टणम, विजयवाडा या प्रमुख शहरात आपले ऑफिस सुरू केली आहेत.
तनुज शोरी यांना बांधकाम क्षेत्रातील आपला व्यवसाय कुशल योगदानासाठी ‘प्रॉप टेक कंपनी ऑफ द इयर’ या पुरस्काराने २०१९ मध्ये गौरवण्यात आले आहे.
‘स्क्वेअर यार्ड्स’चा उल्लेख आशियात सुरू झालेल्या आणि युरोप, अमेरिकामध्ये सुद्धा कार्यरत असलेल्या १०० यशस्वी स्टार्टअपमध्ये सुद्धा नुकताच करण्यात आला आहे.
सिलिकॉन इंडिया या संस्थेने ‘स्क्वेअर यार्ड्स’ला २०१८ मधील ‘काम करण्यास सर्वात चांगली स्टार्टअप कंपनी’ या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. हा पुरस्कार कंपनीच्या टेक्नॉलॉजीचा वापर, उत्तम ग्राहक सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्राला आकार देण्याचा प्रयत्न यासाठी देण्यात आला आहे.
२०२० मध्ये तनुज शोरी यांनी ‘अझुरो’ या मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कंपनीला विकत घेतले. त्यासोबतच, २०१५ मध्ये ‘रिअलायझिंग’ आणि ‘लुक्स’ ह्या प्रॉपर्टी वेबसाईट सुद्धा आपल्या ताफ्यात शामिल करून घेतल्या आहेत.
२०१५ मध्येच ‘स्क्वेअर यार्ड्स’ने ‘ओरिडेन टेक लॅब्स’ ही अहमदाबाद ची कंपनी विकत घेतली ज्यांच्याकडून 3D डिझाईन्स हे तंत्रज्ञान त्यांनी आपल्या प्रॉपर्टी लिस्टिंगमध्ये वापरण्यास सुरू केलं.
‘ब्लिंग’ ही इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी सुरू करून तनुज शोरी यांनी प्रॉपर्टी संदर्भातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना ग्राहकांशी आणि बिल्डर मंडळींसोबत सतत संपर्कात राहण्याचं एक माध्यम मिळालं.
भारतीय व्यक्तीने केलेली ही प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. काही लोकांना हा लेख ‘स्क्वेअर यार्ड्स’ प्रायोजित असा वाटू शकतो. पण, तसं नाहीये, हा लेख केवळ माहितीपर आणि एका भारतीय उद्योजकाचं आम्ही केलेलं कौतुक आहे.
===
हे ही वाचा – यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.