आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका : मानसी चिटणीस, पुणे
===
फेब्रुवारी महिना हा युरोपमध्ये तसा रोमान्सचा महिना मानला जातो. तेथील पशू-पक्षांचा देखील तो समागमाचा महिना असल्यामुळे निसर्गातही सर्वत्र वातावरण प्रणयासक्त असते. रोमियो ज्युलिएट, हिर रांझा, सोनी महिवाल अशी प्रेमी युगुलांची उदाहरणे प्रत्येक संस्कृतीत आढळतात. या आकर्षणाच्या, प्रेमाच्या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके विविध भाषांमधे लिहीली गेली आहेत.
आपले प्रेम व्यक्त करणे हे किंवा स्त्री पुरूषांतील परस्परांविषयी वाटणारे आकर्षण हा काही कोण्या एका संस्कृतीचा मक्ता नसून आकर्षणाची वैश्वीक अशी बायोलॉजीकल भावना आहे. “आम्हाला आमची प्रेमभावना (वास्तवात आकर्षण किंवा कामभावना) व्यक्त करू द्या” अशी आस, विशेषतः जी तरूणांमध्ये साधारण 15 ते 35 वर्षे वयोगटामध्ये उपजते; हे धर्मगुरू व्हॅलेंटाईन प्रमाणेच आपणही समजून घेतले पाहिजे. खरं तर हे खूप नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे.
चार्ल्स डार्विनने “नॅचरल सिलेक्शन” चा सिद्धांत मांडला आणि त्यातूनच “सेक्स्शुअल सिलेक्शन” चा मुद्दा पुढे आला. याकडे नर-मादीने एकमेकांना लैंगिक संबंधांसाठी निवडणे एवढ्या संकुचित अर्थाने न पाहता; सर्वोत्तम पुनरूत्पत्ती साधण्यासाठी नर-मादीमध्ये “सेक्स्शुअल सिलेक्शन” ची घटना निसर्ग घडवून आणतो असे संशोधक मानतात.
त्यामुळे निर्माण होणाऱ्या कामभावनेला व्यक्त करणे, तिच्यासाठी आऊटलेट शोधणे हे स्वाभाविक व तेवढेच नैसर्गिक आहे. पण यामधेही कामभावना ही प्रेमभावना नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
कामभावना आणि प्रेमभावना या मेंदूच्या वेगवेगळ्या विभागात प्रोसेस होत असतात हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले आहे. कोणत्याही व्यक्तीचा विशेष परिचय नसताना त्याच्या किंवा तिच्या विषयी वाटणारे आकर्षण ही कामभावना असते. पण शारीरीक आकर्षण संपल्यावरही त्या व्यक्तीबद्दल वाटणारी ओढ, तिच्याबद्दल वाटणारी काळजी, तिच्या आठवणी यातूनच प्रेमभावना जन्म घेते.
हे समजून घेतलं तरच त्याच्या किंवा तिच्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला अधिक समंजसपणे सामोरं जाता येईल. या भावनेला आऊटलेट मिळाल्यास केवळ शारीरीक आकर्षण न राहता ते मनांच गुंफणं होईल. अशा प्रकारे झालेली ही गुंफण म्हणजेच ‘प्लँटोनिक लव्ह’.
ही गोष्ट आपले पुर्वज योग्य तऱ्हेने जाणून होते. म्हणूनच “वसंत पंचमी”, “होळी” किंवा “रंगपंचमी” या सणांची निर्मिती झाली असावी. पण संस्कृतीतील बदलांबरोबरच नैतिकतेच्या अट्टहासापायी स्त्री किंवा पुरूषांची ही व्यक्त होण्याची चौकट समाजबंधनात जखडली गेली. त्यांना आपले भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण दाबून ठेवण्यास शिकवले जाऊ लागले.
अग्नीभोवती होणाऱ्या मुक्त समागमाची पद्धती बंद होवून अग्नीभोवती फिरून एकाच व्यक्तीशी आयुष्य जोडले जावू लागले. यामुळे स्वतःची कामऊर्जा मारावी लागणारे अनेक स्त्री, पुरूष व्यक्त न होवू शकल्याने बधिरावस्थेत किंवा नैराश्य, चिडचिडेपणा अथवा हिस्टेरीक अवस्थेत असतात. अशांचा लैंगिकदृष्ट्या गैरफायदा घेणारे चक्र फिरतच असते.
यातून कामऊर्जेला व्यक्त करणे हे अनैतिक ठरवण्याच्या हट्टापायी आपण अनेक अनैतिक कृत्यांचे ओझे बाळगत जगत आहोत. थोडक्यात निसर्गात पशूपक्षी निसर्गप्रेरणेने जसे व्यक्त होतात तोच व्यक्त होण्याचा धागा उत्क्रांतीतून माणसापर्यंत पोचला आहे.
आज व्यक्त होण्याच्या पद्धती, साधने जरी बदललेली असली, प्रगत असली तरी त्यामागची व्यक्त होण्याची भावना सारखीच आहे. म्हणूनच ” प्लँटोनिक लव्ह ” सारख्या कन्सेप्टची आवश्यकता भासू लागली आहे.
आपल्याला प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीसमोर तिच्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणाच्या भावना व्यक्त केल्यास त्या आकर्षणातून सुद्धा अचानक मुक्त व्हायला होते. काहीवेळा अंतर्मुख होवून विचार केला जातो आणि नंतर ते आकर्षणही रहात नाही. यामुळे एकत्रित वावरणाऱ्या मुलामुलींमधील कामभावनेचा निचरा होत राहातो आणि त्यांची मानसीक वाढ अधीक निकोप होते.
खरं तर मुलामुलींमधल्या या आकर्षणाच्या भावनेला मिळणाऱ्या अभिव्यक्तीमध्ये जेवढी सहजता असेल आणि त्यांच्या पालकांचा समजूतदारपणा असेल तितकी त्यांच्या शरीरसंबंधांची शक्यता कमी राहाते. पण दुर्दैवाने हे समजून घेतलं जात नाही. बदलती जीवनशैली, नव्याने निर्माण झालेली शारीरीक मानसीक आव्हाने यामुळे विशेषतः गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये विवाहाचे वय सरासरी पाच वर्षांनी पुढे गेले आहे.
अशावेळी या आकर्षणाला व्यक्त करण्याचे मार्ग स्विकारले गेले पाहिजेत हे सत्य कौटूंबिक व सामाजिक स्तरावर मान्य न केल्यास तरूण मंडळी बेधडकपणे नैतिक / अनैतिक सर्वकाही स्विकारण्याचा पर्याय अवलंबतील हे ही लक्षात घेतले पाहिजे. हे आणि असे अनेक मुद्दे विचारात घेता प्लँटोनिक लव्ह या कन्सेप्टला ला विरोध करणाऱ्यांनी बदलत्या काळाचा, सामाजिक समीकरणांचा आणि आकर्षण किंवा प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करण्याच्या पर्यायांचा विचार केलाच पाहिजे.
‘लेडी चॅटर्लीज लव्हर’ हे पुस्तक १९६० सालापर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं. या पुस्तकावर Obscene Publication Act (1857) कायद्यांतर्गत खटला भरण्यात आला होता. या पुस्तकामधे होतं तरी काय? प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं. प्रेम हे शेवटी शारीरिक पातळीवरच जाऊन पोहोचतं असं लिहिलंय यामधे. डीएच लॉरेन्सचं पुस्तक असल्यामुळे पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे इतकच!!
मुद्दा आहे प्लँटोनिक लव्ह. या भावनेचा विचार करताना अजून एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करायला हवा. ते म्हणजे नात्याचं लेबल. ते लेबल नाही तर प्रेम पण नाही असं काही आहे का? आणि असलं तर ते कसं शक्य आहे? प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेचा विचार केला तर दोन शरीरं आणि एक मन हे शब्द जिवंत होतात. अशा वेळी अपेक्षेला काही महत्त्वच उरत नाही. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो, प्रेम म्हणजे दोन शरीरात वास करणारा एक आत्मा.
किती सुंदर कल्पना. प्रेम हे अंतरिक, मानसिक असतं. घोटून गुळगुळीत झाल्यामुळे प्लॅटोनिक लव्ह या शब्दाचा वापर तितक्या गांभीर्यानी केला जात नाही. एक मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनात काही आलं ते तिला उमजलं आणि तिच्या मनात काही आलं तर ते त्याला समजलं हे होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते.
म्हणजे एकमेकांवर जिवापाड प्रेम असाव लागत. ”शब्देविण संवादू” ही कल्पना शारीर सौंदर्यात रमणा-यांना अतर्क्यच वाटते. एकमेकांचं मन जाणण महत्त्वाचं. एकदा असं नात निर्माण झालं की मग त्याच्यासारखा आनंद नाही, समाधान नाही. पण असं नातं निर्माण करणं खुप कठीण आहे.
आदिम काळापासून स्वसंवेद्य अशा शिवतत्वाचे शिवशक्ती हे अर्धनारीश्वर रूप ; हे स्त्री षुरूष प्रतिकाचे प्रतिनिधीत्व करते. प्रकृती आणि पुरुष हे मूळतत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरूष आणि प्रत्येक पुरूषात एक स्त्री लपली आहे अशी या अर्धनारीश्वराची संकल्पना आहे. स्त्री,पुरुष म्हणून एकमेकांना मिळालेल्या सवलतींबद्दल जेवढी त्यांना उत्सुकता असते तितकी आणि तेवढीच आसुया.
या आसुयेतूनच किंवा उत्सुकतेतूनच परस्पर आकर्षण निर्माण होत असावे. कोssहं चा शोध घेता घेता आदिम स्त्री किंवा पुरुषाला ही जाणिव झाली असावी आणि त्या स्त्रीत्व किंवा पुरुषत्वाचा शोधच समस्त सृष्टीच्या उत्पत्तीला कारण ठरला असावा. मुळात अर्धनारीश्वर ही संकल्पना समजून न घेता तिला दैवत्व देवून स्त्री आणि पुरुषाच्या मधील त्यांच्या विरूद्द अस्तित्वाला आपणच तिलांजली दिली आहे.
स्त्री पुरूष ही दोन तत्त्वं आहेत. या भिन्नतेमुळे मानवी वर्तणुकीचे वळण ठरते हे आपण मान्य करतच नाही. उलट कोणत्याही परिस्थितीचे विवेचन करताना योनीभिन्नता हाच निकष आपण लावतो. प्रत्यक्षात स्त्री आणि पुरूष संरचनेत दोघांमधला संघर्ष समाविष्ट नाही तर ती परस्परपुरक संरचना आहे. त्यामुळे त्यांच्यातील शारिरीक किंवा अशरीरी आकर्षण स्वाभाविक व नैसर्गिक आहे.
स्त्री हे मालकी हक्काचे व विनिमयाचे साधन मानले गेल्याने तिथे केवळ अधिकार व हक्काची तीही मालकी हक्काची भावना वाढीस लागली असावी. या भावनेच्या अतिरेकात स्त्रीच्या स्त्रीसुलभ भावनांवर निर्बंध आले असावेत. तेव्हाच कधीतरी प्लँटोनिक लव्ह या कन्सेप्टचा जन्म झाला असावा. प्लँटोनिक लव्ह म्हणजे कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे जाऊन निर्माण होणारे आत्मिक बंध, जे नात्याच्या कोणत्याही चौकटीत मावणार नाहीत की कोणत्याही लेबलमधे बसणार नाहीत.
भारतीय संस्कृतीमध्ये याला मधुराभक्ती असे नाव दिले गेले. यामध्ये शबरी, राधा, मीरा ही काही त्याची ज्ञात उदाहरणे. पण भारतीय संस्कृतीत या विचारधारेचा फारसा पुरस्कार झालेला नाही. बाराव्या शतकात मात्र सुफी संत रुमी यांनी पुन्हा प्लँटोनिक लव्ह या विचारधारेचा पुरस्कार केला.
कोणत्याही नात्याला लेबल किंवा नाव लावलं की मग येतात अपेक्षा, मालकी हक्क. प्रेमाचं सहज सुंदर नात निर्माण करण्यासाठी या नावांच्या, लेबलांच्या पलिकडे जाऊन विचार करता येईल का? कारण अपेक्षा हे दुःखाचे कारण. अपेक्षा ठेवूच नयेत हे शक्यच नाही. पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर येणारा कडवटपणा टाळता येतो का?
जर आपण मनापासून प्रेम करत असू तर तो कडवटपणा टाळता येईलच. नक्की. पण काही वेळा या अपेक्षांच्या अतिरेकामुळे एकतर्फी प्रेमातून घडणारे भयंकर प्रकार घडतात. ज्याचे परीणाम दोघांनाही भोगावे लागतात. मला एक प्रश्न कायम सतावतो. आपण ज्या व्यक्तिवर प्रचंड प्रेम करतो त्याला इजा पोहोचवण्याचा, दुखावण्याचा विचार कसा येत असेल मनात?
असा विचार येणे म्हणजेच प्रेमात सापेक्षता येणे. जे आपलं असतं ते आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण जे आपलं नसतं ते कधीच आपलं होवू शकत नाही. जे मिळवायचय ते अलगद हळूवार मिळवावं नाहीतर हे बंध कच्चे असतात लगेच तुटू शकतात. प्रेम तुटून करावं. पण ज्याच्यावर आहे तिला किंवा त्याला तुटू न देता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.