आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
बॉलिवूड म्हणजे झगमगती ग्लॅमरची दुनिया. या दुनियेत कित्येकदा रंकाचे राव आणि रावाचे रंक होताना आपण सगळ्यांनीची पाहिले असतील. पण तरीही कित्येकांना हे क्षेत्र आजही मोहात पाडतं.
कित्येक तरुण तरुणी इथे करियर करायला येतात. पण सगळेच उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, होतातच असं नाही. याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाची मेहनत! काही लोकं एखाद दुसऱ्या प्रयत्नांनंतर हे क्षेत्र सोडून देतात तर काही चिकाटीने या क्षेत्रात कंबर कसून उभे राहतात आणि त्याच लोकांना ही इंडस्ट्री मोठं करते.
या इंडस्ट्रीला सत्यजित रे, श्याम बेनेगल, गुरु दत्त यांच्यापासून आशुतोष गोवारीकर, श्रीराम राघवन, रोहित शेट्टी पर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे दिग्दर्शक लाभले.
प्रत्येकाची वेगळी शैली, विचारधारा, यामुळे त्यांच्या विविध कलाकृतींनी प्रेक्षकांना प्रचंड आनंद दिला.
या सगळ्या दिग्दर्शकांच्या मंदियाळीत आणखीन एक नाव घेतलं जातं ज्यांच्या आर्ट फिल्म पासून मसाला कमर्शियल फिल्म्स पर्यंत प्रत्येक सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं, ते नाव म्हणजे दिग्दर्शक निर्माते विधू विनोद चोप्रा!
पृथ्वीवरील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीर मधल्या श्रीनगरमध्ये विधु विनोद चोप्रा लहानाचे मोठे झाले. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या वेळीस त्यांच्या कुटुंबालासुद्धा तिथून स्थलांतरित व्हावं लागलं होतं.
त्याच विषयावर आधारित आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ‘शिकारा’ हा सिनेमा नुकताच दिग्दर्शित केला, ज्याला लोकांनी फारसा रिस्पॉन्स दिला नसला, तरी विधु विनोद चोप्रा हे वेगळे आणि अत्यंत कमालीचे दिग्दर्शक आहेत यात नक्कीच वाद नाही.
===
हे ही वाचा – अमिताभने रंगवलेला अँथोनी गोन्सालवीस खरंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा गुरू होता…!
===
काश्मीर मधून परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्यातल्या कलाकाराला मोकळं केलं आणि पुण्याच्या फिल्म इंस्टिट्यूट मध्ये त्यांनी फिल्ममेकिंगचे धडे गिरवले, आणि तिथपासूनच त्यांच्यावर सगळ्याच फिल्म्सचे संस्कार होत गेले.
फिल्म इंस्टिट्यूट मध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी केलेल्या २ डॉक्युमेंट्रीजना राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्करसाठी नमांकन मिळाले होते. विधु विनोद बहुतेक हे एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत जे लाईम लाइट मध्ये येण्याआधीच राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्करवारी करून आले.
नुकतंच त्यांनी त्यांचं आत्मचरित्र ‘अनस्क्रिप्टेड’ या नावाने प्रकाशित केलं आहे, हे लिहिण्यात त्याच्याच एका मित्राचा मोठा सहभाग आहे तो म्हणजे लेखक अभिजात जोशी यांचा!
अभिजात जोशी यांनी विधु यांच्यासोबत बहुतेककरून सगळ्याच सिनेमात लेखनाचं काम केलं आहे. राजकुमार हिरानी, विधु विनोद चोप्रा या त्रिकूटाने दिलेले काही हीट सिनेमे म्हणजे ३ इडियट्स, पीके, मुन्नाभाई एमबीबीएस, इत्यादि.
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अभिजात जोशी यांनी विधु विनोद यांच्याशी व्हीडियो कॉलद्वारे संवाद साधला, त्यावेळेस विधु विनोद चोप्रा यांनी त्यांच्या नॅशनल अवॉर्डचे आणि ऑस्करवारीचे किस्से सांगितले त्याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!
फिल्म स्कूल मध्ये शिकत असतानाच १९७६ साली विधु विनोद यांनी केलेल्या ‘Murder at monkey hill’ या डॉक्युमेंट्री फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला.
याच डॉक्युमेंट्रीचं स्पेशल स्क्रीनिंग लोकप्रिय दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी आयोजित केलं आणि बड्या बड्या लोकांना त्यांनी यासाठी निमंत्रित केलं, अमिताभ बच्चन हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते!
फिल्म स्कूल मध्ये शिकत असल्या कारणाने आणि परिस्थिति सुमारच असल्याने विधु विनोद यांना राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा तेंव्हा त्याबरोबर मिळणाऱ्या ४००० रुपयांच्या रकमेचं जास्त कौतुक होतं.
पैसे उसने घेऊन भाड्याचे कपडे घालून ते राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचले.
जेंव्हा त्यांचं नाव जाहीर झालं आणि ते पुरस्कार घेण्यासाठी मंचावर गेले तेंव्हा तत्कालीन Information & Broadcasting minister लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन राष्ट्रपती संजीवा रेड्डी यांच्या हस्ते विधु विनोद चोप्रा यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि एक पाकीट देण्यात आलं.
आपली आयुष्यातली पहिली कमाई म्हणून विधु विनोद यांनी ते पाकीट तिथे मंचावरच फाडलं, तर त्यातून फक्त एक कागद बाहेर आला ज्यावर “4000 rs bond encashable after 7 years” असं लिहिलं गेलं होतं.
पैशाची अत्यंत गरज असलेल्या विधु विनोद यांना तो कागद म्हणजे तो बॉन्ड पाहून थोडी निराशा झाली, कारण त्यांना कॅश प्राइज ४००० रुपये असं सांगण्यात आलं होतं आणि रक्कम हातात दिली नाही म्हणून त्यांनी याची अडवाणी यांच्याकडे विचारपूस केली!
अडवाणी यांनी त्यांना रोख रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना मंचावरुन खाली जायची विनंती केली. पण विधु विनोद काही केल्या खाली जात नव्हते शेवटी राष्ट्रपतींनी येऊन विधु विनोद यांना आश्वासन दिले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खुद्द अडवाणीजींच्या ऑफिस मध्ये जाऊन कॅश प्राइज घ्यायला सांगितले.
विधु विनोद हे तसे लहानच होते, विशी पार केलेल्या या तरुणाने पुन्हा देशाच्या राष्ट्रपतींकडून पैसे मिळण्याची खातरजमा केली, आणि ते मांचावरून खाली उतरले!
दुसऱ्या दिवशी जेंव्हा विधु विनोद चोप्रा अडवाणीजी यांना भेटायला त्यांच्या ऑफिस मध्ये गेले, तेंव्हा त्यांनी “ये है देश का भविष्य, ये है राष्ट्रीय पुरस्कार के विजेते!” असे खडे बोल सुनावून विधु विनोद यांची कान उघडणी केली.
===
हे ही वाचा – इंजिनियरिंगचे प्रोफेसर ते एक अष्टपैलू कलाकार – कादर खान ह्यांचा प्रेरणादायक प्रवास!
===
अडवाणी यांनी विधु यांना त्याच्या वडिलांना फोन करायला सांगितला.
फोन करता करता विधु विनोद यांनी अडवाणीजी यांना एक प्रश्न केला की “तुम्ही नाश्ता केलात का?” हा विचित्र प्रश्न ऐकून आडवाणीजी उत्तरले “हो ११ वाजायला आलेत, नाश्ता कधीच झाला आहे!”
यावर विधु विनोद उत्तरले की “सर तुम्ही नाश्ता केलायत पण माझ्याकडे नाश्ता करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत म्हणून माझ्यासाठी ते ४००० रुपये खूप महत्वाचे आहेत!”
हे ऐकून अडवाणीजींनासुद्धा अवघडल्यासारखे झाले आणि त्यांनी तातडीने विधु विनोद यांच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर केला आणि त्यांना त्यांचे ४००० रुपये रोख मिळतील याची सोय केली!
ऑस्करवारीचा किस्सा तर याहून भन्नाट आहे, १९७८ च्या आणखीन एका डॉक्युमेंट्रीसाठी विधु विनोद चोप्रा यांना बेस्ट डॉक्युमेंट्रीचं (प्रायोगिक फिल्म) ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.
त्यांना जेंव्हा ही बातमी समजली त्यावेळेस तर त्यांच्याकडे पासपोर्ट सुद्धा नव्हते आणि ऑस्कर सोहळा अगदी २ दिवसांवर येऊन ठेपला होता. यावेळी अडवाणीजींनीच एका दिवसात विधु विनोद चोप्रा यांच्यासाठी पासपोर्ट आणि तिकीटाची सोय केली!
पण व्हिजासाठी जेंव्हा ते मुंबईच्या युएस एंबसी मध्ये गेले तेंव्हा शनिवार असल्याने ऑफिस बंद होते, त्यांनी तिथल्या सिक्युरिटी गार्डशी हुज्जत घातली तर आतून एक अमेरिकन माणूस आला!
तेंव्हा विधु विनोद यांना ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे यावर त्या गोऱ्या माणसाचा विश्वासच बसेना, पेपरामधील कात्रण आणि ऑस्करचं निमंत्रण दाखवल्यावर त्याची खात्री पटली आणि अखेर त्या माणसाने विकेंड असूनसुद्धा त्यांना व्हिजा दिला!
या सगळ्या घटनांवरून शिकण्यासारखं म्हणजे, एखाद्या गोष्टीच्या मागे चिकाटीने लागलात तर यश तुमच्या पदरात पडतच, फक्त त्यासाठी गरज आहे संयमाची!
इतर स्ट्रगलर्सप्रमाणे विधु विनोद चोप्रा यांनीसुद्धा हार मानली असती तर आज भारतीय इंडस्ट्रीमधले सर्वात मोठे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शक बनू शकले नसते.
शिवाय या इंडस्ट्री मध्ये टिकायचं असेल तर तुमची कातडी जाड हवी, कोणत्याही प्रकारचे अपमान सहन करायची ताकद हवी तरच या इंडस्ट्री मध्ये तग धरून राहता येतं.
===
हे ही वाचा – बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!
===
कदाचित विधु विनोद चोप्रा यांच्या याच बेधडक स्वभावामुळे ते फेमस होण्याआधीच नॅशनल अवॉर्ड पासून ऑस्करवारी करू शकले, नाहीतर परिंदा, मुन्नाभाई पासून ३ इडियट्स पर्यंत मास्टरपिस फिल्म्स ते करू शकले नसते!
पण ज्यांना ज्यांना आज विधु विनोद चोप्रा यांचं फक्त यश दिसतं त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या या गोष्टी माहीत नसाव्यात. संजू किंवा पीके सारखे सिनेमे करून त्यांना बऱ्याच लोकांचा रोष पत्करावा लागला होता!
पण विधु विनोद चोप्रा हे त्या काही मोजक्या फिल्ममेकर्सपैकी एक आहेत जे कोणत्याही परिणामांची पर्वा न करता सिनेमे करतात, आणि म्हणूनच आज इतकी वर्ष इंडस्ट्री मध्ये मोजकेच सिनेमे करूनसुद्धा लोकांना त्यांचे सिनेमे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात, हेच खरं यश आहे एका प्रोड्यूसर डायरेक्टरचं.
अभिजात जोशी आणि विधु विनोद चोप्रा यांचा व्हीडियो तुम्ही इथे बघू शकता!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.