हे ७ कॅफेज फक्त खाबूगिरीसाठीच नव्हे, तर नेत्रसुखासाठीही आहेत प्रसिद्ध!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘इग्लु’ हा शब्द आपण शाळेत असताना भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये वाचला होता. एस्किमोचं घर म्हणजे इग्लु हे आपण तेव्हा शिकलो होतो. छोट्या उंचीचे एस्किमो या छोट्या घरात कसे जात असतील? राहत असतील? हे सगळे प्रश्न आपल्याला तेव्हा पडायचे.
उन्हाळ्याच्या दिवसात हे शिकताना कित्येक विद्यार्थ्यांना तेव्हा हे वाटलं असेल, की आजूबाजूला मस्त असा बर्फाच्छादित प्रदेश असावा, त्यामध्ये एक उलटी टोपली असल्यासारखं इग्लु घर असावं.
इग्लुच्या थंडगार घरात जाऊन बसावं असं स्वप्न आपण प्रत्येकाने शाळेत असतांना बघितलं असेलच!
आजच्यासारखी तेव्हा ना ऑनलाईन शाळा होती ना आजच्या सारखे ए. सी. बसवलेले वर्ग होते. तरीही आपण शिक्षकांच्या शिकवणीत इतके तल्लीन व्हायचो, की असं वाटायचं की आपण त्या इग्लुला जवळून बघत आहोत. पुस्तकात बघितलेलं हे इग्लु आता प्रत्यक्षात बघण्याची संधी चालून आली आहे.
भारताचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या ‘काश्मीर’मध्ये ‘इग्लु कॅफे’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील ‘गुलमर्ग’ या पहाडी भागात गेल्यावर आपल्याला या ‘इग्लु कॅफे’चा आनंद घेता येणार आहे.
‘इग्लु कॅफे’ हे संपूर्णपणे बर्फाच्छादित आहे आणि त्यातील टेबल, खुर्ची, भिंती हे सगळं बर्फाने बनलेलं आहे. ४ टेबल्सची आसन व्यवस्था असलेल्या या कॅफेमध्ये एका वेळी १६ लोक, कडाक्याच्या थंडीत गरमागरम कॉफीचा आस्वाद घेऊ शकतात.
कोल्हाई रिसॉर्टचे संचालक वसीम शाह यांच्या संकल्पनेतून ‘इग्लु कॅफे’ची सुरुवात करण्यात आली आहे.
आपल्या या नवीन संकल्पनेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलतांना वसीम शाह सांगतात की, “मी स्वित्झर्लंडमध्ये फिरतांना असे कॅफे बघितले होते. लोकांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही इग्लु कॅफेची सुरुवात केली आहे. गुलमर्गमधील प्रतिसाद बघून आम्ही नक्कीच इतर ठिकाणी सुद्धा इग्लु कॅफे सुरू करण्याचा विचार करत आहोत.”
–
हे ही वाचा – या १६ हॉटेल्सचं स्वातंत्र्यपूर्व भारताशी आहे एक अपूर्व, अनोखं नातं…
–
ग्राहकांना सुद्धा ही संकल्पना खूप आवडली आहे. ‘इग्लु कॅफे’ला भेट दिलेल्या लोकांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड केले आणि त्यानंतर आता ‘इग्लु कॅफे’चा आनंद घेण्यासाठी लोकांना ‘वेटिंग’मध्ये थांबावं लागत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतं. इतका छान प्रतिसाद आता मिळत आहे.
हॉटेल, कॅफे अशा ठिकाणी लोक एक वेगळा आणि खास अनुभव घेण्यासाठी जात असतात. भारतात असे आणखीही काही कॅफेज आहेत जिथे आपण एकदा तरी जायलाच पाहिजे:
१. सायक्लो कॅफे, गुरुग्राम:
सायकलिंग करणे ज्यांना प्रचंड आवडते त्यांच्यासाठी हा कॅफे आहे. इथे चारही बाजूंनी सायकल्स लावलेल्या आहेत, तुम्ही तुमची सायकल इथे सर्व्हिसिंगसाठी देऊ शकता आणि जोपर्यंत सायकल ही गॅरेजमध्ये आहे, त्यावेळात तुम्ही कॉफीचा आनंदही घेऊ शकता. अमेरिकन आणि इटालियन खाद्यपदार्थ सुद्धा इथे उपलब्ध आहेत.
२. ‘कैदी किचन’, चेन्नई:
जेलमध्ये जाऊन काही खाण्याचा आपल्याला अनुभव नसतो आणि तशी वेळही येऊ नये. चेन्नईच्या एका कॅफेने त्यांच्या हॉटेलचं स्वरूप एखाद्या जेलसारखं केलं आहे. इथले कर्मचारी हे पोलिसांसारख्या खाकी वेशात असतात.
आसन व्यवस्था म्हणून, काही छोटे जेल तयार करण्यात आले आहेत. मेक्सिकन, इटालियन आणि भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासोबतच लोक इथे येऊन खूप हसतात आणि त्यांचा वेळ छान जातो.
३. ‘कुंझुम ट्रॅव्हल कॅफे’, दिल्ली:
तुम्हाला जर प्रवास वर्णन लिहायला, वाचायला आवडत असेल, फोटो बघायला आवडत असतील, तर हा कॅफे तुमच्यासाठीच बनला आहे. जगभरातील प्रवास प्रेमी इथे भेटतात, आपले अनुभव, माहिती एकमेकांना सांगतात.
फोटोग्राफर्स, लेखक यांच्या अनेक कार्यशाळा सुद्धा इथे होत असतात. कॅफेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे तुम्हाला कोणतंही ‘बिल’ दिलं जात नाही. तुमच्या इच्छेने तुम्ही पैसे द्यायचे असा नियम आहे.
येणारे लोक हे या जागेचा, सोयीचा योग्य तो मोबदला दिल्याशिवाय बाहेर पडत नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे!
४. ‘११ ईटस्ट्रीट कॅफे’, पुणे:
‘लाईव्ह किचन’ या लंडनच्या संकल्पनेच्या आधारावर आपल्या पुण्यात कॅम्प भागात हा कॅफे सुरू करण्यात आला आहे. इंग्रजी फर्निचर, डबल डेकर बसच्या आकारात तयार केलेलं हॉटेल हे या जागेला एक सुखद अनुभव देणारं आहे.
चिप्सपासून चिकन पर्यंत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे उत्तम चवीमध्ये मिळू शकतात.
५. ‘७० एमएम’, हैद्राबाद:
सिनेमा प्रेमींसाठी ही जागा म्हणजे एक पर्वणी आहे. या कॅफेमध्ये भिंतींवर जुन्या, नव्या बॉलीवूड सिनेमांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.
समोर एक स्क्रीन लावली आहे ज्यावर एक सिनेमा सुरू असतो आणि लोक आपल्या आवडीच्या दक्षिण, उत्तर भारतीय खाद्यपदार्थांवर ताव मारत असतात. प्रत्येकानी एकदा तरी जावं असा हा अनुभव आहे.
६. ‘ब्लॅक पर्ल’, बँगलोर:
एखाद्या जहाजात बसून आपला नाश्ता करायची तुम्हाला इच्छा असेल तर या कॅफेला नक्की भेट द्या. या कॅफेमधील कोणत्याही जागेवर बसल्यावर तुम्हाला असं वाटेल की, तुम्ही त्या जहाजाचे कॅप्टन आहात. इथे वाऱ्याची व्यवस्था अशी केलेली आहे, की जहाजात बसल्यासारखं वाटेल. इथले कर्मचारी हे ‘पायरेट्स’च्या वेशात असतात.
७. ‘UFO रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट’, मुंबई:
एखाद्या ‘अवकाशयाना’मध्ये बसल्याचा अनुभव तुम्हाला या हॉटेलमध्ये गेल्यावर मिळेल. गोलाकार बसण्याची रचना, निळे आणि पांढरे रंग, मध्यभागी सुरू असलेला टीव्ही, हे सगळं तुम्हाला अवकाश यानासारखंच वाटेल.
मेनू कार्ड समोर आल्यावर, भारतीय आणि इतर खाद्यपदार्थांची यादी बघितल्यावर मात्र, परत जमिनीवर आल्यासारखं वाटू शकेल. कांदिवली ईस्टमध्ये असलेल्या या रेस्टॉरंटचा एकदा तरी आपण आस्वाद घेतला पाहिजे.
कोणतंही हॉटेल, खाण्याची जागा ही लिहिण्या, वाचण्या पलीकडे जाऊन अनुभव घ्यायची गोष्ट असते. ‘इग्लु कॅफे’च्या निमित्ताने हे असे अनेक कॅफेज पुन्हा चर्चेत आले आहेत. हे कॅफेजसुद्धा खाद्यप्रेमींना नक्कीच आवडतील. फिरण्याची बंधनं आता तशीही आता शिथिल झाली आहेत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या लोकांच्या कल्पकतेचं, सेवेचं खरं कौतुक करा.
===
हे ही वाचा – महागडी हॉटेल्स : जगातल्या या “९” हॉटेल्समधलं एका रात्रीचं भाडं ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.