Site icon InMarathi

टागोरांच्या प्रेरणेने राष्ट्रगीत लिहिणाऱ्याचा सरकारने घेतला बळी! एक अस्वस्थ करणारी कथा

ravindrnath tagor InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कला ही अशा प्रक्रिया आहे जी स्वानुभवातून येते किंवा कधी कधी दुसऱ्या कलाकृतीतून प्रेरित होऊन घडवली जाते. आपल्याकडे अनेक नाटके, सिनेमा गाणी ही पाशात्य कलाकृतींवरून प्रेरित झालेली आहेत. शेक्सपिअरला तर संपूर्ण जगात पुजले जाते.

आपल्या देशात सुद्धा असे दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांच्यामुळे इतर कलाकार नक्कीच प्रेरित झाले आहेत. त्यातलाच एक कलाकार म्हणजे आनंद समारकून. हा एक श्रीलंकन कलाकार आहे. आज ४ फेब्रुवारी म्हणजेच श्रीलंकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एका भारतीय कलाकाराकडून प्रेरित झालेल्या आनंद यांच्याबद्दल जाणून घेऊया!

लंकेचे राष्ट्रगीत या कलाकाराने लिहिलेले आहे. हे गीत लिहिणारे आनंद समारकून यांनी प्रेरणा घेतली आहे ती आपल्या रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून!

कोण आहेत आनंद समारकून?

हा दिग्गज कलाकार मूळचा श्रीलंकेचा. आनंद समारकूनचा जन्म १३ जानेवारी १९११ रोजी पडुक्का परिसरातील वातारेकाजवळील लियानवेला या छोट्याशा गावात झाला.

 

 

त्याचे पालक, सॅम्युएल समारकून आणि डोमिंगा पियर्स ख्रिश्चन होते. त्याचे खरे नाव होते जॉर्ज विल्फ्रेड होते. त्याचे संपूर्ण नाव ‘एगोडागेज जॉर्ज विल्फ्रेड अल्विस समाराकून’ होते.

त्यांनी वेवला शासकीय सिंहला स्कूलमध्ये शालेय शिक्षण सुरू केले. १९२९ मध्ये त्यांनी ईएसएलसी परीक्षा दिली. त्यानंतर १९३४ साली ते ख्रिश्चन कॉलेजच्या स्टाफमध्ये कला आणि संगीत विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले.

त्याच सुमारास रवींद्रनाथ टागोर आपल्या नर्तक आणि संगीतकारांच्या ग्रुपसोबत श्रीलंकेत गेले होते आणि त्यांनी रामायणातील काही भागांवर कलाविषकर सादर केले.

त्यांची ही श्रीलंकेची भेट इतकी लक्षणीय ठरली की त्यावेळचे अनेक तरुणतरुणी टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक होते. त्यातलाच एक तरुण म्हणजे आनंद समारकून.

१९३६ साली ते शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले आणि प्रसिद्ध बंगाली कलाकार नंदालाल बोस यांच्या अंतर्गत कला, आणि शांती देवी गोश यांच्या अंतर्गत संगीत आणि गाण्याचा अभ्यास केला. आर्थिक कारणास्तव ते पुन्हा लंकेत परतले व मेहेंदा कॉलेजमध्ये पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झाले.

पुढे वैवाहिक जीवन वाट बघतच होते. एकीकडे करियरची गाडी सुद्धा वेगात पळत होती. संगीतकार, गीतकार म्हणून परिचित झाले होते. १९३९ मध्ये त्यांनी एचएमव्ही कंपनीसाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर लवकरच त्यांची आणखी गाणी रेकॉर्ड झाली.

 

 

एखाद्या कलाकाराचे करियर सुरळीत झाले, तर ते करियर कसले! त्यांच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्यावर नंतर त्यांनी दुसरे लग्न केले आणि एका मुलाला जन्म दिला. दुर्दैवाने तोसुद्धा वयाच्या ५ वर्षी जग सोडून गेला.

त्यामुळे आनंद खूपच दुखी झाले व त्यांना नैराश्य आले. शेवटी कलाकार स्वतःच्या आयुष्यातले दुःख विसरण्यासाठी कलेचाच आधार घेतो.

त्यांना शांतिनिकेतन सोडवत नव्हते, म्हणून ते पुन्हा शांतिनिकेतनमध्ये आले. तिथल्या पेंटिंगच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. रॉकस्टार चित्रपटामध्ये एक छान वाक्य आहे, ‘टूटे हुवे दिलसे ही संगीत निकालात हैं’ त्याप्रमाणे ते शिक्षण संपवून, पुन्हा आपल्या मायदेशी परतत असताना त्यांना आपल्या मायदेशासाठीचे राष्ट्रगीत सुचले. त्यांनी ते त्यांच्या गाण्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले.

हे पुस्तक त्यांना प्रकशित करायचे होते, पण पुन्हा पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी ते एका पेंटरला विकून टाकले. कलाकारांचे नशीब अनेक वळणांनी भरलेले असते, हे खरे!

श्रीलंकन सरकारने राष्ट्रगीतासाठी काही गाणी मागवली, तेव्हा त्यांच्या पत्नीने व भावाने त्यांचे गाणे सरकारकडे पाठवले व योगायोगाने ते निवडले ही गेले. सरकारकडून त्याबद्दल त्यांना रु. २५०० मिळाले. परंतु त्याचे कॉपी राइट आधीच विकले गेल्यामुळे त्यांना ती रक्कम त्या पेंटरला द्यावी लागली.

 

 

राष्ट्रगीतातील फेरफार आणि विरोध

कुठल्या ही कलाकृतीला विरोध करणे, ते ही पूर्ण न वाचता, पाहता हे नवीन नाही. ते अगदी श्रीलंकेतही होऊ शकते, अगदी त्याकाळात सुद्धा झाले. घडले असे की गाण्यात ‘गण’ हा शब्द होता, ज्यामुळे देशाला शोकांतिका, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे असे अनेक कवी, पंडित बौद्ध लोकांचे म्हणणे होते. त्यात पुढे असे म्हणले की असे गाणे हे राष्ट्रासाठी अशुभ आहे.

एखाद्या शब्दामुळे जर राष्ट्रावर आपत्ती येते असे वाटत असेल, तर नक्की तिकडच्या लोकांच्या मानसिकता व कलेबद्दलची आसक्ती किती आहे हे कळून येते.

श्रीलंकेच्या सरकारने आनंद यांची कोणतीही परवानगी न घेता गाण्यातील ‘गण’ हा शब्द काढून ‘नमो’ टाकले व २२ नोव्हेंबर १९५१ रोजी ‘नमो नमो माता’ला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. तत्कालीन सरकारने १२ मार्च १९५२ रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे घोषित केले .

आपल्याला न विचारता आपल्या कलाकृतीत बदल केल्याने आनंद पुन्हा एकदा दुःखाच्या व नैराश्याच्या छायेत गेले आणि त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला.

ते उत्तम कलाकार होते. त्यांचे संगीत आणि पेंटिंग्स त्या काळात खूपच लोकप्रिय झाली होती. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी ‘टाइम्समन’ या टाइम्स वृत्तपत्रावरील स्तंभलेखकांना पत्र लिहिले होते.

त्यांनी लिहिले की, “गीताचा शिरच्छेद करण्यात आला आहे. यामुळे केवळ गाणेच संपले नाही तर संगीतकाराचे आयुष्यही नष्ट झाले आहे. मी निराश झालो आहे. ज्या देशात अशा गोष्टी घडतात त्या देशात राहणे दुर्दैव आहे. मृत्यू श्रेयस्कर असेल “.

हे सुद्धा वाचा – फाळणीनंतर पाकिस्तानात जाऊनही “सिंध”चा भारतीय राष्ट्रगीतात उल्लेख कायम ठेवण्यामागे आहे “हे” ऐतिहासिक कारण

रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतन

भारतीय गुरुकुलपद्धतीचा प्रयोग रवींद्रनाथ टागोर यांनी साकार केला. पश्चिम बंगाल राज्याच्या बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर गावानजिकचा शांतिनिकेतनचा हा विस्तृत परिसर, कोलकात्याच्या पश्चिमेस सुमारे १३० कि.मी. अंतरावर आहे.

 

 

शांतिनिकेतन हे विविध विद्या आणि कलांच्या वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणाचे मोठे संकुल असून, त्याची जडणघडण रवींद्रनाथांनी आपल्या हयातीत केली.

शांतिनिकेतन जागतिक स्तरावर एक आदर्श संस्था मानली जाते. परदेशांतील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ही संस्था म्हणजे एक आदर्श सांस्कृतिक केंद्र आहे. ललित कला व त्यांच्याशी संबंधित अनेक विषय येथे शिकविण्यात येतात.

वेदवाङ्‌मय, प्राचीन संस्कृत व बौद्ध वाङ्‌मय तसेच संस्कृत, प्राकृत, पाली, तिबेटी, चिनी भाषा यांची प्रगत केंद्रे सुद्धा येथे सुरू करण्यात आली. शांतिनिकेतनमधून अनेक कलाकार घडले त्यापैकी एक म्हणजे आनंद समारकून, राष्ट्रगीताची प्रेरणा त्यांना इथूनच मिळाली.

कला ही मुळातच अभिव्यक्त होण्यासाठीचे साधन आहे, पण आपल्याच कलाकृतीला कोणत्याही कारणांशी जोडून विरोध केला जातो तेव्हा तो कलाकार जास्त खचतो.

शेवटी कलाकार हा पैशापेक्षा त्याच्या कलेशी जास्त एकनिष्ठ असतो. जेव्हा आपल्या कलाकृतीची हेळसांड होते, तेव्हा ते त्या कलाकारासाठी जास्त दुःखदायक असते.

स्वतःच्या कलेमधून मिळणारी तुटपुंजी रक्कम, हे दुःख एका बाजूला व आपल्या परवानगीशिवाय कलाकृतीत केलेले बदल व त्यातून आलेले दुःख एका बाजूला! या दोन्हीमध्ये दुसऱ्या गोष्टीत कलाकार जास्त खचतो.

प्रेमभंगामुळे आत्महत्या केलेले ‘कलाकार’ आपल्याकडे आहेतच. पूर्वी कलाकार मंडळींना राजाश्रय मिळायचा पण कालातंराने राजाश्रय तर सोडाच, प्रशासनच काही लोकांच्या सांगण्यावरून कलाकारांची मुस्कटदाबी करत आहे.

आनंद यांच्यासारखा एक कलाकार आशिया खंडात होऊन गेलाय आणि तो आपल्या रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून प्रेरित झाला होता, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version