आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज धुमाकूळ घालत आहे. व्हॅलेंटाईनचं निमित्त साधत प्रेमीजिवांना भुरळ घालणारा हा मेसेज अर्थातच बनावट म्हणजेच फेक आहे. असेच अनेक फेक मेसेज व्हॉट्सॲपवर नेहमीच फिरताना दिसतात आणि त्यामुळे लोक फसलेले सुद्धा पाहायला मिळतात.
व्हॅलेंटाईन नेमका काय प्रकार आहे? तो सेलिब्रेट करणं योग्य की अयोग्य या सगळ्या नियमित चर्चेपलीकडे आपण जाऊन पोहोचलो आहोत.
जवळपास प्रत्येकजण यथाशक्ती व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतच असतो. यानिमित्तानं मॉलपासून शॉपिंग स्ट्रीटवरील दुकानांपर्यंत सर्वत्र काही ना काही सवलती दिल्या जातात.
यानिमित्तानं रेस्टॉरंट्स, कॅफेजमध्ये खास कार्यक्रम आणि वेगळा मेन्यू जाहीर केला जातो. शॉपिंगपासून, खाण्यापिण्यापर्यंत सगळीकडेच सवलतीची गुलाबी हवा पसरलेली असते. प्रत्येकालाच आपल्या प्रेमिकेला इंप्रेस करायचं असतंच आणि ते करताना ते जर स्वस्तात होत असेल तर तेही हवंच असतं.
म्हणूनच ब्रॅण्डेड कपडे, पर्सेस अशा वस्तूंवर डिस्काऊंटची धमाल या काळात सुरु असते. समजा एखाद्या उच्चभ्रू हॉटेलमध्ये, जिथे एरवी जाणं हे स्वप्न असू शकेल, तिथे जर कमी खर्चात व्हॅलेंटाईनचं रोमॅन्टिक डिनर वगैरे करणं शक्य असेल तर तुम्ही काय कराल? अर्थातच बहुतेकांचं मन में लड्डू फुटा, असंच होईल.
–
हे सुद्धा वाचा – “वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत!??
–
यंदा असाच एक मेसेज व्हॉट्सॲपच्या गल्ल्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. एव्हाना तुम्हालाही हा मेसेज फॉरवर्ड झाला असेलच. तुमच्यापैकी अनेकांनी त्याकडे हसून दुर्लक्षही केलं असेल, तर काहींनी ‘वाह भारीच!’ असं म्हणत इतरांनाही फॉरवर्ड केला असेल.
काहींनी तो मेसेज सिरियसली घेत ट्राय मारने में क्या जाता है? असा विचारही केला असेल.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही हॉटेल ताजच्या मेसेजविषयी बोलत आहोत.
मागच्या काही वर्षांत फक्त व्हॅलेंटाईन ”डे” साजरा होत नाही, तर व्हॅलेंटाईन “विक” साजरा केला जातो. (जेणेकरून चॉकलेटवाल्यांपासून गुलाबवाल्यांपर्यंत सगळ्यांचे व्यवसाय जोरात चालावेत)
हा सप्ताह अधिकाधिक कल्पक पध्दतीनं साजरा करण्याची एक अघोषित स्पर्धाच लागलेली असते. यंदा फेक मेसेजवाल्यांनी एक अनोखी सवलत जाहीर करून ही कल्पकता जवळपास माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. कहर म्हणजे इतक्या उच्च उंचीच्या या लोणकढी थापेला अनेक नेटिझन्स फसतही आहेत.
व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा करत आपल्या प्रेमिकेला इंप्रेस करत मिंगल होण्याची स्वप्नं पहाणारे तरूण (मनानं तरूण असलेली मंडळीही यात आलीच) हे या फेक मेसेज निर्मात्यांचं लाडकं गिर्हाईक असतात.
हे उतावीळ प्रेमवीर अक्षरश: कशालाही भुलतात इतकं त्यांना सिंगलचं मिंगल व्हायचं असतं. सध्या हॉटेल ताजमध्ये एक दोन नाही तर, तब्बल सात दिवस मोफत (अर्थात फ़ुकटात) राहण्याचं कूपन मिळणार असल्याची लोणकढी थाप सोशल मीडियावर फिरत आहे.
इतक्या झपाट्यानं व्हायरल झालेल्या या मेसेजवरूनच लक्षात यावं की ऑनलाईन फसवणूकीला आपल्याकडचे लोक कसे आणि किती बळी पडतात.
व्हॅलेंटाईन विक निमित्त हॉटेल ताजने खास २०० गिफ्ट कार्ड्स काढून त्याची ऑफर दिल्याचं मेसेजमधे सांगण्यात आलेलं आहे. कुपन स्क्रॅच करून हे गिफ्ट कार्ड मिळवण्याची संधी असल्याचं आमिष दाखविण्यात येत आहे.
मेसेज मिळवल्यावर अनेकांच्या उत्सुकतेपोटी ही कुपन्स स्क्रॅच झाली असतील. मात्र आता हॉटेल ताजने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा मेसेज फेक असल्याचं स्पष्ट केलेलं आहे.
अशा प्रकारची कुठलीही स्किम हॉटेल ताजनं जाहीर केलेली नाही असं सांगून, लोकांनी या मेसेजला बळी पडू नये असं आवाहन केलेलं आहे.
काय आहे हा मेसेज?
तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन विक’ निमित्त ७ दिवस हॉटेल ताजमध्ये मोफत वास्तव्य करण्याची संधी मिळणार आहे. सोबत दिलेल्या बॉक्समधला अचूक बॉक्स तुम्ही उघडला तर या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकाल, अशा मेसेजसोबत एक लिंक पाठवलेली असते.
लिंकवर क्लिक केल्यावर काय होतं?
तुम्ही ओके दाबलं की तुमचं पेज रिडायरेक्ट होतं. तुमच्यासमोर एक छोटीशी प्रश्नावली उघडते. या सगळ्याची उत्तरं दिली की पुन्हा पेज रिडायरेक्ट होतं.
आता या पेजवर १२ लालचुटुक गिफ्टबॉक्स दिसतात. (या बॉक्सवर टाटाचा लोगोही दिसत असल्यानं तुम्ही शंका घेण्याचं कारणच उरत नाही) यातल्या एखाद्या बॉक्सची निवड करून तुम्हाला तुमचं नशीब आजमावण्याविषयी सांगण्यात येतं.
बॉक्स उघडल्यावर काय होतं?
जर तुम्हाला गिफ्ट मिळालं तर पुढील पेजवर जाण्याच्या सूचना मिळतात. तुम्ही पुढील पेजवर गेला की हे कार्ड रिडीम करण्याविषयी सांगितलं जातं (इथे तुम्ही मनातल्या मनात ढोल वाजवत नाचायला लागलेले असता)
हे गिफ्ट मिळविण्यासाठी २० जणांना वैयक्तिकरित्या आणि किमान ५ व्हॉट्सॲप ग्रुपवर हा मेसेज फॉरवर्ड करायला सांगितला जातो.
तुम्ही हे सगळं केलं असेल, तर तुम्हाला हॉटेल ताजमधलं फुकटातलं वास्तव्य नक्कीच लाभणार नाही मात्र तुम्ही सायबर क्राईमच्या जाळ्यात ओढले जाण्याच्या शक्यता मात्र वाढतात.
मुंबई पोलिसांच्या सायबर विंगनं नेटकर्यांना या लिकंपासून सावध रहाण्याचा इशारा दिलेला आहे. या लिंकमधून तुमची फोनवर असलेला पासवर्ड, बॅन्क डिटेल्स अशी खाजगी माहिती चोरली जाऊ शकते.
यानिमित्तानं आणखी काही स्कॅम असणारे आणि नेहमी लोकांना भुलवणारे मेसेज पाहू-
या व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध रहा
१. आदिदासचे फ्री शूज
हा मेसेज गेली अनेक वर्षं व्हॉट्सॲपवर फिरतो आहे आणि अजूनही अनेकजण याला भुलून बळी पडतात. आदिदास हा महागडा ब्रॅण्ड आहे. याचे शूज वापरणं प्रत्येकालाच आवडत असलं तरीही परवडणारं नसतं.
नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेत हा फेक मेसेज बनवला गेला आहे. ९३ व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त आदिदास ३ हजार शूज गिव्ह अवे करत असल्याचा मेसेज असं सांगतो की, आणखी पाच जणांना हा मेसेज फॉरवर्ड करा. या मेसेजला चुकूनही बळी पडू नका.
–
हे सुद्धा वाचा – दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स
–
२. झारा व्हाऊचर
झारा हा महागडा आणि प्रसिध्द ब्रॅण्डही या स्कॅमपासून वाचलेला नाही. झाराचे फ्री व्हाऊचर मिळणार असल्याचा व्हॉट्सॲप मेसेज तुम्हाला आला तर तो तद्दन खोटा आहे हे समजा. या मेसेजमधे तुम्हाला तुमची खाजगी माहिती विचारली जाते. याचा वापर पैशाचा फ्रॉड करण्यासाठी केला जातो.
३. पिझ्झा हट फ्री लार्ज पिझ्झा
हेही एक लोकप्रिय फिशिंग आहे. लोक अगदी सहज या फ्री पिझ्झाच्या सवलतीला भुलतात.
४. आणखी एक लोकप्रिय फिशिंगचा प्रकार म्हणजे, व्हॉट्सॲप लवकरच प्रिमियम होणार आहे. फ्री सेवा बंद होणार आहे, मात्र तुम्ही जर अमूक इतक्या जणांना हा मेसेज फॉरवर्ड केला तर तुमची फ्री सेवा चालूच राहील.
५. मार्टिनेली व्हिडिओची दहशत
एक व्हिडिओ येईल तो अजिबातच ओपन करू नका. यामुळे तुमचा फोन क्रॅश होईल अशी भीती घालणारा जो मेसेज येतो त्यात काहीच तथ्य नाही. हे असं काहीही घडत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही येणारा कोणताही रॅण्डम व्हिडिओ उघडा.
६. व्हॉट्सॲपचा रंग बदला
हा एक लोकप्रिय फिशिंग मेसेज आहे. व्हॉट्सॲपचा रंग बदलण्याचा कोणताही पर्याय अजून तरी उपलब्ध नाही.
७. अमेझॉन बिग बिलियन सेल
अत्यंत लोकप्रिय असं हे स्कॅम आहे. असा कोणताही अमेझॉनच्या सेलच्या लिंकचा मेसेज आला तर अजिबात क्लिक करू नका. हा शंभर टक्के फेक मेसेज आहे.
८. फ्री आयफोन
आयफोन अनेकांच्या जिव्हाळ्याचा आणि लक्ष वेधून घेणारा विषय असतो. म्हणूनच हादेखील एक लोकप्रिय आणि गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या फिशिंगचा प्रकार आहे.
आयफोनने कधीही तो फ्री देण्याची कोणतीही स्किम काढलेली नाही किंवा ९९९ अशा स्वस्त किंमतीलाही तो देण्याची कोणतीही सवलत नाही. त्यामुळे आयफोनच्या नावाने आलेला मेसेज ही सुद्धा एक फसवणूकच आहे हे लक्षात घ्या.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.