Site icon InMarathi

धर्म वाचवणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या ‘बाप्पाचा’ पेशवेकालीन इतिहास वाचायलाच हवा!

ganapati photo inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय समाजमन बरंचसं धार्मिक आहे. खूप बारकाईने लक्ष देऊन बघा, दर महिन्याला एक तरी सण असतोच. चैत्र पाडवा, अक्षय्य तृतीया, वटपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, गौरी गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, देवदिवाळी, संक्रांत, होळी अशा अनक सणांची पर्वणी असते.

 

 

याशिवाय संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, एकादशी या तिथी वगैरे महत्त्वाचे दिवसही असतात.

प्रत्येक धर्माच्या आपापल्या पुराणकथा आहेत. बहुतेक सर्व देवांनी दृष्टांत दिला.आपलं स्थान कळवलं मग माणसांनी तिथं जाऊन देऊळ बांधलं. किंवा स्थानमहात्म्य समजल्यानंतर तिथं जाऊन शासकांनी मंदिर बांधलं. असं होऊन बरीच धार्मिक स्थळे बांधली गेली. आजही त्यांचं महत्त्व अबाधित आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खूपदा त्या ठिकाणांचे आलेले चांगले अनुभव लोकांना त्या ठिकाणी परत परत जायला लावतात.

 

 

शेवटी असं आहे, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरु होतं. कितीतरी गूढ गोष्टी, सुखद अनुभुती अशा ठिकाणी अनुभवायला मिळाल्या आहेत लोकांना आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न.

आपल्याला पटत नसेल तर दुसऱ्यांच्या श्रध्दा, विश्वास यांना चेष्टा कुचेष्टेच्या फुटपट्ट्या लावायचा अधिकार नाही.

महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातो तो सण गणेश चतुर्थी. लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आजही महाराष्ट्रात हौसेने साजरा केला जातो.

 

 

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाची भक्ती पेशवेसुध्दा करायचे. माधवराव पेशवे यांनी तर शेवटचा श्वास गजाननासमोर घेतला होता असं म्हणतात. पेशव्यांनी आपलं साम्राज्य पार अटकेपार झेंडा रोवून वाढवलं होतं. त्याचबरोबरीने धार्मिकता पण जपली होती.

पेशव्यांनी पोर्तुगीजांचा धोका ओळखला होता. अधूनमधून पोर्तुगीज आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी गोव्याच्या भूमीत लोकांवर अन्याय आणि छळाचा वरवंटा फिरवायचे. स्त्रीयांवर अत्याचार करणे, लोकांना बाटवणे हे करतच असतो, पण त्याच बरोबरीने कोकणवरही त्यांचा डोळा होताच.

वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पण पेशव्यांनी तो किल्ला वेढा घालून, खूप मोठे युद्ध करुन पोर्तुगीजांच्या तावडीतून हिसकावून घेतला आणि साष्टी, वसई हा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

 

त्यावेळी त्या परिसरात असलेल्या देवालयांचाही त्यांनी उद्धार केला होता. अशा देवालयांपैकी एक देवालय अणजूरचा गणपती.

 

 

हे देवालय खूप जुनं. जवळपास ११व्या शतकात अणजूर हे गांव बिंब राजाने राणे या आपल्या धर्मप्रेमी आणि निष्ठावंत असलेल्या राणे या सरदाराला बक्षिस म्हणून दिलं. त्यासह नाईक ही पदवी बहाल केली.

तीनशे वर्षांनी पोर्तुगीज लोक आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भारतात आले.‌ त्यांनी गोवा हे आपलं ठाणं बनवलं आणि तिथून आजूबाजूच्या परिसरात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हातपाय पसरायला सुरुवात केली.

साष्टी आणि आसपासच्या परिसरात पोर्तुगीजांनी लोकांना अतोनात त्रास द्यायला सुरुवात केली. कोणतीही सत्ता प्रथम कमकुवत लोकांनाच त्रास देते या न्यायाने प्रथम स्त्रीया, गोरगरीब जनता या छळाचं लक्ष्य होतात, बळी पडतात.

हळूहळू धर्मांतरित लोक वाढवून आपली ताकद वाढवायचा पोर्तुगीजांनी चंगच बांधला. असं करत करत पूर्ण कोकणपट्टी आपल्या अखत्यारीत कशी आणायची हेच डावपेच पोर्तुगीज लढवत होते.

आपला धर्म बुडवून पोर्तुगीज सत्ता प्रस्थापित करायची खेळी खेळत होते. नाईकांना ही चाल लक्षात आली. त्यांनी संभाजी महाराजांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने तेच औरंगजेबाच्या कैदेत सापडले.

 

 

निंबाजी नाईक यांनी पोर्तुगीजांविरुध्द लढण्यासाठी तयारी केली होती. पण आता छत्रपतीच धोक्यात होते म्हटल्यावर त्यांनी आपला मुलगा गंगाजी याला सांगून कुलदैवत असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला साकडं घातलं.

त्यासाठी अनंत अडथळे, अडचणी पार करत गंगाजी मोरगाव येथे गेले. तिथं गणपतीच्या अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेव्हा त्यांना दृष्टांत झाला आणि चिंचवड येथील मोरया गोसावी यांच्या पणतूंना भेटण्याची आज्ञा दिली गेली.

गंगाजी परत चिंचवडला आले. त्याकाळचे प्रवास चालत चालतच! मोरया गोसावींच्या पणतूनी त्यांना आदेशानुसार उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक अनुग्रहपूर्वक दिला.

 

 

गंगाजींनी ती मूर्ती गावी आणली आणि सिद्धिविनायकाची आपल्या वाडीत प्राणप्रतिष्ठा केली. नंतर जेव्हा चिमाजी अप्पांनी वसई किल्ला जिंकला तेव्हा या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

पेशवेकालीन बांधकामाचा हे मंदिर उत्तम नमुना आहे. लाकडी तुळया आणि त्यावर तोललेले हे मंदिर. नक्षीदार कमानी, नक्षीदार दरवाजे, वळणावळणाच्या पायऱ्या, कोनाडे, खुंट्या हे सारं पाहताना आपलं गतवैभव पुन्हा पाहतो आहोत हे जाणवतं.

मंदिराच्या दरवाजावर असलेली फुलांच्या नक्षीची चौकट, त्यावर असलेले सोंड उंचावलेले हत्ती, हे पाहून त्यावेळी असलेल्या कामाची कल्पना येते.

नंतर अणजूरकर नाईकांची वंशावळ चित्रात मांडली आहे. लाकडी मखर असलेलं हे दालन, या मखरांच्या कोपऱ्यावर पितळी सिंहमुखं बसवली आहेत.

आता चौरंगावर पितळी देव्हारा आहे. त्याला कळस आहे. या देव्हाऱ्यात श्री सिद्धिविनायकाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती फार मोठी नाही. पण या मूर्तीचं तेज, मूर्तीला असलेला वेगळा मुकूट, गळ्यात बारीक मोत्यांचे सर या सर्वांमुळे ही मूर्ती विलक्षण तेजस्वी दिसते.

 

 

हे अणजूरकर नाईकांचं देवघर असल्याने इरतही देव आहेत पण ही मूर्ती खास लक्षवेधी आहे. हे प्रसिद्ध नसलं तरी एक छान ठिकाण आहे.

ठाणे बस स्थानकावरुन दर तासाला ८७ नंबरची बस अणजूरला मंदिरापर्यंत येते. त्याशिवाय भिवंडीहून पण अणजूरला थेट बससेवा उपलब्ध आहे. माणकोली ते अणजूर शेअर रिक्षा मिळतात आणि याशिवाय खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात.

शाळेत केवळ मार्क मिळवण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करतो. पण अणजूरसारखी ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणं मात्र आपल्याला फारशी ठाऊक नाही.

धर्मासाठी, राज्यासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारी दैदिप्यमान माणसांबाबतही आपल्याला फारशी माहिती नाही. निदान ती परंपरा तरी जपुया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version