' विश्वास बसणार नाही, पण आपलं दही जगभरात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने चाखलं जातं! – InMarathi

विश्वास बसणार नाही, पण आपलं दही जगभरात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने चाखलं जातं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या अगदी रोजच्या खाण्यातल्या दह्याचा शोध किती जुना असावा? साधारण मानव गुहेत रहात होता त्या काळापासून आहारात दही असण्याच्या शक्यता आहेत. जगभरात विविध नावांनी आणि प्रकारांनी खाल्लं जाणारं दही खर्‍या अर्थानं ग्लोबल पदार्थ आहे.

तुम्ही कधी विचार केलाय का? दही नेमकं कोणत्या देशात सर्वात आधी बनलं आणि खाण्यास सुरुवात झाली असावी? आपल्याकडे तरी ते खूपच जुनं आहे कारण अगदी श्रीकृष्णाच्या लिलांमध्येही दह्याचे उल्लेख आहेत. मात्र जरा जगभरातल्या खाद्य संस्कृतीवर नजर टाकली तर असं दिसून येईल की जसं आपल्याकडचं दही जुनं आहे तसं ते इतर देशातही हजारो वर्षांपासून खाल्लं जातं.

काही पदार्थ हे नेमके कोणत्या देशाचे, प्रांताचे आहेत हे न समजण्याइतका त्यांचा जगभरात सर्रास वापर केला जातो. दही हादेखील असाच एक पदार्थ आहे, जो जगभरात विविधप्रकारे वापरला जातो.

 

curd InMarathi

 

ऋग्वेदात नासके दूध या अर्थाचा दधि हा शब्द वारंवार उल्लेखला गेलेला आहे. दधि याचा अर्थ अनेकदा दही या अर्थानं घेतला गेला आहे जो योग्यही आहे.

दह्याचाच परकीय जातबंधू आहे योघर्ट किंवा योगर्ट. तुर्की स्वयंपाकघरांनी जगभरात पोहोचवलेलं योगर्ट आणि दह्यात थोडासा फरक आहे. दही हे आंबट पदार्थापासून दूध नासवून त्यात बॅक्टेरिया निर्माण करून बनवतात, तर योगर्ट हे एकप्रकारचे यीस्ट दूधात घालून दूध किण्वन करून बनवतात.

आपण दही आणि पनीर हे दोन वेगळे प्रकार समजत असलो तरीही जगभरात पनीरला दह्याच्या पंक्तीत बसवून त्याचा वापर होतो. याचं कारण या दोघांची प्रक्रिया सारखीच आहे- दुधाचं नासणं/विरजणं.

 

paneer-inmarathi

 

जगभरातल्या अनेक देशांत दही विविध पध्दतीनं खाल्लं जातं, किंवा नावं वेगळी असली तरीही पदार्थ तोच असतो. उदाहरणार्थ आपण दह्यात पाणी मिसळून ते घुसळून त्याचं ताक बनवतो. हेच ताक तुर्की घरांत आयरान या नावानं बनवलं जातं. आयरानलाच तान असंही म्हटलं जातं.

बघा बरं, फक्त क आणि न चा  फरक आहे भारतीय ताकात आणि तुर्किश ताकात. आपल्याकडे जसा उन्हाळ्यात ताकाचा मठ्ठा केला जातो तसाच तुर्कीमधे पुदिन्याची पानं घालून बनवला जातो. इराणमधे दूघ या नावानं ताक बनतं.

इंडोनेशियाचा पारंपारिक पदार्थ, ज्याचा उल्लेख सुमात्रियन लोककथांतही आढळतो तो म्हणजे, ददिह. अलिकडे तिकडच्या लग्नात याची उपस्थिती अनिवार्य बनली आहे. तर हे ददिह म्हणजे, म्हशीचं कच्चं दूध बांबूमधे विरजण लावलं जातं. या बांबूंना केळीच्या पानानं घट्ट झाकून काही दिवस तसंच ठेवलं जातं. Set it and forget it या प्रकारातली बहुदा ही पहिली रेसपी असावी.

हे सुद्धा वाचा – योगर्ट की दही? यातला फरक लक्षात घेतला तर आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल

ग्रीसमधे दह्यानं ग्रीक खानपानात चांगलेच पाय पसरले आहेत. ग्रीक योगर्ट तर जगभरात परिचयाचं आहेच. डिपिंग सॉसेजेस, स्प्रेड्स यांचे अगणित प्रकार भारताप्रमाणेच ग्रीक मंडळीही बनवतात. यात काकडी, लसूण, शेपू आणि ऑलिव्ह ऑईल यांचा वापर भरपूर प्रमाणात आहे.

ग्रीक लोकांच्या जवळपास प्रत्येक पदार्थात उघड अथवा छुपा दह्याचा वापर अनिवार्य असल्यासारखा आहे. इतका त्याचा सढळ वापर केला जातो. मस्टोकिहा हे इराणची खासियत असलेलं दह्याचं डीप आहे. दही आणि काकडी यांच्यापासून बनवलेलं मस्टोकिहा आपल्याकडची दह्यातली काकडीची कोशिंबिरीचाच प्रकार आहे. आणि रोजचं जेवण असो वा खास मेजवानी याची उपस्थिती असतेच.

 

mast-o-khiar-inmarathi

 

मिडल ईस्टर्न योगर्ट चीजचा प्रकार- लाब्नेह.

ही दह्याला आणखी नजाकतेनं वापरण्याची पध्दत आहे. मिडल ईस्टचा ब्रेकफास्ट दह्याशिवाय पुरा होऊच शकत नसला तरीही ते विशिष्ट प्रकारेच-लाब्नेह- बनवलं जातं. दह्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकून चीजप्रमाणे घट्ट बनवून त्याचा क्रिमी स्प्रेड बनवला जातो. अनेकजण यांत विविध भाज्याही घालतात. प्लेन लाब्नेहचा वापर सॅण्डविचला लावायला मुख्यत: केला जातो.

लेबनानमधे पिढ्यानुपिढ्या लाब्नेह बनविण्याच्या रेसपिज चालत आलेल्या आहेत. सण्डे ब्रन्च म्हणलं की हे स्प्रेड अनिवार्य आहेत. आपण जसं दही घरीच बनवणं पसंत करतो त्याचप्रमाणे हे लाब्नेहही घरगुती बनवणं पसंत केलं जातं.

ब्राझिलमधला ब्राझिलियन पाउन दे केह्जो म्हणजेच ब्राझिलियन चीज पफ! ब्राझिलमधला लोकप्रिय ब्रेकफास्ट प्रकार आहे. याच्या काही प्रकारात दही हा मुख्य घटक आहे.

लस्सी हे भारत आणि पाकिस्तानात लोकप्रिय असलेलं गोड पेय आहे. अमेरिकेतही काही ब्रॅण्ड अलिकडच्या काळात लोकप्रिय झालेले आहेत. याशिवाय भारत आणि बांगलादेशात लोकप्रिय असणारं मिष्टिदोई-दही लावतानाच ते साखर घालून विरजलं जातं.

 

mishti-doi-inmarathi

 

फ्रेंच योगर्ट केक 

फ्रेंच योगर्ट केक हा जगभरात लोकप्रिय झालेला प्रकार आहे. या केकमधे दही, अंडं, बटर, साखर, तेल आणि मैदा वापरला जातो. वाढदिवस असो की घरी येणार्‍या पाहुण्यांसाठी खास काहीतरी पदार्थ करणं असो फ्रेंच योगर्ट केक सर्रास बनवला जातो.

 

french-yogurt-cake-inmarathi

 

त्ससिके

त्ससिके हा एक अगदी सर्रास बनवला, खाल्ला जाणारा ग्रीक पदार्थ आहे. इराणच्या अस्तोहिका किंवा आपल्या कोशिंबीरीचा हा भाऊबंद आहे. यात काकडीसोबत, लसूण, शेपू आणि ऑलिव्ह ऑईल घातलं जातं (हाच पदार्थ तुर्की खानपानातही थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि नावाने हजेरी लावतो) याचा स्प्रेड म्हणून अथवा डीप म्हणून वापर केला जातो.

 

greek-tzatziki-inmarathi

 

फिल्मजॉक हा स्विडिश दह्याचा प्रकार पुष्कळसा आपल्या दह्यासारखाच असतो. दही विरजण्याची पध्दत भारतीय दह्याच्या जवळ जाणारी असते.

अफ्रिकन अमासी

आपल्या पनीरचा हा आफ्रिकन भाऊबंद आहे. साऊथ आफ्रिकेत याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे असंच नुसतं खाण्याची पध्दत आहे किंवा ते खिरींवरही ओतून वाढलं जातं. पारंपारिक पध्दतीनुसार हे मातीच्या भांड्यात खायला देण्याची प्रथा आहे. याशिआय सेनेगली सूपच्या प्रकारात क्रिमसारखं दही वापरलं जातं.

 

amasi-inmarathi

 

फ्रोयो

अमेरिकेत इतर देशांप्रमाने रोजच्या जेवणात दह्याचा वापर फारसा होत नाही मात्र, आपल्याकडचं श्रीखंड रूप बदलून अमेरिकेत फ्रोयो नावानं झपाट्यानं लोकप्रिय झालं आहे. आईस्क्रिमला पौष्टिक पर्याय म्हणून फ्रो-यो निवडलं जातं. बहुतेक अमेरिकन या गोडसर दह्याला प्राधान्य देतात.

अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही फ्लेवर्ड योगर्ट खाल्ली जातात. फ्रोजन, नॉर्मल आणि ग्रिक योगर्ट हे प्रकार तिकडे खाल्ले जातात. घरगुती योगर्टपेक्षा तयार मिळणार्‍या योगर्ट वापरावर भर दिसून येतो.

 

fro-yo-inmarathi

 

नैलोओ

चीनमधे नैलाओ किंवा बिजिंग योगर्ट नावानं बनणारं दही आपल्या मिष्टीदोईचा चायनिज भाऊ आहे.

याची बनविण्याची पध्दत मात्र खूपच वेगळी आहे. हे दही लावताना त्यात मनुका आणि राईस वाईन घातलं जातं. हे सगळं मिश्रण सतत हलवत रहावं लागतं. यासाठी विशिष्ट प्रकारचं गॅजेट वापरलं जातं.

 

bejing-yogurrt-inmarathi

 

मातोसोनि

रशियात दही हे त्यांच्या रोजच्या जेवणातील भाग आहे. जिथे रशिया आणि जॉर्जिया हे दोन देश मिळतात त्या सीमाभागात विशिष्ट प्रकारचं दही बनवलं जातं. मातोसोनि असं या दह्याचं नाव आहे.

रशियन कर्डचीज अर्थात त्वोरोग पासून विविध प्रकारची डेझर्टस अर्थात गोड पदार्थ बनविले जातात. झॅपेकन्का म्हणजेच कॉटेजचीज पुडिंगमध्ये मनुका किंवा वाळलेले ॲप्रिकॉट घातले जातात. लहान मुलांत विशेष लोकप्रिय असा हा गोड पदार्थ आहे. ईस्टरमधे हमखास केला जाणारा गोड पदार्थ, पक्शा. पिरॅमिडच्या आकाराचा हा पदार्थ बनवणं ही परंपरा मानली जाते. वेरेन्की हा रशियन ड्म्पलिंग्जचा प्रकार आहे.

 

russian-tvorog-inmarathi

 

आयर्लंड हा दही खाणार्‍या देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिथलं दही हे जास्त क्रिमयुक्त असतं.

मेझे

तुर्किश जेवणातही दह्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जाजिक हे थंडगार सूप वर्षभर खाल्लं जातं. काकडी, दही, लसूण, पुदिना असणारं तुर्किश मेझे (appetizer) मधला मुख्य घटक आहे.

हे सुद्धा वाचा – केवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल

बहुतेक तुर्किश मेझे दही आणि ऑलिव्ह ऑईल असणारे असतात. बहुतेक तुर्किश रेस्टॉरंटस (meyhanes) मधे सर्व्ह होणारी डिश आहे, हायद्री. कुरकुरीत ब्रेडसोबत दिली जाणारी ही डिश म्हणजे घट्ट दही, शेपू, पुदिना आणि लसूण वापरून बनविली जाते.

 

meze-inmarathi

 

दही घालून केलेली गाजराची कोशिंबीर, वांग्याचं भरीत हेदेखील अनिवार्य असे appetizer आहेत. याशिवाय अंडं आणि दह्यापासून बनविलं जाणारं जिलबीर आणि योगर्ट सूप हेदेखील लोकप्रिय पदार्थ आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?