Site icon InMarathi

कच्छपासून जगभर असा झाला दाबेलीचा प्रवास! चविष्ट पदार्थाचा तितकाच चविष्ट इतिहास

dabeli inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चटपटीत खाऊ, भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस हे पदार्थ न आवडणारा विरळाच असावा. हौसेने घरी पण हे पदार्थ करणाऱ्या महिला आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर जेव्हा गॅस पेटतो, तवा चढवून जेव्हा पावभाजी, मसाला पाव, सँडविच, टोस्टचे वेगवेगळे प्रकार, नुडल्स, यांचे वेगवेगळे वास हवेत दरवळू लागतात तेव्हा त्या स्वादाने तोंडाला पाणी सुटतं.

रगडा पॅटीसवर चिंचेचा आंबटगोड स्वाद असलेली चटणी, पुदीन्याच्या स्वादाची हिरवी तिखट चटणी हे खायची तीव्र इच्छा होते. मग बाजाराला निघालेल्या गृहिणी मैत्रीणींसोबत हळूच एखादी डिश आॅर्डर करतात.

काॅलेजचे पोरं पोरी मस्त एकत्र येऊन शेवपुरी- दहीपुरी चापतात. काय ती व्हरायटी..काय ती चव! जिभेवर रेंगाळत राहते. पुन्हा पुन्हा खावी वाटते..

 

 

पूर्वी चटपटीत पदार्थांचे किती कमी प्रकार होतेे.. असलेच तर मर्यादित होते. आता अजून एक अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे कच्छी दाबेली. हा मस्त मसालेदार चटपटीत पदार्थ…आबालवृद्ध लोकांना आवडणारा!

मऊ लुसलुशीत पावात मस्त भाजीचं फिलिंग…त्यात भाजलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, जराशी चिंचेच्या चटणीची जोड आणि सोबत बारीक शेवेची चव! बघा ना.. तिखट, आंबट, गोड अशा मिश्र चवीची ही दाबेली कशी चट्टामट्टा होते, पण तुम्हाला माहिती आहे का हा पदार्थ मूळ कुठला? हा पदार्थ आहे गुजरातमधील!

हे ही वाचा : घरबसल्या ठराविक पदार्थांना कंटाळले असाल, तर या १० खाऊगल्ल्यांची व्हर्चुअल सफर पाहून तोंडाला पाणी सुटेल

स्नॅक्स म्हणून आपल्याला ढोकळा माहिती आहे, फाफडा, हांडवा..हांडवा म्हणजे केकसारखा पदार्थ. खांडवी म्हणजे आपल्या सुरळीच्या वड्या. मधुर मिलन नांवाने बर्फगोळ्याची वेगवेगळ्या स्वादात तयार केलेली व्हरायटी ही पण गुजराती लोकांची खासियत.

असंही आपल्या देशात खाण्यापिण्यात प्रचंड वैविध्य आहे. प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ‌. एक गोष्ट लक्षात घेतली तर गुजराती पदार्थ हे संपूर्णपणे शाकाहारी असतात. आंबट, गोड, तिखट असे सगळे चवीचे पदार्थ फार हौसेने तयार करतात.

 

 

गुजराती खाद्य संस्कृती आजकाल साता समुद्रापार पोचली आहे. चौराफल्ली हा स्नॅक्स मधला वेगळा प्रकार असो की कढी खिचडी.. कितीतरी पदार्थ आजकाल लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत स्टार्टर म्हणून वापरतात.

फाफडा जलेबी हे तर कितीतरी लोकांचं आवडतं काँबिनेशन! उंधियोनं तर आपला आपला चाहता वर्ग तयार केला आहे.

कचोरी, छुंदा, तक्कू, खाकरा,पत्रा..पत्रा म्हणजे आपली अळूवडी..असे कितीतरी पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. प्रत्येक प्रांताची खाद्य संस्कृती वेगळी.

गुजराती खाद्य संस्कृती तर पूर्णपणे शाकाहारी पदार्थांची रेलचेल असलेली आहे. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्यांच्या चवीमुळे आणि शाकाहारी आहेत या कारणासाठी केवळ गुजरातपुरतेच मर्यादित न राहता सगळीकडेच आवडीचे बनले आहेत.

स्नॅक्समध्ये कच्छी दाबेली हा प्रकार आबालवृद्ध आवडीने खातात, पण हा पदार्थ कुठे..कसा तयार झाला याची ही झलक.

 

 

सर्वत्र आवडणारी ही कच्छी दाबेली नांवावरुनच समजते, की कच्छ मधील आहे. आपल्याकडं माणसांची नावं गावाच्या नावावरून पडलेली असतात ना तसंच हे पण.

गुजरातमध्ये कच्छ प्रांतात ही डिश जन्माला आली. तुम्हाला आश्चर्य वाटेल ही डिश हल्ली हल्ली तयार झालेली नाही.. १९६० साली केशवजी चुडासामा या गृहस्थाने ही डिश पहिल्यांदा तयार केली.

कच्छ प्रांतात असल्यामुळे कच्छी आणि ब्रेड मध्ये ते‌ भाजीचं मिश्रण भरुन दाबणे यासाठी गुजराती शब्द दाबेली. म्हणून या डिशचं नांव आहे कच्छी दाबेली!

बटाटे शिजवून कुस्करून एकसारखे करुन घेतले. त्यात भाजीसाठी बनवलेला विशिष्ट प्रकारचा मसाला मिसळून त्याची भाजी तयार करुन घेतली जाते. या मसाल्यात काय काय असतं?

लाल मिरची पावडर, मिरे पूड, सुकं खोबरं, लवंग दालचिनी, धने पूड, मीठ, जिरे, हळद, थोडेसे वेलदोडे, तमालपत्र, थोडंसं सैंधव मीठ हे योग्य प्रमाणात घेऊन त्याची एकजीव पावडर करुन दाबेलीची भाजी करताना वापरली जाते.

भाजी तयार झाल्यानंतर‌ तिचा जो सुगंध दरवळतो त्याने जीभ खवळून नाही उठली तरच नवल. दाबेली तयार करताना वर दिलेला मसाला घालून केलेला बटाट्याच्या भाजीचा लगदा, ब्रेड मध्ये भरुन ते गरम करायचं.

 

 

त्यात सजावटीसाठी बारीक शेव, मसाला शेंगदाणे, डाळींबाचे दाणे घालून ब्रेड दाबायचा. बटर तव्यावर लावून वर गरम करायला ठेवलेल्या दाबेली..त्यांचा विशिष्ट प्रकारचा मसालेदार सुगंध यांनी कधी एकदा दाबेली खाऊ असं होतं.

त्याचाही पुढचा भाग म्हणजे चटण्या.. चिंच आणि खजुराची चटणी आणि लाल मिरची आणि लसूण यांची चटणी या दोन चटण्या दाबेली अजूनच लज्जतदार बनवतात.

खरं सांगायचं तर आपल्याकडे स्वयंपाक चांगला नव्हे उत्तम बनवणाऱ्या स्त्रीला अन्नपूर्णा म्हणतात, पण गाडीवर चविष्ट दाबेली करणारे पुरुष पाहिले की वाटतं..अन्नपूर्णेचं वरदान पुरुषही तितक्याच प्रमाणात मिळवू शकतात, फक्त नवं काही करण्याची इच्छा हवी.. प्रयोगशीलता हवी..

कल्पकता आणि झोकून देऊन काम करायची इच्छा असेल, तर दाबेलीसारखा लोकल पदार्थ ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version