' मुंबई ते कन्याकुमारी प्रवास करत ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी त्यांनी केले ‘वर्क फ्रॉम सायकल’! – InMarathi

मुंबई ते कन्याकुमारी प्रवास करत ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी त्यांनी केले ‘वर्क फ्रॉम सायकल’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – स्वरूप कुलकर्णी

===

कोविडनं जगभरात अनेक बदल घडवले. यापैकी एक महत्वाचा बदल म्हणजे घरातूनच ऑफ़िसचं काम करणं.  मुंबईतल्या तिघांनी मात्र हे घरातलं ऑफ़िस चक्क सायकलवर स्वार केलं. मुंबई ते कन्याकुमारी अशी सफ़र आणि सोबत ऑफ़िसचं कामही असा धमाल अनुभव या तिकडीनं घेतला.

तीन मित्र एक दिवस सायकलवर कन्याकुमारीला जायचं ठरवतात. तेही आपापल्या नोकऱ्या सांभाळून. एक पक्का सायकलिस्ट असतो बाकीच्या दोघांमधला एक जण आदल्या दिवशी नवी कोरी सायकल विकत घेतो, दुसरा मित्राची सायकल घेऊन निघतो.

ती सायकल पहिल्याच दिवशी रस्त्यात जीव टाकते मग ते रूट बदलून दुसरी नवीन सायकल विकत घेतात आणि अवघ्या 24 दिवसांत 1,687 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत कन्याकुमारीला पोहोचतात.

पूर्ण फिल्मीच वाटत असली तरी ही स्टोरी खरी आहे.

हे सगळं पहिल्यांदा ऐकल्यावर आम्हालाही विश्वास बसला नाही मग आम्ही गुगल बाबाची मदत घेत या अवलियाना शोधून काढून त्यांच्याशी बातचीत केली. तर मंडळी या अवलियांची नावे आहेत बेकन जॉर्ज, अल्विन जोसेफ आणि रतिश भालेराव.

मायानगर मुंबईत राहणारे हे तिघे तसे एकमेकांना गेल्या 10-15  वर्षांपासून ओळखत आहेत. जॉर्ज यांनी यापूर्वी मनाली ते लेह, मुंबई ते गोवा अशा अनेक राइड्स केल्या असल्यामुळे त्यांना सायकलवर कन्याकुमारी करायचं होतंच.

पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य होत नव्हतं. लॉकडाऊनमुळे पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याची भावना त्यांना शांत बसून देत नव्हती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर त्यांनी रोज सकाळी 1 तास कधीकधी 2 तास सायकलिंग सुरु केलं.

पण एक दिवस मनात विचार आला आपण असंच सायकल चालवत एका ठराविक दिशेने प्रवास सुरु केला तर. सध्या सायकलिंग करून झाल्यानंतर घरी जाऊन काम करतोय तसं कुठेतरी थांबून काम केलं आणि पुन्हा सकाळी उठून सायकलिंग केलं तर.

या सगळ्या भन्नाट कल्पना जॉर्जला शांत बसू देत नव्हत्या मग त्यांनी एक प्लॅन तयार केला. मुंबईमधून कोकणमार्गे संपूर्ण कोस्टल बेल्ट कव्हर करत कन्याकुमारीला जायचं फिक्स झालं. जिवाभावाच्या मित्रांना सहज सांगायला म्हणून फोन केला तर ते म्हणाले आम्ही पण येतो की.

आता मित्रांना नाही म्हणून कसं चालेल. मग 21 नोव्हेंबर २०२० चा मुहूर्त धरून या तिघांनी सायकलला टाच मारत सॉरी सॉरी पँडल मारत हा प्रवास सुरु केला.

अल्विन जोसेफ यांनी या प्रवासाला निघण्याच्या एक दिवस अगोदर नवी कोरी सायकल घेतली. रतिश भालेराव यांनीदेखील एका सायकलचा जुगाड केला पण ती सायकल अंबरनाथवरून कशीबशी नेरळपर्यंत पोहोचली. या सायकलवर कन्याकुमारी गाठणं अवघड असल्याचं लक्षात आल्यावर नव्या सायकलचा शोध सुरु झाला.

पण नवी सायकल पुण्यात मिळत होती, मग मित्रासाठी सगळा प्लॅन चेंज करून कोस्टल बेल्टला फाटा देऊन ही मंडळी पुण्यात आली. पुण्यातून सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बंगळुरू, सालेम आणि तिरुनेलवेली अशी मजल दरमजल करत ही मंडळी कन्याकुमारीला पोहोचली. यातील जॉर्ज आणि जोसेफ हे दोघे काम सांभाळून सायकलिंग करत होते तर रतिश हे सध्या जॉबच्या शोधात असल्याने त्यांना कामाचा ताण तसा कमी होता.

सायकलिंग आणि काम कसं जमलं?

रोज 80 किलोमीटर सायकलिंग करायचं त्यासाठी पहाटे 4 ला सायकलिंग सुरु करायचं 11 वाजेपर्यंत एका ठराविक ठिकाणी पोहोचायचंच. नाही जमलं तर 11 च्या सुमारास जिथे असेल तिथे अगदी वेळप्रसंगी सायकलवर लॅपटॉप सुरु करून कामाला सुरुवात करायची. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत काम आटोपून पुन्हा सायकलिंग करत इच्छितस्थळी पोहोचायचं आणि मग आराम!

काम करता येईल पण रेंजच काय?

या मंडळींना सर्वाधिक खर्च लॉज आणि राहण्यातच लागला. एखाद्या ठिकाणी नेट किंवा रेंज व्यवस्थित असायचं. पण कधी धाब्यावर किंवा चहाच्या टपरीवर बसूनही यांनी दिवस दिवसभर काम केली आहेत.

त्यावेळी यांनी एक शक्कल लढविली होती. प्रत्येकाकडे असलेल्या डबल सिम मोबाईलमध्ये सर्व नेटवर्कची कार्ड त्यांनी कॅरी केली होती त्यामुळे ‘हे नाही तर ते’ म्हणत त्यांनी काम पूर्ण करतच ही राईडही पूर्ण केली.

ट्रीपचा खर्च किती?

ट्रीपला तसा फार खर्च नव्हता. पण कोव्हिडमुळे अनेक बंधनं होती. प्रवासाचा खर्च तर शून्यच होता. मात्र लॉजिंगसाठी सर्वाधिक खर्च झाला, त्यात कोव्हीडमुळे काही ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिरिक्त सुविधा देण्यात आल्याने दरही थोडे जास्त होते. काही हॉटेल्सनी तर राहण्याची परवानगीच नाकारली. या संपूर्ण ट्रीपसाठी तिघांना प्रत्येकी 25 हजार रुपये खर्च आला.

घरचे आणि बॉस काय म्हणाले? (हा प्रश्न आम्ही त्यांना सगळ्यात पहिल्यांदा विचारला)

घरच्यांचा पाठिंबा होताच पण आमचे सर्व सहकारी आणि मॅनेजर्स, बॉस यांनीदेखील आम्हाला खूप सपोर्ट केल्याचे जॉर्ज आणि जोसेफ या दोघांनीही आवर्जून सांगितले.

आमची संपूर्ण जर्नीच भारी होती पण आमचा रूट चेंज झाला तेंव्हा आमचं मन जरा खटटू झालं होतं, पण सायकल घ्यायच्या निमित्ताने पुण्यात आलो आणि पुण्याला सायकलींचं शहर का म्हणतात याचा प्रत्यय आला… पुण्यातल्या सायकलस्वारांना बघून आम्हाला एक नवी ऊर्जा मिळाली… पुण्यात सायकलिंग कल्चर फारच भारी आहे आणि प्रोफेशनली सायकलिंग करणारे ही अनेकजण आहेत. त्यांना पाहून खरंच आम्ही भारावून गेलो आहोत.
– बेकन जॉर्ज

जगण्यातील तोच तोच पणा दूर करून नव्या उत्साहानं पुढे जाण्यासाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टी मह्तवाच्या वाटतात. असा वेगळेपणा शोधून जगणं अधिक सुंदर करण्याच्या विचारात असलेल्यांना या तिघांचे उदाहरण प्रेरणा ठरावी, असेच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?