Site icon InMarathi

डीझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातील पहिली ‘महिला लोको पायलट’- मुमताज काझी!

mumtaj inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मुमताज ह्यांनी लोको पायलट ह्या क्षेत्राविषयी असलेले सगळे समज (जेन्डर स्टीरियोटाईप) मोडून काढत लोकोमोटिव्ह ड्रायविंग सुरु केले आणि भारतातल्या सर्व महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला.

४५ वर्षीय मुमताज काजी ह्या सध्या मुंबई येथे उपनगरीय लोकल सेवेमध्ये मोटरवूमन म्हणून काम करीत आहेत.

आजवर त्यांनी अनेक प्रकारच्या ट्रेनचे ड्रायविंग केले आहे.

त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे ह्या भारतातील सगळ्यात व्यस्त समजल्या जाणाऱ्या मार्गावर लोको पायलट म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्या डीझेल इंजिन चालवणाऱ्या आशिया मधल्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.

 

everylifecounts.ndtv.com

 

मुमताज ह्यांचा जन्म एका पारंपारिक व सनातनी मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांनी सांताक्रूझ येथील सेठ आनंदीलाल पोदार हायस्कूल येथे शिक्षण घेतले आणि त्यांनतर भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज केला.

त्यांचे वडील अल्लाराखू इस्माईल काथवाला हे सुद्धा भारतीय रेल्वेमध्येच कार्यरत होते. सुरुवातीला मुमताज ह्यांच्या कामाला त्यांच्या वडिलांचा विरोध होता.

परंतु नंतर त्यांच्या नातेवाईक आणि रेल्वे मधील सहकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यावर त्यांचा विरोध मावळला आणि त्यांनी मुमताज ह्यांना त्यांच्या आवडीचे काम करण्यास परवानगी दिली.

अनेक महिलांचा आदर्श असणाऱ्या मुमताज ह्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी आजवर अनेक गौरव आणि पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या कुटुंबियांना मुमताज ह्यांचा अभिमान वाटतो. त्यांचा विवाह मकसूद नंदुरबार ह्यांच्याशी झाला आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहेत. त्यांनीही मुमताज ह्यांना त्यांच्या कामासाठी कायम प्रोत्साहन दिले.

त्यांना दोन मुले आहेत, १४ वर्षीय मुलगा तौसीफ आणि ११ वर्षीय कन्या फातीन अशी त्यांची नावे आहेत.

 

siasat.com

 

१९९५ साली मुमताज ह्यांचे नाव पहिल्या महिला लोकोमोटिव्ह ड्रायवर म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये लिहिले गेले. तर २०१५ मध्ये त्यांना रेल्वेच्या जनरल मॅनेजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेली २५ वर्ष मुमताज त्यांचे काम प्रामाणिकपणे करत आहेत त्याचे फळ म्हणून त्यांना बरेच पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत.

तसेच आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट असण्याचा मान पटकवणाऱ्या मुमताज एम काजी ह्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने देखील प्राप्त झाला आहे.

माननीय राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी ह्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी मुंबईच्या मुमताज काजी ह्यांना गौरवान्वित करण्यात आले होते.

मुमताज ह्यांना रूढार्थाने पुरुषी वर्चस्व असलेल्या ह्या क्षेत्रात असामान्य कामगिरी केल्याने हा पुरस्कार देण्यात आला.

 

northeasttoday.in

 

मुमताज ह्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असेच आहे, परंतु अजूनही आपल्या देशात मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलत नाही.

मुलींनी हे करू नये, मुलींना ते करणे जमणार नाही, ही फक्त पुरुषांची आणि ती फक्त बायकांनी करायची कामे आहेत असे समज भारतात अजूनही आढळतात.  मुमताज ह्यांनी हाच समज मोडीत काढत आपल्याला आवडते ते काम करण्यास प्राधान्य दिले.

समाजाने मुलींच्या बाबतीत असलेले आपले काही ठोस समज बाजूला ठेवल्यास पुरुषी वरचष्मा असलेल्या क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळणे कठीण होणार नाही आणि महिला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उतरून मनात कसलाही किंतु न ठेवता मोकळेपणाने काम करू शकतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version