Site icon InMarathi

सरकारी धोरणांवर सडकून टीका करणारा, बनला बॉलिवूडमधला ‘शब्दांचा जादूगार’!

sahir-ludhianvi-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहराचा काळ. जगभरात ‘बॉलिवूड’ हा ब्रँड तयार होण्याची सुरुवात याच काळात झाली. या काळात जसे अनेक अभिनेते – अभिनेत्री, संगीतकार, गायक-गायिका नावारूपास आले, त्याप्रमाणेच गीतकारही लोकप्रिय झाले.

साहिर लुधियानवी हे अशा अग्रगण्य गीतकारांपैकी एक! आपल्या काव्यप्रतिभेने त्यांनी १९५० ते १९८० या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.

पंजाबच्या लुधियानामध्ये १९२१ साली साहिरचा जन्म झाला. जमीनदारांच्या घरात जन्म झालेला असला, तरी कमी वयात दुर्दैवाचे दशावतार त्यांना बघावे लागले. साहिरचे वय अवघे १३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी दुसरा निकाह केला. पण साहिरची आई एवढी धीराची, की तिने आपल्या नवऱ्यापासून विभक्त होऊन आपल्या मुलाला एकट्याने वाढवण्याचे ठरविले.

१९३५ च्या दरम्यान तत्कालीन कर्मठ वातावरणात हे पाऊल उचलणे म्हणजे धाडसाचेच काम होते. साहिरच्या वडिलांनी हरप्रकारे प्रयत्न करूनही ते त्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. खेळण्या-बागडण्याच्या वयात साहिरना हे सगळे झेलावे लागले.

 

 

साहिर यांचे शालेय शिक्षण लुधियानातच झाले. इथेच ते मौलाना फरयाझ हरियाणवी यांच्याकडून उर्दू आणि फारसी शिकले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी लुधियानातच एस. सी. धवन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

नंतर काही कारणास्तव त्यांना कॉलेजमधून काढण्यात आले. पुढे त्यांनी लाहोरमध्ये दयाल सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात साहिर यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केलेला होताच. १९४५ मध्ये त्यांनी ‘तल्ख़ियाँ’ या नावाने आपला पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला.

दरम्यान त्यांनी आपले खरे नाव ‘अब्दुल फई’ ऐवजी ‘साहिर लुधियानवी’ हे टोपणनाव घेतले. ‘साहिर’चा उर्दूमध्ये अर्थ होतो ‘जादूगार’.

 

 

हा माणूस एका अर्थाने जादूगारच होता, पण शब्दांचा. त्यांना स्वतःलाच हे फार लवकर समजलं, म्हणून पाळण्यातलं नाव सोडून ‘अब्दुल’ चा ‘साहिर’ झाला!

पुढे भारताची फाळणी झाली आणि त्यानंतर साहिर पाकिस्तानातच राहिले. तत्कालीन स्वातंत्र्यपूर्व भारतात ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंट’ या नावाने एक चळवळ चालवली जात होती.

काहीशा डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या या संघटनेत सादात हसन मंटो, फैज अहमद फैज यांसारखे अनेक प्रथितयश उर्दू आणि हिंदी साहित्यिक सक्रिय होते. साहिरसुद्धा या संघटनेशी निगडित होते.

कॉलेज संपल्यावर त्यांनी ‘शाहकार’ आणि ‘सवेरा’ नियतकालिकांचे संपादन केले. डाव्या विचारसरणीचे समर्थक असल्याने ‘सवेरा’ मधून सरकारच्या धोरणांवर टीकात्मक लिखाण त्यांनी केले, ज्याची परिणीती त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघण्यात झाली.

साहिरनी यामुळे लाहोरला कायमचा रामराम ठोकला आणि दिल्लीत आले. पुढे काही महिन्यांतच ते मुंबईत आले आणि तिथेच स्थिरावले.

 

 

याच काळात भारतात चित्रपट सृष्टी आकार घेत होती. नवनवीन लेखक, दिग्दर्शक पुढे येऊ लागले होते. गाणी हा भारतीय चित्रपटातील अविभाज्य घटक! अगदी लुधियाना पासून साहिरनी गझल आणि नज्म लिहिण्यास सुरुवात केली होती.

हे सुद्धा वाचा – नजरेची भाषा शिकवणाऱ्या या अजरामर प्रेमकहाणीचा दुःखद शेवट वाचून आजही डोळे पाणावतात

मुंबईत आल्यावर त्यांना १९४८ मध्ये सर्वप्रथम ‘आझादी की राह पर’ या चित्रपटासाठी गाणी लिहिली. गीतकार म्हणून साहिर यांचा प्रवास इथपासून सुरू झाला. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती १९५१ मधल्या ‘नौजवान’ आणि ‘बाझी’ या चित्रपटांमुळे.

एस. डी. बर्मन यांचे संगीत असलेल्या या दोन्ही चित्रपटांमधली गाणी लोकप्रिय झाली आणि पहिल्यांदाच ‘साहिर लुधियानवी’ हे नाव चर्चेत आले.

 

 

त्यानंतर साहिर यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. १९५०-१९६० च्या दशकातील जवळपास सगळ्या संगीतकारांबरोबर साहिरनी काम केले. मिलाप, प्यासा, साधना, धूल का फूल, ताजमहाल, कभी कभी अशा अनेक चित्रपटातली साहिर यांची गाणी लोकप्रिय ठरली.

१९६४ मध्ये ताजमहाल मधील ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ आणि १९७६ मध्ये कभी कभी मधील ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’ या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

साधी, पण मनाला भिडणारी रचना हे साहिरच्या गीतांचे वैशिष्ठय. उर्दूवरील त्यांचे प्रभुत्त्व त्यांच्या लिखाणातून दिसून येते. केवळ मागणीप्रमाणे गाणी लिहिली गेली, की ती प्रसंगाला अनुरूप होतातही, पण ती कधीही ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाहीत.

साहिर गीतकार म्हणून गाणी लिहिण्याच्या आधी एक संवेदनशील कवी आणि शायर होते. कोणत्याही कवीसाठी त्यांचे काव्य म्हणजे त्यांच्या जीवनाचा आरसा असल्याप्रमाणे असते. साहिर यांच्या बाबतीतही हे लागू पडते. साहिर म्हणतात,

“मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है
मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,
कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए
वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ”

साहिर यांच्या काव्यात कधीच अवाजवी कल्पना केलेल्या दिसत नाहीत. याउलट जीवनातील सुख-दुःख, प्रेम, नैतिक मूल्ये या ‘प्रॅक्टिकल’ गोष्टी साहिरच्या काव्यात दिसून येतात. त्यांच्याच आणखी एका अजरामर गीतात ते म्हणतात;

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया

 

 

१९७१ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले. अशा या प्रतिभावंत शायर, गीतकाराचे वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज त्याच्या मृत्यूच्या ३० वर्षांनंतरही त्यांच्या काव्यातील जादू कमी झालेली नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version