आझाद हिंद सेनेचा एल्गार, हिटलर भेट आणि पराक्रम दिनामागचा तळपता ‘महानायक’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताच्या इतिहासात काही गोष्टी फारच गूढ ठेवण्यात आल्या आहेत. एका ठराविक वेळेपर्यंत तपास करायचा आणि मग तो अर्धवट सोडून द्यायचा असा पवित्रा कित्येक वर्ष भारतीय जनतेने अनुभवला आहे.
उदाहरण सांगायचं तर, लाल बहादुर शास्त्री यांचा मृत्यू कशामुळे झाला? आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? यांची समाधानकारक उत्तरं अजूनही लोकांना मिळालेली नाहीयेत.
सोशल मीडिया आल्यापासून अजून एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे, लोक फार जजमेंटल झाले आहेत. कोणीही कोणताही प्रश्न उपस्थित केला की, त्या व्यक्तीला विशिष्ठ वर्गाचा प्रतिनिधी म्हणून ठरवलं जातं आणि एका प्रकारे डावललं जातं.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल माहिती असणे हा खरं तर प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, हाच सोशल मीडिया त्या काळात उपलब्ध नसल्याने या गोष्टी गूढ राहिल्या असं सुद्धा म्हणता येईल.
आता हा विषय का चर्चेत आला?
“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दून्गा” हे आश्वासक उदगार काढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा ‘पराक्रम दिवस’ म्हणून देशभर साजरा करायचा केंद्र सरकार ने नुकताच निर्णय घेतला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा, आझाद हिंद सेनेचा हा खूप मोठा गौरव आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २३ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
===
हे ही वाचा – हिटलर – सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भेटीतील, लोकमान्य टिळक आणि गौतम बुद्धांचं कनेक्शन!
===
राजकीय मतभेद विसरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचं महत्व पक्षांना मान्य आहे ही सामान्य लोकांसाठी खूप आनंदाची बाब आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी एका ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ‘देश नायक’ म्हणून सार्थ उल्लेख केल्याचं सुद्धा या निमित्ताने समोर आलं आहे.
नेताजींचे चुलत पणतू चंद्र कुमार बोस यांनी हा दिवस ‘देशप्रेम दिवस’ म्हणून सध्या सर्व देशवासीयांकडून साजरा होत आहे ही माहिती दिली आहे. नवीन पिढीला या निमित्ताने आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या नायकांबद्दल कळत आहे या गोष्टीचं समाधान व्यक्त केलं आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पराक्रम आणि देशभक्तीची दखल घेऊन २३ जानेवारी २०२१ हा दिवस इथून पुढे ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा होईल या बातमीचं सर्व सामाजिक संघटनांकडून सुद्धा स्वागत होत आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या यंदा असलेल्या १२५ व्या जयंतीचं औचित्य साधून हा निर्णय सर्व संमतीने घेतल्याचं जाहीर केलं आहे.
आपल्या पत्रकात, सांस्कृतिक मंत्रालयाने नेताजींच्या अतुलनीय कामगिरी आणि निस्वार्थ देशसेवेतून सर्वांनी बोध घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली हे.
जगात सर्वात जास्त तरुण व्यक्ती असलेल्या आपल्या भारत देशात नेताजी सुभाषचंद्र बोस सारखं व्यक्तिमत्व हे ‘पराक्रम दिवस’ या निमित्ताने समरणात येईल, त्यांच्याबद्दल माहिती इंटरनेटवर शोधली जाईल ही आजच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाहिलेली आदरांजली असेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊयात :
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा काळ खरंच खूप वेगळा होता. २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओरिसा येथे त्यांचा जन्म झाला. चौदा भावंडांमध्ये ते नवव्या क्रमांकाचे होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना त्यांच्यावर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा पगडा होता. इंडियन सिव्हिल सर्विसच्या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले होते.
त्यांना नोकरी साठी पत्र सुद्धा आलं होतं. पण, ब्रिटिशांसाठी नोकरी करणं म्हणजे त्यांना साम्राज्य वाढवण्यास मदत करणे हा विचार त्यांना सतावत होता आणि म्हणूनच त्यांनी लंडन मधल्या नोकरीचा त्याग करून १९२१ मध्ये भारतात येणं पसंत केलं.
१९२३ मध्ये त्यांची निवड अखिल भारतीय युवा काँग्रेस अध्यक्ष या पदावर निवड झाली आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९२७ आणि १९३० यावर्षी इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक केली होती.
भारतीयांच्या मानसिकतेचा विचार न करता पहिल्या महायुद्धात भारतीयांना इंग्रजांकडून लढवायला लावल्या बद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असहकार आंदोलन पुकारलं होतं.
१९४१ मध्ये नेताजी हे अटकेतून सुटका झाल्यानंतर जर्मनीला गेले आणि त्यांनी हिटलरची भेट घेतली. जर्मनीहून परत आल्यानंतर त्यांनी रशियाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रशियन लोकांना ब्रिटिशांच्या भारतात राज्य करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती दिली.
१९४२ मध्ये त्यांनी जर्मनी मध्ये ‘आझाद हिंद रेडिओ’ ची सुरुवात केली आणि परदेशातील भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचं आवाहन केलं. १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारत स्वातंत्र्य होण्यासाठी ‘आझाद हिंद’ ची स्थापना केली.
‘आझाद हिंद’ ची आपली वेगळी करन्सी होती, सिव्हिल कोड होता. पण, या सर्वांमागे जपान सरकारचा पाठींबा होता. ‘आझाद हिंद’ म्हणजे सरकारची रंगीत तालीम असं म्हणता येईल. एकच ध्यास की भारत कधी स्वातंत्र्य होईल?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाच्या काही घटनांवरून त्यांनी आपल्यासाठी किती पराक्रम केले आहेत हे लक्षात आलं असेलच.
आझाद हिंद सैन्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती साजरा करण्यासाठी खूप लोकांना एकत्र आणण्यासाठी मोठी कमिटीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये बॉलीवूड मधील कलाकार, क्रिकेपटू यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर काही लोकं असंही म्हणतायत की बंगाल विधानसभा निवडणुका तोंडाशी आल्या आहेत म्हणूनच हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
यात तथ्य नेमकं कीती ते सांगता येणं कठीण आहे. पण आपल्या देशात नेताजींना मिळणारा हा सन्मान पाहून प्रत्येक भारतीयाचं उर अभिमानाने भरून आलं आहे!
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम दरवर्षी अश्याच मोठ्या प्रमाणात साजरा होत राहील अशी आशा व्यक्त करूयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.