' नव्यांचा नवा डाव, भारताने फक्त ‘विराट’च नव्हे, तर ‘अजिंक्य रहाणे’! – InMarathi

नव्यांचा नवा डाव, भारताने फक्त ‘विराट’च नव्हे, तर ‘अजिंक्य रहाणे’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे

===

सकाळी ६ चा गजर वाजला आणि डोळे उघडले. हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात, सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज येणं ही गोष्ट फारच कॉमन झाली आहे, पण मोबाईल हातात घेतला तो मॉर्निंग खऱ्या अर्थाने गुड व्हावी असा स्कोअर बघता यावा म्हणून…

मोबाईलवर स्कोअर बघितला तेव्हा मात्र काहीसा भ्रमनिरास झाला. रोहित बाद झालेला आहे हे कळलं आणि मनात थोडीशी धाकधूक निर्माण झाली. ३२८ धावांचा पाठलाग भारताचा हा संघ करू शकतो असं मनात वाटत होतं, पण भारताने २००८ साली इंग्लंड विरुद्ध ३८७ धावांचा डोंगर सर केला होता त्यावेळी त्याची पायाभरणी करायचं काम दिल्लीच्या ढाण्या वाघानं केलं होतं.

या सामन्याचा ‘वीरू’ रोहित शर्मालाच व्हावं लागणार, हे मात्र मनात अगदी फिट्ट बसलं होतं.

 

rohit-sharma-inmarathi

 

सकाळी उठल्यावर ही आशा संपुष्टात आल्याचं कळलं. तरीही वेडं मन ऐकायला तयार नव्हतं. सामना बघण्यासाठी टीव्ही लावला. रात्री उशिरा झोपल्यामुळे झोप पूर्ण झालेली नव्हती. अखेर निद्रादेवीने पुन्हा ताबा घेतला.

तेव्हा जे झोपलो त्यानंतर लवकर जाग आलीच नाही. छानपैकी झोप पूर्ण करून उठलं, तोवर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी खेळपट्टीवर तंबू ठोकला होता. गॅबाच्या खेळपट्टीवर बस्तान बसवण्याची तयारी पूर्ण झालेली होती.

या दोघांच्या भागीदारीची घोरपड अशी काही चिकटली होती, की ‘इथून सामना हरणे नाही’ हा विचार मनात येऊन गेला होता. पुजारावर आणि त्याच्या फलंदाजीवर विश्वास होताच. शुभमनदेखील चांगलं खेळत होता.

त्यानंतर जे घडलं ते मात्र ‘सांगावे ते नवलच’ या शब्दांनी चपखल वर्णन करता येईल असं होतं. शुभमनने गियर बदलला आणि खेळात रंगत आली. स्टार्कच्या एका षटकात २० धावा ठोकल्या गेल्या, आणि जॉनी लिव्हरचा ‘अब मजा आयेगा ना भिडू’ हा डायलॉग आठवला.

 

shubhman-gill-inmarathi

 

खरंच आता मजा येणार आहे हे जाणवलं होतं. पण साला, अपेक्षेपेक्षा फारच जास्त मोठा रोलर कोस्टर राईड ठरला की राव सामना!

९१ धावा करून गिल बाद झाला. सध्या ज्याला सोशल मीडियाने ‘सचिनचा जावई’ करून टाकलंय, त्या गिलला सुद्धा नव्वदीत बाद झालेलं पाहायला मिळालं. इथे मात्र हृदयात धस्स झालं. आता सामना जिंकणारच अशी खात्री वाटत होती, तिथे भारतीय संघ आता सामना वाचवू शकेल ना, हा प्रश्न मनात उभा ठाकला.

तसा अजिंक्य रहाणेवर सुद्धा विश्वास होता. तरी मनात भीती होतीच. ती असणं स्वाभाविकही होतं. या बदली कर्णधाराने मात्र वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. त्याने सुद्धा भारतीय फलंदाजीची गाडी तशीच भरधाव सुरु राहील अशी सुरुवात केली. २२ चेंडूत २४ धावा झाल्या आणि तो बाद झाला, पण कर्णधाराने भारतीय संघाचा इरादा स्पष्ट केला.

 

ajinkya-rahane-failure-inmarathi

 

भारत गॅबावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार हे दिसत होतं. रिषभसारखा धमाकेदार फलंदाज संघात असताना लक्ष गाठणं अशक्य नाही, यावर क्रिकेट रसिकांनी विश्वास ठेवला असेल. भीती वाटतं होती, ती रिषभच्या आततायी स्वभावाची…

भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण सार्थकी ठरवणारा भारतीय खेळाडू कोण, असं विचारलं तर रिषभ पंत हे उत्तर अयोग्य ठरणार नाही.

म्हणूनच अजिंक्य गेल्यावर ‘अजिंक्य’ राहण्याची संधी हुकणार, ही भीती मनात यायला कारण होतं. पंत मात्र वेगळंच काहीतरी ठरवून आले होते. मागच्या सामन्यात जी करामत करता आली नाही, ती आज करायचीच असं वाटत असेल सुद्धा या दिल्लीकराच्या मनात कुठेतरी.

पुजारा गेल्यानंतर त्याने सगळी सूत्रं त्याच्या हाती घेतली आणि टी-२० स्टाईलने धमाका सुरु केला. पंतांकडे बॅट नाही हातोडा असतो. त्यामुळे प्रति षटक ५ धावा ही गती अशक्य नव्हती. मागच्या डावात प्रतिहल्ला चढवणारा वॉशिंग्टन, या डावात सुद्धा सुंदर खेळला. मुख्य म्हणजे त्याने पंतला योग्य साथ दिली.

पंतांनी तर कंबर कसली होती. २०१८ च्या डिसेंबर महिन्यात ‘Have you ever heard a word TEMPORARY CAPTAIN’ या शब्दांत ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला स्लेज करणाऱ्या रिषभने यावेळी बॅटनेही दणका दिला. त्याचे कव्हर ड्राईव्ह बघताना मजा आली.

 

rishabh-pant-inmarathi

 

विजयी फटका सुद्धा त्याच्या बॅटमधून आला आणि एक भलामोठा ऐतिहासिक विजय मिळवताना त्यावर शिक्कामोर्तब करण्याची कमाल रिषभने केली.

३२ वर्षे अभेद्य असलेला ब्रिस्बेनमधील Gabba नावाचा गड भारतीय संघाने सर केला.

या ऐतिहासिक विजयाच्या आणि एकूणच मालिकेच्या निमित्ताने काही गोष्टी मनावर अगदी पक्क्या कोरल्या गेल्या आहेत.

‘अजिंक्य’ भारत आता असेच ‘रहाणे’

हा विजय फक्त भारतीय संघाचा विजय नाही. माझ्यासारख्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरेतून बघाल, तर हा अजिंक्यचा सुद्धा विजय आहे. एकेकाळी उपकर्णधार असून सुद्धा संघाबाहेर ठेवल्या गेलेल्या अजिंक्यने आज भीम पराक्रम केलाय. तोदेखील विराट, बुमराह,शमी, अश्विन, जडेजा, वगैरे महत्त्वाचे खेळाडू संघात नसताना.

हे सुद्धा वाचा – …आणि मग विराटची अनोखी कामगिरी तुम्हाला चकित करेल, हे नक्की!

अजिंक्य एक कप्तान म्हणून दमदार पर्याय आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना, बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.

 

ajinkya-rahane-team-india-at-gabba-inmarathi

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कधीही आपलासा न वाटणारा ‘Multiple Captains’ हा पर्याय आता तरी अजमावून बघायला हवा. शांत आणि सुस्वभावी अजिंक्यने कप्तान म्हणून पहिल्या ५ पैकी ४ सामने जिंकून ही गोष्ट अधोरेखित केली आहे.

रोहित टी-२० संघाचा, विराट वनडे संघाचा आणि अजिंक्य कसोटी संघाचा कर्णधार; आणि अवघ्या क्रिकेट विश्वावर भारतीय संघाचं वर्चस्व अशी परिस्थिती पाहायला मिळावी असं स्वप्न आहे. ते साकार होईल का, हे मात्र ठाऊक नाही.

‘दादा’गिरी कायम हैं’

‘आमच्या सौरव गांगुलीचा संघच दमदार संघ होता, हल्लीच्या पोरांमध्ये तो दम नाही’ असं म्हणणारी अनेक मंडळी तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील. गोष्ट खरी आहे. वीरू, सचिन.द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, झहीर, भज्जी, कैफ, युवराज असे रथी-महारथी आजच्या संघात दिसत नाहीत.

 

ganguly-team-india-inmarathi

 

तरीही लॉर्ड्सवर ३२५ धावांचा डोंगर पार करणारा भारतीय संघ किंवा २००८ साली चौथ्या डावात ३८७ धावा करून ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ, आणि आज गॅबावरची मक्तेदारी मोडीत काढून, कांगारुंची त्यांच्या घरात शिकार करणारा ढाण्या वाघ ठरलेला भारतीय संघ यांच्यातील यश मिळवण्याची भूक मात्र तेवढीच आहे.

हा वाघ यावेळी ‘जखमी वाघ’ होता. जखमी वाघ अधिक धोकादायक असतो… हे मात्र खरं!

भल्याभल्यांची बोलती बंद

रिकी पॉन्टिंग, मायकल वॉन, मायकल क्लार्क अशा मात्तबरांनी केलेलं भाकीत भारतीय संघाने खोडून काढलं. विराटविना विजय शक्य नाही, भारताचा धुव्वा उडणार, अशी भविष्यवाणी करताना, या धुरंधरांनी सोशल मीडियावर बरीच ‘टिवटिव’ केली होती.

भारतीय संघाचा ३६ धावांमध्ये खुर्दा झाल्यावर तर, आता व्हाइटवॉश अटळ आहे असंच सगळे म्हणत होते. जायबंदी असलेल्या हनुमा विहारी आणि रवी अश्विन यांनी तिसऱ्या सामन्यात कांगारूंच्या हातातोंडाशी आलेला विजय काढून घेतला. सामना ड्रॉ केला. सामना अनिर्णित ‘राहणं आणि राखणं’ यात नेमका फरक काय ते पाहायला मिळालं.

 

vihari-and-ashwin-inmarathi

 

यासगळ्यावर चेरी ऑन केक काही असेल, तर ते म्हणजे गॅबावरील साम्राज्य खालसा करणं. कसोटीचा चौथा दिवस आटोपल्यावर सुखाने झोपलेल्या कांगारुंची भारताने झोप उडवली.

१९ डिसेंबर २०२० ला ३६ धावांत सर्वबाद होणाऱ्या भारतीय संघाने, बरोबर १ महिन्यानंतर, म्हणजेच १९ जानेवारी २०२१ ला ऐतिहासिक विजय मिळवत, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ३६चा आकडा सिद्ध केला.

कठीण समय येता…

रामदास स्वामी म्हणून गेले आहेत, ‘कठीण समय येता, कोण कामास येतो’… मोहमद सिराज आणि शार्दूल ठाकूर या दोन गोलंदाजांनी, त्यांच्या कृतीतून या प्रश्नाचं उत्तर दिलं असं म्हणायला हरकत नाही. संयम राखला तर काय करता येऊ शकतं हे या दोघांनी दाखवून दिलंय.

दौरा सुरु होण्याआधीच सिराजच्या वडिलांना देवाज्ञा झाली. ज्या वडिलांनी सगळं सर्वस्व मोहम्मदला क्रिकेटर करण्यासाठी वेचलं, त्यांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय त्याने घेतला.

शेवटच्या सामन्याआधी बुमराह, अश्विन आणि जडेजा जायबंदी झाल्यामुळे, संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून मैदानावर पाऊल ठेऊन गोलंदाजीचं नेतृत्व स्वीकारताना, सिराजने ५ गडी बाद करण्याची अफलातून कामगिरी करून दाखवली.

 

mohammad-siraj-inmarathi

 

शार्दूल, सुंदर, गिल, पुजारा, रिषभ यांना या विजयाचं जितकं श्रेय जातं, तेवढंच ते सिराजच्या ५ बळींना सुद्धा जातं. शार्दूलच्या संयमाबद्दल म्हणालो, म्हणून तुम्हाला त्याची पहिल्या डावातील फलंदाजी आठवली असेल. तो अप्रतिम खेळला. त्याचं फलंदाजीचं तंत्र आजच्या टी-२० काळातील अनेक फलंदाजांनादेखील लाजवेल असं आहे.

मात्र मला ज्या संयमाबद्दल बोलायचं आहे. ते जरा वेगळं आहे. सचिन निवृत्त झाल्यानंतर १० नंबरची जर्सी घालून मैदानावर उतरणारा भारतीय आठवतोय? होय! शार्दूल ठाकूर त्याचं नाव!

सोशल मीडियापासून ते गल्लीतल्या चर्चांपर्यंत, सगळीकडे त्याला ट्रोल केलं गेलं. त्याच्यावर खरमरीत शब्दांमध्ये टीका झाली. त्याला जर्सी नंबर बदलावा लागला. आज ५४ नंबरची जर्सी घालून त्याने पहिल्या डावात जी फलंदाजी केली, ती १० नंबरच्या जर्सीला साजेशी नक्कीच होती.

 

shardul-thakur-batting-inmarathi

 

भारतीय संघ संकटात सापडला की १० नंबरची जर्सी कुणाला तरी हाताशी घेऊन लाज राखायची. या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘ठाकूर’ साहेबांनी ‘सुंदर’ फलंदाजी करून लाज राखली आणि विजयाची पायाभरणी सुद्धा केली. शार्दूल भाईने दिल जीत लिया…

मुख्य ८ ते १० खेळाडू जायबंदी असणं, कोविडसारखी महामारी असल्यामुळे बदली खेळाडूंचा पर्याय नसणं, कठीण आणि ‘न भूतो न भविष्यति’ अशी ऐतिहासिक परिस्थिती; या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेला हा विजय अधिकच अधोरेखित होतो. इतिहास सहजासहजी घडत नाही म्हणतात, ते खरंच…

हे सुद्धा वाचा – आज लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील ‘वन डे’ सामन्यांना अशी झाली सुरूवात!

ही केवळ एक सुरुवात ठरावी आणि भारतीय संघाची अशीच प्रगती होत राहावी अशी आशा करूया.

बाकी, सोशल मीडियावर वाचनात आलेल्या अनेक मिम्सपैकी एक मिम अगदी चपखल बसणारा वाटला; दोन्ही संघांनी त्यांच्या कर्णधारांच्या नावाला साजेशी कामगिरी केली, “अजिंक्य रहाणे” आणि “टीम पेन”…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?