इंग्रज असो वा मुघल, शस्त्रांनी नव्हे, कुशाग्र बुद्धीने शत्रूशी लढणारा पेशवाईतील चाणक्य
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पेशवाईमध्ये पेशव्यांव्यतिरिक्त ज्यांना इतिहासात अजरामर स्थान लाभलं त्यापैकी एक नाव – नाना फडणवीस
पेशव्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी मराठी साम्राज्याला पुन्हा नवी झळाळी मिळवून दिली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवराव पेशव्यांकडून त्यांना फ़डणविशीची वस्त्रं मिळाली आणि ही जबाबदारी त्यांनी अखेरच्या श्र्वासापर्यंत समर्थपणे सांभाळली.
अर्थात फडणवीस हे त्यांचं आडनाव नसून त्यांना दिलेली पदवी आहे ही बाब आजही अनेकांना ठाऊक नाही.
नानासाहेब फडणवीस यांचं मुळ नाव होतं, बाळाजी जनार्दन भानू. रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट खाडीवरच्या दक्षीण तीरावरील वेळास हे त्यांचे मूळ गाव मत्र त्यांचा जन्म सातार्यात झाला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
वेळासला महादजी कृष्ण भानू हे वतनदार होते. त्यांना नारायण, हरि, रामचंद्र आणि बळवंत अशी चार मुले. महादजींच्या पश्चात नारायण वेगळा झाला आणि बाकी तिघे एकत्र राहिले.
श्रीवर्धनला राहणारे बाळाजी विश्वनाथ भट हे देशमुख होते. त्यांचा या तिघांशी विशेष स्नेह होता. नानासाहेबांच्या गावी म्हणजे वेळासला हबशांच्या उपद्रवाला कंटाळून भट घाटावर रोजगार शोधण्यास निघाले. त्यांच्यासोबत हे तिघेही निघाले.
भटांनी भानूंना सांगितले की आमच्या भाकरीत तुमचा चतकोर ठेवू. घाटावर येताना अंजनवेलीला हबशांनी भटांना पकडले. भानूंनी खूप खटपटी करून भटांची सोडवणूक केली. पुढे सगळी मंडळी घाटावर येऊन विविध ठिकाणी नोकरीस लागली. बाळाजीपंतांनी धनाजी जाधव सेनापतींकडे चाकरी पत्करली.
नाना बालवायापासूनच मातृभक्त आणि देवधर्माचं करणारे होते. त्यांना देवपूजेचा नादच होता. तासन तास ते पूजेत रमत असत, मुंजीनंतर पेशव्यांनी नानासाहेबांना विश्वनाथराव आणि माधवराव (पेशवे) यांच्यासोबत अभ्यास करण्याची संधी मिळाली.
नानासाहेब आणि भाऊसाहेब पेशव्यांचा नानांवर लहानपणापासूनच लोभ होता. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सहवास लाभल्याने राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या अवघ्या १४ या वर्षी त्यांना फ़डणवीशीची वस्त्रे मिळाली आणि भानू कुटुंबातील नानांची फडणवीस ही नवी ओळख जन्माला आली.
नानासाहेबांचा स्वभाव मुत्सद्दी होताच त्याला थोरल्या पेशव्यांच्या मार्गदर्शनाची जोड लाभल्याने नानांनी पेशवाई आणि राजसत्तेचा दरार, दबदबा वाढवला.
–
हे देखील वाचा – छत्रपती शिवाजी महाराज की बाजीराव पेशवे? बिनडोक तुलनेला दिली गेलेली ६ अप्रतिम उत्तरं…!
–
इंग्रजांचा पडाव करण्यातही त्यांनी यश मिळवलं. नानासाहेबांचं आयुष्य हा पेशवाईतला आणि मराठी साम्राज्याच्या कठीण कालखंडातला इतिहास आहे. त्यांचा उल्लेख या कालखंडाच्या इतिहासाचा अभ्यास करताना करणं अपरिहार्य आहे, इतकं त्यांना महत्त्व आहे.
माधवराव आणि राघोबादादासाहेब यांच्या सतत कुरबुरी सुरुच होत्या. दादांनी आणि सखाराम पंतांनी कारभारात लक्ष घालणे सोडल्यावर माधवरावांनी त्यांच्या नाकदुर्या काढण्याऐवजी त्रिंबकरावमामा, गोपाळराव पटवर्धन, नाना फ़डणवीस, मोरोबा फ़डणवीस आणि हरिपंत फडके यांचे मंडळ नेमुन राज्यकारभार चालू ठेवला.
दुखावले गेलेले दादा निजामाला जाऊन मिळाले आणि साक्षात पुण्यावर चाल करून आले. गृहकलहात शत्रूचा फ़ायदा होत आहे हे दिसल्यावर माधवरावांनी शांतपणे कारभाराची सूत्रे दादांच्या हवाली करून गृहच्छिद्र झाकले.
दादांच्या हातात कारभार आल्यावर त्यांनी भानूंकडून काढून घेऊन रायरीकरांना फ़डणविशीची वस्त्रं दिली. राक्षभुवनाच्या लढाईनंतर माधवराव पुन्हा राज्य कारभार करू लागले आणि फ़डणविशीची वस्त्रं पुन्हा एकदा नानांकडे तर मोरोबांना कारभारी बनवले.
पेशवे स्वार्यांवर जात त्यावेळेस मागचा कारभार नानांवर सोपवून ते निर्धास्त असत. याशिवाय स्वारीवर असणार्या पेशव्यांना धान्यधुन्य, पैसा, दारूगोळा यांचा पुरवठा नियमित व्हावा ही जोखमीची जबाबदारीही नानाच सांभाळत.
तुकोजी होळकर आणि महादजी शिंदे यांना राघोबादादांची मर्जी नसतानाही सरदारकीची वस्त्रं मिळवून देण्यात नानांचाच पुढाकार होता.
नारायणरावांवर पुत्रवत माया करणार्या नानासाहेबांना त्यांच्या मृत्यूने हादरवून टाकले. ते फ़ार निराश झाले. ही घटना घड्वून आणलेल्या राघोबादादांबद्दल त्यांच्या मनात कायमचीच अढी बसली. याच संतापाच्या आणि उद्रेकाच्या भरात त्यांनी इतिहासातील सुप्रसिध्द असे बारभाईचे कारस्थान रचले.
या बारभाईत सामिल अनेक मंडळी फुटीर होती तरिही नानासाहेबांनी शेवटपर्यंत ही जबाबदारी पेलली. निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी राघोबादादा निघाले तेंव्हा नानासाहेब आजारपणाचे निमित्त करून पुण्यात परतले.
राघोबांच्या बाजूनं असणार्यांची धरपकड केली. खुद्द दादांच्या फ़ौजेतच फ़ितुरी निर्माण केली. इतकेच नाही तर निजाम आणि भोसल्यांनाही आपल्या बाजूनं केलं.
दादा पुण्यास परतले तर त्यांना थोपवायला आधी त्रिंबकरावमामा आणि नंतर हरिपंत फ़डक्यांना पाठवले. अखेरीस दादा इंदूरला पळून गेले आणि इकडे सवाई माधवरावांचा जन्म झाला.
अत्यंत खडतर असा तो काळ होता. एकीकडे पेशवाईवर हक्क दाखवणारे राघोबादादा, दुसरीकडे बारभाईतली दुही, राज्यात सर्वत्र चाललेली फ़ितुरी यामुळे कोणावर विश्र्वास ठेवावा आणि कोणावर नाही अशी बिकट परिस्थिती.
राज्याची आर्थिक घडी विस्कटून कधी नव्हे ते पैशाची चणचण चालू झालेली, फ़ौज आणि सरदार मनमर्जी करणारी, प्रजा उदासिन, भोंसले आणि निजाम स्वार्थसाधू असं एकंदर चित्र होतं आणि मराठी साम्राज्याची सगळी भिस्त नानासाहेबांवर एकट्यावर येऊन पडली होती.
नानांच्या मुत्सद्दीपणामुळेच ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी अधीही थेट मराठी साम्राज्यासाठी धोका ठरली नाही.
मोघलांशी लढण्याचे आणि ब्रिटिशांशी लढण्याचे व्यूह भिन्न असतात हे दूरदृष्टिनं त्यांनी जाणलं आणि त्यानुसार पावलं टाकली. त्यांनी आखलेल्या रणनीतिच्या जोरावर अनेक युध्दांमधे मराठ्यांना विजय मिळवता येणं शक्य झालेलं होतं. यात हैदराबादच्या निजामाविरूध्दची लढाई, हैदर अली, टिपू सुलतान यांच्यासह इंग्रजांविरूध्दच्या लढायांचा मुख्यत्वे समावेश आहे.
नानांनी इंग्रजांचा बारकाईनं अभ्यास केला होता. इंग्रज युध्दापेक्षाही तहांवर भर देत आणि तो करताना शब्दांचे खेळ कसे रचत हे नानांनी अचूकपणे हेरलं होतं. इंग्रजांची दुटप्पी शब्द तहनाम्यात वापरण्याची पध्दत त्यांनी ओळखली होती आणि म्हणूनच आपलं साम्राज इंगजांपासून सुरक्षित ठेवणं त्यांना जमलं होतं.
अशातच नानांना पकडण्याचा बेत शिजला, कोपरगावात असणार्या आनंदीबाई या कटाच्यामागे होत्या. शनिवार वाड्यातील बळवंतराव पटवर्धन यांच्या सहाय्यानं हा कट रचण्यात आला होता. मात्र अगदी मोक्याचा वेळेस फ़ितुरी होऊन हा कट उघडकीस आला.
फ़ितुरी केलेल्यांना नानांनी कडक शासन केले पण आनंदीबाई किंवा राघोबादादा त्यांना काहीही शासन केले नाही.
धन्याला सेवकानं शासन न करण्याचं तारतम्य अशाही परिस्थितीत नानांनी बाळगलं. याविषयी स्वत: ग्रॅण्ट डफ़ यानं नानांची स्तुती केलेली आहे.
थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवाईची घडी विस्कटली होती. सरदार महादबा शिद्यांच्या मदतिने त्यांनी ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवली.
दक्षिणेतील मराठा वर्चस्व अबाधित ठेवले.सवाई माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सात आठ महिने तुरूगवासही भोगला. सरदारांवर नानांचा वचक भारी होता. कारण वेळ पडली तर नाना स्वत: आघाडीवर येत. त्यांच्यापासून फ़ितुरी लपून रहाणं अशक्य असायचं. नानांचं गुप्तहेर खातं कमालिचं उत्तम होतं. याविषयीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत.
बदामीच्या लढाईत बरेच दिवस वेढा पडूनही किल्ला हाताशी लागेना तेंव्हा एका रात्री स्वत: नाना लष्करातील व्यवस्था पाहण्यासाठी वेष बदलून बाहेर पडले.
पटवर्धनांच्या तंबूत परशुरामभाऊ आणि इतर सरदार बुध्दीबळ खेळत होते. नानांनी हे पाहिले आणि त्यांनी हे पहाताना भाऊंचे लक्ष त्यांच्याकडे गेले. लगेचच सर्वसरदाराम्नी एकत्र बसून हल्ल्याची व्युहरचना केली आणि लवकरच किल्ला सर केला. टिपुवरच्या या पहिल्या लढाईत मराठ्यांनी मोठा विजय मिळवला होता.
नानांनी पुण्याचा कायापालट केला. त्याकाळातही जे कमालीचं सिटिप्लॅनिंग त्यांनी केलं ते वाचून थक्क व्हायला होतं आणि हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
पुण्यात आयुष्य घालविलेल्या नानांचे सातार्यात मेणवलीत दफ़्तर होते. या वाड्यात कमिशनच्या तावडीतून सुटलेल्या अनेक कागदपत्रांचा इतिहासाचार्य राजवाडे यांनी अभ्यास करून मोलाची माहिती इतिहास अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
नानांचे वारसदार या वाड्याचे जतन करत असून येत्या वर्षात हा वाडा म्हणजे आठवणी आणि माहिती यांचं संग्रहालय बनणार आहे. या वाड्यात नानांच्या कार्यापासून, पेशवाईतील महत्वाचे दस्तावेज, नानांच्या वस्तु, चित्रे यांचं जतन केलं जाणार आहे.
–
हे ही वाचा – या ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.